आठवणीतील वाजे विद्यालय.......!🌹भाग-३

🌹आठवणीतील वाजे विद्यालय.......!🌹
भाग-३               (सिन्नर)

शब्दांकन ✒️– एस. व्ही. कदम (सर)

             मविप्र संस्थेचे सिन्नर येथील लोकनेते शंकरराव बाळाजी विद्यालय ग्रामीण भागात इतर शाखेत सेवा करणाऱ्या सेवकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र असायचे. मविप्र समाजातील इतर शिक्षकाप्रमाणे मी देखील या गोष्टीला अपवाद नव्हतो. वाजे विद्यालयाबाबत मला नेहमीच उत्सुकता येथे कार्यरत असलेल्या, माझ्या मित्रांकडून विविध उपक्रम किंवा वैशिष्ट्यपूर्ण बाबी मला समजत असत. तालुक्यातील विविध शाखांवर माझी जवळपास आठ वर्षे सेवा झाल्यानंतर माझ्या दृष्टीने स्वप्नवत असलेल्या विद्यालयात मला सेवा करण्याची संधी मिळाली. येथे रुजू झाल्यापासून माझ्यासाठी येथील परिपूर्ण परिपाठ आकर्षण ठरला होता.  त्यात घेतले जाणारे राष्ट्रगीत, प्रार्थनेसह विद्यार्थी दिनविशेष, बातम्या, बोधकथा, वाढदिवसाचे अभीष्टचिंतन इत्यादी उपक्रम खूपच परिणामकारक पद्धतीने सादरीकरणाने  मन प्रसन्न होत असे. येथील परिपाठाबाबत मी सिन्नरहून अध्यापक विद्यालय नांदगाव येथे बदलुन गेल्यावर तेथील माझे जेष्ठ सहकारी श्री.एस. बी.आहेर यांनी मला विचारले “ कदम सर, मला सिन्नरच्या शाळेतील परिपाठासारखा उत्तम परिपाठ इतरत्र कोठेही बघावयास मिळाला नाही. वाजे विद्यालात माझी नांदगाव येथून बदली झाली होती, तेव्हा तेथील शाळेची प्रार्थना खूपच सुंदर होत असायची. त्यामुळे दिवसभर विद्यालयात काम करण्यास उत्साह वाटायचा. मी नांदगाव येथून अप-डाऊन करत होतो. जर एखाद्या दिवशी प्रार्थनेस पोहचत आले नाही तर संपूर्ण दिवसभर कंटाळा यायचा.” याप्रसंगावरून मला वाटते शाळेच्या कामाची सुरुवात सुंदर झाली, तर विद्यालयातील अध्यापानासह बाकी उपक्रम दिवसभर उत्साहात उत्तम होतात. काही अपरिहार्य कारणास्तव जर शाळेचा परिपाठ सदर होऊ शकला नाही तो दिवस कंटाळवाणा वाटत असायचा. येथील शाळेत होणाऱ्या परिणामकारक परीपाठाचा आनंद घेण्याचे भाग्य मला जवळपास पाच वर्षे लाभले. परिपाठातील प्रार्थनेची परिणामकारकता दर्शविणारा एक प्रसंग नेहमीच आठवतो, शाळेच्या मैदानापासून रस्त्याने जाणाऱ्या लोकांना थांबविण्याची क्षमता येथील संगीतमय प्रार्थनेत होती. परिपाठास संगीतमय करण्याची जबाबदारी येथील संगीत शिक्षक श्री. व्ही. एन. जाधव प्रामाणिकपणे पार पाडत असत. येथील शाळा दोन सत्रात भरत असे, तरी देखील दोन्ही सत्राच्या सुरवातीस परिपाठ व शाळा सुटतांना ‘वंदे मातरम’ देखील खूपच परिणामकारक होत असायचे.  त्यांना क्रीडा शिक्षक श्री. घुमरे सरांची तितकीच तोलामोलाची साथ लाभत असे. शाळेतील कोणत्याही कार्यक्रमात संगीत विभाग आपली छाप उपस्थितांवर सोडत असे. श्री. जाधव सरांनी तबला, पखवाज, हर्मोनिअम व इतर वाद्य वाजविण्यासाठी विद्यालयातील अनेक विद्यार्थी तयार केलेले होते. त्यामुळे येथील परिपाठात वाद्यांसह घेतला जाणारा प्रत्येक घटक खूपच परिणामकारक होत असे. संगीत विभागाची जबाबदारी श्री. विलास जाधव सर उत्तम रीतीने पार पडत असल्याचा अनुभव येथे मला आला.  

                     येथील विद्यालयातील क्रीडा विभाग सतत क्रियाशील असल्याचे नेहमीच बघावयास मिळत असे. विद्यालयास अनुभवी व कर्तव्यदक्ष क्रीडा शिक्षकांची मोठी परंपरा लाभली आहे. येथील क्रीडा विभागाची संपूर्ण जबाबदारी आमचे सहकारी जेष्ठ क्रीडा शिक्षक श्री. एन. सी. घुमरे यशस्वीरित्या पार पडली. येथील क्रीडा शिक्षक शारीरिक शिक्षण विषयांच्या सर्व वर्गांच्या तासिका विद्यालयाच्या क्रीडांगणावर होता असत. सर्व क्रीडा शिक्षक पूर्ण वेळ मैदानावर खेळाचे तास उभे राहून घेत असत. खेळाच्या विविध स्पर्धा ठराविक काळात घेतल्या जात असल्या तरी संपूर्ण वर्षभर येथील क्रीडा शिक्षक गरजेनुसार शाळा भरण्यापूर्वी किंवा शाळा सुटल्यावर स्पर्धांची तयारी संबधित क्रीडा शिक्षक करून घेत असत. वैयक्तिक क्रीडा प्रकार व सांघिक क्रीडा प्रकारात तालुक्यात उत्तम यश मिळविण्याची परंपरा दरवर्षी विद्यालयाने जोपासली होती. त्याच बरोबर मविप्र संस्थेच्या मॅरेथॉन स्पर्धेत दरवर्षी यशाची परंपरा या विद्यालयात आहे.  तालुक्यातील विविध स्पर्धांची तयारी करून घेण्याची जबाबदारी येथील क्रीडा शिक्षक श्री. एन. सी. घुमरे, श्रीम. एस. एस. नवले, श्री. एम. एल. नवले, श्री. व्ही. एन. शिंदे, श्री. एम. के. कासार इ. पार पडत असत.विद्यालयात विद्यार्थी संख्या जास्त असली तरी येथील पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा भरण्यापूर्वी, मधल्या सुट्टीत व शाळा सुटल्यावर कोणताही गोंधळ होणार नाही याची दक्षता क्रीडा शिक्षकाबरोबर इतर शिक्षकांवर देखील सोपविलेली असायची. त्यामुळे शालेय शिस्तीचा विद्यालयात कधीही प्रश्न उपस्थित होत नव्हता. विद्यालयात नव्याने आलेले श्री. नवले सर सध्या विद्यालयात राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत मोठे यश मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते. त्याच बरोबर नवले सरांनी नव्यानेच मल्लखांब क्रीडा प्रकारात विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या कष्टाने तयार केले आहे. येथील थोर क्रीडा शिक्षकांची परंपरा जोपासण्याचे काम आजची नवी पिढी देखील करत असल्याचा आंम्हाला निश्चितच आनंद आहे.
  
        येथील कला विभाग विद्यालयाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असल्याचा अनुभव मी घेतला आहे. येथील कला शिक्षक श्री. इ. डी. चव्हाण, श्री. के. आर. गोसावी यांनी हा विभाग अत्यंत जागृत ठेवला होता. त्यांना श्रीम. खालकर, श्री. मिलिंद डावरे यांची उत्तम साथ लाभत असायची. वाजे विद्यालयातील फलक लेखन नेहमीच शिक्षक व विद्यार्थ्यांना नेहमीच प्रेरणादायी ठरत असायचे. फलक लेखनाबरोबर येथील शोकेश नेहमीच बोलक्या असायच्या. त्याच बरोबर संकलित केलेले प्रासंगिक लेख व विद्यार्थ्यांनी लिहिलेले लेख प्रकाशित होत असत. कला विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमामुळे बालवयातच विद्यार्थ्यांना लेखनाची सवय लागत असे. शिक्षकांनी लिहिलेले प्रासंगिक लेख विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा देणारी असायचे. प्रासंगिक फलक लेखन सर्वानाच्याच आकर्षणाचा केंद्र असायचे. कोणत्याही शाळेच्या नावलौकिकात संगीत, खेळ, कला, सांकृतिक विभाग महत्वाचे असतात, त्यानुसार या शाळेतील हे सर्व विभाग शाळेच्या योगदानात महत्वाची भूमिका नेहमीच बजावत असल्याचे आढळते. हे सर्व विभाग शाळेच्या दृष्टीने किती महत्वाची आहेत याचे आदर्श या विभागांनी घालून दिले आहेत. वाजे विद्यालयाच्या नावलौकिकात जवळपास सर्वच विभाग कार्यक्षम असल्याने आपल्यापरीने प्रत्येक विभाग योगदान देत असे.   

            विद्यालयातील सांस्कृतिक विभाग अत्यंत महत्वाचा असतो. या विभागाची जबाबदारी येथील अनुभवी व सांकृतिक कलेचे अंग असलेल्या शिक्षकाकडे प्रमुखपद दिलेले असायचे. बरेच दिवस श्रीम. एस. डी. शिंदे, श्री. व्ही. बी. म्हस्के यांनी ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पडली. त्यांना श्री. बी.आर. कहांडळ , श्री. विलास जाधव, श्रीम. व्ही.डी. सोनवणे, श्रीम. सीमा हांडगे मॅडम, श्रीम. एस. पी. हांडोरे, श्रीम. भागवत मॅडम, श्रीम. जे.के.पाटील, श्रीम. रोहिणी शिंदे इत्यादी शिक्षक सहकार्य करत असत. हा विभाग शालेय दृष्टीने अत्यंत महत्वाचा असल्याने वर्षभरातील दिनविशेष, विविध कार्यक्रम, विविध स्पर्धा, मविप्र सांस्कृतिक स्पर्धा इत्यादीची परिपूर्ण तयारी करून घेण्याची जबाबदारी शाळेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा विभाग करत असायचा. वर्षभर होणाऱ्या विविध स्पर्धेत आपल्या विद्यालयाची छाप सोडण्यात सांस्कृतिक विभाग आगाडीवर असायचा. दरवर्षी मविप्र संस्थेच्या सांकृतिक कला उत्सवात जिल्हा स्तरावर पोहचविण्यात हा विभाग आपली महत्वाची भूमिका पार पाडत असे. हा विभाग कला व संगीत शिक्षकाच्या मदतीने वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील असायचा. त्याच बरोबर विद्यार्थी हस्तलिखित, भित्तीपत्रक, स्काऊट  गाईड जिल्हास्तरीय मेळाव्यातील सांकृतिक कार्यक्रम, स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देशप्रेमावर आधारित गीतावरील नृत्य सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत असे. कार्यक्रमासाठी उपस्थितांच्या कौतुकाचे आशीर्वाद सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाचे होते. अशा प्रकारे विद्यालाच्या नावलौकिकात भर टाकण्याच्या दृष्टीने विद्यालयातील सर्व विभागांना सोबत घेऊन यश संपादन करण्याचे काम हा विभाग करत असायचा.     
               
               येथील विद्यालात प्रत्येक विभाग परिपूर्ण असल्याचा अनुभव आ  ला. मराठी विभाग श्री. एन. वाय. गुळे सरांनी समर्थपणे सांभाळला. विद्यालयातील वक्तृत्व स्पर्धा, समाजदिन स्पर्धा, विविध स्पर्धांची उत्तम तयारी करून घेण्याची जबाबदारी मराठीचे सर्व शिक्षक पार पडत असत. यात पर्यवेक्षक श्री. एम. पी. देशमुख व श्रीम. एस. डी. शिंदे, श्री. एन. वाय. गुळे, श्री. एफ. ए. आहेर, श्री. एम. एल. नवले, श्रीम. एम. आर. मुरकुटे, श्रीम. व्ही. डी. सोनवणे, श्री. डी. जे. म्हस्के, श्री. आर. व्ही. वाजे, श्री. फटांगळे, श्रीम. पोटिंदे मॅडम, श्रीम. व्ही.एस. ठाकरे, श्रीम. भागवत मॅडम, श्रीम. जे. के. पाटील  व मराठी विषय शिक्षकांचे योगदान महत्वाचे असायचे. सर्व भाषा विषयाचे शिक्षक भाषा विषयाच्या अध्यापनाबरोबर सामाजिक शास्त्र विषयाचे अध्यापन देखील करत असायचे. सामाजिक शास्त्रे विभाग प्रमुख श्री. डी. डब्ल्यू. सोनवणे यांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पडली.श्री. एम.एल. नवले, श्री. एफ. ए. आहेर सर , श्रीम. एम.आर.मुरकुटे मॅडम श्री. डी. जे. म्हस्के इ. त्यांना मदत करत असत. त्याच बरोबर तिन्ही भाषा विषयशिक्षक आपल्या मेथडच्या विषयासह सामाजिक शास्त्र विभागाच्या अध्यपन कार्यात सहकार्य करीत असत.
                 हिंदी विषय विभाग प्रमुख श्री. एस. बी. येवले यांच्या कडे जबाबदारी असायची. त्यांना त्याच्या कामात हिंदी  विषय समितीचे सर्व सदस्य सहकार्य करत असत. दरवर्षी ‘हिंदी दिन’ कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयात या विभागा मार्फत उत्तम रीतीने केले जात असयाचे.  येथील मोठा स्टाफ माझ्यासाठी येथील सेवत खूप काही शिकण्याची संधी उपलब्ध करून देत होता. विद्यालयात मला मिळणाऱ्या संधीचा फायदा शक्य असेल तेथे आपल्या कामाचा ठसा उमटविण्याचा प्रयत्न मी करत होतो. सप्टेंबर महिन्यात साजरा होणारा ‘हिंदी दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली होती. त्यानुसार आमचे नाशिक येथे शिकत असतानांचे शिक्षक प्रा. श्री. के. डी. शिंदे यांना बोलविण्यासाठी संपर्क साधला मात्र त्यांनी इतरत्र कार्यक्रमासाठी जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे कार्यक्रमासाठी  प्रमुख पाहुणे म्हणून कुणास बोलवावे यासाठी मी विचार करत होतो. त्यावेळी पर्यवेक्षक श्री. एम.पी. देशमुख सर व श्री. बी. जी.थोरार, श्री.एन.वाय. गुळे सरांनी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका व नाशिक शिक्षण प्रसारक मंडळातील रुग्ठा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम. आशाताई पाटील यांचे नाव सुचविले. त्यांना हिंदी कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून फोन करून पर्यवेक्षक देशमुख सरांनी निमंत्रण दिले, त्यांनी विद्यालयातील कार्यक्रमाचे निमंत्रण त्वरित स्वीकारले त्यांच्या परवानगीने कार्यक्रमाची वेळ ठरली. विद्यालयात नियोजनाप्रमाणे एक तास आधी श्रीम. आशाताई पाटील उपस्थित झाल्या. येथे आल्याबरोबर त्यांनी कार्यक्रमाचे ठिकाण व उपस्थितांचा वयोगट याविषयी आमच्याकडे माहिती विचारली. मी विचारलेल्या माहिती संदर्भात विचारणा केली असता त्यांनी समर्पक उत्तर दिले. त्या म्हणाल्या ‘ऐसी बात बोलिये, कोई न बोले झुठ, ऐसी जगह बैठीये, कोई न बोले उठ’ त्यांनी संत कबीराच्या दोह्यातून दिलेला संदेश माझ्यासाठी आजही खूप मोलाचा ठरला आहे. त्यांनी आपल्या समोरील उपस्थित श्रोत्यांचा वयोगट विचारात घेऊन आपल्या मनोगताची तयारी केली. हिंदी दिनाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व स्वागत व सत्कार पार पडले. आशाताई यांनी प्रमुख वक्त्या म्हणून पाऊन तासाचा वेळ आमच्याकडे मागितला होता, त्याप्रमाणे त्यांनी जवळपास चाळीस मिनिटात हिंदी दिनाचे महत्व, लहान व मोठ्या वयोगटास संस्कारशील बोधकथा ओघवत्या शैलीत सांगून बाळगोपाळांसोबतच सर्वांचे मने जिंकली. कार्यक्रम वेळेत संपल्यावर मला आशाताईच्या बाबत दोन ओळी आठवल्या ‘बोले तैसे चाले, त्याची वंदावी पाऊले’ ताईचे व्यक्तिमत्व या  उक्तीप्रमाणे असल्याचा अनुभव आम्ही घेतला. शाळेसमोरील रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना त्यांच्या ओघवत्या व प्रभावी मनोगताने थांबविल्याचा प्रसंग बघून आम्ही आवक झालो होतो. ‘हिंदी दिनाचा’ आगळा-वेगळा पार पडलेला हा कार्यक्रम यांच्या उपस्थितीत पार पडलेला कार्यक्रम आज देखील मला आठवतो. ताई नाशिक येथे वास्तव्यास होत्या, तरी त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शनाची मिळालेली संधी आम्हा सर्वांनाच खूप काही शिकवण देवून गेली. येथील विद्यालयात साजरे होणारे प्रासंगिक कार्यक्रम विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांना खूप काही शिकवून जात असायचे. येथील शिक्षक मोठ्या तयारीने आपल्यावर सोपविलेल्या प्रासंगिक मनोगताची प्रभावीपणे अभिव्यक्ती करतांना सर्वांनी अनुभवले आहेत. येथे बहुसंख्य शिक्षकांना व्यासपिठावर बोलण्याची संधी मिळाल्याने त्याच्यात आत्मविश्वास निर्माण होत असे.
या विभागात श्री. एस. व्ही. कदम, श्रीम. राहणे मॅडम, श्री. एम. के. श्रीम. के. डी. निकम, श्रीम.एस. जी. खडांगळे, श्रीम. व्ही.एस. ठाकरे व हिंदी विषयाचे अध्यापन करणारे इतर शिक्षक आपली जबाबदारी उत्तम पद्धतीने पार पाडत असत. 
                 
            इंग्रजी विभाग प्रमुख म्हणून श्री.बी. आर. कहांडळ सरांनी ही जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळली. येथील इंग्रजी विभाग अत्यंत व्यस्त असायाचा, इयत्ता दहावी व इतर वर्गांचे इंग्रजी विषयाचे स्पर्धा परीक्षेचे जबाबदारीने तास घेण्याचे काम श्री.बी. आर. कहांडळ, श्री. एम. वाय. कणसे, श्री. के. एस. नवले, श्री. व्ही. बी. म्हस्के , श्रीम.सीमा हांडगे मॅडम , सौ. व्ही.डी. सोनवणे, श्री. बी. एस. देशमुख, श्री. बी. एच. सहाणे, श्रीम. देवकर मॅडम, श्री. शंकपाळ सर इत्यादी इंग्रजी शिक्षक योग्य प्रकारे पार पडत असत. एवढेच नाही तर इयत्ता दहावीचा इंग्रजी विषयाचा विद्यालयात उत्तम निकाल लावण्याची परंपरा इंग्रजी विभाग आपल्या अथक परिश्रमातून करत असल्याचे अनुभवयास मिळाले.  
                   येथील गणित व विज्ञान विभाग देखील खूपच क्रियाशील होता. पाचवी ते दहावी पर्यंत संस्थेच्या विविध स्पर्धा परीक्षाची तयारी येथील गणित शिक्षक करून घेत असत. गणित विभाग प्रमुख म्हणून श्री. बी. जी.थोरात सरांनी उत्तम प्रकारे जबाबदारी पार पडली. शालेय स्तरावर होणाऱ्या बाल विज्ञान परिषद, तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन व जिल्हा विज्ञान प्रदर्शन, इंस्पयार अवार्ड  इत्यादीची तयारी दोन-तीन महिने पूर्वी पासून विद्यालयातील मुख्याध्यापक व इतर पदाधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान शिक्षक श्री. बी. जी. थोरात, श्री. टिळे सर, श्री. एस. आर पगार, श्री. जी. बी. मोरे, श्री. डी. एच. चांदोरे, श्री. जी. एस. खैरनार, श्री. भागवत आरोटे, श्री. जे. एन. बडवर, श्री. एस. के थोरात, श्रीम. एस. पी. हांडोरे, श्री. व्ही.एन.शिंदे, श्री. एन. आर. आहेर, श्री. एस.पी.भोई, श्रीम. सोरते मॅडम,  श्री. कल्पेश चव्हाण, श्री. डी. टी. पांगारकर, श्रीम. निखाडे मॅडम, श्रीम. वैष्णव मॅडम, यांच्यासह सर्व विज्ञान शिक्षक पार पडत असत. तालुक्यात सेमी इंग्रजीचे वर्ग सुरु झाल्याबरोबर पहिला वर्ग वाजे विद्यालयात देखील सुरु करण्यात आला होता. येथील सेमी इंग्रजीचे वर्ग यशस्वीरित्या चालविण्याचे दिव्य विज्ञान विभागाने पार पडल्याचे मी बघितले आहे. गणित व विज्ञान अध्यापन सेमीच्या वर्गाना इंग्रजी माध्यमातून करावे लागत असे. विज्ञान विषय मराठी माध्यमाच्या शिक्षकांना खूप मोठे आव्हान होते, हे कठीण असलेले आव्हान पेलण्याचे काम श्री. बी.जी. थोरात सर, श्री. डी.एच. चांदोरे सर, श्रीम. एस.पी. हांडोरे, श्री. जे. एन. बडवर, श्री. एन. आर. आहेर, श्री. कल्पेश चव्हाण,  श्री.डी. टी. पांगारकर, श्रीम. वैष्णव मॅडम व त्यांच्या सहकारी शिक्षक मित्रांनी  यांनी पार पाडले. तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात येथील विद्यालयाने अनेकवेळा बक्षिसे प्राप्त केली आहेत. विद्यालय देखील विज्ञान प्रदर्शनासाठी खर्च करतांना संपूर्ण सहकार्य करीत असायचे.श्री.लुटे मामा श्री. नामदेव म्हस्के मामा, श्री. डी.आर.देवरे मामा विज्ञानप्रयोग शाळा सहायक म्हणून आपले योगदान देत असयाचे. येथील विज्ञान प्रयोग शाळा अद्ययावत असल्याने विद्यार्थी विविध विषयाचे प्रयोग येथे उत्साहात करत असत. परिणामी विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी पुढे अकरावीसाठी विज्ञान शाखा निवडत असत. येथील विद्यालातून मिळालेल्या सर्वांगीण ज्ञानाच्या जोरावर वेगवेगळ्या क्षेत्रातील अतुच्य शिखरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पादाक्रांत केलेली असल्याचे दिसते. येथील विज्ञान शिक्षकांना इतर तालुका व जिल्हा विज्ञान प्रदर्शनात परीक्षक म्हणून श्री. भागवत आरोटे, श्री. जी. एस. खैरनार इ. यांनी ही जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली आहे.
                येथे सेवेत असतांना मला आलेला अनुभव- प्रथमसत्र परीक्षेचे पर्यवेक्षण करण्यासाठी मी मला मिळालेल्या ब्लॉक वर गेलो. माझ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्या जवळ पेपर लिहिण्याचे साहित्य बरोबर ठेवण्याची  व या व्यतिरिक्त असलेले बाकी साहित्य वर्गाबाहेर ठेवण्याची मी सूचना केली. मी केलेल्या सूचनेचे जवळपास तंतोतंत पालन विद्यार्थ्यांनी केले. मला पेपरच्या वेळी आलेल्या रीलीव्हरने पाच-दहा मिनिटासाठी सोडले होते. त्यानंतर मी पुन्हा माझ्या वर्गावर पर्यवेक्षण सुरु केले. मधल्या वेळेत विद्यार्थ्यांनी संधी साधून थोडीफार लिहिलेल्या कागदांची देवाण घेवाण केली असावी. त्यामुळे एक विद्यार्थी मला पेपरमध्ये पुस्तकाचे  पान ठेऊन लिहित असतांना सापडला. मी त्याला तो काय करतोय? याबाबत विचारणा केली. तो झालेला प्रकार मान्य करायाल तयार नव्हता. त्याला मी थोडी दमदाटी करून बहितली, एवढ्यात मी हात वर करत त्याला मारण्याची भीती घालायला गेलो. माझा हात वर होतच त्याने खिडकीकडे जोरात मान वळविली व  मार चुकविला. मात्र खिडकीचा लोखंडी भाग त्याच्या डोळ्याच्या वर लागला माझा हात त्याला लागणार नाही याची आम्हीं दोघांनी मी दक्षता घेतली. मात्र त्यावेळी वेगळाच प्रकार घडला, थोड्या वेळाने डोळ्याच्या भुवई जवळून रक्ताची धार सुरु झाली. मी जखमेच्या ठिकाणी रुमाल बांधला रक्त थांबत नव्हते. त्याला शिपाई मामा व मी गावठ्यावरील डॉक्टर येवलेकर याच्याकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी ड्रेसिंग केल्याने रक्तस्त्राव थांबला होता. दवाखान्यातून येई पर्यंत पेपरची वेळ संपली होती. तो विद्यार्थी खूप घाबरलेला होता त्यांच्या सोबत येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याला व्यवस्थित घरी घेऊन जाण्यास आम्ही सांगितले. पर्यवेक्षक एम.पी. देशमुख सरांना झालेला प्रकार सांगितला. मात्र घडलेली घटना मला खूपच मनस्ताप देणारी होती. शाळा सुटल्यानंतर माझे सहकारी मित्र श्री. व्ही. बी. म्हस्के सरांना घेऊन संबधित विद्यार्थ्याच्या घरी गेलो. त्याच्या घरी गेल्या नंतर पालक संध्याकाळची वेळ असल्याने पालक गुर-ढोर बांधण्याचे काम करत होते. तो पर्यंत तो विद्यार्थी आला आणि आम्हांला म्हणाला सर “मी घरी खेळतांना पडलो असे सांगितले आहे? मला काय शिक्षा करायची ती तुम्ही करा. मात्र मला कॉपी करतांना तुम्ही पकडले, हे सांगू नका. अशी हात जोडून विनंती केली”. आम्ही म्हणालो “ठीक आहे.” पालक आल्यानंतर आमचे त्यांच्याशी “ बोलणे झाले. पालक म्हणाले “सर, मुलाने आल्याबरोबर खेळतांना पडल्याचे सांगितले. तुम्ही विनाकारण घरी येण्याचा त्रास घेतला.त्याला गावातील मुलं सुरक्षित घेऊन आले होते” आम्हांला तेथून घरी जाण्यास बराच वेळ झाला होता. मला मात्र विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे पेपर लिहिण्यासाठी, केलेल्या प्रयत्नासाठी मनस्ताप सहन करावा लागला. समाधानाची बाब म्हणजे विद्यार्थ्यास झालेली दुखापत जास्त गंभीर नव्हती. त्याच बरोबर त्याच्या डोळ्याला इजा झाली असती तर बाका प्रसंग उपस्थित झाला असता हे देखील तितकेच खरे. सदर विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याने दुसऱ्या दिवशी पेपरला कोणत्याही प्रकारे काही घडले नव्हते अशा अविर्भावात आल्याचे दिसले. विद्यार्थी पेपरला आल्याचे बघून मला देखील खूप समाधान वाटले, त्यामुळे पुढील अनेक प्रश्नांना पूर्णविराम मिळाला होता. असा अडचणीचा प्रसंग कोणत्याही शिक्षकाच्या जीवनात येऊ नये असे मला वाटते. ग्रामीण भागातील पालकांचा शिक्षकांवर असलेला विश्वास येथील शिक्षक सार्थ ठरवीत असल्याने वाजे विद्यालयाचा नावलौकिक आज देखील कायम आहे.

प्रवास माझा.🌹🌹
शब्दांकन-✒️✒️
 श्री. एस.व्ही. कदम
ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, दिंडोरी

Comments