वाजे विद्यलाय-१
आठवणीतील वाजे विद्यालय.......!
भाग-१
शब्दांकन – संजय कदम (सर)
मी जनता विद्यालय, डुबेरे ता. सिन्नर येथे कार्यरत असतांना मला एक दिवस सिन्नर येथील वाजे विद्यालयात बोलविण्यात आले. तेथे आल्यावर समजले की सिन्नर येथील लोकनेते शंकरराव. बाळाजी वाजे विद्यालयातील हिंदीच्या शिक्षकांची पर्यवेक्षकपदी नेमणूक झाल्याने, त्या जागेवर माझ्या नावाची विद्यालयाने शिफारस केली होती. मला विचारणा झाल्यावर मी येथील माझ्या जेष्ठ मार्गदर्शक मित्रांशी चर्चा करून त्वरित होकार दिला. डुबेरे येथील माझ्या शाळेवर 1 एप्रिल 2002 पासून ज्ञान समृद्धीचे इयत्ता दहावीच्या वर्गाचे तास नियमित सुरु होते. 10 एप्रिल 2002 रोजी माझी नियुक्ती मविप्रच्या तालुक्यातील सर्वात मोठ्या विद्यालयात हिंदी शिक्षक शिकविण्यासाठी झाली होती. माझ्या दृष्टीने ही खूपच अभिमानाची बाब होती, त्याच बरोबर मोठ्या शाळेवर काम करण्याचे आव्हान माझ्या समोर होते. जनता विद्यालय, डुबेरे येथून मला कार्यमुक्त होतांना येथे केलेल्या तीन वर्षाच्या सेवेतील कामातून मिळालेली आत्मीयता खूपच मोलाची होती. आजही येथील विद्यार्थी आत्मीयतेने माझी चौकशी करतात, डुबेरे येथील सेवेची पावतीच म्हणावी लागेल...!
सिन्नरच्या लोकनेते शं. बा. वाजे विद्यालयात रुजू होण्यासाठी मी कार्यालयीन वेळेपुर्वीच पोहचलो होतो. विद्यालयात रुजू होण्यासाठीची सर्व प्रक्रिया कार्यालयात पूर्ण करून मी येथे रुजू झालो. विद्यालयाची भव्य इमारत, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, दोन पर्यवेक्षक, आतापर्यंतच्या माझ्या सेवेतील संख्येने मोठा स्टाफ, भव्य कार्यालय, दहावीच्या वर्गातील मोठी विद्यार्थी संख्या माझ्यासाठी चकित करणारेच होते. विद्यालयात इयत्ता दहावीचे येथे पाच वर्ग होते, एक वर्ग सेमी इंग्लिश व हिंदी/संकृत संयुक्त असलेला होता. त्यातील तीन वर्गांचे हिंदी विषयाचे अध्यापन माझ्याकडे देण्यात आले होते. येथील पर्यवेक्षक श्री. एम.पी. देशमुख सर, जेष्ठ शिक्षक श्री. बी.जी. थोरात सर यांनी विद्यालयातील माझे काम मला समजून दिले. त्यानुसार विद्यालयात माझे अध्यापनाचे नियमित कामकाज सुरु झालेले होते. त्याचवेळी विद्यालयातील आम्हां सर्व शिक्षकांना सिन्नर परिसरातील चौथीचे वर्ग असलेल्या प्राथमिक शाळेत जाऊन पाचवीसाठी नवीन प्रवेशासंबंधी सूचना करण्यात आल्या. त्यानुसार श्री. व्ही. बी. म्हस्के सर व माझ्याकडे पास्ते रोडवरील जि. प. प्राथ. शाळा, झापवाडी व सरदवाडी येथील चौथी पास विद्यार्थ्यांचे जास्तीतजास्त प्रवेश विद्यालयात करण्याची सोपविलेली जबाबदारी आम्ही यशस्वीरित्या पार पाडली. जून २००२ मध्ये शैक्षणिक वर्ष सुरु होताच माझ्याकडे नववी ‘इ’ चा वर्गशिक्षक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. माझ्या वर्गात कुंदेवाडीचे जास्तीतजास्त विद्यार्थी होते, यावर्गाचे वैशिष्ट्ये म्हणजे बहुतेक विद्यार्थ्यांचे सुंदर व सारखेचअसलेले हस्तक्षर कुतुहलाचाच भाग होता. हे कुंदेवाडीच्या प्राथमिक शाळेतील गुरुजींनी लेखन कौशल्य विकसनासाठी घेतलेल्या कष्टाचे फळ असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. हा वर्ग खूपच शिस्तप्रिय, मेहनती व सूचनांचे पालन करणारे होते. मी वर्ग शिक्षक असलेल्या वर्गात आनंदा नाठे, रुपाली माळी हे विद्यार्थी प्रमुख होते.
मी यापूर्वीच्या सेवेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण काम केले होते, मात्र यापूर्वी केलेल्या कामापेक्षा येथील कामाची पद्धती, शिस्त, शहरी भागातील सुशिक्षित पालकांची विद्यार्थी, प्रत्येक काम वेळेवर करण्याची सक्ती, दहावीसाठी रविवारी होणारी सराव परीक्षेचे आयोजन, वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन, विविध प्रशिक्षणाचे आयोजन, संस्थेची प्राथमिक शाळा, आय. टी. आय. इत्यादी बाबी माझ्यासाठी नवीनच होत्या. यापूर्वीच्या शाळापेक्षा वेगळे काम करण्याचा माझा मानस होता. येथे नवीन वेळापत्रकात मला आठवी ते दहावीच्या वर्गांचा संगणक विषय शिकविण्यासाठी मिळाला होता. माझ्यासाठी ही नवीन जबाबदारी होती, यापूर्वी मी संगणक विषय शिकविलेलेला नव्हता. मात्र माझे मित्र व मार्गदर्शक श्री.बी. आर. काहंडळ सर व लिपिक रमेश गाडे भाऊसाहेब यांनी संगणक हाताळणीची प्राथमिक माहिती दिल्यावर माझे टाईपिंग परीक्षा झालेल्या असल्याने मला बाकी गोष्टी अडचणीच्या वाटल्या नाहीत. संगणकावर नवनवीन गोष्टी मी प्रायोगिक तत्वावर करतानाच शिकत गेलो. थोड्याच दिवसात विद्यालयाच्या दहावीच्या सराव परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याचे कौशल्य मी आत्मसात केले. विद्यालयाचे पदाधिकारी मला नेहमीच प्रोत्साहन देत असल्याने मला नवनवीन प्रयोग करण्यास बळ मिळत गेले. बीजगणित व भूमिती सारख्या विषयांची पेजमेकर मध्ये प्रश्नपत्रिका करण्याचे जरा कठीण असलेले ज्ञान मी प्राप्त केले. यानंतर विद्यालयात होणाऱ्या घटक चाचणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका देखील संगणकावर टेन्सील कट करून करू लागलो. माझ्या थोड्या प्रयत्नात शाळेचे पैसे वाचविल्याचा आनंद मला मिळू लागला होता. मी विद्यालयात थोड्याच दिवसात स्वत:ला पूर्णवेळ शाळेच्या संगणकशी निगडीत कामात गुंतवून घेतले होते. त्यासाठी बाहेरगावी सेवा करतांना प्रवासासाठीचा लाहणारा वेळ मी विद्यालयाच्या कामासाठी वापरण्याचा निश्चय केला होता. त्यानुसार मी शाळा भरण्यापूर्वी एक-दीड तास आधीच जात असे. कधी-कधी शाळा सुटल्यानंतर जास्त वेळ थांबण्याचा प्रसंग देखील येत असायचा. मी आता रिक्त तासिकांच्या वेळी मी स्टाफ रूम मध्ये थांबण्याऐवजी संगणक कक्षात थांबत असायचो. विद्यालयाचे परीक्षेचे अतिरिक्त काम करत असतांना मी माझे अध्यापनाचे तास कधीही चुकवत नसे. येथील कामामुळे माझी विद्यालयात एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. येथे काम करतांना मला अनुभव आला की, 'व्यक्ती पेक्षा, काम श्रेष्ठ' आपल्या क्षेत्रात स्थान निर्माण करण्यासाठी कर्मनिष्ठता महत्वाची असते.
वाजे विद्यालयात काम करत असतांना मुख्याध्यापक श्री. आर. बी. देवरे सर, श्री. पगारे सर, श्री.एम. बी. शिंदे सर, श्री. जाधवराव सर इत्यादीचे मार्गदर्शन लाभले. तसेच पर्यवेक्षक श्री. एम. पी. देशमुख सर, श्रीम. एस. डी. शिंदे, श्री. बी. जी. थोरात, श्री. अशोकराव गोवर्धने सर, व माझे जेष्ठ मार्गदर्शक श्री.जी.बी.मोरे, श्री. बी. आर. कहांडळ, श्री. जी. एस. खैरनार, श्री. व्ही. बी. म्हस्के, श्री. भागवत आरोटे यांनी शाळेतील उपक्रमांना योग्य प्रसिद्धी मिळणे देखील महत्वाचे असल्याचे सांगितले. त्यानुसार आम्ही शाळेतील प्रत्येक उपक्रमाची बातमी तयार करून सिन्नर येथील प्रत्येक दैनिकांच्या विभागीय कार्यालयात पोहचविण्याचे काम करू लागलो. सर्वच दैनिकांच्या विभागीय कार्यालयातील प्रमुखांनी व सहकारी स्टाफने आमच्या विद्यालयाच्या बातमीस प्राधान्याने प्रसिद्धी देऊन मोलाचे सहकार्य केले. शाळेच्या प्रसिद्धी विभागाची जबाबदारी शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर सोपविलेली जबाबदारी मी यशस्वीरित्या पार पाडली. दररोज विद्यालयातील प्रत्येक उपक्रम वर्तमानपत्रातून सिन्नर तालुक्यात पोहचत होता. त्याच बरोबर पालकांची विद्यालयाकडून अपेक्षा वाढत गेली. पालकांच्या मागणी नुसार सेमी इंग्रजीच्या तुकड्या वाढत गेल्या, त्या प्रमाणे विद्यालयाने सुविधा उपलब्ध करून दिल्याने इयत्ता पाचवी व आठवीसाठी नवीन प्रवेशाची अडचण देखील दूर झाली. सिन्नर येथे काम करत असतांना दैनिक देशदूत, दैनिक गावकरी, दैनिक लोकमत, दैनिक सकाळच्या विभागीय प्रमुखांनी केलेले अनमोल सहकार्य महत्वाचे ठरले. सिन्नरचे पत्रकार श्री. विलास पाटील याचे बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य नेहमीच प्रेरणादायी ठरले. त्यामुळे वाजे विद्यालयात प्रसिद्धी विभाग सांभाळताना मला कोणतीही अडचण आली नाही.
विद्यालयात काम करतांना एकदा मला वेगळ्याच प्रसंगाला सामोरे जावे लागले. इयत्ता नववीच्या सेमी इंग्रजी असलेल्या वर्गात अध्यापनाचे सुरु होते. अचानक काही तरी उचलून खाली जोरात ठेवल्याचा आवाज येत असायचा. बऱ्याच दिवसापासून हा उपक्रम शिक्षकांच्या तासिकांना सुरु असल्याचा शिक्षक दालनातील चर्चेतून मला माहित झाले होते. वर्गअध्यापनात शिक्षक फलकलेखन करतांना ही गोष्ट सफाईदार पद्धतीने पार पडली जात असे. हा वर्ग अत्यंत हुशार विद्यार्थ्यांचा होता, या वर्गात तालुक्यातील सिन्नर येथे राहणाऱ्या शिक्षकांची हुशार पाल्य मोठ्या संख्येने होते. मी फलकलेखन करतांना वस्तू आपटल्याचा आवाज झाला, मी विचारणा केली मात्र कुणीही मला प्रतिसाद दिला नाही. मी पुन्हा फलकलेखनासाठी वळलो आणि त्वरीत मागे वळून बघितले असता बेंच उचलून ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना पकडले. सदर विद्यार्थ्यांना मी केलेल्या वात्रातपणा बद्दल समज देत वर्गात दोन-चार फटके मारून, तास संपल्यावर वर्गाहून निघून आलो. मी चांगल्या हेतूने शिक्षा केली असल्याने ही घटना विसरून गेलो. दुसऱ्या दिवशी माझ्या स्टाफ मेम्बरचा मुलगा देखील यात सहभागी असल्याने त्यांनी आपल्या पाल्याच्या चुकीच्या वर्तनाचे समर्थन करत मी केलेल्या शिक्षेची तक्रार शाळेच्या पदाधिकाऱ्यांकडे केली. माझे सहकारी शिक्षक मला म्हणाले, ‘आता तुझी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे व मविप्र तालुका संचालक साहेबांकडे तक्रार करून बदली होणार आहे.’ मी उत्तरलो 'ठीक आहे.' मला विद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांनी बोलावून घेतले, वर्गातील घडलेला प्रसंग मी कथन केला. तक्रारदार शिक्षक पालकांनी माझी तक्रार केलेली होतीच, मात्र पर्यवेक्षकांनी त्यांना जर शाळेचे नियम तुमचा पाल्य पाळणार नसेल तर तुमच्या पाल्यास इतरत्र प्रवेश घ्या म्हणून सांगितले. मात्र येथे मला स्टाफ मेम्बरचा 'आपला तो बाब्या, दुसऱ्याचा तो कारट्या' हा अनुभव खूप काही शिकवून गेला. मी माझ्या कामाच्या पद्धतीत कोणताही बदल न करता काम सुरूच ठेवले. थोडक्यात सत्याची बाजू घेणारे पदाधिकारी येथे मला लाभल्याने अध्यापनाच्या कामाचा व इतर सहशालेय उपक्रम सहभागी होण्याचाआनंद मला लोकनेते शंकरराव वाजे विद्यालय, सिन्नर येथे मिळाला.
क्रमश:
🌹प्रवास माझा🌹
✒️शब्दांकन-✒️
श्री. एस. व्ही. कदम(सर)
अध्यापकाचार्य
ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, mvpnd
Comments
Post a Comment