देव तारी त्याला कोण ....! 1
मंगळवार 5 सप्टेंबर 1996 चा दिवस होता. शिक्षक दिन मात्र गोपाळकाला असल्याने शाळेला सुट्टी होती. मी मविप्र समाज, नाशिक संस्थेच्या नूतन जवाहर विद्यालय, मनेगाव ता. सिन्नर जि नाशिक येथे उपशिक्षक पदावर कार्यरत होतो. माझ्या दृष्टीने सुट्टी असूनही अडचणीची होती. कारण बाहेर कुठे जायचे तर खर्च होणार स्वतःचे प्रवासाचे सायकल सह कोणतेही साधन नव्हते. मात्र अनुदानित विद्यालयात नोकरी सुरु होऊन दोन वर्षे नोकरी झाली होती तरी माध्यमिक शिक्षणाधिकारी, नाशिक यांची मान्यता अर्थात ऍप्रूअल नव्हते.
आम्ही बेताच्या आर्थिक परिस्थितीत ही खाऊन-पिऊन सुखी होतो. आईचे छत्र पाच वर्षांपूर्वीच हरपले होते. वडील मूळगावी एरंडगाव ता. मालेगाव येथे लहान भाऊ समाधान कडेच असायचे. त्यांची जाबाबदारी त्यानेच सांभाळली होती. मार्च 1995 मध्ये लहान बहिणीचे लग्न नंतर मे मध्ये आमचे लग्न झाले असल्याने आर्थिक स्थितीचे वर्णन न केलेलेच बरे. त्यामुळे आमच्या गरजा तर खूपच मर्यादित होत्या. गरजा नव्हत्याच असे म्हटलेतर अधिक योग्य ठरेल.
माझी पत्नी सौ. ज्योती संजय कदम (माहेरचे नाव- ज्योती राजाराम टोचे) प्राथमिक शिक्षिका असल्याने आर्थिक गरजा पूर्ण होत होत्या. या व्यतिरिक्त कोणतीही अडचण आल्यास तत्कालीन आमचे मित्रमंडळ सन्माननीय श्री. जे.बी. पगार (तात्या), जी.बी.मोरे (बापू), सोमवंशी आण्णा , पी.टी. जाधव, अनिल कुंदे, एस.एम. सोनवणे, जे. पी. पवार , एल.एस. कोल्हे, इ.डी. पटेल,श्रीम. संगीता हांडोरे, श्री. एस.एम. पाटील, श्रीम.निकुंभ मॅडम, पी.एन. काळे, कांतीलाल वागळे, माधव हांडगे मामा व कै. श्रावण जगताप यांच्यासह विद्यालयाच्या संपूर्ण स्टाफचे सहकार्य लाभत होते. तत्वनिष्ठ असे आमचे मुख्याध्यापक के. आर. पंडित सर कुणाच्याही अडचणीच्या काळात देवाप्रमाणे पाठीशी उभे राहणारे.
सर्व काही सुरळीत सुरु होते. आम्ही दोघे ही नोकरीला आमची मुलगी चार महिन्याच्या मुलीला सांभाळण्यासाठी माझी लहान बहीण श्रीम. रजनी (माई)राजेंद्र जाधव (अवधान, धुळे) सिन्नरला माझ्याकडेच होती. पंधरा दिवसापासून पत्नीला दाढ दुखीने खूप त्रास दिल्याने ती काढून नव्याने दाढ बसविण्यासाठीचे माप दिलेले असल्याने नाशिकरोड येथे डॉ. अशोक पाटील यांच्याकडे जाण्यास आम्ही निघालो. एक वाजता डॉक्टरांकडे पोहोचायचे होते.
सिन्नर बसस्थानकात येताच सुट्टीची जाणीव गर्दीने झाली. नाशिककडे जाणाऱ्या दोन-तीन बस आम्हाला सोडाव्या लागल्या. साधारणतः दुपारी 12.00 वा. सिन्नर बसस्थानकातून शेवगाव- नाशिक बस मध्ये बसण्यात यशस्वी झालो. आम्हांला वेगवेगळ्या ठिकाणी का होईना, पण बसण्यास जागा मिळाली. कंडक्टरने तिकिटे दिली. बस मोहदरी घाटातुन पावसाळ्याच्या नयनरम्य परिसरातून झेपावत दुपारी 12.10 वाजता दुसरे वळण घेल्यावर आमच्या बसला सिन्नर कडे येणाऱ्या निळ्या रंगाच्या 407 टेम्पोने कट मारला. प्रसंगावधनाने बसच्या ड्रायव्हरने खूपच जोराचा ब्रेक दाबून समोरच्या ड्रायव्हरला वाचविले. मात्र इतरांच्या जीवावर बेतणारी घटना घडली. बस साईडपट्टीच्या खोल खड्यात आदळल्याने डाव्या बाजूला एक-दोन-तीन पलट्या घेऊन शेवटी कुणाच्या तरी पुण्याईने दरीत उंच वाढलेल्या निलगिरी बनाजवळ घाटातील वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी केलेल्या भरावावर स्थिरावली. नाहीतर शंभर-दीडशे फूट खोल दरीत गेली असती तर कदाचित कुणीही वाचले नसते. बस पलटी होतांना प्रवाशी तुटलेल्या शीटसह मिक्सर मध्ये वस्तू फिरवल्यागत फिरत होते. बसच्या पलटी बरोबर प्रवाशांचा आक्रोश, किंकाळ्या, बसच्या पलट्या होणारा आवाजाचा थरार मी उघड्या डोळ्यांनी अनुभवला होता. क्षणात काय झाले? हे कुणालाच कळत नव्हते. मी मात्र पत्नीचा शोधात पत्नी बसलेल्या सिटचा अंदाज घेऊन साडीचा पदर दिसला त्या आधारे शोधले. मात्र तिची अवस्था अत्यंत गंभीर झाली होती. कंडक्टरच्या मदतीने पत्नीच्या गळ्यावर प्रवाशी शीटसह त्याखालील रॉड काळ बनून श्वास रोखून होता...! तो आम्ही गोंधळलेल्या स्थितीत दूर करू लागलो. उजव्या हाताने जोर लावून कंडक्टरांच्या मदतीने तो रॉड बाजूला केला मात्र तो पर्यंत ती बेधुद्ध झाली होती.
अपघात स्थळी मोठी गर्दी जमली. प्रत्येकजण देवदूताच्या रूपाने खारीचा वाटा उचलून माणुसकीचे दर्शन घडवत होता. आम्हाला अपघात स्थळापासून इतरांच्या मदतीने घाटातील रस्त्यापर्यंत आणले. आमची प्रकृती गंभीर असल्याने आम्हाला तातडीने उपचारासाठी मागून आलेल्या पुणे- सुरत एशियाड बसमध्ये कंडक्टरच्या मदतीने बसविले. कदाचित सर्व अपघातग्रस्त प्रवाशांची स्थिती कमी-अधिक सारखीच असावी. मला तर खूप अस्वस्थ व्हायला लागले होते. कारण माझ्या डावा हाताचे अस्तित्व मला जाणवत नव्हते. माझी अस्वस्थता बघून कंडक्टरने मला विचारले हात कुठे आहे? माझ्या डोळ्यातील आसवांनीच प्रसंगाचे वर्णन केले असावे. त्यांनी उत्सुकतेने उठून माझा डावा हात पाठीमागे असल्याचं सांगितले. त्यांनी प्राथमिक उपचार म्हणून डॉक्टर प्लास्टर केल्यावर बांधतात त्यास्थितीत मला उजव्या हातात डावा हात मनगटा जवळ पकडून दिला. तो परत-परत हातातून सुटत होता. पण माझी अवस्था मलाच कळत नव्हती.
गाडीच्या वेगाप्रमाणेच आम्ही बेशुद्ध होत गेलो. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर गाडी थांबली असावी. कंडक्टरने हलवून उठविले पण उपयोग न झाल्याने शेवटी कुणीतरी तोंडावर पाणी शिंपडले. अदृश्य हाताची बाही रक्तस्रावाने भरलेली. उपस्थितांनी डावा हात पुन्हा उजव्या हातात दिला पण वेदनांची तीव्रता आता मात्र असाह्य झाली होती. सिव्हिल हॉस्पिटलला लोक का जात नाही? याचा जिवंत अनुभव मी त्या दिवशी घेतला. बराच वेळ झाला तरी आम्हाला अपेक्षित उपचाराच्या ठिकाणी कुणीही पोहचवत नव्हते...! कदाचित आमच्या सारखे अनेक रुग्ण तेथे असावेत. मी एका माझ्या मावशींच्या वयाच्या नर्सला माझ्या परीने अडखळतच विनंती केली. "पत्नीची अवस्था खूप गंभीर आहे." बघून त्यांनी स्ट्रेचरच्या द्वारे उपचार कक्षात पोहोचविले. स्थिती गंभीर होण्याचे कारण जबड्याचे हाड दोन ठिकाणी तुटले होते बऱ्याच ठिकाणी मुकामार लागलेला होता. पत्नीवर त्वरित प्राथमिक उपचार सुरु झाले.
मी मात्र हाताच्या रक्तस्रावाने कोणत्याही ठिकाणी कोसळण्याच्या स्थितीत असतांना ही जीव मुठीत धरून विना आधारे त्या नर्स मावशीच्या मागे जिन्यातून उपचार कक्षापर्यंत कसातरी एकदाचा पोहचलो. रिकाम्या कॉटवरून नजर फिरवू लागलो. नर्स मावशींनी पत्नी उपचार सुरु असलेले ठिकाण हाताने दर्शविले. माझ्यासाठी देवदूत ठरलेल्या मावशीने मला मुलाच्या मायेने विचारले, "नाशिकला कुणी नातेवाईक आहे का?" या प्रश्नाने माझ्या मनात आशेचा किरण जागविला. या अवस्थेतही मी धडपडत माझ्या मोठ्या बहिणीचा लँडलाइन नंबर तोंडी सांगितला व सिव्हिल जवळच हाकेच्या अंतरावर मामा सासऱ्यांचे भोलेहर ब्रॉस बँडच्या टपरीवर अर्थात आताच्या ठक्कर बाजारच्या रस्त्यावर त्यांनी श्री. मनोहर गाजरे(मामा) यांना तत्परतेने निरोप दिला. माझ्या बहिणीला (आक्काला)निरोप मिळाल्याने ती श्री. शिवाजी रायते दाजीसह त्वरित आली.गाजरे मामा ही आले. दोघांनी डॉ. एच. वाय. कवडेशी चर्चा करून सर्व सूत्रे हलविली. आमच्यासाठी देवदूत ठरलेले सिव्हिलला अस्थिरोग विभाग प्रमुख स्वर्गीय डॉ. हरिभाऊ कवडे यांच्या खाजगी यशवंत हॉस्पिटल (आजचे पंचवटीतील रामालय हॉस्पिटल) विकास टॉकीज आवारात अशोक स्तंभ, नाशिक येथे अँडमिट करण्याचे निश्चित झाले. मात्र तेथे जागा नसल्याने मला डॉ. कवडेंनी विचारले "तुम्ही, नोकरीला कोठे आहात?" उत्तर पाहुण्यांनीच दिले व पुढील निर्णय त्यांनीच घेतला डॉ. वसंतराव पवारांच्या 'सुश्रुत हॉस्पिटल' मध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले.
मविप्र संस्थेचे सरचिटणीस व तत्कालीन खासदार स्वर्गीय डॉक्टर वसंतराव पवार यांना आपल्या संस्थेतील कर्मचाऱ्याचा पत्नीसह गंभीर अपघात झाल्याचे रुग्णालयातून कळले. दिल्लीला असूनही त्यांनी फोनवरून आमच्यावर उपचार करणाऱ्या स्वर्गीय डॉ. हरिभाऊ कवडे व डॉ.अर्चना चुंबळे यांच्याशी चर्चा केली. अंदाजे सायंकाळी सात वाजता एक्सरे केल्यानंतर उपचारांना सुरुवात झाली. डॉक्टर पवार साहेब दवाखान्यात आल्याबरोबर सखोल चौकशी करून धीर देऊन गेले. नंतर दवाखान्यातून सुट्टी होई पर्यंत डॉक्टर साहेबाची दररोज तपासणीसाठीची भेट रुग्णांच्या आत्मविश्वास वाढविणारीच असायची. आमच्या सारख्या किती तरी रुग्णांना मायेची सावली देणारे छत्र डॉक्टर साहेबांच्या रूपाने हरवल्याचे दुःख वारंवार सतावते.
अँडमिट काळात मविप्र कर्मचाऱ्यांची काळजी घेणाऱ्या सौ. निलीमाताई पवार यांचे कुटुंब निश्चितच वंदनीय आहे. कारण रुग्णालयातून सुट्टी होतांना बिल भारण्यासाठीचे पैसे नव्हते. उपचार करणारे डॉक्टर बाहेरचे असल्याने त्यांना हॉस्पिटलने पैसे पेड केले होते. आता नवीनच प्रसंग निर्माण झाला. उपचार घेऊन बिल बाकी ठेवणे आमच्या बुद्धीला पटत नव्हते पण म्हणतात ना " पैशाचे सोंग करता येत नाही". मी संस्थेत नोकरीला असून बिल भरण्यात का असमर्थ आहे? माझे अँप्रूव्हल नसल्याने माझा अद्याप पगार सुरु झालेला नव्हता. समजताच सौ. नीलिमाताईं म्हणाल्या "सर, तुम्ही दोघे पहिले पूर्ण बरे व्हा. बिलाचे नंतर बघू" या प्रसंगातून डॉक्टर साहेबांच्या परिवाराचे मोठेपण आम्ही अनुभवले. तसेच पवार आजींनी मी सिन्नरला रहातो हे समजल्यावर आमची आत्मीयतेने दररोज केलेली मायेची विचारपूस आपलेपणा जपणारीच होती. यावेळी सौ. नीलिमाताईंनी दवाखान्याचे बिल नातेवाईक व मित्र भरणार अंदाज घेऊन स्वतः कमी करून दिले. अकरा दिवसांच्या सुश्रुत हॉस्पिटलचा मुक्काम अनेक अनुभव देऊन गेला. पत्नीच्या तुटलेल्या जबड्यावर वायरिंग व क्लिपच्या द्वारे दीर्घ उपचार करून जबड्याचे फ्रॅचर भरून निघाले. मात्र यावेळी एक कात्री सोबत दिली होती ती खास करून या स्थितीत जर उलटीचा त्रास झाला तर क्लिप कट करण्यासाठी सुदैवाने तिने खूप काळजी घेतल्याने ती वेळ आली नाही. मात्र जवळपास सहा महिने दातांच्या फटीतून पातळ पदार्थांचे ऐतिहासिक जेवण करून डॉ. अर्चना चुंबळे व त्यांचे पती कै. डॉ. पराग चुंबळे यांनी यशस्वी उपचार केले.
माझे ही उपचार सुरु होते. मात्र माझा डावा हात पुन्हा बरा होईल का? प्रशांचे उत्तर मी स्वप्नात सुद्धा नाही असेच दिले असते.....! पण पुढील दोन वर्षांचा कालावधी माझ्यासाठी खूपच खडतर होता. कारण गळ्यात बांधलेला हात ड्युटीवर जातांना एसटी बस मध्ये अनेक ऐतिहासिक प्रसंगाचा साक्षीदार ठरत होता. बसचे तिकीट काढण्यापासून मला इतरांची मदत घ्यावी लागत असे. दंडाचे आडवे-उभे-आडवे तुटलेले हाड जुळतच नव्हते. संस्थेत ही सत्तांतर झालेले होते. जानेवारी 1998 मध्ये माझी बदली नायगाव या शाखेत अनपेक्षित झाली होती. बदली झाली त्याच दिवशी जनता विद्यालय, सिन्नरच्या समोर पाय घसरण्याचे निमित्त होऊन डावा हात पुन्हा मोडला. 'पुन्हा पाढे पंचावन्न' नवीन शाखा सर्व अनोळखी स्टाफ आता मात्र मी आत्मविशासच गमावला होता. एकच बाजू जमेची होती ती म्हणजे मोरे बापू माझे शेजारी होते. ते समजूत काढण्यात पटाईत होते. शेवटी जून 1998 मध्ये कै. डॉ. हरिभाऊ कवडे यांनी ऑपरेशन करून हात पूर्णपणे बरा केला. डॉक्टरांच्या टीमने आम्हाला फक्त जीवदान दिले नाही, तर मानसिक आधार, श्रद्धा, संयम, त्याग व सामाजिक बांधिलकीच्या संस्कारांची उपयोगी पडणारी शिदोरीच दिली. या सर्वांचे शतशः अभिवादन.......!
आमच्याकडील सर्व पैसे तर संपले होते. अशा वेळी माझे दाजी श्री. शिवाजी रायते, श्री. मनोहर गाजरे मामा व स्टाफच्या मित्र परिवाराच्या वतीने मोरे सर, पगार सर, जाधव सर, इ.नी शेवटच्या दिवशी भरलेले बिल खूप मोठा धडा शिकवून गेले. तेव्हा पासून आम्ही गरजू विद्यार्थ्यांनी कोणतीही प्रसिद्धी न मिळविता शक्य ती शैक्षणिक मदत करत आहोत आणि पुढे ही ती करत राहू. अपघात प्रसंगी आम्हांला रायते, गाजरे, पवार, वरपे परिवाराने दिलेला आधार खूपच बहुमोल व अवर्णनीय असाच आहे. त्र्यंबकेश्वरचे बाबा कै.श्री. निवृत्ती बाबा गाजरे (सौ.ज्योतीचे आजोबा) वय अंदाजे 78 तरी असेल तोरणमाळ येथून जडीबुटीचे औषध घेऊन सिन्नरला पोहोच करून आमची काळजी घेणारे कै. सौ.साळू आजी व निवृत्ती बाबा तर थोरच होते.
माझ्या मित्रांनी, मनेगावच्या स्टाफने व विद्यार्थांनी दाखविलेली आत्मीयता विसरणे शक्य नाही. जे आजही घरी येऊन किंवा फोनवर आत्मीयतेने चौकशी करतात.
एका गोष्टीची खंत मला नेहमी वाटते या काळात मला वडिलांकडे अपेक्षित लक्ष देता आहे नाही. मात्र हे माझे काम माझ्या बहिणींनी उत्तमरीत्या पार पाडले. या कठीण प्रसंगी मला जर कुणी विचारले तुम्हाला मित्र कसा हवा? तर इतिहासात न जाता मी मोरे बापू सारखा हवा असेच म्हणेल. कारण त्यांनी मित्रत्वाचे सर्वच निकष पुर्ण केले असावेत. आम्हांला बरे करण्यासाठी जे काही करणे शक्य असेल ते सर्व काही त्यांनीआनंदाने केले. वयाने ते माझ्यापेक्षा किमान पंधरा वर्षांनी तरी मोठे असतील. पण माझ्यावर आलेल्या प्रसंगाचे वर्णन ते नेहमी 'दिस जातील, दिस येतील , भोग सरल, सुख येईल 'इ. हे गाणं ऐकवून गितकाराने हे गीत "तुझ्यासाठी तर लिहिले नाही ना? कदम" असे नेहमी म्हणत. खरचं म्हणतात ना "वक्त किसी का इंतजार नहीं करता" वेळेनुसार सर्व बदलत गेले तरी माझ्या शाळेतील कलाशिक्षक पी.टी. जाधव, क्रीडा शिक्षक जे. पी. पवार व स्वर्गीय श्रावण जगताप जेवणाचा डबा व पाण्याची बाटली उघडून देणाऱ्या या माझ्या मित्रांना विसरणे शक्यच नाही. त्याच बरोबर माझे शेजारी श्री. नामदेव खालकर (काका), आर. बी. गायकवाड, आर. पी. शिंदे, अनिल कुंदे, मविप्रचे सिन्नर तालुका संचालक श्री. राजेंद्रजी नवले, आमचे मुख्याध्यापक के.आर. पंडित सरांचे फार मोठे सहकार्य लाभले. त्यामुळेच आज आम्ही आमच्या नोकरीच्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने कामास न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. या काळात आम्हांला अनेक ज्ञात/अज्ञात व्यक्तींनी देवदूताप्रमाणे मदत केली. त्यांचा मी आयुष्यभर सदैव ऋणी राहील......! याप्रसंगी मदत करून ही अनावधानाने कुणाचा उल्लेख राहिला असेल तर आम्हांला माफ करावे. माझी सर्वांना विनंती आहे की, संधी मिळेल तेव्हा इतरांच्या उपयोगी पडा, कारण वेळ केव्हा ही.......!*
🌹🌹👏👏🙏🙏🙏
अपघाताच्या दिवशी सिन्नरला माझी चार महिन्याची लहान मुलगी व तिला सांभाळणाऱ्या माझ्या बहिणीला आमचा निरोप कुणी व कसा दिला हे देखील रहस्यच आहे. माझे मित्र अनिल कुंदे यांच्या कुंदे मेडिकल एजन्सी, गंगावेस, सिन्नर येथे पोहच केला. त्यांना खूपच मुसळधार पाऊसात नाशिक पर्यंत कसे पोहोच केले? त्यांना किती दवाखाने फिरायला लागले हे देखील एक न उमगलेले कोडेच आहे. ते फक्त माझे मित्र, सहकारी व शेजारी श्री.जी.बी मोरे सर (बापू) यांनाच माहित....! असावं.🌹🙏
लेखनाची प्रेरणा अर्थातच माझे मित्र मोरे (बापू)सरांनी लिहिलेले लेख व लॉकडाऊन मुळे मिळालेला भरपूर मोकळा वेळ मिळाला. माझ्या जीवनातील सत्य घटना जी 24 वर्षांनंतर ही आजपर्यंत भावनाशील होऊन आम्ही व्यक्त करू शकलो नव्हतो. ते लेखनातून व्यक्त करण्याचा माझा एक छोटासा व पहिलाच प्रयत्न आहे.
स्वानुभव लेखन-
श्री. संजय कदम (सर)
मोबाइल नं.9834151123
ज्युनि. कॉलेज ऑफ एज्युकेशन, mvpnd
सौ. ज्योती कदम (टोचे) प्राथ.शिक्षिका
जि.प.प्राथ. शाळा,खैरगाव (नाशिक)
नाशिक-
Comments
Post a Comment