आठवणीतील डुबेरे....! भाग-3
✒️आठवणीतील डुबेरे.....! ✒️
भाग३
शब्दांकन श्री.संजय कदम(सर)🌹✒️
डुबेरे येथे सेवा करत असतांना अनेक अनुभव मला येत होते, प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यात नवीन दृष्टीकोन निर्माण करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असायचा. अध्यापन करतांना आशय आणि वास्तविक जीवन यांची सांगड घालण्याचा मी नेहमीच प्रयत्न करतो. डिसेंबर महिन्यात मला भारत स्काउट- गाईड यांच्यावतीने आयोजित प्रशिक्षणासाठी विद्यालयाने पाठविले होते. या प्रशिक्षणासाठी जाण्यास उत्सुक नव्हतो, पण प्रत्येक शाळेतील स्काउट- गाईड अप्रशिक्षित शिक्षकांना सक्तीने प्रशिक्षण घेणे बंधनकारक होते. तसा माध्यमिक शिक्षणाधिकारी साहेबांचा आदेश असल्याने मला प्रशिक्षणासाठी जावे लागले. मनेगाव विद्यालयातून माझे मित्र श्री. एकनाथ खैरनार देखील प्रशिक्षणासाठी माझ्या सोबत असल्याने "एक से भले दो।" नुसार मला त्यांचा सहवास लाभल्याने खूपच आनंद झाला. आमचे प्रशिक्षण भारत स्काउट-गाईड कार्यालय, महामार्ग बसस्थानका जवळ, नाशिक येथे होते. दहा दिवसांमध्ये विद्यार्थ्यांप्रमाणे आम्हांला सर्व तासिकांना उपस्थिती, विविध उपक्रमात सहभागी होणे सक्तीचे होते. या प्रशिक्षणात आम्हीं शालेय जीवनाचा आनंद घेतला. दररोज आम्ही विद्यार्थ्यांना शिकविणारे शिक्षक विविध विषयातील नामवंत व्याख्यात्यांचे विचार ग्रहण करत होतो. या प्रशिक्षणातून आम्हाला देशातील संकटकालीन स्थितीत देशाचे रक्षक म्हणून आमची भूमिका स्पष्ट केली. त्याच बरोबर प्रत्येक स्काऊट मास्टरने सदैव तत्पर, उत्कट देशभक्ती, समयसूचकता, शिस्तीचे पालन, सामाजिक बांधिलकी, सर्व धर्म समभाव, प्रामाणिकपणा, संवेदनाशीलता, वैज्ञानिक दृष्टीकोन, परिश्रमाचे महत्व, काटकसर, भूतदया, स्वावलंबन, स्वच्छतेचे महत्व, आरोग्य विषयक काळजी, मानवतेची शिकवण येथे देण्यात आली.
आमचे दहा दिवसांचे प्रशिक्षण दहा दिवस टेंटमध्ये मुक्कामी राहून पूर्ण केल्यानंतर शेवटच्या दिवशी शानदार समारंभात प्रमाणपत्राचे वितरण केले गेले. प्रत्येक दिवसातील उत्कृष्ट उपक्रमाचे बक्षीस मान्यवरांचे हस्ते मिळविण्यासाठी प्रत्येक ग्रुप उत्साहाने उपक्रमात सहभागी होत असायचे. प्रशिक्षणातील सर्व बाबी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने संस्कारशील होत्या, वेळोवेळी त्यांचा परिचय अध्यापनातून करून द्यायचा होता. दरवर्षी विद्यालयात स्काऊट-गाईड प्रमुख खरी कमाई सप्ताहाचे आयोजन करत असायचे. यातून मिळालेली काही रक्कम भारत स्काउट-गाईड कार्यालयात पाठविली जात असायची. विद्यालयात विद्यार्थ्यासाठी ‘आनंद मेळा’ आयोजित होत असायचा. विद्यार्थ्यांनी या मेळ्यात स्वतः खाद्य पदार्थ तयार करून विकावेत हा मुख्य हेतू असे. वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजक खेळाचे स्टॉल लाऊन विद्यार्थी निधी जमा करायचे. छोट्या वर्गातील विद्यार्थी बाहेरील खाद्य पदार्थांची विक्री करत असत. या उपक्रमात नववीचे विद्यार्थी मोठ्या उत्साहाने भाग घेत असायाचे. कारण दहावीची परीक्षा जवळ आल्याने या उपक्रमातील सक्रीय सहभागातून त्यांना सुट असायची.
अंध व अपंग विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी दरवर्षी निधी संकलन केले जाते. विद्यालयातील विद्यार्थ्यांना कार्ड वाटप करून निधी जमा करण्याचे आवाहन केले जायचे. माझ्या वर्गासाठी देखील सहा कार्ड वाटप करण्यात आले. हा निधी जमा करण्यासाठी विद्यार्थी दारोदार जाऊन पैसे मागतात किंवा आपल्या घरातील वडीलधारी मंडळीकडून पैसे मिळवितात ही गोष्ट मला कधीच आवडली नाही. मी मात्र कार्ड दिल्यानंतर विद्यार्थ्यांना सूचना केली “ कुणीही दारोदार पैसे मागण्यासाठी जाणार नाही, आपण निधी वेगळ्या पद्धतीने जमा करणार आहोत.” आमचे डुबेरेकर मित्र श्री.अनिल कुंदे यांच्या एजन्सीतून होलसेल दराने चॉकलेटच्या एक किलोच्या तीन मोठ्या बरण्या आणून त्याचे समान सहा गटात विभाजन करून दिले. मी सोपविलेले कोणतेही काम विद्यार्थी खूप प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पडतात असा माझा आजपर्यंतचा अनुभव होता. मी आमच्या शिक्षकांसाठी चॉकलेटची खरेदी करून हा उपक्रम सुरु केला. विद्यार्थ्यांना केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन व्हावे ही माझी अपेक्षा होती. त्याप्रमाणे विद्यार्थी मधल्या सुट्टीत किंवा शाळा भरण्यापूर्वी चॉकलेटची विक्री करून पैसे जमवीत होते. यावेळी चॉकलेटचे कव्हर कुणीही मोकळ्या जागेत टाकणार नाही या कडे माझे बारीक लक्ष होते. त्याप्रमाणे कार्यवाही विद्यार्थी करतांना आढळले. स्वत:कडे चॉकलेट असून ते खाण्याची इच्छा झाली तरी विद्यार्थी स्वतःवर नियंत्रण ठेऊ शकतात का? हे तपासण्याचे काम देखील झाले. या उपक्रमातून जबाबदारीची जाणीव, व्यवहार ज्ञानाचा धडा, स्री-पुरुष समानता, कामाचे समान वाटप, परिश्रमाचे महत्व, परिसर स्वच्छता, स्वावलंबन, चिकाटी इ.बाबीची ओळख विद्यार्थ्यांना झाली. अंध-अपंग मदतीसाठी कुणाकडे ही पैसे न मागता विद्यार्थ्यांमार्फत अभिनव उपक्रम राबवून मिळालेला नफ्याची रक्कम जमा करतांना अनेक संस्कार देऊन गेली. नफ्याची जमा रक्कम स्व:कष्टाची असल्याने विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरील आनंद माझ्यासाठी खूप महत्वाचा होता.
प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षण अर्धवट सोडणारी विद्यार्थी बघितले तर मला खूप वाईट वाटते. माझ्या गावात माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्याने अनेक विद्यार्थी सातवी नंतर शेजारचा गावात कमीतकमी पाच-सहा कि.मी. अंतरावर जाऊन शिक्षण घेतात. बहुसंख्य मुलींना जास्त अंतरावरील शाळेत पाठविण्यास पालक तयार नसल्याने त्यांना शाळेला रामराम करण्याशिवाय पर्याय नसायचा. मी माझ्या सेवेतील शाळेत अडचणीतून शिकणाऱ्या विद्यार्थ्याची अधिक काळजी घेत असतो. मी अध्यापन करत असताना ही गोष्ट नेहमीच माझ्या स्मरणात ठेवतो. कोणताही विद्यार्थी शालेय शिक्षण मधेच सोडणार नाही, याची काळजी मी आजही घेतो. दर वर्षी आपल्या समाजदिनाच्या वेळी संस्थेकडून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत दिली जाते. त्यासाठी दोन गटातून विद्यार्थी निवड करण्यासाठी प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थ्यांना आवाहन करून बऱ्याच वेळा सर्वांसमोर पुढे येऊन मदत स्वीकारण्यास विद्यार्थ्यांना कमीपणा वाटतो. शेवटी वर्गशिक्षकांच्या मदतीने संस्थेची मदत गरजू विद्यार्थ्यांना पोहोचविण्याचे काम पदाधिकारी करतात. माझ्यासाठी मदतीची संकल्पना नेहमीच वेगळी होती. “मदत करावी आणि वाटेवर सोडावी” ही परोपकाराची शिदोरी आई कडून मला मिळालेली आहे. ही गोष्ट संधी मिळेल तिथे विद्यार्थ्यांवर बिंबविण्याचा मी प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांनी गरजूंना मदत केली तर त्यामागे कधीच उपकाराची भावना ठेवू नये याबाबत मी त्यांना सूचना केलेली असायची.
माझे वर्गातील व शाळेतील आर्थिक परिस्थिती गरिबीची असलेल्या विद्यार्थ्यांवर नेहमीच बारकाईने लक्ष असायचे. मला त्यासंदर्भात गरज वाटली तर सहकारी शिक्षकांशी चर्चा करायचो. अशा विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण पूर्ण करे पर्यंत सहकार्य करण्याचा आम्हा शिक्षकांचा सामूहिक प्रयत्न असायचा. माझ्या वर्गात आर्थिक अडचण असणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक मदत देण्यासाठी वैशाली वाजे मित्र-मैत्रिणीं गट नेहमीच पुढे असायचा. मी वर्गात नेहमी एखाद्या विद्यार्थ्याची अडचण ही संपूर्ण वर्गाने सोडविण्यास प्राधान्य द्यायचो. “एकीचे बळ” ही संकल्पना मी वर्गशिक्षक असलेल्या वर्गात नेहमीच जोपासण्याचा प्रयत्न व्हायचा. विद्यार्थ्यांना आपण शिक्षणाच्या निमित्ताने ठराविक काळासाठी एकत्र आलो आहोत. पुढील काळात पुन्हा आपली भेट होईल, की नाही याची कुणालाही आज कल्पना नसल्याची जाणीव करून द्यायचो. माझ्या वर्गात कट्टी -बट्टी प्रकार नसायचा, चुकून असे घडले तर सदर विद्यार्थी सर्वांसमोर येऊन त्वरित एकमेकांशी बोलायचे त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसायचा. माझ्या अनुभवाने यात मुलीचीच संख्या अधिक असायची.
कागद बचतीसाठी मी नेहमी आग्रही असायचो, कागद बनविण्यासाठी झाडाचा होणारा उपयोग मी पटवून द्यायचो. वृक्ष तोडीस आपण कसे कारणीभूत ठरतो? याची जाणीव विद्यार्थ्यांना करून द्यायचो. वहीचे कागद फाडले तर त्याचे तुकडे काही वेळाने वर्गात बघावयास मिळायचे. माझ्या वर्ग अध्यापनातून विद्यार्थ्यांना वर्ग, शाळा, घर व गावाचा परिसर स्वच्छतेबाबतच्या सूचना नेहमीच द्यायचो. वर्गातील विद्यार्थ्यांना वहीची पाने फाडण्यास बंदीच असायची. काही कारणास्तव कागद फाडला, तर तो दप्तरात ठेवून घरी कचऱ्यात टाकण्याच्या नियमाचे पालन सर्व विद्यार्थी करायचे. कचरा घरी योग्य ठिकाणी गेल्याने वर्ग स्वच्छतेची काळजी नसे. माझा वर्ग स्वच्छ करण्यासाठी फारसा कचरा नसल्याने सेवक कर्मचारी नेहमीच खुश असायचे. आपल्या सहकाऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद बघण्याची कला मला अवगत होतीच.
विद्यालय सुरु असताना प्रत्येक शिक्षकाला आपल्या अध्यापन तासिका व्यतिरिक्त जादा तासिका घ्याव्या लागतात. प्रत्येक शिक्षक आपल्या सोईनुसार त्यांचा उपयोग करत असतो. मी शाळेच्या दृष्टीने आवशक बाब लक्षात घेऊन या तासिकेचे उपयोग करायचो. काही वेळा शुद्धलेखन, गृहपाठ तपासणे, विद्यालयाच्या मैदानावरील झाडांना पाणी घालणे, गीतमंचच्या विद्यार्थ्यांची नविन प्रार्थना, समूहगीत, इत्यादीचा सराव करून घेत असायचो. शक्य असेल तेव्हा माझ्या विषयाच्या कवितांचे पाठांतर करणे यापैकी गरजेनुसार मी या तासिकांचा वापर करायचो. मात्र यापैकी कोणतीही बाब करण्यासाठी मी विद्यार्थ्याशी सर्वप्रथम चर्चा करून घेत असे. विद्यार्थ्यांना विचारून जादा तासिका कोणत्याही उपक्रमासाठी वापरली तरी विद्यार्थी उत्साहाने सहभागी होत.या तासिका बाबत क्रीडाशिक्षक श्री. नानासाहेब चासकर सरांशी चर्चा करून वापरत असे. पर्यवेक्षक साहेबांनी सुचविलेल्या कामासाठी माझी नेहमीच तयारी असायची. क्रीडाशिक्षक श्री.नानासाहेब चासकर व श्री. आर. ए. पाटील सर नवनवीन उपक्रम सुचवीत असायचे. लेझीम, डंबेल्स, साधनयुक्त कवायत आम्ही वाद्यासह घेत असू.
गीतमंच स्थापन केल्यापासून अनेक उपक्रम घेतले, त्यात एक उपक्रम महाराष्ट्र शासनाने एन.सी. सी.च्या धर्तीवर एम.सी.सी. ची विद्यालयात सुरुवात केली होती. यासाठी मिळणारे गणवेश खूपच मोठ्या आकाराचे असल्याने सुरुवातीस अनेक मनोरंजक प्रसंग घडत. विद्यार्थ्यांना मिळालेल्या गणवेशाची योग्य साईज मध्ये टेलर कडून फिटींग करणे गरजेचे असायचे. त्याच्या संचालनाची तयारी आम्ही गीतमंचच्या माध्यमातून करून घेतली होती. शहरी भागातील शाळेत असलेल्या संगीत विषयाशी संबधित सर्व सुविधा माझा विषय नसताना सुद्धा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न काही अंशी यशस्वी झाला होता. शाळेची सामुदायिक कवायत देखील आम्ही सर्व आवशक तयारी करून ढोल-ड्रमच्या साह्याने घ्यायचो. गायनात आवड असलेली पण उत्कृष्ट ढोल वादक असल्याने माझ्या आग्रहाने कोणतीही तक्रार न करता ढोल वाजविण्यासाठी मनीषा ढोली सदैव उपस्थित असायची. ड्रम वाजविण्यासाठी सचिन ढोली नेहमीच तयार असायचा. विद्यालयात पेटी वादन करण्यासाठी मला पर्याय राजू रुपवते तर पखवाज वादनाचे काम अविनाश वाजे व गणेश चव्हाण आनंदाने करत असायचे. मी विविध सांकृतिक कार्यक्रम बसवून घेण्याचे काम तर केले होतेच. त्यावेळी विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची देखील काळजी मी घेत असायचो.
डुबेरे येथील माझ्या सेवेत मला मुख्याध्यापक श्री. अत्तरदे सर व पर्यवेक्षकांचे सरही. एस. एम. कोकाटे व श्री. चंद्रकांत कानडी सरांचे मार्गदर्शन लाभले. पण त्याच बरोबर श्री. सी. एम. दातीर, श्री. एस. व्ही. रत्नाकर, श्री.आर डी. वाजे सरांचे व्यक्तिमत्व नेहमीच मला मार्गदर्शक ठरले. या जेष्ठ शिक्षकांचे आपल्या विषयावर असलेली मजबूत पकड व विषयाचे परिपूर्ण ज्ञान, त्यांचा वक्तशीरपणा, विद्यालयाच्या विकासासाठी धडपड, होतकरु व हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, गरजू विद्यार्थ्यांना मदत, सहकारी शिक्षकांबाबतचा सकारात्मक दृष्टीकोन इत्यादी गुण आमच्या सारख्या नवीन शिक्षकांना नेहमीच मार्गदर्शक ठरले. यासाठी श्री. पी. आर. शेळके, श्री. मधुकर कणसे, श्री.आर.बी. ढोली, श्री. बी. एम वारुंगसे, श्री. पी. आर. करपे, श्री. दीपक दिपक भालेराव यांनी आपल्या अध्यापनातून विद्यालयात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. माझ्या सहकारी मित्रांकडून मला नेहमी काम करण्यासाठी प्रेरणा मिळत असायची. त्यांच्या सोबत मिळालेले अनुभवांचा उपयोग मला पुढील काळातील अध्यापनासाठी झाला. डुबेरे येथील माझ्या सेवाकाळात सर्व विद्यार्थ्यांनी मला मोलाचे सहकार्य केल्यानेच माझ्या कल्पनेतील अनेक उपक्रम राबविण्याचे बळ मला मिळाले. माझ्या कल्पनेतील उपक्रम राबविणे विद्यार्थी मित्रांशिवाय शक्य नव्हते. आपण सर्वांनीच मला येथील सेवेत केलेल्या सहकार्या बद्दल सर्वांचा नामोल्लेख न करता, मी आपणा सर्वांचा नेहमीच ऋणी राहील...!
मी शाळेविषयी माझे अनुभव लेखातून आपल्यासमोर सादर केले त्यास आपण उदंड प्रतिसाद देऊन आपले शाळा व शिक्षकाबद्दल व्यक्त केलेले प्रेम अवर्णनीय होते. यापुढे ही असेच प्रेम आपणांकडून अपेक्षित आहे. लेखा सोबतच आठवणीतील डुबेरे या मालिकेचे सुरु केलेले लेखन थांबविण्याची योग्य वेळ आली असे वाटल्याने या लेखा सोबतच या मालिकेचा समारोप करतो.🙏
जय हिंद....!🌹🙏🙏
🌹प्रवास माझा🌹
शब्दांकन✒️🌹
श्री. संजय कदम(सर)
अध्यापकाचार्य
ज्युनि.कॉलेज ऑफ एज्युकेशन mvpdn
Comments
Post a Comment