आठवणी बालपणीच्या....!(एरंडगाव)

🌹आठवणी बालपणीच्या ....!🌹🙏
(झाडी- एरंडगावातील)

शब्दांकन✒️– संजय विनायक कदम✒️🌹

               आमचे गाव मालेगाव तालुक्यात असून आजूबाजूच्या तालुक्यात व परिसरात झाडी-एरंडगाव नावाने प्रसिद्ध आहे. आमचे बालपण त्याकाळी एक समृद्ध असलेल्या गावात गेले. आम्ही आई-वडील, काका-काकू व आजीसह एकत्रित कुटुंबात रहात असायचो. या एकत्रित कुटुंबात जवळपास चार भाऊ व सहा बाहीणी असे दहा सदस्य, वडीलधारी मंडळीसह जवळपास पंधरा सदस्य असलेले एकत्रित नावाला साजेसे आमचे कुटुंब होते. आम्ही सर्व भाऊ-बहीणी थोड्याफार अंतराने समवयस्क असल्याने सुख-दुःखासह आमचे बालपण मजेत गेले. आमच्या कुटुंबाचा प्रमुख व्यवसाय शेती असल्यानेच आम्ही गावापासून तीन-चार कि.मी. अंतरावरील मळ्याच्या वस्तीवर रहायचो. आम्हाला शिकण्यासाठी आमच्या जुन्या गावातील प्राथमिक शाळेत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. शाळेत येऊन-जाऊन जवळपास सात-आठ कि.मी.अंतर आम्हाला दररोज पायी जावे लागत असे.  आमच्या बालवयाचा विचार करता हे अंतर जरा जास्तच होते. इयत्ता सातवी पर्यंतच्या शिक्षणाची सोय आमच्या गावातील प्राथमिक शाळेतच होती. 
               आमच्या घरातील जवळपास सर्वांचेच शिक्षण गावातील प्राथमिक शाळेत झालेले आहे. आम्ही शिकत असलेल्या प्राथमिक शाळेत वर्ग सात असले तरी कौलारू तीनच वर्ग खोल्या होत्या. शाळेच्या वरांड्यातील एका कोपऱ्यात शाळेचे छोटेसे ऑफिस होते. तीन कौलारू खोल्यात लहान वर्ग भरायचे, तीन मोठे वर्ग शाळेच्या वरांड्यात भरायचे तर चौथीचा वर्ग मारुती मंदिरात भरत असायचा. अशी आमची प्राथमिक शाळेतील वर्गांची आसनव्यवस्था होती. आम्ही चौथीला असतांना कोणताही दरवाजा नसलेल्या मारुतीच्या मंदिरात वर्षभर शिकण्याचा आनंद घेतला आहे. आम्हांला वर्गशिक्षक श्री. शेवाळे गुरुजी होते. अनेक मजेदार प्रसंग येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांसोबत आम्हीं अनुभवले आहेत. येथे शाळेचा वर्ग भरत असल्याने घाईत बऱ्याचवेळा नारळाच्या शेंड्या न काढल्याने नारळ पटकन न  फुटल्याने अनेक मनोरंजक प्रसंग घडायचे. नारळाचा प्रसाद गुरुजीसह सर्वांनाच मिळायचा. दुर्दैवाने नारळ देवास पावले तर मात्र सर्वांची निराशा होत असायची. 
          आम्हीं सकाळी शाळेत जातांना घरातून वेळेवर निघत असू , मात्र जर रस्त्याने झाडावर खारुताई दिसली तर तिला दगड मारण्यात बराच वेळ गेल्यावर शाळेत पोहचण्यास उशीर होत असे. त्यामुळे गुरुजींकडून शिस्तीचे दोन शब्द ऐकावे लागत. आम्ही शाळेत जात असायचो तेव्हा शाळा दोन सत्रात भरायची सकाळी ८ ते ११ व दुपारी २ इ ५ पर्यंत शाळेची वेळ असायची. शाळेची मधली सुट्टी खूप मोठी होती. त्यामुळे शाळेच्या मधल्या वेळेत आमच्याकडे खूपच वेळ असायचा. मधल्या सुट्टीत त्याकाळी अस्तित्वात असलेली सर्व प्रकारची खेळ आम्ही खेळत असायचो. गावातील जवळपास ७५% लोक मळ्यात वस्तीवर रहात असायचे. त्यामुळे गावात आमच्यावर शिक्षकांशिवाय कुणाचेच नियंत्रण नसायचे. आमचे गावातील घर गढीवर होते, गढीवरील घर उंचावर असल्याने दुरूनच दृष्टीक्षेपात येत असायचे. श्री. व सौ. गोसावी गुरुजीचे कुटुंब आमच्या गावातील गढीवर असलेल्या घरात रहायचे. बाकी शिक्षक आपल्या सोयीनुसार येऊन-जाऊन करत असायचे. गढीच्या घरातून दूरवरून येणाऱ्या-जाणाऱ्या सर्वांवर सहज नजर ठेवता येईल असे होते. शनिवारी सकाळच्या सत्रात जवळपास राहणाऱ्या मुलांनी शेण व गावातील विद्यार्थ्यांनी बदली व दोर घेऊन शाळेचे वर्ग सारविण्याचे काम सर्वांनी मिळून करावे लागत असायचे. काही विद्यार्थिनी गावात राहणाऱ्या शिक्षकांचे घर देखील सारवण्यासाठी आनंदाने जात असत. यातून आम्हांला स्वावलंबनाचे शिक्षण मिळत असायचे. जे आजच्या हाय-फाय शाळेतून मिळणे शक्य नाही.
               प्राथमिक शाळेत शिकतांना आम्हाला खऱ्या अर्थाने आमच्या काळातील सर्व शिक्षकांचा आम्हाला नजरेचाच धाक असायचा. वर्गातील विद्यार्थी संख्या देखील मर्यादित असायची. प्रत्येक मळ्यातील विद्यार्थी गटागटाने शाळेत ये-जा करत असायचे. आमच्या परीसरातील मोठ्या वर्गाचे विद्यार्थी आमच्या गटाचे नेतृत्व करायचे. त्यांच्या सोबतच शाळा भरतांना व सुटल्यावर घरी पोहोचेपर्यंत आम्ही असायचो. माझी मोठी बहीण शोभा(आक्का), कमलाकर कदम (भाऊ), संजीव, दिलीप, राजेंद्र सर्व (पवार) नात्याने सर्वच आमचे काका, अनिल(मामा)शेजवळ, अशोक निकम, राजू निकम, बापू देवरे, दशरथ देवरे इ.मित्र होते.  आमच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी मोठ्या वर्गातील भावंडाकडे असायची. रस्त्याने ये-जा करतांना रांगेने घरातील वडिलधाऱ्यांनी घालून दिलेल्या सूचनांचे पालन सक्तीने करावे लागे. रस्त्याने कुणाच्याही शेतमालास हात लावायचा नाही. शाळेत शिकणाऱ्या आमच्यापैकी कुणाचीही शाळेत तक्रार झाली तर आमच्या आई-वडिलापर्यंत निरोप पोहचण्यास वेळ लागत नसायचा. घरातील वडीलधाऱ्यांचा त्याकाळी खूप धाक असायचा. आईने डोळे मोठे करून बघितले तरी खूप मोठी शिक्षा मिळाल्याची अनुभूती होत असायची. शाळेत शिकणाऱ्या प्रत्येकास घरातुल मिळालेल्या सुचनांचे विनातक्रार तंतोतंत पालन करावे लागत असायचे. प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत आमचे पालक कधीच शाळेपर्यंत येण्याची वेळ आम्ही व शाळेने येऊ दिली नाही.
               आमचे जुने गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले असल्याने डोंगरावरून एखादा मोठा दगड घरंगळत सोडला तर अर्ध्या गावापर्यंत सहज पोहचत असे. शाळेची मधली सुट्टी आम्हांला डोंगर पायथ्याला जाऊन येण्यास पुरेशी होती. शाळेची मधली सुट्टी मोठी असल्याने काही वेळा डोंगर चढून-उतरून येण्याचा पराक्रम देखील आम्ही करत असू. यासाठी सर्वांनाच सक्तीने घेऊन जात असत, कारण जो कुणी आला नाही तर तो घरी सांगेल असे अनेक अलिखित नियमांचे पालन आम्हाला करावे लागत असत. शाळेची सुट्टी झाल्यावर सर्वप्रथम घरून धोतराच्या कपड्यात बांधून दिलेला चटणी-भाकरीचा डबा खाऊन होत असे. यानंतर विविध करामतीचे खेळ बघावयास मिळायचे. लंगडी, लपाछपी, पकडा-पकडी, गोट्या-गोट्या खेळणे,अंपल-चंपल, गाण्याच्या भेंड्या, वेगवेगळे आवाज काढणे, वाचन, कविता व पाढ्याचे पाठांतर, माझ्या मामाचे पत्र हरवले इत्यादी छोट्या मुलांसाठी खेळाचा समावेश असायचा.   
         कबड्डी, खो-खो, आट्या–पाट्या, मंदिराच्या ओट्यावरून लांब उडी मारणे, शाळेच्या आवारातील करंजीच्या झाडावर सूरपारंभ्या, मंदिरा समोरील गोल दगड उचलून दाखविणे, बारवेवर जाऊन पाणी ओढणे, रहाटाचा आवाज काढणे, उडी मारून मंदिरातील घंटा वाजविणे इत्यादी खेळ मोठी मुले खेळत असायचे. एखादा नवीन खेळ कधी-कधी निर्माण होत असायचा त्यात गावातील धाब्याच्या घरावरून उड्या मारने, शाळेपासून ठराविक अंतरापर्यंत शर्यत, परिसरातील बाभळीच्या झाडाचा डिंक काढणे, ऋतुमानाप्रमाणे बोर, चिंच, आंबा, जांभूळ इत्यादी झाडांची फळे मालकाची नजर चूकवून पाडण्याची कला आमच्यातील काही आमच्या मित्रांनी अवगत केलेली असायची. ज्यांना ही कला अवगत नसायची त्यांनी इतरांचे पिशवी वजा दप्तर सांभाळण्याचे काम करायचे. यापैकी एखादी गोष्ट घरी माहित झाली की, घरून मिळालेली ताकीद किवा मिळालेल्या माराबरोबर तो खेळ काही बंद होत असायचा. घरातील दळण संपण्यात असेल आणि कामामुळे दळण्यासाठी कुणालाही जाणे शक्य नसायचे. त्यावेळी डोक्यावर गोणीतून थोडे फार दळण घेऊन जाण्यासाठी मोठी स्पर्धा असायची. कारण त्याबरोबर गोळ्या घेण्यासाठी पैसे देखील मिळायचे. जास्तीच्या मिळालेल्या पैशातून गोळ्या वाटून खाण्यातील आनंद आजच्या कॅटबरी खाऊन देखील मिळत नाही. दळलेले दळण परत घरी नेतांना झालेली अवस्था आरश्यात बघितल्यावरच कळत असे.             
                 कधीतरी घरी कुणी पाहुणे आले कीआम्हांला खूप आनंद व्हायचा. त्यादिवशी गोड-धोड जेवणाचा थाट वेगळाच असायचा पाहुण्याबरोबर जर पंक्तीला बसून जेवयाला मिळाले तर आकाश ठेंगणे व्हायचे. घरी पाहुणे असल्यावर काही तरी कारण शोधून शाळेला टप्पा मारण्याची मजा काही वेगळीच होती. आलेले पाहुणे दुरून आलेले असल्याने तीन-चार दिवस तरी थांबत असत. पाहुण्यांना बसस्थानकापर्यंत बैलगाडी घेऊन पोहचविण्यास जाण्यात वेगळाच आनंद मिळायचा. आजोबा (आईचे वडील)आम्हांला जातांना एक-दोन रुपये देऊन जात असत. घरी येताच सर्वात सुरक्षित ठिकाणी म्हणजे आईकडे देत असू. तालुक्यातील सर्वांत मोठ्या चंदनपुरीच्या जत्रेला घेऊन जाण्याच्या बोलीवर अनेक लहान-मोठी कामे आम्ही आनंदात करायचो. बऱ्याचवेळा बदली गुराखी म्हणून सुट्टीच्या दिवशी आम्हांला काम असायचे. आमचे  गुरे चारणाऱ्या गड्यास सुट्टीच्या दिवशी दुसरे काम दिले जायचे. त्यामुळे आम्हांला गुरे चारण्यासाठीचे मिळालेले काम सर्वाधिक आवडीचे. आमचे सवंगडी आपापली गुरे चारायला घेऊन येत असल्याने रानावनात चटणी-भाकरी, दगडी गोट्यांचा खेळ, विट्टी-दांडूचा खेळ खूपच आनंद देऊन जायचा. आम्ही गुरे चारण्यासाठी घेऊन गेलो तेव्हा असाच जीवावर बेतणारा प्रसंग आम्ही अनुभवला होता. एकदा माझा भाऊ राजू (बापू) जो माझा पाहिली पासूनचा वर्ग मित्र आहे. आम्ही दोघेही घरची गुरे चारण्यासाठी घेऊन गेलो होतो. साधारणतः पावसाळा सुरु होण्याचा काळ असेल दुपारपर्यंत गुरे चारल्यानंतर दुपारी मोठ्या जांभळीच्या झाडा खाली सावलीत थांबलो होतो. जांभळीच्या झाडावरील जांभळं तोडण्यासाठी भाऊ झाडावर गेला होता, मी खाली थांबून खाली टाकलेले जांभूळ झेलून सुरक्षित ठेवत होतो. त्याचबरोबर गुरांवर लक्ष ठेवत होतो. अचानक झाडाची फांदी मोडल्याचा जोरदार आवाज झाला. फांदीसह माझा भाऊ खाली येतांना स्वत:ला वाचविण्यासाठी पकडलेल्या फांदीसह जमिनीवर जोरात पडला. मात्र सुदैवाने त्याने स्वतःला कसे सावरले? ते त्यालाच माहिती गंभीर दुखापत न झाल्याने पुढील अनर्थ टळला. आज कुणी झाडावर चढलेले दिसले तर तो प्रसंग आठवतो.  संध्याकाळी घरी आल्यावर आईला माहित असायचे की, आम्ही किती थकलेले असणार, त्यामुळे जेवण करताच केव्हा झोपी जायचो कुणालाच थांगपता नसायचा...!
             आम्ही प्राथमिक शाळेत शिकत असतानाचा एक रंजक प्रसंग आठवला.  कोणत्या तरी निवडणुकीची धामधूम सुरु झाली होती. निवडून येण्यासाठी अनेक उमेदवार निवडणुकीत उमेदवारी करत होते. प्रत्येक उमेदवार प्रचारासाठी वेगवेळ्या प्रकारचे फंडे वापरत असायचे. सुरुवातीला प्रचाराची दिवस भरात एखादी जीप भरून कार्यकर्ते येत असायचे. शेवटी प्रचाराने चांगलाच जोर पकडला होता, त्यामुळे अनेक उमेदवार  प्रचारासाठी गावात येत असत. एक दिवस प्रचारासाठी निवडणुक उमेदवार श्री. ग्यानदेव (दादा) तुकाराम देवरे आले होते. त्यांची निशाणी हत्ती होती, त्यांनी प्रचारासाठी वेगळीच शक्कल लढविली होती. ते प्रत्यक्ष हत्ती घेऊन प्रचारासाठी आले होते. पाहिल्यादाच गावात हत्ती आला हे बघताच आम्ही सर्व विद्यार्थी शाळेतून केव्हा पसार झालो हे गुरुजींना देखील समजले नाही. आतापर्यंत चित्ररूपातील बघितलेला हत्ती प्रत्येकासाठी कुतूहलाचा भाग होता. आम्हीं सर्वच हत्तीच्या पायाला, सोंडीला, पोटाला इत्यादी भागास हात लावून प्रत्यक्ष अनुभूती घेण्याचा प्रयत्न केला.  हत्तीच्या पाठीमागे फिरत निवडणुकीच्या घोषणा देण्यातच अर्धा दिवस निघून गेला. गुरुजींनी निरोप पाठवून एकही विद्यार्थी शाळेत यायला तयार नव्हता. शेवटी गुरुजी आमच्या दिशेने येताय असे कुणी तरी ओरडले.  सर्व विद्यार्थी त्वरित शाळेत येऊन बसले. विद्यार्थी दशेत निवडणूकीचा आमच्याशी कोणताही संबध नसतांना ही प्रचाराच्या गाडीमागे पळून विनामूल्य घोषणा देण्यातही मजा असायची. पुढे बरेच दिवस हत्तीच्या केलेल्या निरीक्षणावर व वर्णनावर आमची चर्चा रंगायची.
                   आमच्या काळात प्राथमिक शाळेत सातवीची केंद्र परीक्षा होत असे. आमच्या सातवीच्या वर्गात नवसाचे नऊच विद्यार्थी होतो त्यात दोन मुली संध्या बाबुराव देवरे व विजया बाबुराव देवरे होत्या तर हेमंत भास्कर कदम, राजेंद्र रामराव कदम, संजय विनायक कदम, कै. साहेबराव शामराव देवरे, साहेबराव नारायण पवार, विष्णू कारभारी पेंढारे, भाऊराव रामभाऊ पेंढारे मुले शिकत होतो. मुलींनी दुसऱ्या सत्रात शाळा सोडून दिली होती. शेवटपर्यंत परीक्षा देणारे सातच विद्यार्थी होतो. त्यादृष्टीने वर्षभर शिकविणारे गुरुजी खूप तयारी करून घेत. आमच्या प्राथमिक शाळेत भौतिक सुविधांचा अभाव होता. तरी देखील आमची शाळा संस्कारात कुठेही कमी पडत नव्हती. त्यामुळेच भाषेच्या सर्व कविता तोंडपाठ असायच्या उदा. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, या झोपडीत माझ्या...!, कसाले काय म्हणू नये?, लहानपण देगा देवा..!, आणि माणसाचा दिवस सुरु झाला...! अरे संसार संसार...,मन वढाय वढाय त्याले...... , गे माय भू, तुझे मी फेडीन पांग सारे....., काळ्या मातीत मातीत तिफण चालतो....,शूर आम्ही सरदार आम्हाला....,खबरदार जरा टाच मारुनी चाल पुढे...., इ. संस्कारशील कविता व गद्य पाठ व पाढे आजही आमच्या स्मरणात आहेत. आमचा घरी अभ्यास होत नाही, म्हणून गावातील एक घरात गुरुजीच्या सूचनेप्रमाणे सातवीचे विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी थांबत असायचे.  येथे अभ्यासासाठी थांबल्यावर रात्री रॉकेलचा दिवा किंवा कंदीलाच्या प्रकाशात आम्ही अभ्यास करायचो. रात्री कोण किती वेळ अभ्यास करतो हे बघण्यासाठी गटप्रमुख म्हणून हेमंतची नेमणूक केलेली असायची. प्रत्येकजण सातवीच्या परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असायचो. घरात रात्रभर रॉकेलचा दिवा जळत असल्याने सकाळी चेहरा काळ्या रंगाने रंगरंगोटी केल्यासारखा झालेला असायचा. एकमेकाचा चेहरा बघून आम्ही हसत असायचो. दररोज गुरुजींनी सांगितलेला अभ्यास पूर्ण करावा लागत असायचा.  रात्रीचे पोटभर जेवण झाल्यावर वाचतांना तोंडावरील पुस्तकासह, ते कधी अंगाखाली जाऊन झोप लागायची समजत नसायचे. केंद्र परीक्षेसाठी बाहेरगावी जाण्याची पूर्व तयारी होत असायाची. आमच्या सातवी परीक्षेचे केंद्र जिल्हा प्राथमिक शाळा, टाकळी (सोनज) आमच्या गावापासून जवळपास दहा-बारा किलोमीटर दूर होते.  परीक्षेसाठी आलेले बहुतेक विद्यार्थी येथे परीक्षा संपेपर्यंत येथेच थांबत असत.  याकालावधीत आम्हांला वडील व चुलते बैलगाडी/टांग्यावर दररोज घेऊन जात असायचे. येथे दिलेली परीक्षा आमच्यासाठी घरापासून दूर राहून दिलेली पहिलीच परीक्षा होती. आम्हीं परीक्षा दिलेले सर्व विद्यार्थी गट प्रमुख हेमंत कदम- पोलीस डिपार्टमेंट, मी डी.एड. कॉलेजला शिक्षक, राजेंद्र कदम -सिनिअर कॉलेजला स्टेनोग्राफर, साहेबराव पवार माध्यमिक विद्यालयात सेवक, विष्णू बस कंडक्टर , भाऊराव कल्याण स्थायिक झाला आहे. कदाचित या परीक्षेने पुढील शिक्षणात येणाऱ्या अडचणींची ओळखच आम्हांला करून दिली होती. आमचा एक वर्गमित्र कै. साहेबराव देवरे एका अपघातात दुर्दैवाने आम्हांला सोडून गेल्याने खूप हळहळ वाटलं असते. आमचे बालपण समृद्ध ग्रामीण भागात गेले असले तरी भौतिक सुविधांच्या अभावात देखील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.पवार गुरुजी,(शिरसोंडीकर) श्री. नारायण शेवाळे गुरुजी,(जळगांव निं.) श्री.व सौ गोसावी गुरुजी व बाई(मॅडम),(वराळे) श्री. व सौ.गुंजाळ गुरुजी व बाई (मॅडम)(दरेगाव), व श्री. पाटील गुरुजींनी (खान्देश) आमच्यावर केलेले संस्कार व स्वावलंबन जीवनात यशस्वी करण्यात पुरेसे ठरले. आम्हांला ज्ञानदान करणाऱ्या गुरुजनांचे  प्रति आम्हीं सर्वच विद्यार्थी कायम ऋणी राहून दंडवत करतो...! आम्ही सर्व आपले विद्यार्थी व एरंडगावचे सुपुत्र व सुकन्या विविध क्षेत्रात शाळेचे व गावाचे नाव उंचविण्याचा निश्चितच यशस्वी प्रयत्न करु...!

          दोन वर्षा पूर्वी गावाच्या यात्रेत आपल्या गावातील शाळेतीळ  प्राथमिक शिक्षक असावेत. त्यांनी मला रात्रीच्या गर्दीत गाठून आपल्या गावातील प्राथमिक शाळा  डिजिटल करण्यासाठी वर्गणी जमा करतो आहे असे सांगितले तरुण शिक्षकांचा उत्साह मी बघत होतो, तेवढ्यात एका शिक्षकाने माझ्या हातात पाचशे रुपयांची  शाळेची पावती ठेवली. शाळेची पेपेरमधील बातमी वाचून मला दिलेले पैसे सार्थ कारणी लागल्याचा अनुभव झाला. शाळेतील कार्यरत शिक्षकांना पुढील कार्यासाठी  शुभेच्छा....🙏🙏 

(आमच्या शाळेची बातमी पेपरला वाचून मला आकाश ठेंगणे झाले होते. शाळेला तंत्रस्नेही शिक्षक लाभले असून ते शाळेचे व एरंडगावचे नाव जिल्हाभर मोठे करतील याबाबत मला तिळमात्र शंका नाही. पालकांनी आपले पाल्य गावातील शाळेतच पाठवावे असे मला वाटते. मी देखील याच क्षेत्रात काम करत असल्याने ही बाब मी आत्मविश्वासाने सांगू शकतो. कृपया सर्वांनी बातमी वाचावी ही विनंती👏👏👏)

माझा प्रवास🌹🙏
✒️शब्दांकन✒️✒️
संजय विनायक कदम
मु.पो.एरंडगावकर
अध्यापकाचार्य,
ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन,mvpdn

Comments

Popular posts from this blog

वाजे विद्यलाय-१

महाविद्यालयीन जीवनातील मित्र...!

नांदगाव भाग-5