आठवणी मातृभूमीच्या ......!(एरंडगाव)

🌹आठवणी मातृभूमीच्या.....!🌹    
       (झाडी-एरंडगावच्या)
शब्दांकन ✒️ श्री.संजय विनायक कदम

               नाशिक जिल्यात मालेगाव तालुक्यातील  एरंडगाव माझे मुळगाव आहे. आजूबाजूच्या परिसरात झाडी-एरंडगाव नावाने प्रसिद्ध आहे. मालेगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेती सिंचनाखाली आणण्यासाठी नेहमीच चर्चेत असणारा चणकापूर उजवा कालवा झाडी–एरंडगाव लाभ क्षेत्रातील आमचे शेवटचे गाव एरंडगाव. झाडी येथील ऐतिहासिक बंधाऱ्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आपल्या देशाचे तत्कालीन पंतप्रधान मा. जवाहरलाल नेहरू आले होते.  आमचे  गाव यापूर्वी मालेगाव लोकसभा मतदार संघात होते, आता दिंडोरी लोकसभा मतदार संघात गेले असले तरी समस्यात वाढ झालेली आहे. पूर्वीच्या चांदवड विधानसभा मतदार संघात असलेले आमचे गाव सध्या नांदगाव विधानसभा मतदार संघात समाविष्ट होऊन परिस्थितीत फारसा कोणताही बदल न झालेले एरंडगाव.    
          
               आपल्या मातृभूमिचा प्रत्येकाला अभिमान असतो त्याप्रमाणे मला देखील माझ्या गावाचा अभिमान आहे. पंचक्रोशीतील एरंडगाव अत्यंत महत्वाचे गाव आहे. एरंडगाव सन 1972 पर्यंत सावकारवाडी-अंधारपडे-एरंडगाव मिळून एरंडगाव ग्रुप ग्रामपंचायत अस्तित्वात होती. नंतर मात्र आमच्या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आली. इ.स.1972 च्या भीषण दुष्काळाची झळ आमच्या गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सोसली होती. तरीही गावाच्या आसऱ्याने अनेकांनी आपला जीवनक्रम संघर्षमय मार्गाने पुढे नेला. मनमाडच्या उत्तरेस मनमाड- देवळा रस्त्यावर सोळा किलोमीटर, तर मालेगाव पासून दक्षिणेस तेवीस कि.मी. अंतरावर आमचे गाव वसलेले आहे.  देशाच्या 2011 च्या जनगणनेनुसार गावात जवळपास 437 कुटुंब (घरे) असून, गावाची लोकसंख्या 2158 असून यात महिला 48% तर पुरुष 52% इतके आहेत. एरंडगावच्या दक्षिण व पश्चिम बाजूने डोंगररांगेचा विस्तीर्ण नैसर्गिक समृद्ध वारसा लाभलेले आहे. हा भाग शासनाच्या सामाजिक वनीकरणाकडे आहे. येथे मोठ्याप्रमाणात वृक्षरोपण केलेले आहे. पावसाळ्यात आमच्या गावाला निसर्गाने दिलेले सौंदर्य कुणाचीही नजर लागावी असेच असते, डोंगर-दऱ्यातून वाहणारे झरे, पुढे वाहणारे ओढे-ओहळ नदीत रुपांतरीत होत असत. ही सर्व नैसर्गिक संपन्नता असूनही, मात्र डिसेंबर-जानेवारी महिना सुरु होताच गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्यास सुरुवात होते. तेव्हा पासून सुरु झालेली पाणी टंचाई मे-जून महिन्यातील मान्सूनपूर्व अर्थात वळवाचा पाऊस पडेपर्यंत सुरूच असते. शेतीसाठी सिंचनाच्या सोयी सर्व निसर्गावर अवलंबून आहेत.

             आमचे एरंडगाव पंचक्रोशीत अनेक वैशिष्ट्पूर्ण बाबींसाठी ओळखले जाते. आमच्या गावाचे पोलीस पाटील सौ. संगीता राजेंद्र वाघ व सरपंच श्री. सुरेश मुरलीधर  सानप आहेत.आमच्या गावाचे वेगळेपण असे आहे-- जुन्या गावातून नवीन गावाच्या रूपाने स्थलांतरित झालेले गाव, गुढीपाडव्या नंतर पंचमीला भरणाऱ्या यात्रेसाठी प्रसिद्ध गाव,भोहाड्यातून सांस्कृतिक वारसा जपणारे गाव, गावाची यात्रा असूनही लोकनाट्य तमाशा पासून दूर असलेले गाव, नवीन गावात आकर्षक तुळजाभवानी देवीचे सुसज्ज मंदिर असलेले गाव, आमच्या गावातून छपन्न गाव पाणी पुरवठा योजना गेलेली असूनही या योजनेतून वगळलेले गाव, कायम पाणी टंचाईसाठी प्रसिद्ध गाव, मळ्यातील वस्तीचे गाव, गावात मराठी, अहिराणी, आदिवासीची भिल बोलीभाषा प्रचलित असलेले गाव, पारंपारिक व आधुनिक पद्धतीने शेती करणारे अनोखे गाव, यांत्रिक पद्धतीने शेती करणारे गाव, प्रत्येक घरात मोटरसायकल असलेले गाव, बहुसंख्य शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीसाठी केलेला शेततळ्याचा वापर करणारे गाव, डाळिंब उत्पादनासाठी अग्रेसर गाव, शेती पूरक पोल्ट्री फार्म व इतर व्यवसाय करणारे गाव,  दुग्ध व्यवसाय व श्री. सचिन वाघ यांचे दुध संकलन केंद्र असलेले गाव, सर्व धर्मीय गुण्या गोविंदाने नांदणारे गाव, बारा बलुतेदारांपैकी बहुसंख्य गावातच रहात असल्याने स्वयंपूर्ण गाव, जुन्या काळापासून पोष्ट सेवा असलेले गाव, पोलीस पाटील त्यांच्या नियमाने  काम करणारे गाव, लोकशाही पद्धतीने काम करणारी ग्रामपंचायात असलेले गाव, निवडणूक काळात अनेकदा कटुता निर्माण होऊनही गावाचे हित लक्षात घेऊन एकत्र येणाऱ्या लोकांचे गाव, गावात कुणा व्यक्ती व प्राण्यास शारीरिक इजा झाल्यास मोफत योग्य उपचार, सल्ला व मार्गदर्शन करणाऱ्या श्री. संतोष (मामा)गोलाईत यांचे गाव, परिसरात सातवी पर्यंत प्राथमिक शाळा असलेले गाव, देशसेवेसाठी विविद्ध क्षेत्रात कुशल कामगार ते अधिकारी पुरविणारे गाव, आमची प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री ठोके सर, तंत्रस्नेही शिक्षक श्री. वैजनाथ भारती व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी  इलर्निंग द्वारे आधुनिक शिक्षण देणारी शाळा असलेले गाव, युनेस्कोचे सदस्यत्व प्राप्त केलेल्या प्राथमिक शाळेचे गाव, उपक्रमशील प्राथमिक शाळेचे गाव, इयत्ता आठवी ते दहावी पर्यंत अनुदानित माध्यमिक विद्यालय असलेले गाव, महिला बचत गट कार्यरत असलेले गाव,  एरंडगाव विविध कार्यकारी सोसायटी शेतीसाठी प्रमुख अर्थवाहिनी असलेले गाव, परिसरात मोठ्या संखेने मोरांचा वावर असलेले गाव असे अनेक वैशिष्ट्ये असणारे आगळेवेगळे गाव आमच्यासाठी एक आदर्शच आहे. गावात पाड्व्यानंतर भरणाऱ्या यात्रेसाठी एक कमिटी स्थापन करून त्यात सरपंच, पोलीस पाटील, श्री. विष्णू श्रावण देवरे, श्री. दादाजी शिवराम हिंगे, ग्रामपंचायत मदतनीस यांचा सभाग असतो. या कमिटीवरच यात्रेची तयारी व नियोजन करण्याची जबाबदारी सोपवलेली असते.
    
              आमचे गाव पंचक्रोशीत गुढीपाडव्या नंतरच्या पंचमीस भरणाऱ्या देवीचा यात्रोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. यात्रेची तयारी शिमग्यापासून सुरु झालेली असते. यात्रेच्या दिवशी गावात सकाळी देवीच्या मुखवट्याची मिरवणूक वाद्यवृंदासह मोठ्या थाटात निघत असते. जुन्या गावातील सर्व देवांच्या व देवीच्या मंदिरातील सभामंडपात आंबा, उंबर जांभूळ, इ.च्या फांद्याचा मांडव टाकला जातो. देवीच्या मुखवट्याची मिरवणूक संपूर्ण यात्रेचे मुख्य आकर्षण असते. या मिरवणुकीत गावातीतील प्रत्येक घरातील लोक सहभागी होत असतात. यात्रेच्या दिवशी रात्रीच्या भोहाड्यासाठी (अपभ्रंश होऊन सध्या भवाडा भोवाडा, अक्षय तृतीयेस यास आखाडी) आपल्या कुटुंबाकडे असलेल्या पात्राच्या मुखवट्यांची (सोंगाची) आवश्यक तयारी प्रत्येक कुटुंब आपापल्या परीने करत असते. यात्रेपूर्वी आठ-पंधरा दिवस आधीच ही तयारी सुरु झालेली असते. आपल्या कुटुंबाकडे असलेल्या मुखवट्यांची रंगरंगोटी व साज करण्याची जबाबदारी संबंधितांची असते. आपले पात्र आकर्षक व रुबाबदार होण्यासाठी कुटुंबातील सर्वच सदस्य प्रयत्नशील असतात. त्यामुळे प्रत्येक कुटुंबात या काळात नवउत्साह संचारलेला असतो. यात्रेची कमिटी वेळोवेळी भोहाड्यात सहभागी पात्राच्या तयारीचा आढावा घेत असते. कुणाला काही अडचण असेल तर ती दूर करण्याचा प्रयत्न यात्रा कमिटी करते. 
              
              आमच्या जुन्या गावात आज खूपच अत्यल्प वस्ती असली तरी यात्रा जुन्या गावातच भरते. जुन्या गावातील देवीचे अत्यंत जागृत देवस्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. आमच्या गावात सुरतेच्या लुटीवरून परत येतांना दिंडोरी जवळ मुगल सैनिकांशी झालेल्या लढाई नंतर शिवाजी महाराज थांबल्याचे ऐतिहासिक संदर्भ मिळतात. जुन्या गावातील गढीची रचना शिवपूर्वकालीन गढीप्रमाणेच असल्याचे पुरावे आढळतात. या गढीतील पांढरी माती घराच्या बांधकामासाठी अनेकांनी वापरल्याने त्यांचे घर माजबुतीने उभे आहेत. गावकऱ्यांनी गढीची माती खोदून  वाहतूक करतांनाच शिवकालीन दोन तोफा येथे सापडल्या होत्या. गावाच्या पोलीस पाटीलांनी संबंधित यंत्रणेशी संपर्क करून पंचनामा होऊन तत्कालीन तहसीलदारांकडे त्या तोफा सुपूर्द केल्या होत्या. आजही या तोफा मालेगाव येथे असल्याचे समजते. शिवकालीन काळात बुजलेलं सोनं-नानं थोड्याफार प्रमाणात सापडल्याच्या काही घटना पूर्वीच्या काळात घडल्याचे तत्कालीन वृद्ध सांगत असायचे. गढीची रचना गावाच्या मध्यभागी उंच भागावर होती, संपूर्ण गढीला सुरक्षिततेच्या दृष्टीने एकच प्रवेशद्वार, धान्य साठविण्याची व्यवस्था, शस्त्रगार, मजबूत बांधकाम किल्यात असलेल्या सर्व सुविधा असलेली गढी मोठ्या क्षेत्रात विस्तारलेली आहे. कदम परिवाराला त्याकाळातील आपल्या पराक्रमाबद्दल वेरूळ येथील श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या कडून एरंडगावचे व चांदवड तालुक्यातील रेडगाव या दोन गावांचे वतन मिळाल्याचे ऐतिहासिक संदर्भ आढळतात. तेव्हा पासून कदम परिवार गावात एरंडगाव येथील महत्वाचा घटक झाला आहे. गावातील देवी अत्यंत जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.  येथील यात्रेत देवीच्या पूजेचा मान आमचे मोठे काका श्री. भास्करराव शामराव कदम यांच्याकडे आहे. यात्रेच्या दिवशी सकाळी देवीचा मांडव कार्यक्रम आटोपल्यावर संपूर्ण गावातून आपापल्या परीने देवीला गोडधोड नैवेद्य देण्याची परंपरा आहे. कदम परिवारातील सदस्य म्हसोबा महाराजासाठी खारा व देवीसाठी गोड नैवेद्य देण्याची प्रथा आजही जोपासत आहे. दिवस भरात जागृत देवीपुढे आपल्या कामना पूर्तीसाठी केलेले नवस सत्यनारायण पुजेसारखे धार्मिक कार्यक्रम मंदिरात होत असतात. त्याच बरोबर गावातील नोकरी व कामधंद्याच्या निमित्ताने बाहेरगावी असलेले सर्व गावकरी गावात येत असतात. सर्वांना एकत्रित आणण्याचे काम या यात्रौत्सवाच्या निमित्ताने होत असते. गावात आलेले भाविक श्रद्धेने देव देवतांबरोबर जागृत देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी मोठी गर्दी करतात. गावातील तरुण मंडळीसं सायंकाळी आयोजित भोहाड्याचे मोठे आकर्षण असते. रात्री भोहाड्यात गावातील तरुण स्वयंसेवक  म्हणून काम करतात. काही जेष्ठ सदस्यांसह तरुण मंडळी  नियोजनबद्ध पद्धतीने येथे कार्यरत असलेले दृश दोन पिढ्यातील सांस्कृतिक देवाणघेवाणीचे आदर्श चित्र सर्वांनाच थक्क करणारे असते. जुन्या पिढीतील वैचारिक, सांकृतिक, सामाजिक व आधुनिकतेचे संस्कार यानिमित्ताने होत असल्याचे बघावयास मिळतात. संपूर्ण भोहाडा परिणामकारक होण्याची जबाबदारी गावातील वाजंत्री मंडळ यशस्वीरीत्या पार पाडतात. आपल्या परिवारातील व्यक्ती जेव्हा नाचत आपले पात्र घेऊन जाते तेव्हा पैशांची ओवाळणी टाकत असतात. आता पैशाची जागा रुपयांनी घेतल्याने वाजंत्रीच्या काम करणाऱ्या व्यक्तींना आर्थिक हातभार लागण्यास मदत होते.

             भोहाड्याच्या दिवशी जागा पकडण्यासाठी बाज पलंग इत्यादी वस्तू टाकून ठेवल्या जायच्या. जेणेकरून रात्री कुटुंबासह कार्यक्रम जवळून बघता येण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील रहात असायचा. रात्री गावातील भोहाड्याच्या सुरुवातीचा मान गणपतीच्या आकर्षक मुखवट्यासह नाचत येणाऱ्या गणपतीस असतो. प्रत्येक पात्र येतांना मोठा जयजयकार करत येत असते. प्रत्येक पात्र विशिष्ट अंतर नाचत जाऊन परत आरंभीच्या ठिकाणी येताच भोहाड्यातील त्याचा सहभाग संपलेला असतो. उपस्थितांना येणारे पात्र कोणते आहे ? याची संपूर्ण माहिती पात्राच्या जयजयकाराने होत असते. पूर्वीपासून रामायणातील निवडक पात्र व प्रसंगांचे सादरीकरण केले जात असते. यात्रेतील पात्र कुणी नाचवत घेऊन जायचे याची तयारी पूर्वीच झालेली असते. यात्रेतील पात्रासोबत घरातील इतर सदस्य देखील नाचत सहभागी होत असतात. यात्रेच्या निमित्ताने लहानथोर मंडळी वर्षभरातील ताणताणाव विसरून आनंदानुभूती मिळवत असल्याचे सुंदर दृश्य या निमित्ताने बघावयास मिळते. 
यात्रेतील प्रमुख पात्र  पुढील प्रमाणे
गणपती-श्री. मधुकर सुकदेव हिंगे, 
सारजा (सरस्वती) - श्री. बापू बळीराम शेजवळ, एकादशी- श्री. दत्तू कळू जाधव, 
खंडोबा श्री. नागू बुधा वाघ,
 महादेव- श्री. भाऊराव बळवंत वाघ, 
शूर्पणखा- श्री. रतन गटलु नाईक, 
वेताळ- श्री. दामू बापू वाघ, 
मारुती(हनुमान) -श्री. सुभाष बाळू कदम, 
अंगद- श्री. गणेश सयाजी देवरे, 
वालीव-श्री. किसन मौजी शेजवळ, 
सुग्रीव- श्री.दिलीप महादू कदम, 
सीताहरण गोसावी- श्री. बबन किसन निकम, 
हरीण- श्री. नागू बुधा वाघ, 
मारीच- श्री. निंबा रामदास आहेर, 
गरुड- श्री वाल्मिक सहादू कदम, 
श्रीराम- श्री. लक्ष्मण साहेबराव शेजवळ, 
लक्ष्मण- श्री. दादाजी गणपत सोनवणे, 
सीता- श्री. संजय लक्ष्मण शेवाळे, 
कुंभकर्ण- श्री. समाधान तुकाराम हिंगे,
बिभीषण- श्री. भरत सुखदेव पवार
इंद्रजीत- श्री. मधुकर संपत देवरे,
 घुरनारायण- श्री.जिभाऊ भिका वाघ, 
शहामृग(शामृग)- श्री. बाबाजी गुलाब वाघ, 
 कैदी(बंदी)- श्री. माणिक भिका देवरे, 
नारद श्री. कैलास रंगनाथ सोनवणे, 
गावाच्या संपूर्ण यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेले
देवीचे पात्र श्री. कमलाकर (काका) भास्करराव कदम, देवी सोबतच  महत्वाचे 
महिषासुर पात्र-श्री. काळू देवराम सोनवणे
इत्यादी ग्रामस्थ आपल्याला मिळालेल्या पात्रात जीव ओतून सादरीकरण करून उपस्थितांचे मन जिंकतात.  
          
              भोहाड्यातील पात्रांच्या येण्याचा क्रम व वेळ यात्रेच्या कमिटीने ठरवून दिल्याप्रमाणे असतो. प्रत्येक सहभागी पात्र  योग्य नियोजन करून अंमलबजवणी करतात. रामायणातील विविध पात्र युद्धाचे प्रसंग किंवा प्रभावी संवादांची जुगलबंदी सर्वांचेच लक्ष वेधून घेते. सीतेच्या अपहरणाचा प्रसंग अत्यंत भावनाशील व करूणेचे वातावरण निर्मितीने उपस्थितांच्या डोळ्यातून  अश्रुंना मोकळी वाट करून देण्यास पुरेसे ठरतात. भोहाड्यातील पात्र क्रमाक्रमाने राम-रावण, लक्ष्मण-इंद्रजीत, राम-कुंभकर्ण इत्यादी पात्रातील शाब्दिक व रणांगणावरील युद्धाच्या प्रसंगाने सर्वच दर्शक मंत्रमुग्ध होत असतात. या संघार्षमय प्रसंगानातर सर्व संपूर्ण पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवी व महिषासुर यांच्यातील संघर्षात देवीच्या तलवारीचा स्पर्श होताच महिषासुर पात्र असलेल्या व्यक्तीच्या अंगात शक्तीचा संचार होत असल्याची भाविकांची मान्यता आहे.  देवीच्या विजयाने भोहाड्याची अंतिम चरणांकडे वाटचाल सुरु होते. यानंतर सर्व भाविक श्रद्धेने देवीच्या पात्राचे शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेऊन मार्गस्थ होतात. देवीचे पात्र विजयी आवेशात मंदिरापर्यंत जावून देवीच्या दर्शनाने भोहाड्याची सांगता होत असते. 
               
                   भोहाड्याची सांगता जरी झाली असली तरी यात्रेचे खरे आकर्षण बालगोपालांना असते. यामध्ये प्रामुख्याने गावात तिसऱ्या प्रहरात कुस्त्यांचे यशस्वी आयोजन- गावातील वीटभट्टी उद्योजक श्री संतोष फुला गोलाईत, माजी सरपंच श्री. बाळासाहेब रावजी हिंगे इ. करतात. कुस्तीसाठी दूरवरून नामवंत पहिलवान सहभागी होऊन बक्षिसाची मोठी रक्कम जिंकण्यासाठी आपले खेळातील कसब पणाला लावून उपस्थित कुस्ती प्रेमींचे मन जिंकतात. बालगोपालांच्या कुस्त्या जिंकणारे व हरणारे दोघेही बक्षिसास पात्र असतात. गुडीशेव व रेवड्या मिळतात याचा लाभ आम्ही बालवयात घेतल्याचा मला अभिमान आहे. यात्रेतील विविध खेळणीची दुकाने, लहान-मोठे पाळणे, मिठाई व खाऊच्या दुकानातून प्रत्येक घरात यात्रेचा खाऊ परिवारासोबत खाण्याचा आनंद लहान-थोर घेत असतात. आमच्या गावातील यात्रा नोकरी निमित्त बाहेर असलेल्या सर्वांनाच आनंद देणारा उत्सव आहे. नवीन गावात तुळजा भवानी मातेचा उत्सव नवरात्रात मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. या उत्सवात सकाळ सायंकाळ देवीची पूजा-अर्चा व आरती होत असते. दसऱ्याच्या दिवशी येथे विधिवत  होम-हवन केले जाते.प्रत्येक सण उत्सवाचा वेळी मंदिरातील देव-देवतांची पूजा करून नैवेद्य दिला जातो. गावाने नेमूण दिलेले कुटुंब सकाळ-सायंकाळ मंदिरात स्वच्छता व दिवाबत्तीचे काम श्रद्धेने इमाने-इतबारे पार पाडत असते.

                  आमच्या गावातील बहुसंख्य लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. गावातील लोक पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांचे नियोजन करतात. पावसाळ्याच्या सुरुवातीस पावसाच्या आगमना बरोबर काही शेतकरी कांद्याचे रोप टाकतात. कांद्यासारखे नगदी पिक उत्तम प्रकारे घेण्याचे कौशल्य काही शेतकऱ्यांनी आत्मसात केले आहे. संबधित शेतकरी पोळ कांद्याचे चांगले पैसे प्राप्त करून शेतीसाठी भांडवल उपलब्ध करून घेण्यास यशस्वी होत असतात. कांद्याचे सर्वाधिक उत्पन्न घेणारे प्रमुख शेतकरी श्री. त्र्यंबक नामदेव वाघ, श्री. नाना रामभाऊ वाघ, श्री. शरद विष्णू देवरे, श्री. तात्याबा किसन वाघ, श्री. अशोक पुंजाराम वाघ, श्री. अनिल शामराव देवरे, श्री. राजेंद्र बबन वाघ, श्री. पंडित केदा देवरे, श्री.बापू रामचंद्र देवरे, श्री.भाऊसाहेब दशरथ देवरे इ. आहेत. काही शेतकऱ्यांनी डाळिंब उत्पादनासाठी आवशक पाणी शेततळ्याच्या माध्यमातून उपलब्ध करून घेतले आहे. शेततळ्यातील पाण्याचा अंदाज घेऊन हे शेतकरी पिकाचे योग्य नियोजन करतात. काही नवागत शेतकरी डाळिंबाचे उत्कृष्ट पिक घेण्यासाठी तज्ञांचे गरजेप्रमाणे मार्गदर्शन घेतात. आमच्या गावात डाळिंबाचे सर्वाधिक उत्पन्न घेणारे श्री. नाना रामभाऊ वाघ, श्री. तात्या किसन वाघ, श्री.राजेंद्र दादाजी निकम, श्री. कांतीलाल शंकर हिंगे, श्री. प्रकाश अशोक पवार, श्री.सुरेश बाळू कदम, श्री.रमेश नथू शेजवळ, श्री.प्रभाकर सावळीराम जाधव, श्री.सुभाष बाळू कदम, इ. शेतकरी यशस्वी उत्पादन घेत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. गावातील शेतकऱ्यांनी पिकविलेले डाळींब नाशिकच्या बाजारात पोहचविण्याचे काही शेतकरी शेतीपूरक व्यवसाय देखील करू लागले आहेत. यात श्री. अनिल पोपट जाधव, श्री.प्रकाश पांडुरंग शिंदे, श्री. सुनील अशोक शिंदे, श्री.संदीप सुरेश देवरे इ.वातुकदार प्रमुख आहेत. शेतकऱ्यांच्या घरून डाळिंबाचे कॅरेट संकलन करून विक्रीसाठी नाशिकला घेऊन जातात. शेतकरी शक्य असेल तर आपले प्रतिनिधी पाठवितात. ज्या शेतकरी मित्रांना शक्य नाही, अशा शेतकऱ्यांचा शेतमाल  विश्वासाने विक्री करणारे वाहतूकदार गावातीलच असल्याचा फायदा शेतकऱ्याना मिळतो. शेतकरी मित्र म्हणून हे गावातील वाहतूकदार महत्वाची भूमिका पार पडत असतात.

                   गावात काही शेतकरी शेतीस जोड व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसाय करतात. गावात हा व्यवसाय दीर्घ काळापासून यशस्वीरीत्या सांभाळण्याचे काम श्री.कमलाकर (काका) भास्करराव कदम करत आहे. त्याच बरोबरच श्री. शांताराम भिका देवरे, श्री. विलास साहेबराव देवरे, श्री. योगेश दौलत देवरे, श्री.रवी खैरनार इ. शेतकरी शेती पूरक व्यवसाय करत आहेत. या शेतकऱ्यांचे परिश्रम, जिद्द व धैर्य या क्षेत्रात येणाऱ्या नव व्यावसायिकांसाठी ते मार्दर्शक ठरले आहेत. माझ्या गावातील सर्व शेतकरी आणि वेगवेगळे शेती पूरक व्यवसाय करणाऱ्या बांधवाना माझी एक विनंती आहे. बरेच लोक झटपट श्रीमंत होण्याचे प्रयत्न करतात पण मला एक उदाहरण नेहमी आठवत असते. आपण उंचावर फेकलेली वस्तू ज्या वेगाने वर जाते, त्याच वेगाने ती  खाली येत असते हा नियम नोकरी, व्यवसाय, व्यापार व शेतीसाठी देखील लागू होईल असे मला वाटते. जीवनात सफल व्हायचे असेल तर आपल्यापेक्षा कष्टाने जीवन जगणाऱ्या लोकांचे जीवन बघितले तर जीवनात निराशा कधीच येणार नाही. जीवनाचे मार्ग आपोआप सफलतेकडे घेऊन जातील. जर श्रीमंत लोकांच्या जीवनाकडे बघून आपण जीवन पुढे घेऊन जाणार असलो तर आपले सुखी जीवन कधी दु:खात रुपांतरीत होईल हे आपणांस कळणार देखील नाही. माझ्या दृष्टीने देशसेवा करणारा सैनिक, शेतात प्रामाणिकपणे काम करणारा शेतकरी, नोकरी करणारा नोकरदार, वेगवेगळे अभ्यासक्रम शिकणारा कोणत्याही वायोगटातील विद्यार्थी, वृद्ध आईवडीलांची सेवा करणारी मुलं, मतीमंद पाल्याची सेवा करणारे पालक, इच्छा असताना किंवा इच्छा नसतांना प्रामाणिकपणे आपले काम एकनिष्ठेने करणारी व्यक्ती देशसेवा करणाऱ्या सैनिका इतकीच महत्वाची असते. म्हणून प्रत्येकाने आपले काम श्रद्धेने, निष्ठेने, प्रामाणिकपणे केले तर अपयश आपल्या जवळपास सुद्धा फिरकणार नाही असा मला विश्वास आहे. गावातील सर्वच शेतकरी बंधू आपल्या परीने उत्तम शेती करताय मात्र सर्वांची नावे लेखात लिहिणे शक्य नसल्याने व अनावधानाने जर कुणाचे नाव येथे लिहिणे आवश्यक होते पण मी ते येथे समाविष्ट करू शकलो नाही .मी अशा सर्व शेतकरी मित्र, नोकरदार, व्यावसायिक, मजूर इत्यादींची क्षमा मागतो.

              शेतीप्रधान असलेले आमच्या गावाने परिसरात आपले वेगळेच स्थान निर्माण आहे. आमच्या गावातील मातीतून बालवयातच संघर्ष करण्याचे संस्कार होतात.  त्यामुळेच प्रत्येक बालक शिक्षण घेत असतानांच तावून सुलाखून निघाल्याने गावाबाहेर पडून नोकरी, व्यवसाय, देशसेवा इत्यादी क्षेत्रात निष्ठेने कार्य करून गावाचे नाव उंचविण्याचे काम प्रामाणिकपणे करत असल्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. गावातील शेतकरी निसर्गाच्या चांगल्या-वाईट गोष्टीच्या होणाऱ्या परिणामाची पर्वा न करता भविष्यात आशावादी दृष्टीकोन अंगीकारून आपले संघर्षमय जीवन जगत आहे.  आपल्या व्यवसायावर निष्ठा ठेऊन येणारा भविष्यकाळ घडविण्याचा प्रयत्न निश्तितच करत असल्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. माझ्या गावातील कोणताही व्यवसाय किंवा शेती करण्यासाठी ही पूरक नक्कीच नाहीत पण संघर्षातून मिळालेली गोष्ट कायम स्थायी स्वरुपात मिळते. विशेष म्हणजे माझ्या गावाचा मला एका गोष्टीसाठी निश्चित अभिमान वाटतो, आमच्या गावात संघर्षमय जीवन जगणाऱ्या एकही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही ही गावाच्या दृष्टीने गौरवास्पद आहे. यामुळेच आमचे गाव माझ्यासाठी नक्कीच आदर्श व प्रेरणादायी ठरलेले आहे. म्हणूनच माझ्या गावाच्या बाबतीत मी म्हणेल की, "जननी जन्मभूमी स्वर्ग से श्रेष्ठ है.....!"  
 
             मला लिहिण्यासाठी माझे वडील आदरणीय श्री. विनायक शामराव कदम (आण्णा) व काका श्री.भास्कर शामराव कदम यांचे बहुमोल आशीर्वाद रुपी मार्गदर्शन लाभले. माझे मित्र श्री. अशोक दादाजी निकम यांचे सहकार्य लाभले. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

🌹माझा प्रवास🌹✒️
✒️शब्दांकन- ✒️श्री.संजय कदम
अद्यापाकाचार्य 
जुनिअर कॉलेज ऑफ  एज्युकेशन, mvpdn

Comments

Popular posts from this blog

वाजे विद्यलाय-१

महाविद्यालयीन जीवनातील मित्र...!

नांदगाव भाग-5