आठवणीतील मनेगाव....!

✒️आठवणीतील मनेगाव....!✒️🌹
           

          भाग-3                

                   मनेगाव विद्यालयात काम करत असतांना मला ठळकपणे जाणवलेल्या काही बाबी मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. हनुमान मंदिराच्यावरती पाचवी व सहावीचे प्रत्येकी दोन वर्ग भरत असत. त्यावर्गांची रचना सहावी ‘अ’ च्या  वर्गातून जाऊन पाचवी ‘ब’ चा वर्ग असायचा, तर शेजारील सहावी ‘ब’ च्या वर्गातून जाऊन पुढे पाचवी ‘अ’ चा वर्ग असायचा. बऱ्याच वेळा अध्यापन सुरु असतांना आम्हांला एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जावे लागत असे, अशा वेळी शिक्षकांना देखील अध्यापन बंद करावे लागत असे. वर्गाध्यापना बरोबरच समोरील शेवटच्या बाकावर बसलेल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहचणे खूप जिकरीचे काम होते. छताचा भाग डोक्याला लागण्याची नेहमी भीती असायची. त्यामुळेच कदाचित या लहान वर्गांची आसनव्यवस्था येथे केलेली असावी.
                 मला पाचवी व सहावीच्या वर्गाचे वर्णन करायला लावले तर एकाच वेळी चार शिक्षकांचे शिकवणे सुरु झाल्यावर, एकमेकांच्या वर्गातील शिकविणे आम्हांला स्पष्ट ऐकायचो.  शिक्षक येथे वर्गाचा दरवाजा बंद करून, उकाड्याने हैराण होत अध्यापन करत.   अशा ही परिस्थितीत कोणतीच तक्रार न करता ज्ञानदान करणारे शिक्षक व ज्ञान ग्रहण करणारे विद्यार्थी धन्यच होते. मंदिरावरील वर्गाकडे जाण्यासाठी एक खुपच अरुंद जीना, एकाच जिन्यातून चार वर्गाचे जवळपास दोनशे विद्यार्थ्यांचा वापर, अत्यंत जुनी इमारत, उतरत्या छताची कौलारू एक बाजू खुपच कमी उंचीची, या इमारतीत शिकणारे विद्यार्थी व शिक्षक जीना चढ-उतार करतांना जीव मुठीत धरून जात होते असे म्हटले तर चूक ठरणार नाही. त्याकाळात विद्यालयात भौतिक सुविधांचा अभाव होता.
                     हनुमान मंदिरावर चार वर्ग भरायचे, तळमजल्यावर दोन वर्ग भरायचे अशा प्रकारे बारा पैकी सहा वर्ग मंदिराच्या इमारतीत भरायचे अर्थात अर्धी शाळा येथे भरायची.  तीन वर्ग प्रयोगशाळेसमोर तर तीन वर्ग ग्राउंड समोरील इमारतीत भरत असे.  संपूर्ण विद्यालयाची आसनव्यवस्था याप्रमाणे होती. शालेय इमारतीच्या अडचणी असल्या तरी गावातील सर्वांनाच विद्यालयाचा अभिमान होता.  पिण्याच्या पाण्याची व्यवस्था टंचाईग्रस्त गावात कशी असेल? याची कल्पना न केलेली बरी. गावात पाणी टंचाई असूनही श्री. बैरागी बाबा, गावातील हॉटेल चालक, दुकानदार, शाळेच्या परिसरातील नागरिक स्वतः पाणी विकत घेत असून ही विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात धन्यता मानत.  मला वाटते “दुसऱ्याची तहान भागविण्याचा आनंद काही वेगळाच असतो.” आपल्या अडचणीत सुद्धा अनेक मनेगावकर हा आनंद प्राप्त करत होते.
                  आजच्या जगात “स्वतःसाठी प्रत्येकजण जगत असतो पण दुसऱ्यासाठी जगण्यातच खरा पुरुषार्थ असतो.” तो मनेगावकरांच्या रुपाने सर्वांनी बघितला आहे. त्यामुळे शैक्षणिक सुविधांचा अभाव असतांना अनेक विद्यार्थी सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात उच्च पदावर काम करत असल्याचे दिसते. असे म्हटले जाते “जेथे चणे आहेत, तेथे दात नाहीत आणि जेथे दात आहेत, तेथे चणे नाहीत” ही उक्ती  मनेगावला लागू होते. मात्र गुणवत्ता वाढीसाठी केले जाणारे विद्यालयाचे प्रयत्न कौतुकास्पद होते. मला  विद्यालयात अजून एक गोष्ट खुपच अनोखी वाटली. दहावीचे इंग्रजी विषयशिक्षक पाचवीचा इंग्रजी विषय शिकवित असत.  दहावीचा शिक्षक पाचवीच्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेतांनाच इंग्रजी विषयाची गोडी विद्यार्थ्यात निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असे. 
                  मविप्र संस्थेत एक जानेवारीला होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेची तयारी, दहावीच्या पूर्व परीक्षेची तयारी, मविप्र संस्थेच्या स्पर्धा परीक्षेची तयारी संबंधित शिक्षक येथे उत्तम पद्धतीने करून घ्यायचे. जानेवारी महिन्यात प्रत्येक वर्गाचा सांस्कृतिक कार्यक्रम बसविला जात असे.  मविप्र संस्था आयोजित स्पर्धेसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाची चांगली तयारी केली जायची. त्यातील निवडक कार्यक्रमांचे २६ जानेवारीला विद्यालयात सादरीकरण व्हायचे.  यात प्रामुख्याने एकांकी, नृत्य, समूहनृत्य, गायन, नकला,  इ. कार्यक्रम सादर केले जात असत. विद्यार्थी विविध स्पर्धेत सहभागी होऊन, आपल्या विविध कलागुणांना सादर करीत असत.  यासाठी विद्यालयातील श्रीम. निकुंभ मॅडम , श्रीमती कुमावत मॅडम, श्री. मोरे जी.बी सर, श्री. कोल्हे सर, श्री. उफाडे सर, श्री. सोनवणे सर, श्री. वागळे सर इ. विद्यार्थ्याची तयारी करून घेत.  याच काळात सहल प्रमुख श्री. मोरे जी.बी. शैक्षणिक सहलीचे नियोजन करून दरवर्षी नवीन ठिकाणी सहलीतून ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन गावाबाहेरील विश्वाची ओळख ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करून देण्याचा यशस्वी व प्रामाणिक प्रयत्न करायचे.          
                  इंग्रजी व गणित विषयांचे महत्व शालेय जीवनात खूप महत्वाचे स्थान असते, हे सत्य कुणी ही नाकारू शकत नाही. तरी देखील सर्वच विषय परीक्षेत गुण प्राप्तीसाठी महत्वाचे असतात असे मला वाटते. प्रत्येक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शिक्षक व शाळेसाठी गौरवाची बाब असते. त्यामुळे प्रत्येक विषयशिक्षक आपापल्या परीने विद्यार्थ्यांची परीक्षेच्या दृष्टीने तयारी करून घेत असत. भाषा विषयात श्रवण, संभाषण, वाचन, लेखन विकसित होण्यासाठी मी वर्षभर वेगवेगळ्या प्रकारे तयारी करून घेत असे. गृहपाठ व स्वाध्याय वह्या तपासतांना वाचनाचा उपक्रम मी वर्गात घेत असे, त्यामुळे विद्यार्थी वाचन कसे करतात? हे समजायचे. खराब अक्षर असेल तर त्या विद्यार्थ्याला दररोज शुद्धलेखनाचा उपक्रम असायचा. “अशुद्ध लेखन अधुरी शिक्षा का प्रतीक माना जाता है|” म्हणूनच मी छोट्या वर्गासाठी पाच ओळी व मोठ्या वर्गासाठी दहा ओळी हिंदी विषयाचे सक्तीने शुद्धलेखन उपक्रम नियमित राबवून ते तपासण्यासाठी विद्यार्थी गट प्रमुखाची मदत घ्यायचो. काही विद्यार्थी या उपक्रमास टाळण्याचा प्रयत्न करत आम्हीं आता शुद्धलेखन करायला लहान आहोत का? असा प्रश्न विचारत असत, त्यांना मी कोणतीही चांगली गोष्ट आत्मसात करण्यासाठी वयाची अट नसते. ही बाब स्पष्ट करून देत असे. हिंदी विषयाच्या कवितांचे पाठांतर प्रत्येक वर्गात नियमित कोणत्याही दोन-तीन विद्यार्थ्यांकडून घ्यायचो. नववी व दहावीच्या कवितेसाठी वीस गुण असायचे त्यादृष्टीने तयारी व्हायची. वर्गात प्रश्न विचारल्या नंतर हात वरती नसलेल्या विद्यार्थ्यांना उत्तर विचारण्याची माझी पद्धत होती. हिंदी विषयाचे शिकवलेल्या व्याकरणावर आठवड्यातून वर्गातच परीक्षा घेऊन व्याकरणात पैकीच्या पैकी गुण मिळविण्यासाठी आवश्यक तयारी विद्यार्थी करायचे. काही विद्यार्थी चांगले गुण मिळवीत असत कमी गुण मिळालेले विद्यार्थी आपले काय चुकले? याचा शोध घेत असत नव्याने तयारी करून पुढील परीक्षेत चांगले गुण मिळवीत असत.
                 मी राबवत असलेल्या उपक्रमाबद्दल काही वेळा माझे काही सहकारी व काही विद्यार्थी खिल्ली उडवत असत. “निंदकाचे घर असावे शेजारी“ नुसार दोष दाखविणारी लोक आपले खरे हितचिंतक असतात ही बाब लक्षात घेऊन, कोणताही परिणाम माझ्या कामावर कधीच झाला नाही.  मी नि:स्वार्थ पणे विद्यार्थी हिताचे उपक्रम घेत राहिलो, त्याचे परिणाम दहावीच्या निकाला नंतर मिळायचे. मी कधीच विद्यार्थी प्रिय शिक्षक होण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र शिस्त प्रिय विद्यार्थी घडविण्याचा प्रयत्न केला, याचा अनुभव माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी घेतला असेलच. शालेय जीवनात शिस्तीला खूप महत्व असते, म्हणूनच मला शिस्त मोडणारे, पण हुशार असलेले विद्यार्थी कधीच आवडले नाहीत.“ विद्या विनयेन शोभते“ नम्र व शिस्त पाळणारा विद्यार्थी माझ्या दृष्टीने मी नेहमी आदर्शच असायचा. बेशिस्त, खोटे बोलणारे व उद्धट विद्यार्थी मला कधीच आवडले नाहीत. एखाद्या विद्यार्थी न कळत दुखावला गेला असेल तर मला मोठा भाऊ समजून माफ करावे.
                  शैक्षणिक वर्षा अखेर विद्यालयात वार्षिक परीक्षा सुरु होती. इयत्ता नववीचे पेपर सुरु असतांना एक घटना घडली. मी पर्यवेक्षण करतांना पेपर सुरु झाला तरी  पाटोळे येथून नियमित वेळेवर येणारा विद्यार्थी आलेला नव्हता.  मी उपस्थित विद्यार्थ्यांना विचारणा केली तेव्हा पाटोळे येथील काही विद्यार्थी आलेले नसल्याचे समजले. थोड्या वेळाने संबधित विद्यार्थी पेपरसाठी आले. आज त्याने तोंडाला उपरणे बांधलेले होते. त्याचे मी बारकाईने निरीक्षण करून विचारपूस केली. त्याने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत पेपर सोडवायला सुरुवात केली. मी त्याच्या बरोबर येणाऱ्या मुलांना विचारून बघितले पण उपयोग झाला नाही. त्याच्या एका मित्रास मी विश्वासात घेऊन चौकशी केली तेव्हा समजलेला प्रकार थक्क करणारा होता.  
                 नववीच्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, मनेगाव येथील एक विद्यार्थी व त्याच वर्गात बाहेरगावचा एक विद्यार्थी वर्गात अनुक्रमे पहिल्या-दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होणारे, एकमेकांचे अभ्यासात प्रतिस्पर्धी होते. गावातील विद्यार्थी थोडा खोडकरच होता, तो बाहेरगावच्या विद्यार्थ्याच्या पेपर सोडविण्यावर देखील लक्ष ठेवायचा. गावातील विद्यार्थ्यास एक पेपर अवघड गेला. बाहेरगावहून येणाऱ्या मुलास तो दम देत असे, तू माझ्यापेक्षा जास्त पेपर का लिहितो ? हा प्रकार सुरुवातीस किरकोळ होता. मात्र गावातील विद्यार्थ्यात फाजील आत्मविश्वास निर्माण झाल्याने, त्याला अधिकच त्रास देऊ लागला. बाहेरील विद्यार्थी परिस्थितीने गरीब असल्याने माघार घ्यायचा.  हिच संधी साधून संबधित विद्यार्थ्याने त्याला उद्या तू पेपर पूर्ण सोडवायचा नाही, माझ्या पेक्षा जास्त गुण मिळवायचे नाहीत, वर्गात पहिला क्रमांक माझाच आला पाहिजे असे धमकाविले. एक दिवस बाहेरगावच्या विद्यार्थ्याला कुरापत काढून फिल्मी स्टाईल सायकलच्या चैनने बेदम मारहाण केली, त्यात तो गंभीर जखमी झाला. परीक्षेचा काळ असल्याने बाहेरगावच्या विद्यार्थ्याने तयारी करून पेपर लिहिणे पसंद केले. 
                   पेपर संपताच मी मनेगावातील सदर विद्यार्थ्यास बाजूला घेऊन झालेल्या प्रकार श्री. मोरे सरांना सांगितला त्यांनी प्रकरणाचे गांभीर्य सदर विद्यार्थाच्या लक्षात आणून दिले. जर मुख्याध्यापाकांकडे जख्मी विद्यार्थ्याने लेखी तक्रार दिली, तर होणारे परिणाम संबधित विद्यार्थ्याला सांगितले. उद्या पालकांना घेऊन येण्यास सांगितले असता तो खूप घाबरला. त्याशिवाय पेपरला बसता येणार नाही. संबधित विद्यार्थी आम्हा उपस्थितांची खुपच विनवणी करू लागला. त्याने यापुढे अशी चूक होणार नाही असे सविस्तर लेखी दिले. जखमी झालेल्या विद्यार्थ्याची माफी मागितली. संबधित विद्यार्थ्याला योग्य समज देऊन श्री. मोरे सरांच्या मदतीने या घटनेस पूर्णविराम दिला...!  कारण अडचणीतील विद्यार्थ्यास माफ करण्याचा मोरे सरांकडून घेण्यासारखाच  आहे. विद्यार्थी जीवनात स्पर्धा ही जीवघेणी नसावी हे संस्कार देणे आवश्यक आहे. त्याच बरोबर विद्यार्थी चुकीचे वागत असेल तर त्यास योग्यवेळी आवश्यकते नुसार समज देणे किंवा शिक्षा करणे ही गरजेचे असते. हा प्रसंग मला सातवीतील  मराठीच्या  पुस्तकातील “गुरूचा न्याय” पाठाची आठवण करून देतो.
                  संपूर्ण दुसरे सत्र मी मनेगाव येथील परीट मळ्यात श्री. उफाडे सरांच्या शेजारीच खोली घेऊन राहत होतो.  यावेळी मी स्वतः स्वयंपाक करायचो मात्र जेवण श्री.उफाडे सरांसोबतच असायचे. मात्र काही वेळा सौ. उफाडे वाहिनी मला स्वयंपाक बनवू देत नव्हत्या. उफाडे परिवाराचे मला खूपच सहकार्य मला लाभले.  काही वेळा इतरत्र ही जेवणाचे निमंत्रण यायचे ते आम्ही नम्रपणे नाकारत असू. या कालावधीत आम्हीं परिसरातील वेगवेगळ्या रस्त्यांनी दररोज फिरायला जात असत. अनेक पालकांच्या गाठी-भेटी होत असत. बरेच पालक ओळखीचे झाले होते. त्याचा फायदा मला शिस्त राखण्यास व्हायचा. कालावधीत आम्हीं परिसरातील वेगवेगळ्या रस्त्यांनी दररोज फिरायला जात असत. अनेक पालकांच्या गाठी-भेटी होत असत. बरेच पालक ओळखीचे झाले होते. आम्हीं राहत असलेली मळ्यात आम्हांला मनेगावचे पोलीस पाटील श्री. अशोकराव पाटील, श्री. उदयभान शेठ (काका), श्री. दत्तू  पा. सोनवणे, डॉक्टर श्री. अशोकजी सोनवणे, श्री. रावसाहेब पा. सोनवणे, श्री. शंकर सोनवणे, श्री. नंदू आंबेकर, श्री. प्रदीप सोनवणे इ. व नजर चुकीने एखादे नामोल्लेख राहिला असेल तर क्षमा असावी.  मळ्यातील व गावातील अनेकांचे मला खूप सहकार्य लाभले त्यांच्या प्रति मी ऋण व्यक्त करतो.    
               विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मणियार सर,  सहकारी श्री. पगार जे.बी. सर, श्री.मोरे ,जी.बी. सर, श्री.सोनवणे पी.एच.सर,  श्री.कोल्हे सर, श्री.पटेल इ. डी.,  श्री.वागळे सर, श्रीम. सुमित्रा कुमावत मॅडम व श्री. श्रावण जगताप मामा  इत्यादीचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले या सर्वांचे मी याप्रसंगी मनापासून ऋण व्यक्त करणे माझे कर्तव्य समजतो.....!

पुढील भाग क्रमशः
भाग - 3 (7520)

माझा प्रवास✒️
श्री. एस.कदम
ज्युनि. कॉलेज ऑफ एज्यु.

Comments

Popular posts from this blog

वाजे विद्यलाय-१

महाविद्यालयीन जीवनातील मित्र...!

नांदगाव भाग-5