एक समर्पित व्यक्तिमत्व आर.डी.वाजे सर...!
*एक समर्पित व्यक्तिमत्व श्री.आर. डी. वाजे (सर)...!*
जनता विद्यालय, सोनांबे ता. सिन्नर जि.नाशिक येथील मुख्याध्यापक श्री. आर.डी. वाजे सर मविप्र समाज संस्थेतील जवळपास 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून रविवार दिनांक 31 मे 2020 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. डुबेरे येथील सामान्य शेतकरी श्री. दामू वाजे व सौ. जनाबाई वाजे यांच्या कुटूंबात सरांचा जन्म 1 जून 1962 रोजी झाला. सरांचे आजोळ येथून जवळच असलेले सोनारी आहे.
सरांनी आपले चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डुबेरे येथे, तर माध्यमिक शिक्षण आपल्या गावातील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बर्वे वाड्यात अर्थात जनता विद्यालय, डुबेरे येथे पूर्ण केले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सिन्नर येथे झाले. त्यांनी सन1985-86 शैक्षणिक वर्षात शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नाशिक येथे बी. एड. पूर्ण केले. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीचे ध्येय असते की चांगल्या ठिकाणी शिक्षकाची नोकरी मिळावी. सरांना देखील महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेली संस्था मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेत शिक्षक म्हणून नोकरीची संधी मिळाली.
सरांच्या नोकरीची सुरुवात जनता विद्यालय, सोनांबे येथून दिनांक 19.11.1986 रोजी झाली. येथे त्यांनी उपशिक्षक म्हणून जवळपास 9 वर्षे सेवा केली. येथील सेवेत त्यांनी इंग्रजी विषयाचा चांगला शिक्षक म्हणून नावलौकिक मिळविला. येथे सेवेत असतांनाच ऑगस्ट 1995 मध्ये सरांची बदली खेडले झुंगे येथे झाली. त्यांच्या बदलीने सरांची खूपच गैरसोय झाली होती. मात्र या गोष्टीचा आपल्या अध्यापनावर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली. येथे त्यांनी जवळपास एक वर्ष उपशिक्षक म्हणून सेवा केली. ऑगस्ट 1996 मध्ये जनता विद्यालय, नायगाव येथे त्यांची बदली झाली. असे म्हणतात," दगडा पेक्षा विट मऊ " या उक्ती प्रमाणे येथील बदलीने त्यांच्या प्रवासाचे अंतर कमी झाले होते. नायगाव येथील विद्यालयात त्यांनी दोन वर्षे सेवा केली. माझी मनेगाव येथून जानेवारी 1998 मध्ये नायगाव येथे बदली झाल्यावर आमची येथे सहकारी म्हणून ओळख झाली. सरांचा स्वभाव अत्यंत मितभाषी, शांत, परिश्रमी, कर्मनिष्ठ , मनमिळावू, एकनिष्ठ परोपकारी व्यक्तिमत्व असलेला. त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी निष्ठेने पूर्ण करण्यात नेहमीच अग्रेसर असायचे. सरांचा विषय इंग्रजीसारखा अवघड असल्याने विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी शाळा भरण्यापूर्वी एक तास आधी ते शाळेवर उपस्थित असायचे. त्यांचे इंग्रजी सारख्या कठीण विषयावर प्रभुत्व होते. सर नायगाव येथे बदलून आल्यावर डुबेरे ते नायगाव असा प्रवास दररोज मोटरसायकलने करत असायचे. माझा याकाळात हात फ्रॅक्चर असल्याने मला खाजगी साधनाने प्रवास करणे अडचणीचे होते. यावेळी सरांनी माझ्यासाठी मदतीचा हात पुढे केल्याने माझी नायगाव येथे शाळेवर जाण्या-येण्याची व्यवस्था झाली होती. सर नायगाव येथे असे पर्यंत आम्ही शाळेत सोबतच सेवा केली. सरांच्या रूपाने मला एक चांगला मित्र लाभला. सरांच्या सोबत मला डुबेरे येथे तीन वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली. त्यांच्या अनेक गुणवैशिष्ट्यांचा मला आज देखील सेवा करतांना उपयोग होत आहे*
*सरांची जुलै 1998 मध्ये जनता विद्यालय, डुबेरे अर्थात आपल्या गावात बदली झाली. ज्या विद्यालयात आपण शिक्षण घेतले तेथेच सेवा करण्याची संधी त्यांना या निमित्ताने मिळाली, असे दुर्मिळ भाग्य खूपच कमी व्यक्तींना प्राप्त होते. गावात बदलून आल्यावर त्यांच्या कामाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. त्यांनी आपल्या अध्यापनावर गावातील कोणत्याच गोष्टींचा परिणाम न होऊ देता काम सुरु ठेवले. त्यांच्या अध्यापनावरील एकनिष्ठता व प्रमाणिकपणाचे फळ त्यांना मिळाले. स्वतःच्या गावात निःपक्षपातीपणे कामामुळे जवळपास 16 वर्षे सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली. आपल्या स्वतःच्या गावात सेवा करण्याची मिळालेल्या संधीचं त्यांनी सोन केलं असे म्हटले तर ते योग्य ठरेल.
डुबेरे येथून ते नूतन जवाहर विद्यालय , मनेगाव येथे पर्यवेक्षक म्हणून जुलै 2014 पदोन्नतीने सेवा करण्यासाठी गेले. पुन्हा जून 2015 मध्ये पर्यवेक्षक पदावर डुबेरे येथे बदलून आले. डुबेरे येथून पदोन्नतीने फेब्रुवारी 2017 सायखेडे येथे उपमुख्याध्यापक म्हणून गेले. पुढे 1जून 2017 रोजी पदोन्नतीने जनता विद्यालय, सोनांबे येथे मुख्याध्यापक म्हणून सेवेत रुजू झाले. सोनांबे येथे 3 वर्षे मुख्याध्यापक म्हणून यशस्वी कारकीर्द पूर्ण केली. शासकीय नियमानुसार आज ते 58 वर्षे वय पूर्ण झाल्याने सेवानिवृत्त होत आहेत. मविप्र संस्थेतील विविध शाखांमध्ये जवळपास 34 वर्षे विविध पदावर त्यांनी जबाबदारीने सेवा पूर्ण केली. एक विशेष बाब म्हणजे ज्या शाळेतून त्यांच्या सेवेला 1986 मध्ये सुरुवात झाली होती त्याच शाळेतुन ते मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त होत आहेत हा एक योगायोगच आहे.
सरांनी संस्थेच्या विविध शाखात सेवा करतांना विद्यार्थ्यांवर निःस्वार्थ देवा, स्वावलंबन,परोपकार, परिश्रम,चिकाटी इत्यादी संस्कार अध्यापनातून करण्याचे काम आपल्या सेवेतून केले. त्यांनी विविध क्षेत्रात उच्च पदावर काम करणारे, देश सेवा करणारे सैनिक, इंजिनिअर, डॉक्टर, व्यावसायिक, कुशल कामगार, बँक अधिकारी, पोलीस, पोलीस अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, विविध स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करणारे विविध विद्यार्थी घडविण्याचे कार्य सरांनी केले. त्यासाठी त्यांचे कार्य नेहमीच सर्वांच्या स्मरणात राहील.
सरांना आपल्या आई वडिलांची सेवा करण्याचे मोठे भाग्य लाभले. वडील श्री. दामू बाबा वाजे वय 85 वर्षे यांची आज त्यांचा परिवार आनंदाने सेवा करतो आहे. त्यांच्या मातोश्री जनाबाई वाजे याचे वृद्धापकाळाने 2014 मध्ये दुःखद निधन झाले. हा कालखंड त्यांच्या परिवारासाठी खूपच कठीण होता.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्याच्या अर्धांगिनीचे अर्थात पत्नीचे मोठे योगदान असते. सरांच्या पत्नी सौ.सुनीता रुंजा वाजे वाहिणींची त्यांना भक्कम व तोलामोलाची साथ मिळाल्यानेच त्यांना हा शैक्षणिक प्रवास करणे सुलभ झाले. सरांना दोन मुले व एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगा सचिन देश सेवेत सैनिक म्हणून कार्यरत आहे, लहान मुलगा विजय मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षांत शिकत आहे, तर उच्चशिक्षित कन्या सौ. वृषाली विक्रम जाधव विवाहित असून गोंदे दुमाला येथील सुसंस्कृत जाधव परिवारात तिचा सुखाचा संसार सुरु आहे. सौ. वाजे वहिनींनी एक आदर्श गृहिणी बरोबरच शेतीच्या कामांची सर्व जबाबदारी समर्थपणे पार पाडली. त्यामुळेच त्यांना यशस्वी महिला शेतकरी म्हटले ते नक्कीच योग्य ठरेल. अशा प्रकारे सरांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात महत्वाचे योगदान आहे. सरांच्या ज्ञानाचा फायदा त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व आपल्या आवडीच्या क्षेत्रात भरीव काम करण्यासाठी करावा अशी त्यांना मी विनंती करतो. श्री. आर. डी. वाजे सरांच्या परिवाराचे भावी जीवन आरोग्यदायी दीर्घायुष्य, सुख-समृद्धी, यश, वैभव, किर्ती, संपन्नता प्राप्त होवो ही परमेश्वरचरणी प्रार्थना....!
सरांचा सेवापूर्ती कर्यक्रम लॉकडाउन मूळे होत नसला तरी त्यांचे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवक वृंद, मित्र परिवार, डुबेरे व सोनांबे येथील ग्रामस्थ, विद्यार्थीमित्र, नातेवाईक, मित्र परिवारातर्फे सेवानिवृत्तीस शुभेच्छा🌹🌹💐💐💐🙏🙏🙏
शब्दांकन✒️🌹
श्री. एस.व्ही.कदम(सर)
ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, दिंडोरी
Comments
Post a Comment