बी.एड. कॉलेजच्या आठवणी...!🌹🌹
✒️शब्दांकन- ✒️संजय कदम
मी एम.ए. चा अभ्यासक्रम पूर्ण करत असतांना माझ्याकडे पुढील शिक्षणासाठीचे अनेक पर्याय उपलब्ध होते. मी याकाळात नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयात पार्ट टाइम काम करत होतो. त्यामुळे त्यांनी मला ग्रंथपाल विषयाची पदवी पूर्ण करण्यासाठी आग्रह धरला. माझी परीक्षा जवळ आल्यामुळे त्यांनी मला पानसे अभ्यासिकेत नेमणूक केली होती. मात्र एप्रिल १९९२ चा महिना माझ्या दृष्टीने ‘काळात तेरावा महिना ठरला.’ याच महिन्यात आई आजारी असल्याने आम्ही तिला भेटण्यासाठी गेलो होतो. आई दवाखान्यात उपचार घेत असतांना डॉक्टरांचे उपचार अपुरे पडल्याने माझे मातृछत्र हरपले. माझ्यासाठी जीवनच अंधकारमय झाले होते. याच काळात मी पुढील शिक्षणासाठी भरलेल्या विविध अभ्यासक्रमासाठी मुलाखती होणार होत्या. मात्र गावी असल्यामुळे मला त्यातील बऱ्याच मुलाखतीसाठी उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे माझ्या हिंदी विषयात एम. फिल. च्या अभ्यासासाठीची संधी गेली. पुणे, धुळे, संगमनेर येथील बी. एड. अभ्यासासाठीच्या मुलाखतीला पोहचता आले नाही.तेथील संधी देखील माझ्या हातातून गेल्या होत्या. नाशिक येथील मुलाखतीसाठी मोठ्या मुश्किलीने उपस्थित राहून मविप्रच्या बी.एड. कॉलेजला माझा नंबर लागला. माझ्या परिचित मुलाने माझा अवतार बघून, वाढलेली दाढी, अस्तव्यस्त केस बघून माझ्यावर केलेली कॉमेंट्स आजही आठवल्यावर मला खूप यातना होतात. मला वाटते खेड्यात राहणाऱ्या सर्व मुलांसोबत असे प्रकार घडत असतात. माझी सर्व स्थिती माहित झाल्यावर त्याने माझी माफी मागितली, पण त्या अगोदर अनेक वेदना मला तो देऊन गेला. आईचा दशक्रिया विधी करून आल्यानंतर पेपर द्यावे, की नाही मी या विचारात असतांना माझी मोठी बहीण सौ. शोभा रायते व दाजी श्री. शिवाजीराव रायते यांनी मला परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन देऊन तयार केले. त्यामुळेच मी एम. ए. हिंदी द्वितीय वर्षाचे पेपर देऊन चांगले गुण मिळविले. एम. ए.ची परीक्षा दिल्याने माझे पुढील शैक्षणिक सत्र सुरळीत सुरु होण्यास मदत झाली.
पुढील शैक्षणिक वर्ष सूरु होताच माझे बी. एड. कॉलेज नियमित सुरु झाले. मला सार्वजनिक वाचनालयातील पार्ट टाईम काम सोडावे लागले, कारण त्यांनी सुचविल्याप्रमाणे मी ग्रंथपाल अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला नव्हता. माझ्या घरची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासाळलेली होती, या वेळी माझे लहान दाजी कै. राजेंद्र जाधव यांनी माझे अडमिशनचे पैसे भरल्याने मी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकलो. बी.एड.च्या पहिल्याच तत्वज्ञानाच्या तासिकेला पहिले वाक्य ‘मागता येत नाही भिक, तर मास्तरकी शिक’ हे वाक्य ऐकून मला तर आपले क्षेत्र चुकले की काय? असा प्रश्न पडला, पण आता मार्ग बदलणेही शक्य नव्हते. जस-जसा बी.एड.चा अभ्यासक्रम पुढे जात होता तसा मी व्यस्त होत गेलो. मायक्रो टीचिंगचे पाठ मी उत्तम रीतीने घेतले होते.यापूर्वी मी गरजे पोटी श्री गजानन क्लासेस, सिडको येथे शिकविण्याचे काम केलेले होते. माझे ग्रुपचे प्राध्यापक व्ही. एस. मुरकुटे यांच्या कडून पाठ चांगले घेतल्याची शाबासकी मिळाली होती, त्यामुळे माझा आत्मविश्वास खूपच उंचावला होता. त्याच बरोबर येथे मला हिंदीचे आशयज्ञान अध्यापन करणाऱ्या प्राध्यापिका वासंती सोर मॅडम ह्या माझ्यासाठी आदर्श ठरल्या. त्यांची प्रत्येक तासिका आमच्यासाठी नवनवीन संस्कार देऊन जात होती. येथे मला भावलेले व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. डॉ. रामदास बरकले सर होय. त्यांनी कथन केलेला हुतात्मावीर अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे क्रूर व अत्याचारी कलेक्टर जॅक्सनच्या वधाचा प्रसंग आज देखील डोळ्यासमोर चित्रपटाप्रमाणे उभा राहतो. शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य एन. एल. जाधव सरांचे मोलाचे मार्गदर्शन, भूगोल शिकविणारे प्रा. बी. डी.पाटील सर, तत्वज्ञान शिकविणारे प्रा. के. बी. पवार सर, प्रा. एम. बी. मुरकुटे सर, प्रा. वसंतराव कर्डिले सर, मानसशास्त्र प्रा. जी. आर. बेळे सर, डॉ. एस. आर. रायते सर इ. प्राध्यापक आपल्या अध्यापन कार्यातून आमच्यावर खूपच प्रभाव पाडून गेले. उर्वरित प्राध्यापकांचे देखील आम्हांला मोलाचे सहकार्य आम्हाला लाभले.
ऑगस्ट महिन्यात आमचे सराव पाठ सुरू झाले, सराव पाठ म्हणजे शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील अत्यंत महत्वाचे भाग असतो. त्यावेळचे पाठप्रमुख प्रा. एस. आर. वाजे यांनी पाठाचे काम सुरु केल्यानंतर माझे पाठ ठराविक अंतराने लागत गेले. संपूर्ण कॉलेज मध्ये पहिल्या सत्रातच माझे सर्व सराव पाठ घेऊन झाले होते. त्यासाठी मला हिंदी विषयासाठी प्रा. वासंती सोर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याने मी आज या ठिकाणी कर्मनिष्ठेने माझे काम करतो आहे. सराव पाठाचे मार्गदर्शन करतांना काही विद्यार्थांना माझ्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी विश्वासाने काम पाठविण्याचे प्रा. सोर मॅडम यांनी केल्याने मी त्यांच्या विश्वासास पात्र ठरण्याचा नेहमीच प्रयत्न केला. त्यात मी यशस्वी ठरल्याचा मला आज आनंद आहे. त्याचे संपूर्ण श्रेय सोर मॅडम यांनाच द्यावे लागेल. त्याच बरोबर इतिहास विषयासाठी प्रा. डॉ. रामदास बरकले सरांचे परिपूर्ण मार्गदर्शन मिळाल्याने आजही हिंदी विषयासोबत इतिहास विषयाचे अध्यापन करण्यात मी आनंद घेत असतो. डॉ. रामदास बरकले सरांनी दिग्दर्शित केलेले 'आतून कीर्तन, वरून तमाशा' नाटक बघण्याचे भाग्य आम्हास लाभले. डॉ. बरकले सरांचे एक उत्कृष्ठ कलाकार म्हणून असलेले कौशल्य येथे आम्ही अनुभवले. बी. एड. कॉलेज मध्ये विद्यार्थी पालक म्हणून सौ. रंजना बरकले यांनी देखील वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले. त्याच बरोबर प्रा. सुभाष भालेराव सर, प्रा.शैलजा चव्हाण मॅडम, प्रा. रंजना गटकळ मॅडम, प्रा. कासार मॅडम, प्रा. चव्हाण सर, प्रा. विद्या जाधव मॅडम, प्रा. निकुंभ सर, प्रा. रसाळ मॅडम, इ. प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
बी.एड. करत असतांना आमचा मित्र-मैत्रिणीचा एक ग्रुप येथे तयार झाला होता. प्रा. डॉ. रामदास बरकले सरांच्या मागदर्शनाने आम्ही सर्व उप्रक्रमात सहभागी होत असु. आमच्या ग्रुप मध्ये सौ. कार्तिकी भोरे, सुनिता बाहेकर, नीता डाके, हेमा भोसले, अंजली महाजन, संजय काळोगे, रामनाथ दौंड व संजय कदम इ. होते. यामुळे आम्हाला विशिष्ट प्राध्यापकाकडून अनेक वेळेस टोमणे देखील ऐकावे लागत होते. मात्र आमचा हा ग्रुप सर्वच बाबतीत आदर्श होता. कार्तिकी ताई तर आम्हाला सर्व प्रकारचे मार्गदर्शन करण्यात सक्षम होती. कॉलेज मधील प्रत्येक स्पर्धेत भाग घेऊन बक्षीस मिळविण्यात आम्ही आघाडीवर होतो. मी येथे शिकत असतांना विद्यापीठाने गुणवत्तेवर प्रतिनिधी नियुक्तीचे आदेश काढल्याने हिंदी विषय प्रतिनिधी व कॉलेजच्या ग्रंथालय समिती सदस्य म्हणून मला काम करण्याची मिळालेली जबाबदारी मी यशस्वीरित्या सांभाळली.
आम्ही कॉलेजच्या स्नेहसंमेलनात देखील सहभागी झालो होतो. येथे आम्ही समूह नृत्य ‘आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर ..!’ या गीतावर सादर केले होते. त्याच बरोबर आमच्या ग्रुप मधील सुनीताने वैयक्तिक नृत्यात ‘आज न छोडूंगी तुझे दम दमा दम....!’ हे गीत सदर करून सर्वांचीच मन जिंकली होती. फॅन्सी ड्रेस स्पर्धेत संजय काळोगेने सादर केलेला ग्रामीण भागातील नवरदेवाचे पात्र व सोबतच्या करवल्या सर्वांचे आकर्षण ठरले होते. पुढे वार्षिक पाठ सुरु त्यावेळचा प्रसंग मला आजही आठवतो. माझा इतिहास विषयाचा ‘अफजलखान शिवाजी महाराज भेटीचा प्रसंग’ पाठ उत्तम पद्धतीने घेतला. पण वार्षिक पाठाचा दबावामुळे मी शैक्षणिक साहित्य दाखविण्याचे विसरून गेलो. ज्यावेळी वर्गातून बाहेर आलो त्यावेळी पाठ निरीक्षकांच्या निदर्शनास ही गोष्ट मी लक्षात आणून दिली. त्यांनी माझे पाठ यापूर्वी बघितले असल्याने गुणदान देखील चांगले केल्याचे सांगितले. खरोखरच आमच्या नकळत झालेल्या चुका देखील मोठ्या मनाने माफ करणारे प्राध्यापक येथे आम्हांला लाभल्याचा अभिमान देखील आहे. आमच्या ग्रुप मधील सर्वच सदस्य अष्टपैलू असल्याने आम्हाला कोणतीही अडचण आली नाही. आमचे संपूर्ण वर्ष अत्यंत व्यस्ततेत केव्हा संपले हे कळले सुद्धा नाही. आमचा बी.एड. परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला तेव्हा अपेक्षेप्रमाणे सौ. कार्तिकी ताई महाविद्यालयात प्रथम आल्यावर आम्हाला झालेला आनंद अवर्णनीय असाच होता .....! परीक्षेत आम्ही सर्व प्रथमश्रेणी सह विशेषश्रेणीत उत्तीर्ण झालो. त्याच शैक्षणिक वर्षात वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सर्वच शिक्षक म्हणून सेवेत रुजू झालो, आजही जवळपास आम्ही सर्वच ज्युनिअर कॉलेज कडे कार्यरत आहोत. बी.एड. करतांनाच चांद्रजीत डी. शिंदे, राजेश शिंदे, संजय काळोगे, रामनाथ दौंड, रामनाथ रायते, सातपुते,एल. बी. डोंगरे, विष्णू राजोळे, तुषार जाधव, आर. डी. शिंदे, रामदास ढोली, इत्यादी वेळोवेळी सहकार्य करणारे मित्र भेटले त्यांचा मी सदैव ऋणी राहील...!
🌹प्रवास माझा🌹✒️
✒️शब्दांकन - ✒️✒️
संजय कदम
अध्यापकाचार्य
ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, mvpdn
Comments
Post a Comment