आठवणीतील डुबेरे,....! भाग-1

आठवणीतील डुबेरे.....!✒️🌹 
          भाग -1

शब्दांकन ✒️श्री.एस.व्ही. कदम

          मविप्र सेवेत असतांना माझी नायगाव येथून बदली झाल्याने जून १९९९ मध्ये जनता विद्यालय, डुबेरे  ता. सिन्नर येथे मला उपशिक्षक पदावर सेवा करण्याची संधी मिळाली. सिन्नर पासून ठाणगाव रोडवर साधारणतः सात-आठ किलोमीटर अंतरावर घनदाट झाडीत डुबेरे गाव वसलेले आहे. श्रीमंत बाजीराव पेशव्यांची जन्मभूमी म्हणून या गावाला ऐतिहासिक ओळख असली, तरी अनेक वैशिष्ट्ये लाभलेले डुबेरे सिन्नर तालुक्यात आपले वेगळेपण जपण्यात यशस्वी ठरले आहे. थोर राजकीय व ऐतिहासिक वारसा असलेले गाव, भाजीपाला उत्पादनाचे प्रमुख केंद्र,  शेतातून भाजीपाला थेट नवी मुंबईला पाठविणारे गाव, शेती सोबतच शेती पूरक व्यवसाय करणारे गाव, भैरवनाथ ग्राम दैवत असलेले गाव, भाविकांचे श्रद्धास्थान सटवाईचे भव्य मंदिर असलेले गाव, डुबेरे गडावर सप्तशृंगी देवीचे मंदिर असलेले गाव, पंचक्रोशीतील सर्वच दृष्टीने महत्वाचे गाव, भोपळ्याचे झाड असलेले गाव, घनदाट चिंचबनाचे गाव, सुंदर नक्षीकाम असलेले जैन मंदिराचे गाव, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रयोग करणारे गाव, शैक्षणिक व सांस्कृतिक समृद्ध वारसा असलेले गाव, देश सेवेतील सैनिकांचे गाव, धार्मिक सलोखा जपणारे गाव, प्राथमिक केंद्र शाळेचे गाव, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे सहकारी पतसंस्था, लोकनेते शंकरराव  बाळाजी वाजे सहकारी पतसंस्था शेतकऱ्याच्या अर्थवाहिनी म्हणून एक वेगळाच आदर्श सहकार क्षेत्रात घालून देणारे गाव. गावात असलेल्या पतसंस्था पंचक्रोशीत व परिसरात अनेक समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन वेळोवेळी करत असतात.

             जनता विद्यालय, डुबेरे येथे बदली झाल्याने, मी शाळेत रुजू होण्यासाठी गावातील बर्वे वाड्यात शाळेच्या कार्यालयात गेलो. जिन्यातून  वाकून व थोड्या अंधारातून जातांना ऐतिहासिक वास्तूत प्रवेश केल्याचा अनुभव अदभुतच होता. त्याच वेळी माझ्यातील नम्रता व सतर्कता गुणांचा संस्कार जागृत झाला. मुख्याध्यापक श्री. मेतकर सरांनी मला बोलावून माझी ओळख करून घेतली. मला सांगितले की “सर आपली शाळा दोन ठिकाणी भरते, त्यामुळे तुम्ही कोणत्या ठिकाणी काम करणार?” माझे उत्तर तयारच होते “आपण, सांगाल तेथे मी काम करेल.” सरांनी मला दोन्ही ठिकाणी काम करण्यास सांगितले. कार्यालयीन बाबींची पूर्तता करून मी विद्यालायात रुजू झालो. मुख्याध्यापकांच्या सुचनेप्रमाणे मी गावाबाहेरील वर्गावर मधल्या सुट्टीपर्यंत काम करत असे, मधली सुट्टी संपताच गावातील वर्गावर अध्यापनाचे काम करत. तसेच गावातील विद्यालयात काम करणारे काही शिक्षक मधल्या सुट्टी नंतर गावाबाहेरील वर्गावर अध्यापन करायचे.  गावाबाहेरील इमारतीचे काम विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. एस. एम. कोकाटे हे काम बघत असयाचे. त्यांचाकडून  अध्यापनाचे वर्ग व विषयांचे वेळापत्रक मिळताच माझी कामकाजास सुरु झाले. डुबेरे येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वाड्यातील शाळेत भरलेल्या वर्गात अध्यापनाचे दूर्लभ भाग्य, ज्या काही शिक्षकांना लाभले होते, त्यात असल्याचा मला देखील निश्चितच अभिमान आहे.

                मी यापूर्वी संस्थेच्या नैताळे, मनेगाव व नायगाव येथील विद्यालयात सेवा केली, तेथील शाळेतील काही उपक्रम राबविण्याचा विचार माझ्या मनात होता. डुबेरे येथे येतानाच माझे सेवेतील पाच वर्षे जवळपास पूर्ण झाल्याने, अनेक अनुभव देखील सोबतीला होते. माझ्या मनातील विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी अनुभवाचा मला उपयोग होणार होता. त्यासाठी विद्यालयाच्या कामकाजाचे सुरुवातीचे काही दिवस मी बारकाईने निरीक्षण करत होतो. शालेय परिपाठ वाद्याशिवाय होत असल्याचे लक्षात आले. शाळेचा परिपाठ वाद्यवृंदासह व्हावा असा विचार माझ्या मनात आला. यासाठी आवश्यक साहित्य असल्याची खात्री करून घेण्यासाठी ही बाब मी जेष्ठ शिक्षक श्री. दातीर सरांना सांगितली, त्यांनी  मला संपूर्ण साहित्य उपलब्ध होईल असा विश्वास दिला. मी “गरज ही शोधाची जननी आहे.” नुसार प्रार्थनेसाठी शाळेतील एक पखवाज किंवा तबला वादक विद्यार्थ्यांच्या शोधात होतो. हा शोध घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या गावातील भजनी मंडळात काही शालेय विद्यार्थी सहभागी होतात का? याचा शोध सुरु केला. यासंदर्भात चर्चा करून एक दिवस विद्यालयातील भजनी मंडळात थोडेफार वाद्य वाजविण्यासाठी सहभाग घेत असलेला एक विद्यार्थी शोधला. हा विद्यार्थी भजनी मंडळात उपस्थित असायचा. या विद्यार्थ्यास मी विचारले, “तुला कोणते वाद्य वाजवता येते?” हा विद्यार्थी विद्यालयात पाचवीच्या वर्गात नव्यानेच प्रवेशित  झालेला असल्याने माझ्याकडे बघत थोडेसे स्मितहास्य केले. मी त्याला म्हटलो की, “तुला, आपल्या शाळेच्या परिपाठात हार्मोनियमला पखवाजची साथ करायची आहे.” तर  त्याने “मला, स्पष्ट नकार दिला.” त्याला कारण विचारले असता तो म्हणाला “सर, माझे काही चुकले तर....!” हे ऐकताच माझ्या समोर देखील प्रश्न निर्माण झाला, मी हा विचार आत्तापर्यंत केलेला नव्हता. खरेच जर काही चुकले तर विनाकारण चर्चा होईल. पण मी हिम्मत सोडली नाही. “चुकतो तोच शिकतो” या तत्वानुसार सदर विद्यार्थ्यास विश्वासात घेऊन सांगितले की, “आज आपला परिपाठ वाद्याविना होतो. आपण थोडा सराव करून बघू, जर आपल्याला योग्य वाटले तरच परिपाठात वाद्यवृंदासह घेऊ, जर आपल्याला योग्य वाटले नाही, तर आपण परिपाठ आता घेतो तसाच घेऊ.”  सदर विद्यार्थ्याने संमती दर्शविली. पण आता खरी माझी परीक्षा सुरु होणार होती. मला यातले खूप काही येत होते असे काही नव्हते.  मला माझे मित्र श्री. पी.टी. जाधव सरांचे मार्गदर्शन घेऊन प्रथम स्वतः ह्या गोष्टी शिकायच्या होत्या, त्या शिकल्या नंतर सराव करून ह्या गोष्टी शाळेत करणार होतो. माझा निर्धार पक्का होता, मी सर्वप्रथम हार्मोनियम विकत घेऊन घरी कसून सराव सुरु केला. त्यात वर्षभरापुर्वीच माझ्या डाव्या हाताचे झालेले ऑपरेशन माझ्यासाठी थोड्या फार प्रमाणात अडचण ठरत होते. मात्र छंद जोपासत असतांना अडचणीवर सहज मात करता येते याचा अनुभव मी घेतला.  नंतर शाळेत आम्ही गीतमंच तयार केला त्यात मनीषा ढोली, मनीषा जगधने, वैशाली वाजे, निशा भालेराव, सीमा माळी, साधना माळी, किशोरी मंडलिक,अविनाश वाजे, गणेश जाधव, राहुल अभंग, राजू रुपवते, दत्तू ढोली, सचिन ढोली, गणेश चव्हाण इ. विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सराव सुरु केला. राष्ट्रगीत, प्रार्थना वाद्यासह तालासुरात व्यवस्थित होई पर्यंत सराव सुरु होता. दररोजच्या सरावातून आम्हांला दिवसेदिवस आत्मविश्वास मिळत गेला. विद्यार्थी मात्र कितीही सराव करावा लागला तरी चालेल पण मागे हटण्यास तयार नव्हते. माझ्या प्रमाणेच ते देखील जिद्दीला पेटले होते. माझा देखील स्वतंत्रपणे असे धाडस करण्याचा पहिलाच प्रयत्न होता. परिपाठात राष्ट्रगीत, प्रार्थना हार्मोनियम ढोल-ड्रम व तबल्या सोबत घेण्यासाठी आम्ही सज्यतेने सुरुवात केली. आम्ही आत्मविश्वासाने परिपाठ सादर केल्याने पर्यर्वेक्षकांसह सर्वांनीच आमच्या सर्व टीमचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.आम्ही सादर केलेल्या परिपाठात एक बाब विशेष होती,  आमचा बालमित्र तबलजी गणेश चव्हाण इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणारा होता. शाळेतील इतर विद्यार्थ्यांना देखील वाद्य शिकण्याचे मी वेळोवेळी आवाहन करत होतो. परिणामी विद्यार्थ्यामध्ये संगीत विषयक आवड निर्माण होऊ लागली होती. माझा उपक्रम सुरु करण्याचा हेतू साध्य होण्याच्या दृष्टीने पाऊल पडण्यास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम आम्ही सुरुच ठेवले होते.अविनाश वाजे तबला व राजू रुपवते हार्मोनियमचे शिक्षण घेऊ लागले. मला ही गोष्ट समजल्यानंतर खूप आनंद झाला. अधून-मधून आम्ही सदर विद्यार्थ्यांना परिपाठात सहभागी करून घेत होतो.  कारण ही कला आत्मसात करणारे विद्यार्थी शाळेसाठी भविष्यकालीन मोठी गुंतवणूकच होती. शाळेसाठी एखाद्या शिक्षकाने नाविन्यपूर्ण गोष्ट करण्याचे ठरविले तर त्याला सर्व अडचणी सोडविता येतात हा अनुभव मी घेतला. मात्र माझे प्रयत्न मला योग्य मार्गाने घेऊन गेल्याने माझे ध्येय मला साकार करता आले. आपण नेहमीच  व्यावसायिक अभ्यासक्रमात सुप्त गुणांविषयी वाचतो, ऐकतो, पण हे गुण शिक्षकाचे असो की विद्यार्थ्यांचे त्यांना वाट करून देण्याचे काम आमच्या गितमंचच्या जिद्दी बालकांमुळेच शक्य झाले . या सर्वांचा आज देखील मला सार्थ अभिमान वाटतो. आमच्या या उपक्रमाचे यशस्वीतेचे सर्व श्रेय मी आमच्या पाठीशी असलेल्या सहकाऱ्यांनाच देईल...!
                आता आमचे लक्ष ऑगस्ट महिन्यातील स्वातंत्र्यदिन व समाजादिन कार्यक्रमाकडे होते. त्यासाठी आम्हाला आता विद्यालयाचा गीतमंचची अधिक तयारी करून घ्यावी लागणार होती.  ध्वजगीत व समाजगीत वाद्यासह तयारी माझ्या मित्राकडे जाऊन मी सर्व नोटेशन समजून घेत त्याप्रमाणे सराव केला. विद्यालयात वेळ असेल तेव्हा विद्यार्थासोबत आम्ही सराव सुरु केला होता. अधून मधून मी या क्षेत्रात शून्य पासून सुरुवात केलेली असल्याने आम्ही स्वातंत्र्यदिन विद्यालयात व ग्रामपंचायत कार्यालयात वाद्यासह राष्ट्रगीत, ध्वजगीत सदर केल्याने सर्वांना आनंद झाला. पुढे समाजादिन कार्यक्रम समाजगीतासह यशस्वीरित्या घेतल्याने आमचे सर्वांनी कौतुक केले. मी डुबेरे येथे सेवेत असे पर्यंत प्रत्येक प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्यदिनांसाठी प्रत्येकवेळी नव्याने देशभक्तीपर गीत आम्ही गितमंचच्या माध्यमातून कर्क्रमावेळी सादर करत असायचो. आता पर्यंत मी गितमंचच्या विद्यार्थ्यांना बोलवत असायचो, मात्र गीतमंचचे विद्यार्थी मला  वेगवेगळ्या कार्यक्रमांची आठवण करून देत होते. 
                     शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम घेतला. त्यात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या गो दांड्यावरुन नवरा कुणाचा येतो... या गीतातील नवरदेवाचे पात्र माझ्या डोळ्यासमोर आजही उभे राहते. हे गीत असलेली 'महाराष्ट्राची लोकधारा' सी. डी. मिळविण्यासाठी आम्ही चार -पाच दिवस शोधत होतो. शेवटी आम्हांला नाशिक येथे ही सी.डी. मिळाली. असे अनेक आनंदानुभूतीचे प्रसंग डुबेरे येथे अनुभवास मिळाले. मला या उपक्रमासाठी प्रेरणा व मार्गदर्शन माझे मित्र श्री.पी. टी.जाधव सरांचे मिळाले होते. माझा हा मित्र कोणतेही चांगले काम करण्यासाठी नेहमीच अनेकांच्या पाठीशी उभा राहिला आहे. योगायोगाने आज डुबेरे विद्यालयात माझे कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय व कलाकार मित्र श्री. पी. टी. जाधव सर पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असून, आम्ही सुरू केलेला उपक्रम परिपाठात वाद्यवृंदासह उत्तम होत असल्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत. माझ्या दृष्टीने एवढ्या बारीक गोष्टी लक्षात ठेवणारा माझा मित्र व आम्ही सुरु केलेला उपक्रम आज ही विद्यालयाने सुरु ठेवल्याने सर्वांचेच धन्यवाद .....!
      शाळेत अध्यापना वेळी एक घडलेला प्रसंग मला आठवला. एका विद्यार्थ्याकडे जेवण डबा नव्हता, ही गोष्ट मला त्याच्या मित्राकडून समजली. सदर विद्यार्थ्यास सर्व विद्यार्थ्यांसमोर कारण विचारले, त्याने प्रतिसाद दिला नव्हता मात्र त्याचे काही मित्र हसू लागले. त्याच्या मित्रांना हसण्याचे कारण विचारले की “तुम्हाला, माहित असेल, तर तुम्ही सांगा” एक विद्यार्थी थोड्या घाबरलेल्या स्थितीत उभा राहिला त्याला काही विद्यार्थांनी बोलण्यास विरोध केला. त्या विद्यार्थ्याला म्हणाले "आज शाळा सुटल्यावर तुझे काही खरे नाही." माझा हा प्रकार लक्षात आला मी त्या विद्यार्थ्यास विश्वासात घेतले आणि त्याला म्हणालो “तुला, जे काही माहित आहे ते सर्व सांग,” तो विद्यार्थी थोडे-थोडे बोलू लागला, हे बघताच इतर विद्यार्थी मधेच एक-दोन शब्द बोलू लागले. विद्यार्थ्यामध्ये एक सहज प्रवृत्ती असते की, त्याचे जर एक दुसऱ्याशी पटत नसेल तर सरांकडे तक्रार करण्याची आलेली संधी शक्यतो कुणीही सोडत नाही. येथे ही असेच घडले. एक विद्यार्थी उभा राहिला आणि मला म्हणाला “सर, याला काहीच बोलू नका किवा मारू नका.” मी त्याला विचारले का? त्यावर तो विद्यार्थी म्हणाला “सर, हा आईला सुद्धा मारतो.” वर्गातील सर्व विद्यार्थी आवक झाले.आईने त्याला थोडाफार प्रसाद दिला होता, पण तो शाळेत पळून आला. आई-वडीलांचा मार चुकविण्यासाठी हा विद्यार्थी जेवण डबा घरी सोडून आला. मात्र मी त्याचा यथोचित सत्कार केला.  मी  सदर विद्यार्थ्यास विश्वासात घेऊन झालेला प्रकार विचारला. त्याच्या शेजारी राहणाऱ्या विद्यार्थ्यांनीच बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मी घटनेची सत्यता पडताळून पाहिली, मिळालेली माहिती खरी होती. मी त्याला रागावलो आणि सहजच म्हणालो ‘तुला, मारायचे असेल, तर मोठा झाल्यावर सैन्यात भरती हो आणि पाहिजे तेवढे शत्रू मार...! महाशय आपल्या हातून देशहिताचे तरी काम होईल.” सदर विद्यार्थ्यास कौटुंबिक माहिती विचारल्यावर एक गोष्ट स्पष्ट झाली की, त्याच्या घरातील कौटुंबिक परिस्थिती त्यास जबाबदार होती.  मुले आईला त्रास देतात याची अनेक उदाहरणे मी बघितलेले होते.  मात्र सहावीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याकडून मला असली कृती होईल याची अपेक्षा नव्हती. आपल्या जन्मदात्या आईशी असे वागणे योग्य नाही, यावर एक-दोन उदाहरण देऊन त्याला आई-वडिलांची सर्व जबाबदारी तुझी आहे याची जाणीव करून दिली. त्याचा शेजारील राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मी सांगितले की, याने परत आईला त्रास दिला तर आम्हाला सांगा. जर परत तक्रार आली तर मात्र आम्ही कडक शिक्षा करू का असा दम दिला. मला शाळा भरण्यापूर्वीच काही दिवस यासंबधीची माहिती विद्यार्थी देत होते. मी एका विद्यार्थ्या मार्फत सदर विद्यार्थ्याच्या घरी निरोप पाठविलेला होता, जर सदर मुलाने  पुन्हा काही त्रास दिला, तर पालकांना शाळेत बोलावलेले होते. सुदैवाने पुढील काळात सदर विद्यार्थ्याची घरातील कोणतीही तक्रार आली नाही. सदर विद्यार्थ्यास योग्य वेळी समज दिल्याने पुढील अनेक अनर्थ टाळण्यात आम्हाला यश आले. आर्थिक परिस्थितीमुळे बालवयातील मुलांना हाताळणे आई-वडिलांना अवघड होऊन बसते. शाळेत शिक्षकांनी नाठाळ विद्यार्थ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जर योग्य समुपदेशन व मार्गदर्शन केले तर असे प्रश्न निश्चितच सहजतेने सुटण्यास मदत होते.     

               संस्थेच्या स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरून झालेले होते.  सर्व विषयांचे जादा तास सुरु झाले , त्यावेळी एक शिक्षकांना काही अपरिहार्य कारणास्तव दीर्घ रजा टाकून जावे लागले. पर्यवेक्षकांनी या वर्गाचे स्पर्धा परीक्षेच्या तयारीचे काम इतर शिक्षकाकडे सोपविले होते. शाळेचे वर्ग दोन ठिकाणी असल्याने संबधित शिक्षकास अजून दुसऱ्या वर्गाचे ही जादा तास असल्याने तास घेण्यातही अडचण येत होती.  एक दिवशी संबधित सरांना तासाला येता आले नाही, हे बघून शाळेतील शिपाई श्री. सुदाम वारुंगसे मामांनी मुलांना सहजच विचारले, ”तुमचा, कोणता घटक सुरु आहे? मुलांनी त्यांना घटकाचे नाव सांगितले, त्यांनी मी तुम्हांला हा घटक शिकवून बघतो म्हणून शिकविला देखील. पर्यवेक्षकांना त्यांनी ही बाब सांगितली, त्यांनी देखील खात्री करून घेतली. संबधित विद्यार्थ्यांना वर्गात जाऊन विचारणा देखील केली. विद्यार्थ्यांनी त्याचे शिकवणे समजत असल्याचे पर्यवेक्षकांना सांगितले. सदर वर्गावर अध्यापनात कोणत्याही प्रकारची अडचण नसल्याची सर्वांची खात्री झाली. आपले काम अध्यापनाचे नसतांना ही घरून विषयाची संपूर्ण तयारी करून येणे सोपे काम नव्हते. मात्र अध्यापनाचे स्वीकारलेले काम निष्ठेने पूर्ण करून त्याच वेळी आपले सेवकाचे काम देखील वेळेवर पूर्ण करायचे.  श्री. सुदाम मामा सारख्या सेवकांसोबत सेवा करण्याची संधी मला देखील खूप काही शिकवून गेली. संस्थेकडून स्पर्धा परीक्षेचे वेळापत्रक आलेले होते. संबधित शिक्षकाची दीर्घ रजा संपल्याने ते शाळेवर रुजू झाले. शिक्षक रुजू झाल्यावर संबधित विषयाची तयारी करून घेण्याविषयी पर्यवेक्षकांनी त्यांना सूचना केली. विषय शिक्षक वर्गावर तास घेण्यासाठी जाऊन आलेले होते, काही वेळाने पर्यवेक्षकांकडे संबधित वर्गाचे विद्यार्थी आले आणि म्हणाले की “आमचे सर आम्हाला शिकविण्यासाठी आले आहेत,  संबधित विषय शिकविण्यासाठी आम्हाला आतापर्यंत शिकविणारे शिपाई मामा हवेत.” या प्रसंगावरून आपण जर एखाद्या कामात स्वत:ला झोकून दिले तर आपल्या कामाचे योग्य मूल्यमापन होत असते. यावरून आपल्या संस्थेत  असे काही सेवक कर्मचारी  आज सुद्धा उच्च शिक्षित असल्याने कार्यालयीन कामकाजात योगदान देतातच पण काही वेळा स्वतः जबाबदारी स्वीकारून शालेय प्रशासनास अडचणीच्या वेळी मदत करतात ही बाब आपल्या सर्वांच्या दृष्टीने निश्चितच गौरवास्पद आहे...!

                    येथील विद्यालयात काम करत असताना गावातील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे संथापक मा.श्री. नारायणशेठ वाजे, लोकनेते शंकरराव बालाजी वाजे पतसंस्थेचे संस्थापक, मा. श्री. राजाभाऊ वाजे यांचे विद्यालयास मोलाचे सहकार्य लाभत असते. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अत्तरदे सर,श्री. मेतकर सर व श्री. अमृतकर सर , पर्यवेक्षक श्री. कोकाटे सर व  श्री. चंद्रकांत कानडी सरांचे मला बहुमोल मार्गदर्शन मिळाले त्यासाठी  मी त्यांचे सदैव ऋणी राहील. त्याच बरोबर श्री. सी. एम. दातीर,  श्री. एस. व्ही. रत्नाकर, श्री. बी. एम.पवार, श्री. आर. डी. वाजे, श्री. रामदास ढोली, श्रीम.वामन मॅडम, श्री. पी. आर करपे, श्री. पी. आर. शेळके, श्री. मधुकर कणसे, श्री. आर.ए. पाटील, श्रीम.पाटील मॅडम, श्री. बी.एन वारुंगसे, श्री. खर्डे भाऊसाहेब, श्री. सुदाम वारुंगसे,श्री. अनिल काळे इत्यादीचे मला अनमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले त्याबद्दल मी या सर्वांचाच नेहमी ऋणी राहील...!

क्रमशः

प्रवास माझा✒️🙏
शब्दांकन✒️🌹
श्री. एस. व्ही.कदम(सर)
ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, mvpnd

Comments

Popular posts from this blog

वाजे विद्यलाय-१

महाविद्यालयीन जीवनातील मित्र...!

नांदगाव भाग-5