महाविद्यालयीन जीवनातील मित्र...!
शब्दांकन – श्री. संजय कदम
नाशिक येथे श्री. रायते दाजींकडे वर्षभर राहून मी बारावीची परीक्षा मार्च १९८७ उत्तीर्ण झालो. बारावीच्या निकालानंतर के.टी.एच.एम. कॉलेजला प्रथम वर्ष बी.ए.च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. नियमित कॉलेजला करून चांगले गुण मिळविणे हे माझे ध्येय होते. मला राजेंद्र साखरे, विलास कोटमे, बापू दवंगे, बाळू लिलके, सुनील कदम, शशी गोपाळे, सुनील पाटील, किशोर घोलप इ. मित्र भेटले. घरापासून तर कॉलेजहून घरी येई पर्यंत माझे अनेक मित्र सोबत असायचे. सर्व मित्र आर्थिक परिस्थिती बेताची असलेले होते, त्यामुळे बऱ्याच गोष्टीत आमच्यात साम्य होते. यातूनच आमची मैत्री घट्ट होत गेली. प्रत्येक मित्र आपल्या वैशिष्ट्यासह आपले वेगळे पण जपत असे. मात्र शिक्षणाची सर्वांनाच तळमळ होती. आमचा प्रत्येक मित्र शिक्षणासोबत काहीतरी काम करत असे. बारावी पर्यंत बहिण व दाजी अभ्यास करण्याबद्दल सांगत होते, आता अभ्यास कर सांगण्याची गरज पडत नसायची. आपण कोणत्या परिस्थितीत शिकतो आहोत याची आम्ही नेहमीच जाणीव सोबत ठेऊन शिक्षण पुढे जात होते.
आम्ही मित्र समान विचारधारा जपणारे असल्याने आमच्यात कमालीची एकता होती.
प्रत्येकजण कॉलेजला आल्या नंतर आपापल्या तासिका करणार. ज्यांना तासिका नसतील ते सर्व एका ठिकाणी थांबलेले असतील, तासिका बदलल्यावर सदस्य बदलात असायचे मात्र आमचे थांबण्याचे ठिकाण ठरलेले असायचे. कॉलेजला असताना आम्ही दोन गोष्टी कटाक्षाने पाळल्या त्या म्हणजे कॉलेजला वेळेवर जाणे आणि वेळेवर घरी येणे. एखाद्या दिवशी कॉलेजवर जास्त वेळ थांबावे लागणार असेल किंवा इतरत्र जावे लागणार असेल तर तशी कल्पना घरी आम्ही देत असू. ज्याला शक्य असेल तो घरी जावून आपण कोठे जाणार आहोत? याची माहिती घरी देत असत. आमचे सर्वच मित्र विश्वासू, मेहनती, प्रामाणिक, आज्ञाधारक व परोपकारी होते. एकमेकांच्या सुख-दुखात कोणत्याही परिस्थितीत सर्वच मित्र सहभागी होत असत. त्यामुळे दिवसेदिवस आमची मैत्री दृढ होत गेली. सर्व मित्रांच्या घरी आमचे येणे-जाणे असायचे त्यामुळे एकमेकात कौटुंबिक जिव्हाळा देखील निर्माण झाला होता.
आमच्या सर्व मित्रांना नेहमीच हसतखेळत ठेवण्याची जबाबदारी राजेंद्र साखरे कडे होती. आमच्या मित्रांत राजाभाऊ नावाने तो परिचित आहे. राजाभाऊचे वैशिष्ट्ये म्हणजे कितीही गंभीर प्रसंग क्षणात विसरायला लावण्याची कला त्याच्या जवळ आहे. कायम हसतमुख हा आमचा मित्र इतरांच्या मदतीसाठी नेहमीच अग्रेसर असतो. कॉलेजच्या सुट्टी नंतर तो द्वारकेला भावाच्या कुशनच्या दुकानावर थांबून मदत करत असे. मला वाटते कर्मवीर भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यासाठी सुरु केलेली ‘कमवा व शिका’ ही योजना आमच्या सर्वच मित्रांनी अंगीकारलेली होती. पदवी नंतर पोलीस दलात अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यादृष्टीने त्याने तयारी करून यश प्राप्त केले. मात्र ती भरती न्यायालीन प्रक्रियेत अडकली, जवळपास सत्तावीस वर्षापासून अंतिम निकालाची वाट बघणारा आमचा मित्र नाशिक केबल नेटवर्कचे संपादक म्हणून काम बघतो आहे. राजाभाऊ गणपतीचा फार मोठा भक्त असून, गणेशोत्सव काळात स्वत:च्या घरी ‘श्री लालबागचा राजा’ गणेशाची आकर्षक मूर्ती व सुंदर सजावटीसाठी त्यांच्या परिवाराने घेतलेले कष्ट आम्ही प्रसादासाठी गेल्यावर आम्हाला खूपच आनंद देऊन जातात.
आमचा मित्र विलास कोटमे अत्यंत साधा, सरळ व सत्यवचनी असलेला मित्र चांदोरी येथून कॉलेजला येत असे. त्याची खरी ओळख म्हणजे वेळेचा आणि दिलेल्या शब्दाचा अत्यंत पक्का होता. शेतकरी कुटुंबातील असल्याने नेहमीच काबाडकष्ट व धावपळीत व्यस्त असायचा. आई-वडिलांचे शेती व्यवसायातील कष्टमय जीवन जवळून बघितलेले असल्याने नेहमीच त्यांना हातभार लावण्याविषयी धडपडत असे. आमचा हा मित्र. एस. वाय. बी. ए. च्या वर्गात शिकत असतांना पोलीस भरतीसाठी निवड झाल्याने नोकरीस लागला. आपल्या कुटुंबास आर्थिक हातभार लागावा याहेतूने त्याने पोलिसाची नोकरी स्वीकारली. खरे तर आमच्या या सत्यवचनी मित्राचे क्षेत्र चुकल्याचे आम्ही त्याला भेटल्यावर वारंवार म्हणत असतो. आम्ही मात्र मित्रत्वाच्या नात्याने त्याला पदवीचे शिक्षण पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक सहकार्य केले. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्या नंतर पुढील बढतीसाठीच्या परीक्षा देण्याची आम्ही केलेली विनंती विलासने फेटाळली. नेहमी त्याचे उत्तर ठरलेले असते. “आमच्या शेतीची व्यवस्थित घडी बसविल्यानंतर, मला पोलिसाची नोकरी सोडायची आहे.” आम्ही त्याचे बोलणे ऐकून गप्प होत असू कारण असे म्हणतात "पुलीससे ना तो जरुरत से ज्यादा दोस्ती अच्छी होती और ना दुश्मनी..!" आजही हा आमचा सत्यवचनी मित्र तीस वर्षापासून पोलीसदलात आपल्या स्वभावाप्रमाणे प्रामाणिकपणे सेवेत आहे.
विलासची पोलीस दलातील सेवा पूर्ण होवो ही सदिच्छा.
आमचा मित्र रायभान(बापू) दवंगे आपले वेगळेपण नेहमीच जपणारा. बापूने दिंडोरी येथे आपल्या काकांकडे राहून शिक्षण पूर्ण केले. त्याने महाविद्यालयीन शिक्षणात खूपच संघर्ष केला. घरी काम असेलतर काम पूर्ण होई पर्यंत कॉलेजला सक्तीची सुट्टी घेणारा बापू नेहमीच लक्षात राहतो. गैरहजेरीच्या काळात कॉलेजचा अभ्यास आल्याबरोबर पूर्ण करण्यासाठी अपर परिश्रम करणार मित्र अनोखाच होता. आपल्या विनोदी स्वभावाने सर्वाना आपलेसे करणारा, संघर्षमय जीवनाच्या प्रवासात आनंदी रहाण्याचा जणूकाही सर्वाना मंत्र देत असायचा. बापूचे वैशिष्ट्ये म्हणजे त्याला सुंदर हस्ताक्षराचे नसैर्गीक वरदानच लाभलेले होते. त्याच्या सोबत अनेकवेळा मी थिएटरला चित्रपट बघण्यासाठी जात असे. कोणतीही परीक्षा संपली, की त्या दिवशी पेपर संपल्या नंतरचे पुढील सर्व शो चित्रपट बघण्याचा आमचा अलिखित नियम होता. बापू बरोबर खूप चित्रपट बघितले पण त्याच बरोबर अभ्यासही खूप केला.आम्ही वर्गातील एकमेकाचे स्पर्धक होतो, मात्र बराच वेळ अभ्यास सोबत करत असायचो. एकमेकाला मार्गदर्शन करून परीक्षेत कुणालाही जास्त मार्क मिळाले तरी त्यात खूपच थोडे अंतर असायचे. एकमेकांचे अभिनंदन आम्ही खिलाडूवृत्तीने करायचो. अत्यंत कर्मनिष्ठ व हजरजबाबी बापू संघर्षातून शिकलेला असल्याने नेहमीच परिस्थितीचे भान ठेऊन वागत असे. बापूचे जीवन आमच्यासाठी नेहमीच प्रेरणास्थान असायचे. सर्वांच्या हिताच्या गोष्टीत नेतृत्व करण्यात पुढे असायचा. आज मविप्र संथेत हिंदी विषयातील उत्कृष्ट शिक्षक व विद्यालयात एन.सी.सी. विभागाचा प्रमुख म्हणून सातपूर येथे कार्यरत आहे. आपण आपल्या कार्यातून आपली ओळख निर्माण करण्यात बापूला आवडते. याच जोरावर मखमलाबाद येथे सेवेतील जवळपास तेवीस वर्ष सेवा केली. अनेक संस्कारशील विद्यार्थी घडविण्यात आहे.
आमचा मित्र बाळू लिलके सर्व सामान्य कुटुंबातील असल्याने कोणत्याच गोष्टीचा गर्व नसलेले व्यक्तिमत्व. प्रत्येक गोष्ट फारशी गांभीर्याने न घेणारा व दुसऱ्यांना नेहमीच आनंदी ठेवणारा मित्र. कुणावर अन्याय होत असेल तर त्याला ती ठामपणे विरोध करणार. दहीपूल परिसरात राहायला असलेला। बाळासाहेब उंच, मात्र शरीराने सडपातळ व चश्माधारी त्यांना उंचीमुळे आम्ही बऱ्याच वेळा बच्चन म्हणायचो. बाळासाहेब स्वभावाने शांत, मनमिळाऊ, अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक, मितभाषी, विनम्र व परोपकारी स्वभावाने सर्वाना आपले करणारे व्यक्तिमत्व होते. त्यांच्यापासून कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेत असे. कॉलेजच्या सिन्सिअर विद्यार्थ्याचे सर्व गुण त्याच्यात होते. एखादा वादग्रस्त प्रसंग उद्भवला तर तो प्रसंग कुशलतेने हाताळण्यात खूपच आघाडीवर असायचे. दोन्ही मित्रांची समजूत घालण्याचे कौशल्य त्याच्याकडे होते. चांगल्या मित्रत्वाचे सर्व शिष्टाचार बाळासाहेब पाळत असे. अडचणीच्या प्रसंगी इतरांना मदतीसाठी नेहमीच पुढे असत. बाळासाहेबांचे अक्षर सुंदर होते. आज बाळासाहेब सिन्नर येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. मी सिन्नर येथे अनेक वर्ष राहायला होतो, एक दिवस तहसील कार्यालयात जाण्याचा योग आला. बाळासाहेब जेव्हा माझ्या बरोबर कार्यालयातून बाहेर आले तेव्हा त्यांच्या सोबत असलेली असंख्य माणसे त्याचा लोकसंग्रह करण्याची कला स्पष्ट करून गेला.
सुनील (बंधू) कदम आमच्यातील एक आगळे-वेगळे व्यक्तिमत्व. सुनील सर्व सामान्य कौटुंबिक परिस्थितीतून शिक्षण घेणारा आमचा मित्र आहे. सुनील नेहमी भाऊ शब्दाने इतराशी बोलताना सुरुवात करत असे. त्यामुळे सर्व त्याला बंधू म्हणूनच ओळखत असत. सुनील मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने सर्वच मित्रांशी त्याचे खूप चांगले संबध होते. आमच्या मित्रामध्ये बंधू स्वभावाने शांत, स्पष्ट वक्ता, प्रामाणिक, जबाबदार, मेहनती होता. सर्वांच्या सुख-दुखात सहभागी होण्यात सुनील आघाडीवर असायचा. सर्व मित्राची आस्थेने चौकशी करून प्रत्येकाला आपलेसे करत असे.आमच्या इतर मित्रांप्रमाणे आपल्या अभ्यासाकडे नेहमी लक्ष देत असे. चांगले गुण मिळविण्यासाठी त्याची धडपड चालू असायची. इतर कौटूंबिक जाबाबदऱ्या तो कुशलतेने पार पाडत असे. सुनील आमच्या सर्व मित्रांचा आदर करत असे. त्यामुळे त्याला देखील सर्व मित्रांमध्ये आदराचे स्थान प्राप्त झालेले होते. उंच असलेल्या सुनीलला रुबाबदार शरीरयष्टी लाभलेली होती. पोलीस दलास साजेसे व्यक्तिमत्व सुनीलला लाभलेले आहे. सुनील पोलीस दलात कार्यरत असून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहे.
आमचा मित्र शशीभाऊ गोपाळे हसतमुख व्यक्तिमत्व होते. आमच्या मित्रांमध्ये एकत्रित आल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या विनोदावर दिलखुलासपणे भरपूर वेळ हसण्यासाठी आमचा शशीभाऊ प्रसिद्ध होता. मित्रांमध्ये प्रसंगी विनोद करण्यात तो आघाडीवर असायचा. आसामचे सर्व मित्र कोण केव्हा आला? कोठे गेला? यावर शशीभाऊची नजर असायची. सर्व मित्रांना एकत्रित ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असे. मित्रामध्ये दुरावा निर्माण होणार नाही याची काळजी शशीभाऊ घेत असे. आमच्या इतर मित्रांप्रमाणे त्याला देखील शिक्षण घेत असताना संघर्ष करावा लागला होता. सर्व मित्रांसारखी साधी रहाणी असलेला, सर्वाशी मिळून-मिसळून राहणारा सर्व मित्रांचा आवडीचा होता. शशीभाऊ उत्साही, प्रचंड उर्जा असलेला, प्रामाणिक, मेहनती इ. गुण असलेला मित्र होता. मित्राच्या सुख-दुखात सहभागी होण्यात पुढे असायचा. सर्व मित्रांची काळजी घेणारा शशीभाऊ अत्यंत दिलदार मित्राप्रमाणे आजही वावरत असतो
आमच्या मित्रांच्या सहवासात पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक मित्र आपापल्या परीने नोकरी, व्यवसाय व इतर कामधंदा शोधण्याचा प्रयत्नात राहिला. आपल्याला मिळालेल्या जबाबदारी बरोबरच कौटुंबिक जबाबदारी आल्याने भेटीगाठी कमी होत गेल्या. मात्र तंत्रज्ञानाच्या युगात पुन्हा सर्व मित्र आम्ही एकमेकांशी जोडले गेलो ही बाब आमच्यासाठी खूपच आनंददायी आहे.
Comments
Post a Comment