आठवणीतील डुबेरे......! भाग-2
✒️आठवणीतील डुबेरे.....!
भाग-2
शब्दांकन✒️ श्री. एस. व्ही. कदम(सर)✒️🌹
मी नवीन ठिकाणी बदलून गेलो की, अनेक उपक्रम हाती घेण्याचा माझा मानस असतो. डुबेरे येथे बदलून आल्यावर देखील उपक्रम सुरु करण्याचा माझा संकल्प होता. विद्यार्थी मित्रांशी पहिल्याच दिवशी ओळख परीचय झाला, उरलेल्या वेळेत विद्यार्थ्यांना लेखनासाठी काही वाक्य देऊन व अक्षर तपासले. मी विद्यार्थ्यांना प्रश्न केला “ विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षाच्या जुन्या वह्या घरी आहेत काय?” वेगवेगळी अपेक्षित असलेली व नसलेली उत्तरे मिळाली. मी त्यांना जुन्या वह्या दुसऱ्या दिवशी शाळेत आणण्यास सांगितले. जवळपास सर्वच विद्यार्थी वह्या घेऊन आले होते. मी जुन्या वह्यांचा उपयोग शुद्धलेखनासाठी करण्याचे सुचविले. मला प्रत्येक शाळेत बदली झाल्यावर नेहमीच ऐकावे लागणारे वाक्य येथेही ऐकावे लागले. एक विद्यार्थी म्हणाला “शुद्धलेखन करण्यास आम्ही लहान आहोत काय?” मला तेव्हा कळले की असे काही असते. मी मात्र शुद्धलेखन उपक्रम येथे ही सुरू केला. मी विद्यार्थ्यांना म्हटलो " चांगली गोष्ट शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते!.' मी शिकवत असलेल्या सर्वच वर्गांना शुद्धलेखन उपक्रम अनिवार्य असायचा. यासाठी विद्यार्थ्यांना जुन्या वह्या रद्दीत देण्यापूर्वी त्यातील कोरी पाने काढून, त्यांना शक्य होईल अशी स्वतः वही तयार करण्याची सक्ती असायची. मागच्या वर्षीच्या टाकाऊ रद्दी वह्यांच्या उपयोगीतेचे प्रात्यक्षिक त्यांना अनुभावातून मिळायचे.. “गोष्ट छोटी, पण खूपच मोठा संस्कार देणारी होती.” त्यांना काटकसर व नियमित सरावाचे (अभ्यासाचे) संस्कार येथून मिळत असत....!
या उपक्रमाचा फायदा सर्वच विषयांची तयारी करण्याच्या दृष्टीने होत असायचा. उपक्रमाच्या पहिल्या दिवशीचे हस्ताक्षर व सत्र/वर्ष संपतानाचे हस्ताक्षर यातील फरक मी विद्यार्थ्यांना वर्गात पटवून देत असायचो. मी माझ्या सेवेतील बऱ्याच विद्यार्थ्यांना व माझ्या सहकारी शिक्षकांना त्यांच्या हस्ताक्षरावरून आज ही ओळखतो.. शुद्धलेखनासाठी धडा पहिल्यापासून तर शेवट पर्यंत लिहिण्यास सांगायचो. हुशार विद्यार्थ्यासाठी संपूर्ण वाक्य वाचून लिहिण्याचा भाग असायचा. हा उपक्रम राबविताना गटप्रमुखांना नेमून देत त्यांच्यामार्फत शुद्धलेखन तपासण्याचे काम नियमित होत असे. गट प्रमुखाचे शुद्धलेखन मी स्वतः तपासत असे, गटप्रमुख सोपविलेले काम खूप काटेकोरपणे करायचे. शुद्धलेखनातील चूक शोधण्याचा प्रत्येक गटप्रमुख प्रयत्न करायचा. परिणामी त्याला शुद्धलेखनाचे कौशल्य आत्मसात होत असायचे. मला एका विद्यार्थ्याने दीपावलीच्या सुट्टीपूर्वी सहजच विचारले, सर, सुट्टीत हा उपक्रम सुरु ठेवायचा का?” मी उत्तरलो,” विद्यार्थी मित्रांनो, आपण या काळात जेवण करतो का?” विद्यार्थ्यांना पुढील गोष्ट समजली, आणि हा उपक्रम तारखेनुसार सुरूच असायचा. हा छोटासा उपक्रम विद्यार्थ्यांना यशाकडे घेऊन जाणारा ठरल्याचे अनेक अनुभव मी घेतले आहेत. या उपक्रमातील सहभागी विद्यार्थी आजदेखील त्यांना विद्यार्थी दशेतील नको असलेला शुद्धलेखन उपक्रमाचा झालेला फायदा सांगतात.
दीपावलीच्या सुट्टी पूर्वी विद्यालयातून सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीबाबत सूचना केली. सहल दुसऱ्या सत्रात जरी जाणार असली तरी विद्यार्थी सुपच उत्साहित होते. आमच्या विद्यालयाची सहल डुबेरे-सिन्नर-घोटी- कसारा - पाली– मुरुड- जंजिरा- अलिबाग-पेण- पनवेल-डुबेरे परत इ.भागात जाणार होती. सहलीचे प्रास्ताविक बऱ्याच विद्यार्थांनी यापूर्वीच उत्साहात घरी करून ठेवले होते. सूचना मिळताच काही विद्यार्थी माझ्याकडे आले आणि म्हणाले ”सर, आहाला सहलीला जायचे आहे, मला घरून पैसे मिळत नाहीत.” मी सहजच म्हणालो “सहलीला जायचे, तर आपल्या आईचा विश्वास जिंकायचा असतो, पैसे आपोआप मिळतात.” तेव्हाचा काळ सहलीसाठी बाहेरच्या प्रदेशातील ऐतिहासिक गड, किल्ले, समुद्र व कोकणातील निसर्ग सौंदर्य प्रत्यक्ष बघण्याचा अनुभव मिळविण्यासाठी विद्यार्थी उत्सुक असायचे. काही हुशार विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थितीमुळे सहलीचे पैसे भरू शकत नसल्याने ते निराशा लपवू शकले नाहीत. त्यांची निराशा आम्हाला देखील क्लेशदायक ठरायची. काही विद्यार्थ्यांनी सुट्टीत मोलमजुरी करून तर काहींनी आपल्या स्वत:च्या शेतात मजुरांबरोबर काम करून पैसे जमा केले होते. पैसे भरण्यामध्ये हे विद्यार्थी आघाडीवर असायचे. येथे नकळत परिश्रम व स्वावलंबनाचा संस्कार त्यांच्यावर होत असत.
दीपावलीच्या सुट्टी नंतर सहलीचे पैसे अत्यंत संथ व नंतर जलद गतीने जमा झाले. दोन एस. टी. बसचे विद्यार्थी संख्या पूर्ण झाल्यावर सहलीचा दिवस निश्चित झाला. यानंतर काही विद्यार्थ्यांनी पैसे मिळविले पण त्याच्या पदरी निराशाच आली. मला एक विद्यार्थ्याने या बाबत विचारले की, “सर, आता काही करता येईल का?” काहीच पर्याय शिल्लक नव्हता. आम्ही दोन बस घेऊन नियोजनाप्रमाणे सहलीसाठी निघालो होतो. सहलीत येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन प्रथोमपचार साहित्य, बस प्रवास सहन न होणाऱ्या विद्यार्थ्यासाठी गोळ्या, ओमेटिंगसाठी पुरेशा प्लास्टिक पिशव्या इ. साहित्य सोबत घेतले होते. सहलीला निघण्यापूर्वी आवश्यक सर्व सूचना दिलेल्या होत्या. तरी सर्व सुचानांचे पालन करतील, तर त्यांना विद्यार्थी कोण म्हणेल? सहलीला जायचे म्हटले की, सहलीच्या गाड्या निघे पर्यंत विद्यार्थ्यांचा उत्साह त्यांना झोपू देत नाही. काही विद्यार्थी केलेल्या सूचनेप्रमाणे झोपल्याने त्यांना काहीही त्रास झाला नाही. मात्र प्रवास सुरु होताच काही विद्यार्थ्यांना त्रास सुरु होतो.
शहापूरच्या आसपास असतांना आम्हांला समजले की, एका (पुष्पा ढोली) मुलीची तब्बेत सततच्या उलट्या झाल्याने सिरिअस झाली होती. तिचे शरीर थंड पडल्याने आम्ही सर्वच भयभीत झालो. यावेळी सहल सुरक्षित परत येई पर्यंत असलेली जबाबदारी काय असते? याची चांगलीच जाणीव आम्हाला झाली. हायवेने पुढे जातांना आम्ही डॉक्टरांचा दवाखाना शोधत होतो. एक दवाखाना सुरु असल्याचे दिसला. आम्ही सदर विद्यार्थिनीस उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता डॉक्टरांनी सलाईन द्वारे इंजेक्शनसह उपचार सुरु केले. श्री. सी. एम. दातीर सरांनी या विद्यार्थिनीचा उपचार करण्यासाठी थांबून सहल पुढे घेऊन जाण्याचे सुचविले, पण या गोष्टीस कुणीही तयार नव्हते. श्री. दातीर सर आणि श्री. अनिल काळे दवाखान्यातच थांबले. आम्ही डॉक्टरांचे व्हिजिटिंग कार्ड घेऊन डॉक्टरांना जवळपास असलेल्या प्रेक्षणीय ठिकाणा विषयी विचारले . त्यानुसार आम्ही जवळच असलेले बिर्लामंदिर बघण्यासाठी वेळेचा सदुपयोग केला. तेव्हा मोबाईल फोन नसल्याने डॉक्टरांना दूरध्वनीवर एका कॉईनबॉक्स वरून फोन करण्यासाठी रांगेत उभे राहून नंबर आल्यावर डॉक्टरांशी संपर्क साधला, सलाईन संपल्यावर रिक्षाने सदर मुलीला घेऊन श्री. दातीर सर घेऊन आले. येथे आमच्या घाबरलेल्या स्थितीचा फायदा डॉक्टर घेऊ शकत होते, पण अजूनही चांगले माणसे जगात असल्याची प्रचीती आम्हाला या निमित्ताने आली. आम्ही संकटात असताना भेटलेले डॉक्टर आमच्यासाठी देवदूत ठरले. आमचा पुढील सहलीचा प्रवास सुरु झाला. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सदर विद्यार्थिनीची काळजी घेत इलेक्ट्रोल पावडर पाण्यातून नियमित देत होतो. सर्व विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रवासात काही त्रास झाला तर त्वरित आम्हाला सांगण्याचे आवाहन केले. पालीच्या गणपतीच्या दर्शनाने व महडचे ऐतिहासिक महत्व जाणून घेत आमचा सुरु झालेला प्रवास अडथळ्याशिवाय जंजिऱ्याच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत पोहचलो. किनाऱ्यापासून किल्या पर्यंतच्या बोटीने सागरीसफरीचा आनंद घेतला. समुद्र परिसराचे बारकाईने निरीक्षण व चर्चा करत जंजिरा किल्यापार्यंत पोहचलो. किल्याच्या प्रवेश द्वाराजवळ बोटीतून उतरताना सर्व विद्यार्थी एका बाजूस आल्याने बोट थोडी तिरपी झाल्याने बोटीतील काही विद्यार्थ्यांचे भयभीत झाले होते, मात्र बोटीवरील लोकांचा नेहमीचा अनुभव असल्याने त्यांनी त्वरित सूचना केल्याने पुढील अनर्थ टळला.
सर्व विद्यार्थी बोटीतून सुरक्षित उतरून किल्याच्या प्रवेशद्वारातून आत गेले. किल्याची सखोल माहिती फक्त तेथील गाईड उत्तम रीतीने देतात हा अनुभव असल्याने आम्ही सर्वप्रथम गाईड ठरवून घेतला. गाईडने आम्हाला किल्याची निर्मिती, रचना, झालेल्या लढाया व ऐतिहासिक महत्व इ. बाबी स्पष्ट करून सांगितल्या. येथे पोहोचतांनाच सहलीचे पैसे वसूल झाल्याची चर्चा विद्यार्थी करू लागले होते. समुद्रातील चहुबाजूनी पाण्याने वेढलेल्या किल्ल्याचे सौंदर्य डोळ्यात सामावून घेण्यासाठी सहलीतील प्रत्येक सदस्य प्रयत्नशील होता. आमच्या परतीच्या प्रवासात अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर मनमुराद मौजमस्ती करण्यासाठी मिळालेल्या संधीचा फायदा सर्वांनीच मनसोक्त घेतला. विद्यार्थ्यांनी समुद्राच्या भरती-ओहटीची माहीती श्री. दातीर सरांकडून समजून घेतली. आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. पेण येथे बस मध्ये डिझल भरण्यासाठी आम्ही थांबलो असता तेथे डुबेरे येथील व्यक्ती एस.टी. डेपोत नोकरीला असल्याने श्री.दातीर सरांनी त्यांची भेट घेतली. बस येण्यास वेळ होता तो पर्यंत गणपती मूर्ती बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पेण विषयी थोडी माहिती आम्ही जणू घेतली. बस येताच गणपती बाप्पा मोरयाच्या जोरदार घोषणासह आम्ही परतीच्या प्रवासास निघालो. परतीच्या प्रवासात आम्हास कोणतीही अडचण आली नाही. सहलीचे अनुभव विद्यार्थ्यांना नेहमीच प्रेरणा देण्याचे काम करतात. सहलीत मला सहभागी होण्याची संधी मुख्याध्यापकांनी उपलब्ध करून दिल्याने त्याचा मी आभारी आहे. आपल्या गावातील विद्यालयाची शैक्षणिक सहल जाते समजल्यावर आमचे मित्र श्री. अनिल दादाजी कुंदे यांनी प्रथोमचारचे साहित्य विनामूल्य पुरविले. आमच्या विनंतीवरून विद्यालयास वेगवेगळ्या स्वरुपात मदत केली त्याबद्दल त्याचे आभार....!
डुबेरे येथे सेवेत असतांना येथील दिलखुलास व्यक्तिमत्व, मविप्र संथेचे सभासद व आमचे सर्वांचे मार्गदर्शक माननीय कै.श्री. भाऊराव (भाऊ) ढोली हे शाळेच्या मार्गाने येतांना-जातांना विद्यालयात थांबत असत. त्यांना कितीही घाई असली तरी दोन मिनिटे थांबून शाळेच्या कामकाजाबाबत विचारपूस करणे. समोर असलेल्या शिक्षकांची आस्थेवाईकपणे केलेली विचारपूस, त्याबरोबर परिचित शिक्षकांची केलेली विचारपूस सर्वाना आपले करणारी होती. शाळेतील एखादा विद्यार्थी समोर येताच त्याचे नाव विचारून त्याचे वडील व आजोबाचे नाव सांगत परिवारातील सदस्याची चौकशी चकित करणारी असायची. शाळेतील शिक्षकांना आपलेसे करणारे भाऊ आमच्या सदैव स्मरणात राहतील. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंथेचे संस्थापक मा. श्री. नारायणशेठ वाजे, लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे पतसंस्थेचे संस्थापक मा. श्री. राजाभाऊ वाजे, गावातील मविप्र संथेचे सभासद, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, गावाचे सरपंच व इतर मान्यवरांचे, विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक इत्यादीचे आम्हाला नेहमीच मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले त्याबद्दल आम्ही सर्वांचे सदैव ऋणी असू ....!. प्रा.श्री.रामदास वारुंगसे यांनी मला अडचणीच्या वेळी सहकार्य केले त्यांचा मी आभारी आहे.
डुबेरे येथे सेवा करत असताना शाळेच्या इमारतीचा मुख्य प्रश्न होता. इमारत परिपूर्ण नव्हती तरी माझे सर्व सहकारी मित्र विद्यार्थी घडविण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करत असायचे. आमच्या मुख्याध्यापक व पर्यवेक्षकांनी सोपवलेली प्रत्येक जबाबदारी सर्व शिक्षक प्रामाणिकपणे पार पाडत असत. माझ्या सर्व सहकारी मित्रांनी मला वेळप्रसंगी केलेले मार्गदर्शन व मोलाचे सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. विद्यालयात कार्यरत असताना मला विविध उपक्रम राबविण्यासाठी विद्यार्थी मित्रांचे लाभलेले अवर्णनीय सहकार्य विसरणे शक्य नाही. आम्ही अध्यापनातून केलेले संस्कार आपणास निश्चितच दिशादर्शक ठरतील. विद्यार्थी घडविण्यासाठी मला शक्य असलेले सर्व अथक व प्रामाणिक प्रयत्न करून आपल्या पंखात बळ भरण्याचे भाग्य मला मिळाल्याने मी स्वतःला नशीबवान समजतो.
आपल्या विद्यालायातील विद्यार्थी विविध ठिकाणी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, भुवनेश्वर, गुजरात, नवी मुबंई, संगमनेर, दमन, सिन्नर, डुबेरे इत्यादी ठिकाणी देशाचे रक्षक सैनिक-नितीन पवार,सचिन वाजे, पोलीस अधिकारी गोकुळ वारुंगसे, पोलीस- योगेश, डॉक्टर- भाऊसाहेब ढगे, इंजिनीअर भालचंद्र वारुंगसे, योगेश वाजे, उद्योजक- दांगट बंधू,, लेबर कंत्राटदार-राजू ढोली,, प्राध्यापक- विकास कुंदे, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक- राकेश नन्नावरे, वैशाली वाजे, आशा वाघ, सचिन ढोली, इ. ग्रामसेवक- अनिता माळी, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी-सचिन शिंदे, दूरदर्शन केंद्र- गणेश जाधव, व्यावसायिक- मनोज वाजे, प्रगत शेतकरी मनीषा ढोली, मनीषा जगधने,बँक- किरण गीते, वकील- राजू रुपवते, कंपनीत उच्च पदस्थ- अविनाश वाजे, मंगेश भालेराव, उत्तम गृहिणी-निशा भालेराव,कीर्तन व्यस्थापन राहुलसाळुंके, कंपनी कामगार- असंख्य आहेत, इ. वेगवेगळ्या क्षेत्रात आपण जबाबदारीने आपल्या कर्तृत्वाची यशस्वी पताका फडकविणार असा मला विश्वास आहे. आपले काही विद्यार्थी मित्र कोरोनो पासून इतरांची काळजी घेणारे देशाचे रक्षक म्हणून कार्य करताय त्यांच्या कार्यास सॅल्यूट..! विद्यार्थी मित्रांनो भावी काळात आपल्या हातून देशाची, राज्याची, समाजाची, आई-वडिलांची व गावाची सेवा घडेल ही अपेक्षा व्यक्त करतो. माझ्या येथील सेवेत विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांच्या संपर्कातून मिळालेले अनुभव मला भावी सेवेत उपयोगी ठरतील यात कोणतीही शंका नाही.आपणां सर्वांचे असेच प्रेम व सहकार्य यापुढे ही मिळेल हीच अपेक्षा .....!
जय हिंद.🙏🙏
क्रमशः
प्रवास माझा🌹🙏
शब्दांकन✒️🌹
श्री. एस. व्ही. कदम (सर)
ज्युनिअर कॉलेज ऑफ एजुकेशन,mvpnd
Comments
Post a Comment