आठवणीतील नैताळे...!
✒️आठवणीतील नैताळे.....!✒️🌹
नैताळे गावाचे नाव मी लहनपणा पासून नेहमीच घरात ऐकत होतो. कारण 1974 -1975 मध्ये आमच्या मूळ गावी एरंडगाव(झाडी) ता. मालेगाव येथे ग्रामीण भागात नव्याने कडी-पाटाईचे घर बांधण्यासाठी सागाचे लाकुड व इतर साहित्य येथून आणण्यासाठी चार बैलगाड्या घेऊन माझे वडील, वडिलांचे मामा श्री. दिनकर (बाबा) शिंदे , माझ्या आईचे वडील श्री. काशिनाथ (बाबा) जाधव , वडिलांचे मामेभाऊ श्री. त्र्यंबक (काका) शिंदे श्री. बाबुराव (तात्या) वाघ इत्यादी वडीलधारी मंडळी दोन दिवसांच्या कठीण प्रवासानंतर आवश्यक साहित्य घेऊन परत आली होती. तेव्हा पासून नैताळे गावातील यात्रेच्या अनेक गोष्टी मी नेहमी ऐकत असे.
नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध यात्रा म्हटले तर समोर येते श्री खंडोबा महाराज यात्रा चंदनपुरी (मालेगाव), ओझर व नैताळे (निफाड) येथील यात्रा डोळ्यासमोर येतात. अर्थात ह्या यात्रा दोन आठवडे /पंधरा दिवस सुरु असतात. नैताळे गावात भरणारी यात्रा चार-पाच पिढ्यांपासून भरत असल्याचे ऐकले होते. महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत असलेले श्री मतोबा महाराजांची यात्रा मोठी व भक्तांसाठी पर्वणीच ठरत असते. यात्रा काळात येथे विविध प्रकारची दुकाने, लाकडी खेळणीची दुकाने, बैल, घोडे व गृहसजावटीचे साहित्य, विविध प्रकारच्या धातूंच्या भांड्यांची खरेदी भक्त करतात, खरेदी केलेल्या भांड्यावर देवाचे नाव टाकण्याची प्रथा व भक्तांची श्रद्धा, बाळ-गोपाळ व महिलांसाठी लहान मोठे पाळणे, मनोरंजनासाठी येणारे लोककला मंडळ(तमाशा) प्रसिद्ध तांगा शर्यती , कुस्त्यांची दंगल इत्यादी विषयी खूप काही ऐकलेले होते. पंचक्रोशीतील या ऐतिहासिक, सांस्कृतिक, प्रगत व आधुनिक तंत्राने केल्या जाणाऱ्या शेतीचा वारसा लाभलेल्या गावात प्रत्यक्ष गावात जाऊन अनुभव घेण्याचा योग येईल असे वाटले नव्हते .
माझे महाविद्यालयीन शिक्षण मविप्र संस्थेच्या नाशिक येथील विविध शाखातून झाले होते. मविप्र संस्थेत नोकरी करण्याची माझी इच्छा होती नोकरीसाठी मुलाखत दिली होती. योगायोगाने मला मविप्र संस्थेत डॉक्टर वसंतराव पवार साहेबांच्या कृपेने संस्थेत सेवेची संधी मिळाली. मी मविप्र संस्थेत 19 जून 1993 रोजील जनता विद्यालय, नैताळे, ता. निफाड या शाखेत उपशिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी गेलो. नैताळे बस स्टँडवर उतरलो शालेय गणवेशात असलेले विद्यार्थी शर्माच्या हॉटेलसमोर दिसले. हा गावातील वर्दळ असलेला भाग होता. मी विद्यार्थ्यांना विचारले की "गावातील जनता विद्यालय कोठे आहे?" पहिले तर त्यांनी दुर्लक्ष केल. खेड्यातील विद्यार्थी अनोळखी व्यक्तीशी सहजासहजी बोलत नाहीत. हा माझा स्वतःचा ही अनुभव होता. मी देखील ग्रामीण भागातील असल्याने मी पुन: विचारले की "मला जनता विद्यालयात जायचे आहे कसे जायचे?" मला तेथे असलेल्या विद्यार्थ्यांनी कार्यालयापर्यंत पोहचविले.
नाशिक-औरंगाबाद रोडवरील नैताळे गाव पंचक्रोशीतील सर्वच दृष्टीने पुढारलेले गाव म्हणून परिचित होते. या महामार्गावर गावातच विद्यालयाचे छोटेसे कार्यालय होते. कार्यालयात सर्व प्रथम सुधीर चिने हे विद्यालयाचे शिपाई भेटले. विद्यालयात नव्याने रुजू होण्यासाठी श्री. व्ही. एन. शिंदे सर ही आले होते. मुख्याध्यापक श्री. आर. बी. कुशारे, श्री. सुभाष शिंदे सर , श्री. सुरेश राख सर उपस्थित झाले होते. कार्यालयातच आमचा सर्वांशी एकमेकांशी जुजबी ओळख परिचय झाला.
विद्यालय नियोजनाप्रमाणे भरले. परिपाठ आटोपून विद्यार्थी आपापल्या वर्गात पोहचले. वर्गशिक्षक ही त्यांच्या पाठोपाठ वर्गावर गेले. मुख्याध्यापकांनी मला वर्गशिक्षक म्हणून आठवीचा वर्ग दिला. प्रत्येक विद्यालयात नवीन शिक्षकास जास्त पटसंख्या असलेला वर्ग देण्याचा अलिखित नियम आज येथे ही पाळण्यात आला होता. इयत्ता आठवीचा वर्ग शाळेच्या कार्यालया शेजारील श्री विठ्ठल मंदिरात भरत असे. मला मंदिरात वर्ग भरण्याचे काहीही आश्चर्य वाटले नाही.
माझ्या गावात मी प्राथमिक शाळेत शिकतांना माझा चौथीचा वर्ग मारूतीच्या मंदिरातच भरत असे. आम्हांला श्री. नारायण शेवाळे (गुरूजी) वर्गशिक्षक लाभले होते. गावातील मंदिरात शिकण्याचा आमचा अनुभव खूपच रंजक होता. गावातील भक्त मंदिरात दर्शनासाठी येत असत. काही भक्त नारळ देखील फोडायचे. काही वेळा नारळाच्या शेंड्या काढलेल्या नसल्याने खूप वेळ नारळ न फुटल्याने अनेक विनोदी प्रसंगाने सर्वांचेच मनोरंजन होत असे. नंतर अनुभवाने आम्हीं नारळाच्या शेंड्या काढून झटपट नारळ फोडण्याची कला अवगत केली होती. त्यासोबत नारळाचा प्रसाद खाण्याचा आनंद ही मिळत असे. नारळ देवास पावले तर मात्र निराशा ही आम्ही अनुभवली होती. देवदर्शनासाठी आलेले भक्त असे पर्यंत वर्गाला स्वयंघोषित सुट्टीचा आनंद आम्हीं उपभोगला होता.
मी वर्गशिक्षक असलेला आठवीचा वर्ग मंदिरात भरत असला तरी येथे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बँचेस होते. दोन्ही गावात मंदिरातून शिक्षण देण्याची परंपरा सुरूच होती. मी विद्यार्थी या नात्याने गावातील मंदीरातील वर्गात शिकलो होतो. येथे मात्र शिक्षक म्हणून शिकविण्याचे भाग्य मला लाभले होते.माझा शाळेचा पहिला दिवस शिक्षक म्हणून सर्व वर्गात विद्यार्थी ओळख-परिचय करण्यातच संपला. मात्र मविप्र संस्थेने सर्व विषयांना शिक्षक उपलब्ध करून दिल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आम्हीं अनुभवला होता.
दिवसभरात आमचे सहकारी शिक्षकांचे परिचय सत्र सुरूच होते. श्री. सुभाष के.शिंदे सर वनसगावचे होते. त्यांच्याशी झालेच्या चर्चेतून त्यांनी सांगितले की "मी वनसगाव ते नैताळे रोज सायकलवर अप-डाऊन करतो" हे अंतर एका बाजूने जवळपास बारा किलोमीटर इतके होते. दररोज चोवीस किलोमीटर प्रवास करून दिवसभर शाळेचे नियमित कामकाज उत्साहाने करत. त्यांच्या विषयी मला वेगळीच सहानुभूती वाटली. श्री. सुरेश राख सर डोंगरगाव येथून सायकलवर रोज येत असत. त्यांचे सुद्धा दोन्हीं बाजूनी जवळपास बारा-तेरा किलोमीटर होते. मुख्याध्यापक मात्र सावरगाव येथून बसने अपडाउन करत असत. माझ्या बरोबर रुजू झालेले श्री. वसंत शिंदे सर सिन्नर तालुक्यातले ठाणगावचे होते. समजल्यामुळे जरा बरे वाटले कारण सोबत होईल. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून त्यांनी "मी नैताळे येथे राहणार असे सांगितले." श्री. सुधीर चिने हे कुंभारी ता. कोपरगाव जि. अहमदनगर येथील होते. ते भाड्याने खोली घेऊन नैताळे गावात पूर्वी पासूनच राहत होते.
विद्यालयात रुजू होण्यापूर्वी अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण झालेले होते. या प्रश्नांची उत्तरे जवळपास पहिल्याच दिवशी मिळण्यास सुरुवात झाली होती. पहिला प्रश्न राहण्याचा होता तो श्री. चिने यांच्या सहकार्याने श्री. वसंत शिंदे सर व मी पुढच्या आठवड्यात त्यांच्याच खोलीत राहण्याचे निश्चित झाले. आम्ही त्याप्रमाणे तयारीला लागलो. आमची ग्रामीण भागात नोकरीला सुरुवात झाली. नोकरीच्या ठिकाणी नवनवीन अनुभव येत होते . हे अनुभव मला 'शिकणे' आणि 'शिकवणे' यातील महत्वाचा फरक समजला. मला शिक्षक म्हणून येथे मिळालेले अनुभव अनमोल असेच होते.
पूर्वी गावात असलेल्या शाळेच्या बाबतीत आम्ही काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.नैताळे गावात यापूर्वी चंद्रेश्वरी बाबा ट्रस्ट, चांदवड, संस्थेचे अनुदानित माध्यमिक विद्यालय कार्यरत होते. चांदवड येथे गोशाळा चालविण्यासाठी परिसरातून मोठी मदत मिळत असे. बरीच वर्षें येथे माध्यमिक विद्यालय सुरळीत सुरु होते. ट्रस्टने गावाची गायरान जागा गायी चारण्यासाठी मिळविली होती. मात्र पुढे काही कारणाने संस्थाचालक व गांवकरी यांच्यांत या जागेवरून वाद झाला. गांवकरी व संस्था चालक यांच्यातील सुरु असलेला संघर्ष न्यायालया पर्यँत पोहचला होता. शेवटी हा संघर्ष गावकऱ्यांनी उच्च न्यायालयात जिंकला. या विषयी असे म्हणता येईल की "गाव करी, तेथे राव काय करी?" ते बरोबरच आहे. शाळेच्या इतिहासाने गावाच्या संवेदनशीलतेचा ही परिचय आम्हांस करून दिला. मात्र नैताळे येथील येथील अनुदानित विद्यालय " दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ" या उक्ती प्रमाणे नैताळे पासून जवळच असलेल्या शिवरे ता. निफाड येथे व्ही. एन. नाईक संस्थेस प्रशासकीय बाबींची पुर्तता करून स्थलांतरित झाले. हे अनुदानित विद्यालय आज देखील सुरळीत सुरु आहे.
नैताळे गावातील अनुदानित विद्यालय झाल्याने अनेक शिक्षणप्रेमी नागरिक अस्वस्थ झाले होते. नव्याने विद्यालय सुरु करणे मुळात सोपे काम नव्हतेच. त्यात शासनाच्या बदलत्या नियमामुळे किती अडचणीचे व त्रासदायक ठरते हे " पाण्या मधी मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे" या उक्तीचा प्रत्यय शाळा सुरु करण्यासाठी स्वतःला वाहून घेतलेल्या सहभागी व्यक्तींना आला असेल. गावातील विद्यालय बंद होण्याचे परिणाम गावातील मुलां-मुलींच्या शिक्षणावर होऊ लागला होता. पंचक्रोशीतील मुलींच्या पालकांनी इतरत्र शिक्षणासाठी त्यांना पाठविणे बंद केले. गावाचा विचार केला तर ही बाब गावातील जाणकारांना व शिक्षणप्रेमींना आत्मचिंतन करायला लावणारी होती.
गावातील माध्यमिक विद्यालय बंद झाल्याने त्याची झळ नैताळेसह पंचक्रोशीतील सोनेवाडी, आंबेवाडी, कोळवाडी, गाजरवाडीच्या सर्व सामान्य नागरिकांना बसू लागली होती. गावकऱ्यांनी हीच बाब प्रतिष्ठित व सुजाण नागरिकांच्या लक्षात आणून दिली. त्यादृष्टीने गावातून हालचाली वेगाने सुरु झाल्या होत्या. गावातील मविप्रच्या सभासदांनी व ग्रामस्थांनी थेट मविप्र पदाधिकाऱ्यांना भेटून गावात शाळा सुरू करण्याविषयी मार्गदर्शन घेतले. त्यानुसार विद्यालयासाठी आवश्यक वर्ग खोल्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उपस्थितांनी दिले. त्यानुसार विद्यालयासाठी आवश्यक बाबींचा पाठपुरावा सुरु केला.
नैताळे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान व गैरसोय दूर करण्यासाठी श्री. विश्वनाथ म्हसुजी पा.बोरगुडे, चेअरमन विविध कार्य.सोसा. नैताळे, श्री. रामकृष्ण यशवंत पा.बोरगुडे, माजी संचालक रासका, श्री. निवृत्ती विठठल पा. बोरगुडे (गुरुजी) संचालक रासका, श्री. केदु परबत पा. बोरगुडे, श्री. सोपान मुरलीधर पा. बोरगुडे, सरपंच नैताळे व निफाडचे तालुकामास्तर जाधव (गुरुजी) श्री. तुकाराम शंकर जाधव यांच्यासह गावकऱ्यांचा सततचा पाठपुरवा यशस्वी झाला. मविप्र संस्थेचे सरचिटणीस डॉ. वसंतरावजी पवार साहेबांनी जून 1990 मध्ये जनता विद्यालय, नैताळे येथे सुरु केले. संस्थेचे ब्रीद "बहुजन हिताय, बहुजन सुखाय" नुसार नैताळे पंचक्रोशीतील सर्वसामान्य व गोरगरिबांच्या मुलां-मुलींसाठी गेल्या दोन-तीन वर्षांपासून बंद असलेले शिक्षणाचे पवित्र द्वार खुले केले. संस्थेने नेमलेल्या आमच्या सारख्या अनेक सेवकांना या विद्यालयात सेवा करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली. संस्थेच्या पदाधिकारी व संचालक मंडळाचे आम्ही कायमच ऋणी असू.
नोकरी सुरु होऊन आठवडा संपत आला होता शनिवार येताच आमची खोली सारविण्याचे काम सुरु झाले. मला तर प्राथमिक शाळेतील दिवस आठवले. हे काम आम्हीं देखील करत असायचो. आम्ही ज्या खोलीत राहणार होतो ती देखील सारवून आमच्या स्वागतासाठी सज्य करणारे विद्यार्थी व नियमित आमची खोली न विसरता सारवून देणारी विद्यार्थी दुर्मिळच म्हणावी पण माझ्या दृष्टीने या गावातील विद्यार्थी महानच होते. आमच्या खोलीवर स्वतः स्वयंपाक करून स्वछंदी जीवन जगण्याचा आनंद आम्हांस नैताळे येथील सेवेने मिळाला. बाहेरगावून येणारे आमचे सहकारी देखील शुक्रवारी आमच्या खोलीवर थांबू लागले होते. अनेक विद्यार्थी देखील आम्हांला सहकार्य करीत असत. आमच्या समोर राहणारे श्री. पंढरीनाथ सोनवणे यांचे भाचे संजय व श्याम साळुंके यांनी या काळात आम्हांला खूपच सहकार्य व मदत केली.
आम्ही आता गावात राहून दैनंदिन शाळेतील अध्यापनासोबतच विविध स्पर्धेत शाळेच्या सहभागासाठी प्रयत्न सुरु केले. शाळा सुटली की दररोज आम्हीं नवीन रस्त्याने पंचक्रोशीतील गावाकडे सायंकाळी फिरायला जात असायचो. सकाळी लवकर शाळेत जाऊन अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू लागलो. गणित, विज्ञान, इंग्रजीचे विषय शिक्षक जादा तास घेऊ लागले. गरज असेल तेव्हा पालकांचा संपर्क होऊ लागला. गावकऱ्यांचे आम्हांला प्रत्येक गोष्टीत सहकार्य मिळू लागले. गावातील हॉटेल चालक शर्मांनी बाहेरगावाहून येणाऱ्या मुलींसाठी सायकलीचे वाटप करून नवा आदर्श निर्माण केला होता. असे म्हणतात ना "देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे" या काव्यपंक्ती प्रमाणे अनेक दानशुरांनी प्रेरणा घेऊन विद्यालयात एस.एस. सी. परीक्षेत व प्रत्येक वर्गातील प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्री. तुकाराम शंकर जाधव (गुरुजी) नी वेगवेगळी बक्षिसे आपल्या स्वर्गवासी पत्नी कै. लिलावती (मावशी) जाधव यांच्या स्मरणार्थ विद्यालयात सुरु केली. या बरोबरच विद्यालयात बक्षिसे, गरजू विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप,गणवेश वाटप करण्यासाठी दानशूरांचे सढळ हाताने मदतीचा ओघ सुरु झाला. गावातील तरुण मित्रमंडळ, तसेच श्री. संजय (तात्या) विश्वनाथ पा. बोरगुडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नैताळे ग्रामपंचायतीचे सरपंच, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन, विविध मित्र मंडळ, छोटे व्यापारी व दुकानदार इत्यादीचे आम्हांला बहुमोल सहकार्य लाभले. आमचे मित्र संजू (तात्या) यांनी गावातील खोली राहण्यासाठी उपलब्ध करून दिली होती. ते नेहमी विनोदाने म्हणायचे की " ज्या व्यक्तीने आमच्या गावात सहा महिने नोकरी केली, त्याला जगाच्या पाठीवर कोठे ही भीती नाही" त्याची अनुभूती मला पुढील सेवेत आली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक व शिपाई सर्वांनीच विद्यालयासाठी वाहून घेतले होते. या विद्यालयातील एक अनुभव आम्हांला येथे सेवक कर्मचारी सुट्टीवर असेल तर शाळा भरण्याची व सुटण्याची बेल देण्यापर्यंत सर कामे करण्याची सवय होती. शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास अपेक्षित असतो पण येथे आम्हां शिक्षकांचा देखील सर्वांगीण विकास होत होता. या छोट्या शाळेने आम्हांला स्वावलंबनाचे धडे दिले होते. त्यामुळे आम्हाला कोणतेही काम करण्यात कमीपणा वाटला नाही. नैताळे येथे सर्व कामे केलेली असल्याने आजपर्यंत आम्हांला नोकरी करतांना कोणतीच अडचण आली नाही.
अभ्यासाबरोबरच इतर उपक्रमही आम्ही विद्यालयात राबविण्यास सुरुवात केली होती. आमच्या शाळेची वर्षासहल आम्हीं नांदूर मध्यमेश्वर बंधारा येथे घेऊन गेलो होतो. विविध कलागुण दर्शनाचा कार्यक्रमाने उपक्रमाची सांगता झाली. वर्षांसहलीच्या यशस्वी आयोजनाबरोबरच मोठ्या सहलीची तयारी सुरु झाली होती. नियोजनाप्रमाणे विद्यालयाची सहल विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून यात्रेच्या कालावधीत शिर्डी-देवगड-औरंगाबाद -वेरूळ येथे यशस्वीरित्या पार पडली. संस्थेच्या नियोजना प्रमाणे स्पर्धा परीक्षा, पूर्व परीक्षा, वार्षिक परीक्षा व निकाल जाहीर करण्याबरोबर शैक्षणिक वर्षांची सांगता झाली.
आम्ही ज्या ठिकाणी काम करत होतो तेथे गावाशी एक नाते निर्माण झाले होते त्यामुळेच शाळेसाठी काही तरी करावे असे आम्हाला वाटू लागले होते . शाळेसाठी देणगी जमा करण्याचे आम्ही ठरविले. गावात भरणाऱ्या मोठ्या यात्रेच्या निमित्ताने आलेले विविध दुकानदार, तमाशा मंडळ इ. कडून आम्ही काही प्रमाणात देणगी मिळविण्यात यशस्वी झालो होतो. गावातील श्री मतोबा महाराज यात्रेचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही घेऊन ऐकलेल्या गोष्टीची त्यानिमित्ताने पडताळणी केली होती. इतकी मोठी यात्रा तीसुद्धा पंधरा दिवस आम्ही खूपच आनंद उपभोगण्यासाठी नशीबच असावे लागते. त्याच बरोबर इयत्ता दहावीचा निकाल चांगला लागण्यासाठी सर्वांनी परिश्रम घेतले होते.
जूनमध्ये शाळेचा निकाल अपेक्षेप्रमाणे चांगला लागला होता. परिणामी आम्ही गावकऱ्यांच्या व संस्थेच्या विश्वासास पात्र ठरलो. आता शाळेची इमारत असावी याकरिता गावकऱ्यांनी संस्थेला शाळेसाठी जागा उपलब्ध करून दिली होती. शाळेच्या स्थापने पासूनचा इतिहास जाणून घ्यायची उत्सुकता आम्हांला होतीच. कालांतराने आम्हांला शाळेच्या सुरुवातीच्या काळात मविप्र संस्थेच्या खेडले झुंगे येथील हायस्कुलचे काही शिक्षक येऊन अध्यापनाचे काम करीत असत. संस्थेने वर्ग वाढत गेले तसे विद्यालयात कर्मचारी नेमले. यातूनच आम्हांला सेवेची संधी या विद्यालयात उपलब्ध झाली होती.
आज विद्यालय संस्थेने गावाजवळच विकत घेतलेल्या जागेवर सुसज्य इमारतीच्या रूपाने उभे आहे. हे ऐकूण मला खूप आनंद झाला. काळानुरूप गावाने बदलता दृष्टीकोन स्वीकारुन विद्यालयात शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन मी माझे त्यावेळचे विद्यार्थी व आजचे पालक यांना करतो. मी बदलून गेल्यानंतर माझ्या जागेवर नियुक्त झालेल्या राख मॅडम बरेच दिवस येथेच होत्या. पुढे प्रमोशन होऊन त्या सध्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम. मंदाकिनी सानप (सौ. राख मॅडम) मॅडम कार्यरत आहेत. त्यांना भावी वाटचालीस मानासूनन खूप-खूप शुभेच्छा ...!
विद्यालायच्या उभारणीत नैताळेतील मविप्र संस्थेचे सभासद, गांवकरी व हितचिंतकांचे आभार मानणे आम्ही आमचे आद्यकर्तव्य समजतो. माझी जनता विद्यलाय, नैताळे गावातील सेवा जवळपास दीड वर्षे झाली. याकाळात गावातील आम्हांला मार्गदर्शन करणारे संस्थेचे सभासद, विद्यालयावर प्रेम करणारे शिक्षणप्रेमी नागरिक, गांवकरी, विद्यालयाचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यासर्वांचे खूप सहकार्य लाभले. मी सर्वांचे सदैव ऋण व्यक्त करतो.
विद्यालयात काम करतांना मी काही वेळा विद्यार्थी हितासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा केल्या असतील त्या शुद्ध हेतूनेच केल्या होत्या. यात मला पालक व सहकाऱ्यांचे खूपच सहकार्य लाभले. त्यामुळे शाळेच्या लौकिकात भर टाकण्यात माझाही सहभाग असल्याचे समाधान मिळाले. नैताळे येथील विद्यालयात मी दि. 17 ऑक्टोबर 1994 पर्यंत कार्यरत होतो. पुढे मी मनेगाव ता. सिन्नर येथे अनुदानित विद्यालयात बदलून गेलो. येथील सेवेत मला श्री. सुभाष के. शिंदे, श्री. वसंत एन. शिंदे, श्री.सुरेश के. राख, श्री. आर.बी. कुशारे, श्री. आर.जी. दवंगे, श्री. विलास कोटमे, श्री. भागवत आरोटे, श्री. एकनाथ खैरनार, श्री. संजय काळोगे, श्री.सुधीर चिने, श्री. रावसाहेब भोसले, श्री. संजय बोरगुडे(तात्या), श्री. कोटकर सर, श्री. प्रशांत ओस्तवाल (मच्छिन्द्रभाऊ) डॉ. गायकवाड,श्री. संजय बोरगुडे(सर) पत्रकार श्री. संजय साठे, श्री. रंगनाथ बोरगुडे (वायरमन काका) श्री. नंदू व श्री. बाळू शिंदे यांच्या सारखे मित्र व मार्गदर्शक लाभले. हे मी माझे भाग्य समजतो.
तसेच रतन बोरगुडे, वाळू तळेकर, केशव बोरगुडे, बाळू बोरगुडे, संतोष कोटकर, दशरथ, रवी घायाळ, खंडू बोरगुडे, संजय साळुंके, आण्णा अडसरे, श्याम साळुंके, बाळू भवर, नवनाथ बोरगुडे, इत्यादी विद्यालयातील विद्यार्थी सदैव स्मरणात राहतील.
नैताळे येथील सेवेचा कालावधी जरी माझा कमी असला तरी गावातील सेवा ही कायम माझ्यासाठी संस्मरणीय राहतील. अर्थातच असे म्हणणे योग्य आठवणीतील नैताळे ....!🌹🙏🙏
माझे सेवेतील अनुभव✒️✒️ -1
श्री. कदम संजय विनायकाराव (सर)
एम.ए.एम.एड.
ज्युनि. कॉलेज ऑफ एज्यु. दिंडोरी, जि. नाशिक
मोबा. नं. 9834151123
Comments
Post a Comment