नांदगाव भाग-5
🌹आठवणीतील नांदगाव.....!🌹🌹🙏 भाग-5
(अ.वि.दक्षिण भारत सहल भाग-1)
✒️शब्दांकन-✒️श्री.एस.व्ही.कदम(सर)🌹🌹
माध्यमिक विभागात माझ्या जवळपास बारा-तेरा वर्षाच्या सेवेत शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्याची संधी मला काही ठिकाणी प्रत्यक्ष मिळाली होती. सन 2006 मध्ये अध्यापक विद्यालय, नांदगाव येथे माझी नियुक्ती झाली होती. तेव्हापासून येथील विद्यालयाचे वनभोजन किंवा पाक्षिकांतील छोटी सहल सोडली तर इतरत्र दूर अंतरावर सहल गेलेली नव्हती. मात्र अध्यापक विद्यालय, नांदगाव येथे प्राचार्यपदी श्री. शाम पाटील सरांची पदोन्नतीने फेब्रुवारी 2008 मध्ये नियुक्ती झाली होती. श्री. शाम पाटील सर आणि विविध सहलींचे आयोजन असे समीकरणच यापूर्वी झालेले असल्याचे मी ऐकलेले होते. सरांच्या नांदगाव येथील आगमना बरोबरच सहलीच्या विषयांने मोठा जोर पकडला होता. आमच्या विद्यालयातील छात्राध्यापक देखील देखील प्रवेश घेतल्यापासून सहल काढण्यासाठी आग्रही होते. श्री. श्याम पाटील सर दूर अंतरावर रेल्वेने विद्यार्थ्यांना आगळ्यावेगळ्या व शैक्षणिक दृष्ट्या चांगली माहिती मिळविण्याच्या हेतूने सहलीचे आयोजन करण्याच्या विचारात होते. त्यानुसार त्यांनी उत्तर भारतात सहल काढण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रत्येक शिक्षक व आमचे प्राचार्य आवश्यक ती माहिती देत होते. एप्रिल महिन्यात काही विद्यार्थ्यांनी सहलीचे पैसे जमा केले होते. परंतु विद्यार्थी संख्या कमी असल्याने जून नंतर सहलीचे नियोजन करण्याचे ठरले. त्यानुसार जून मध्ये कॉलेज सुरू होताच विद्यार्थ्यांचे व सहलीत सहभागी शिक्षकांचे रेल्वेप्रवासाचे रिझर्वेशन करण्याचे काम डॉ.श्री. बी.के.पवार व श्री.एस.जे. शिंदे सरांनी मनमाड येथे आपला बहुमोल वेळ खर्च करून करून घेतले. जुलै 2008 मध्ये आमच्या विद्यालयाची सहल जम्मू काश्मीर-वैष्णव देवी- वाघा बॉर्डर-अमृतसर- दिल्ली-मथुरा -आग्रा दर्शन या मार्गावर यशस्वीरित्या जाऊन आली होती. यापूर्वीच माझ्या कौटुंबिक सहलीचे याच मार्गावर नियोजन झाले असल्याने, प्राचार्यांची इच्छा असून देखील मी या सहलीत सहभागी झालो नव्हतो. त्यामुळे प्राचार्यसाहेब माझ्यावर बरेच रागावले व नाराज होते त्यांना पुढील सहलीत सहभागी होण्याचे मी आश्वासन दिले होते.
प्राचार्य साहेबांनी पुढील सहलीचे नियोजन माझ्याकडे व श्री. बी.डी. बाराहाते, श्री.एस.जे. शिंदे आमच्यावर सोपवले होते. त्याप्रमाणे आम्ही दक्षिण भारत सहलीच्या तयारीला लागलो होतो. आमच्या विद्यालयाची शैक्षणिक सहल डिसेंबर-जानेवारीमध्ये दक्षिणा भारतात घेऊन जाण्याचे नियोजन केले होते. मात्र या नियोजना बरोबरच विद्यार्थ्यांच्या आर्थिक सहभागाचा देखील विचार होणे गरजेचे असते. दूरवर जाणाऱ्या सहलीसाठी खर्च देखील अधिक येत असतो. त्यामुळेच पुरेसे विद्यार्थी सहलीत सहभागी होण्यासाठी अधिक कालावधी लागत असतो. बहुसंख्य विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याने बरेचसे पालक आपल्या मुलींना सहलीस दूरच्या अंतरावर पाठविण्यासाठी तयार नसायचे. पालकांचे योग्य समाधान झाल्यानंतर बरेच पालक विद्यार्थ्यांना सहलीस पाठविण्यास तयार झाले. जानेवारीच्या अखेरीस सहलीसाठी जाणार्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे रिझर्वेशन यावेळी नांदगाव येथूनच करण्यात आम्हाला यश आले होते. त्यानुसार आम्हाला सहलीसाठी मार्च 2009 मधील पहिल्या आठवडातील तारीख मिळाली होती. आमच्या विद्यालयाची शैक्षणिक सहल मनमाड- हैदराबाद- तिरुमाला-तिरुपती बालाजी-बंगलोर- म्हैसूर वृंदावन गार्डन-अलमट्टी धरण- उटी-परतीचा प्रवास-म्हैसूर-बंगलोर-पुणे- मुंबई नाशिक- मनमाड नांदगाव या मार्गाने प्रवास करणार होती.
सहलीच्या दिवशी प्राचार्य श्री.शाम पाटील सर, डॉ. श्री. बी. के. पवार, श्री.एस. व्ही. कदम, श्रीम. ए. के. महाले, श्री. बी. डी. बाराहाते, श्री. एस.जे.शिंदे व श्री. व्ही.एस. कोल्हे, शाम काकांचे बंधू अध्यापक विद्यालयात उपस्थित होतो. दूरच्या अंतरावरील विद्यार्थी दुपारी पाच वाजताच विद्यालयात पोहचले होते. बाकी विद्यार्थी सहा वाजेपर्यंत विद्यालयात सूचनेप्रमाणे हजर झाले. नांदगाव येथून मनमाडकडे जाण्यासाठी रेल्वे नसल्याने मिळेल त्या साधनाने मनमाडला जाण्यास आम्ही निघालो. आम्ही सहलीच्या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन सायंकाळी सात-साडेसात वाजता मनमाड रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. आमच्याकडे बराच वेळ असल्याने मनमाड रेल्वे स्टेशनवरच सोबत घेतलेल्या सहभोजनाच्या आस्वादाने सहलीचा श्रीगणेशा झाला. यानंतर आम्ही रात्री आठ वाजेपर्यंत प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर पोहचलो. साडे आठच्या दरम्यान अजंता एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर येऊन थांबली. यापूर्वीच सर्व विद्यार्थ्यांना आम्ही रेल्वे प्रवासामध्ये घ्यावयाची काळजी या संदर्भात जबाबदारीने कडक शब्दात सूचना केल्या होत्या. आम्हा शिक्षकांना रेल्वे प्रवासाचा रोजचा अनुभव प्रवासात खूपच उपयोगी ठरत होता. प्रत्येक गटप्रमुख शिक्षक आपल्या गटानुसार रिझर्वेशन असलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था झाली असल्याची खात्री आम्ही करून घेतली. मनमाड वरून रात्री नऊ वाजता अजंता एक्सप्रेस (सिकंदराबाद)अर्थात हैदराबाद कडे रवाना झाली.
सहलीचे सर्व रेकॉर्ड सांभाळण्याची जबाबदारी श्री. वाल्मिक कोल्हे मामा यांनी सांभाळली होती. रात्रीचे साधारणत: दहा-साडे दहा वाजले असतील, यादरम्यान रेल्वेचे तिकीट चेकर आमच्या पर्यंत पोहचले. सहलीच्या रेल्वे प्रवासाचे राजिस्टरची मागणी त्यांनी आमच्या कडे केली. त्यांनी मागितलेली प्रत्येक गोष्टीची पूर्तता आम्ही शांततेने करत होतो. रेल्वे टी. सी.आम्हाला म्हणाले, "एक विद्यार्थिनी (कदाचित नाव स्मिता गंडे असावे) सहलीच्या सवलतीसाठी वय जास्त असल्याने अपात्र असल्याचे सांगितले." आम्ही मात्र त्यांना "याबाबत आम्हाला काही माहिती नसल्याचे सांगितले. रिझर्वेशन करतांना आम्हाला तसे काहीच सांगण्यात आले नाही ?" असा प्रश्न केला. बराच वेळ चर्चा करून देखील काही एक निष्पन्न झाले नाही. रेल्वे टी.सी. ने मात्र दंड म्हणून साडे तीनशे रुपये दंडाची पावती आमच्या हातात दिली. आमच्याकडून पैसे वसूल करून आपली कर्तव्यनिष्ठतेची झलक आम्हाला दाखविली. यावरून पुढील प्रवासातील अडचणींचा थोडासा अंदाज आम्हाला आला होता. औरंगाबाद येई पर्यंत आमच्या सहलीची सुरुवात दंड भरून झाली. रात्रीचा प्रवास सुरु होता, स्लीपर कोच रिझर्वेशन असल्याने आम्ही विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी वारंवार आवाहन करत होतो. आमचा हेतू इतर प्रवाशांना आपल्या विद्यार्थ्यांच्या वागण्याने कोणताही त्रास होऊ नये. रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत स्लीपर कोचमध्ये झोपण्याची वेळ रेल्वेने निश्चित केलेली केलेली असते. सकाळी हैदराबाद येथे पोहोचल्यावर सहलीचे प्रेक्षणीय ठिकाणे दिवसभरात उत्साहाने बघणे शक्य होईल, मात्र विद्यार्थ्यांचा सहलीतील अति उत्साहाने त्यांना रात्री कदाचित झोपू दिले नसावे. सकाळी सर्व विद्यार्थ्यांना झोप येऊ लागली होती, यातच आम्ही साधारणतः सकाळी साडेसात-आठ वाजता आम्ही सिकंदराबाद येथे पोहोचलो.
सिकंदराबाद (हैदराबाद) येथील भव्य रेल्वे स्टेशन, तेथील स्वच्छता व शिस्तबद्ध रेल्वेचे व्यवस्थापन बघून आम्ही सर्वच आश्चर्यचकीत झालो. आम्ही विद्यार्थ्यांना रेल्वे स्टेशनवर थांबवून येथील निवास व्यवस्थेसाठी प्राचार्य पाटील सरांसोबत आम्ही काही शिक्षक गेलो होतो. मात्र थोड्याच वेळात रेल्वे स्टेशनवरील रेल्वे पोलिस व टी.सी. यांनी विद्यार्थ्यांजवळ येत रेल्वे स्टेशन मधून आम्हाला बाहेर निघण्याचे आवाहन केले. आम्ही त्वरित बाहेर गेलो नाही, तर दंड आकारण्याची धमकीवजा सूचना केली. खरोखर प्रत्येक गाडी येथून गेल्यावर संपूर्ण रेल्वे स्टेशन रेल्वे प्रशासनाने रिकामे करून घेतले. तेथील स्वच्छता कर्मचारी रेल्वे स्टेशन झाडून पाठीमागे मशीनने स्वच्छ करत होते. तेथील रेल्वे स्टेशनवर प्रत्येक गाडी येऊन गेल्यानंतर स्टेशनची स्वप्नवत स्वच्छता तेथे आम्हाला बघायला मिळाली. स्टेशनबाहेर आम्ही एका मोकळ्या ठिकाणी सर्व विद्यार्थी व शिक्षक थांबलो. निवासाची व्यवस्था झाल्याने आम्ही त्यांना तेथे घेऊन गेलो. विद्यार्थ्यांनी निवासाच्या ठिकाणी अंघोळी केल्या. तेथेच नाश्ता आटोपुन आम्ही हैदराबाद दर्शन करण्यासाठी निघालो. सायंकाळ पर्यंत आम्ही येथील सुप्रसिद्ध चारमिनार, जामा मशीद, मोती व सौंदर्य प्रसादनांचा बाजार इत्यादी सर्वच प्रेक्षणीय ठिकाणे बघितले. सायंकाळी गोवळकोंडा किल्ल्यावर अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजातील निवेदनासह किल्ल्यावरील माहितीपटातुन आम्हाला हैदराबाद शहराची ऐतिहासिक माहिती यातून जाणून घेता आली. रात्री वेळेवर जेवण करून सर्व थकलेले असल्याने शांत झोपले. पुन्हा सकाळी लवकर उठून हैदराबादचे प्रमुख आकर्षण रामोजी फिल्म सिटी बघण्यासाठी जाण्याची नियोजन होते. नियोजनाप्रमाणे आम्ही रामोजी फिल्मसिटीच्या गेटवर गेल्यानंतर बुकिंग करून घेतले. आम्ही रामोजी फिल्म सिटीच्या बसने प्रवास करत परिसरातील वेगवेगळ्या वैशिष्टपूर्ण ठिकाणांना भेटी देऊन जास्तीत जास्त मनोरंजनासह आनंद प्राप्त करुण घेत होतो. टी.व्ही. वरील विविध मालिका व चित्रपटाचे शूटिंगमध्ये दाखविलेली रेल्वेचा प्रवास, विमान प्रवासाचे दृश्य, चित्रपटातील हाणामारीचे प्रसंग, टांग्यातील प्रवास, साहसी दृश्य इत्यादी कसे फसवे असते? याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी जाणून घेतला. त्याचबरोबर इतर मनोरंजक गोष्टीचे व गार्डन मधील खेळण्याचा आनंद लुटला. संपूर्ण दोन दिवसात हैदराबाद शहरातील महत्त्वाचे पर्यटन स्थळांना भेटी देऊन सायंकाळच्या जेवनासह रात्री दहा वाजता आम्ही पुढील प्रवासासाठी रेल्वे स्टेशन वरून तिरुमालाच्या दिशेने प्रवासास निघालो.
आज मात्र दिवसभराचा प्रवास व प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन सर्वच थकलेले असल्याने स्लीपर कोचचा खऱ्या अर्थाने झोपण्यासाठी विद्यार्थ्यांनी उपयोग करून घेतला. रात्रीचा प्रवास गाढ झोपेत झाल्याने लॉजिंगचा खर्च व वेळ वाचला. मात्र रात्रीच्या प्रवासात काही विद्यार्थी/विद्यार्थिनींनी फोन चार्जिंगसाठी दरवाजा जवळ उभे राहून जास्तीतजास्त वेळ सोबत घालवत बेशिस्त वर्तन करत होते. आम्ही रात्री अधून-मधून विद्यार्थ्यांकडे चक्कर मारत आमचे कर्तव्य पार पाडत होतो. याबाबत आम्ही सर्वानाच सूचना केल्याने पुढे पुन्हा सूचना करावी लागली नाही. सकाळी तिरुमला येथे पोहोचताच फ्रेश होऊन आम्ही सर्वांनी मराठमोळी नाश्त्याचा आस्वाद घेतला. आम्ही येथील बस स्थानकातून बसद्वारे श्री. क्षेत्र तिरुपती देवस्थान येथे जाण्यासाठी प्रवास सुरु केला. प्रवासाच्या रस्त्यातील घनदाट झाडी वळणावळणाचा रस्ता , काही ठिकाणी पोटात गोळा उठविणारा प्रवास, कधी सुखद अनुभव देणारा तर कधी चिंतेत टाकणारा दीड-दोन तासांचा प्रवास काही विद्यार्थ्यांना थोडया फार उलटीचा झालेला त्रास सहन करत नाही म्हटले तरी निर्विघ्न पार पडला. देवस्थान परिसरात पोहोचल्यानंतर आम्ही तिथे निवासासाठी देवस्थानच्या कार्यालयात नोंदणी करून निवासासाठी खोल्या ताब्यात घेतल्या. सर्व विद्यार्थी व शिक्षक एकमेकांच्या संपर्कात राहतील, कुणीही संपर्कातून दूर जाणार नाही याची काळजी घेतली . येथे मिळालेल्या रूमवर सोलर सह गरम पाण्याची व्यवस्था असल्याने तेथे सर्वांनीच मनसोक्त आंघोळी केल्या. त्यानंतर श्री तिरुपती बालाजी देवस्थानच्या महाप्रसादालयातील विनामूल्य भोजनाचा (भंडाऱ्याचा) स्वाद स्वाद घेतला. काहीवेळ विश्रांती घेतल्यानंतर येथील प्रसिद्ध श्री तिरुपती बालाजी देवस्थानच्या दर्शनासाठी भल्यामोठ्या रांगा व टप्याटप्याने शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांना सोडण्याची पद्धती देवस्थानच्या व्यवस्थापनाच्या कार्यकुशलतेचा परिचय देऊन गेली. श्री.क्षेत्र बालाजीच्या दर्शनाने आम्ही सर्वच भारावून गेलो होतो. तेथील नयनरम्य परिसराचे चित्र आजदेखील डोळ्यासमोर उभे राहते. येथील देवाचे दर्शन आटोपल्यावर वडीलधाऱ्यांचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. त्याप्रमाणे आमच्या विद्यार्थ्यांनी सर्व गुरुजनांचे दर्शन घेतले. येथेच शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांनी ही देवाचाप्रसाद, बालाजीची माहिती असलेली सीडी, फोटो इत्यादी खरेदी केली. मंदिरातून परतीचा प्रवासात येतांना मोफत भंडाऱ्याचा अर्थात भोजनाचा आस्वाद घेतला. येथील निवासस्थानात सर्व सुविधा उत्तम असल्याने सर्वांनी रात्रीची निवांत झोप घेतली. सकाळी शिक्षक व विद्यार्थी श्रीक्षेत्र तिरुपती बालाजी येथे केसदान केल्याने पुण्य प्राप्त होते. अशा काही आख्यायिका आम्ही यापूर्वी ऐकलेल्या होत्या. आम्हाला प्रवासास निघतांना केसदान करण्याचे अनेकांनी आम्हाला मोफत सल्ला दिला होता, त्यानुसार आम्ही शिक्षकांनी सकाळी लवकरच नंबर लावून केसदान केले. मात्र श्री.श्याम काकांनी मी सर्वात शेवटी केसदान करतो म्हणून स्वतःची कुशलतेने सुटका करून घेतल्याचे आज ही आठवते. केसदाना बरोबर आम्ही डोक्यावरील भार कमी झाल्याची अनुभूती घेतली. आमच्या सोबत काही विद्यार्थ्यांनी देखील केसदान केले. येथील केसदानाबाबत अनेक श्रद्धा व अंधश्रद्धेचा विचित्र पण आम्हाला आनंद देऊन गेलेला अनुभव आम्ही घेतला होता. येथील निवासाच्या ठिकाणी माफक दरात उत्तम सुविधा असल्याने जास्त दिवस थांबून येथील नैसर्गिक संपन्नतेचा व पर्यटन स्थळांचा आनंद घ्यावा असे सर्वांना वाटत होते, परंतु वेळ कोणासाठी थांबत नसते.
आमच्या सहलीच्या नियोजनानुसार आम्हाला येथील पर्यटन स्थळांना वेळेत भेटी देणे आवश्यक होते. त्यानुसार आम्ही दुसऱ्या दिवसाच्या प्रवासाचे नियोजन करण्यासाठी धावपळ संध्याकाळ पासूनच करत होतो. शेवटी येथे बाहेरील पर्यटकांसाठी महिंद्रा कमांडर जीप व्यतिरिक्त प्रवासाचे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. आम्ही जवळपास साठ पेक्षा अधिक संख्येने असलेले विद्यार्थी व शिक्षक गटागटाने विभागून गाड्यांमध्ये बसून प्रवासास सज्य झालो होतो. आपल्या गटातील विद्यार्थ्यांची काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित शिक्षकावर होती. येथील परिसरातील प्रेक्षणीय ठिकाणे उंच पर्वतावर जाण्यासाठी असलेले वळण घाटाचे अरुंद रस्ते याचे आव्हान होते. सर्व पर्यटनस्थळांना भेटी देऊन आल्यानंतर आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. श्रीक्षेत्र तिरुपती येथे जवळपास दोन दिवसात आम्ही श्री भगवान बालाजी देवाच्या मंदिरात जाऊन दर्शनाचा लाभ घेतला
होता. येथील नियोजित देवदर्शन व पर्यटन स्थळांना भेट देऊन आंम्ही पुढील प्रवासासाठी तिरुमाला रेल्वे स्टेशनकडे मार्गस्थ झालो....!🌹🌹
क्रमशः
🌹🌹प्रवास माझा🌹🌹
✒️शब्दांकन-✒️✒️🌹🌹
श्री. एस.व्ही.कदम(सर)
ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, दिंडोरी
Comments
Post a Comment