आठवणीतील मनेगाव .....!

✒️आठवणीतील मनेगाव....!✒️🌹
 भाग -1                              

            मविप्र संस्थेत सेवा करतांना मी नैताळे येथे विनानुदानित शाळेवर उपशिक्षक म्हणून दीड वर्षापासून मी कार्यरत होतो. मी जून महिन्यापासूनच अनुदानित विद्यालयात नेमणुकीची वाट बघत होतो. संस्थेने माझी मनेगाव येथील अनुदानित विद्यालयात उपशिक्षक म्हणून दिनांक 18 ऑक्टोबर, 1994 रोजी नियुक्ती केली होती.  माझ्या दृष्टीने ही खूपच आनंदाची बाब होती. पण मनेगाव येथे जाण्यापूर्वीच  तेथील अधिकाधिक माहिती मला जाणून घ्यायची होती. 
             माझे नैताळे शाळेवरील मित्र व सहकारी श्री. वसंत एन. शिंदे हे ठाणगाव(सिन्नर) यांच्याकडून बरीच माहिती मिळाली. आम्हीं अनेक वेळा चर्चा करतांना आपापल्या भागातील अनेक वैशिष्टयपूर्ण बाबींवर चिकित्सक दृष्टीने चर्चा करत असू त्यावेळी मनेगावचे नाव सहकारी मित्राकडून खूपदा ऐकले. 
               मनेगाव विषयी मला माहित असलेल्या काही गोष्टीत प्रामुख्याने चंपाषष्ठीस श्री खंडोबा महाराजांची यात्रा व यात्रेतील बारागाड्या ओढण्याच्या  कार्यक्रम , सर्वाधिक शिक्षक असलेले गाव, घरोघरी विड्या बांधण्याचे होणारे काम, विडी कामगार केंद्र, सिन्नरच्या दोन्ही औद्योगिक वसाहतीत सर्वाधिक काम करणारे कामगारांचे गाव, पाणी टंचाईसाठी प्रसिद्ध गाव,  उत्तर महाराष्ट्रात भर उन्हाळ्यात ऊसाच्या ताज्या रसाची/रसवंतीची सेवा पुरविणाऱ्यांचे गाव, बऱ्याच अडचणी असूनही शिक्षणात अग्रेसर असलेले गाव, गावाभोवती असलेल्या बारा वाड्यांचे गाव, आम्हाला बी.एड. कॉलेजला शिकविणाऱ्या प्राध्यापक मा.श्री. सी.एच. पाटील सरांचे गाव, आमदार मा. हरिभाऊ शिंदेचे गाव, मविप्र संस्थेतील प्राचार्य व पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू श्री.एन. जे. सोनवणे सरांचे गाव,  असे अनेक वैशिष्ट्ये असलेले गाव म्हणजेच मनेगाव. या गावात नोकरीची सुरुवात म्हणजे माझ्या दृष्टीने नवनवीन गोष्टी शिकण्याची पर्वणीच ठरणार होती.
                माझ्या सहकारी मित्राने  मनेगावात जाणाऱ्या बसेसची माहिती सांगितली होती. नाशिक येथून मी मनेगाव विद्यालयात हजर होण्यासाठी सिन्नर बसस्थानकात पोहोचलो. त्यावेळी मनेगाव जाण्यासाठी इतर साधने खूपच दुर्मिळ. बस स्थानकातील चौकशी खिडकीवर  विचारणा केली, त्यांनी सांगितले की, " समोरील रसवंती समोर रामनगर बस लागेल."  रामनगर बस येताच त्यात बसून पहिलाच स्टॉप मनेगाव आणि तिकीट सुद्धा एक रुपया पन्नास पैसे होते.  मी बस स्टॉपवर उतरून शाळा भरण्यापुर्वीच विद्यालयात पोहोचल्याने सुटकेचा निःस्वास टाकला.
            अनुदानित शाळेतील पहिलाच दिवस असल्याने मी खूपच उत्साहित होतो.  विद्यालयाच्या शिक्षक दालनात असलेले शिपाई श्री. श्रावण जगताप यांना मी विचारले, "मुख्याध्यापकांना भेटायचे आहे." त्यांनी मला विचारले "काय  काम आहे?" मी सांगितले "मी कदम सर, नव्याने माझी या विद्यालयात नियुक्ती झाली आहे.  मी येथे रुजू होण्यासाठी आलो आहे." ते म्हणाले  "मुख्याध्यापक,  साहेब  येतीलच आता ..!".  थोड्या वेळातच ते मला मुख्याध्यापक  मा.श्री.  मणियार सरांकडे घेऊन गेले. सरांनी कनिष्ठ लिपिक श्री. रणशेवरे भाऊसाहेबांकडे मला पाठविले.  श्री.आर. डी. गाडे वरिष्ठ लिपीक दोन्ही भाऊसाहेबांनी कार्यालयीन कागदपत्रांची पडताळणी करून घेतली. मला रुजू रिपोर्ट स्वहस्ताक्षरात भरून रुजू करून घेतले.
            विद्यालय भरण्याची घंटा झाली.  त्याबरोबरच सर्व विद्यार्थी शिस्तीने विज्ञान प्रयोगशाळेसमोरील मैदानावर उपस्थित झाले. शाळेचे प्रार्थनामैदान पूर्ण विद्यार्थ्यांनी भरले, हे दृश्य बघून मला खूप आनंद झाला. कारण यापूर्वीच्या माझ्या शाळेत खूप कमी विद्यार्थी होते.  शाळेचा परिपाठ छान झाला. याच ठिकाणी माझा नवीन आलेले शिक्षक म्हणून परिचय उपस्थितांना करून दिला. मी समोर  येऊन उपस्थितांना नमस्कार केला. यावेळी मी एक दृश्य समोर बघितले एका रांगेतील सर्व विद्यार्थ्यांनी डोक्यावरील संपूर्ण केस कापलेले दिसले. अर्थात चप्पी केलेली होती. 
             आम्ही शिक्षक दालनात पोहचलो. मी सहजच उत्सुकते पोटी शेजारी असलेल्या शिक्षकांना मुलांच्या चप्पी बाबत विचारले. त्यांनी मला घडलेला प्रसंग सांगितला" काही विद्यार्थी वारंवार सूचना करून ही केस वाढलेले असतांना ही कटिंग करत नव्हते. नेहमीच्या सबबी ऐकूण शेवटी, मी एक दिवस संबंधित विद्यार्थांचे वाढलेले केस कात्रीने कापले. मात्र दुसऱ्या दिवशी त्या वर्गातील सर्व विद्यार्थी चप्पी करून शाळेत आले." याबाबत वर्तमानपत्रात देखील बातमी प्रसिद्ध झाली होती. एकीकडे किशोर वयातील मुले काय करू शकतात? याचे उदाहरण तर त्यांना हाताळणे हे देखील शिक्षकांसाठी एक आव्हानच असते. याचे हे उदाहरण तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी वाईटपणा घेणारे कर्तव्यनिष्ठ शिक्षक त्याकाळात विद्यालयास लाभले होते. 
             "शिस्तीने राष्ट्र मोठे होते ." हा सुविचार मला आठवला. त्यामुळे विद्यालयाची शिस्त ऊत्तम असेल तर त्याचे भविष्यकालीन निकाल सुद्धा चांगले परिणाम देणारे असतात. सरांनी माझ्या डोक्यावरील टोपी बघून मला विचारले,"सर, टोपी का घातली?' मी त्यांना सांगितले की "माझ्या चुलत्यांचा दशक्रिया विधी परवाच झाला..!"  माझा तेव्हाचा सडपातळ बांधा व डोक्यावरील टोपीमुळे इतरांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन मला थोडा वेगळाच वाटत होता..!
               आजचा दिवस, विद्यार्थी, शिक्षक, विद्यालय मुख्याध्यापक, परिसर इ. सर्व माझ्यासाठी नवीनच. माझी अवस्था तर अगदी नव वधू सारखी झाली...! ज्याप्रमाणे नव्या कुटूंबात जाऊन ती गोंधळते. तशीच काहीशी माझी अवस्था झाली होती. मी छोट्या स्टाफवर काम केलेले होते, तुलनेने येथील स्टाफ खूप मोठा होता. मी नव्यानेच विद्यालयात आलेलो असल्याने प्रत्येक शिक्षक माझी  आस्थेने चौकशी करत होते, मी देखील शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत होतो. माझा परिचय शिक्षकदालनातील उपस्थित शिक्षक श्री. थोरात बी.जी. श्री. पगार जे. बी. श्री. मोरे जी. बी., श्री. श्री. कणसे एम. वाय. श्री. पाटील एस. एम. श्री. पाटोळे बी. एस., श्री.सोनवणे पी. एच., श्री. सोनवणे के. डब्लू., श्री.उफाडे आर. पी., श्री.कोल्हे एल एस., श्रीम.निकुंभ मॅडम, श्रीम. सुमित्रा कुमावत, श्री. कांतीलाल वागळे  यांच्याशी माझा परिचय झाला, तर काहींचा पुढे होणार होता.   
               मनेगाव येथे नोकरी करणारे जवळपास सर्वच सिन्नर येथून अपडाऊन करत होते.  मी स्टाफ मधील काही शिक्षकांना विचारून बघितले " माझी सिन्नर येथे राहण्याची व्यवस्था  बॅचलर शिक्षकांत होईल काय?"  पण असे कुणी ही भेटले नाही. त्यामुळे मी मनेगाव येथे गावातच  खोली शोधू लागलो. कारण बाहेर गावी राहून खर्च वाढणार होता.  ही बाब तेव्हा मला आर्थिकदृष्टया परवडणार नव्हती. मात्र मनेगावची पाणी टंचाई बाबत असे म्हटले जाई की " पाणी टंचाई तर आमच्या (मनेगावच्या) पाचविलाच पुजलेली असते."  पहिल्या दिवशी माझ्या काळे मळ्यातील नातेवाईकांकडे थांबलो. मनेगावच्या पाणी टंचाईचे प्रात्यक्षिक, मला तेथे बघावयास मिळाले. माझी आतापर्यंत मळा म्हणजे, तेथे मुबलक पाणी अशी समजूत. पण ती समजूत येथे खोटी ठरली. नैताळे येथे पाणी मुबलक प्रमाणात होते. त्यामुळे आम्हांला पाण्याचा प्रश्न कधीच जाणवला नव्हता. पण मानेगाव येथे खोली बघतांना पाणी हा प्रधान्यक्रमाचा घटक ठरला होता.  
                महिना भरापूर्वीच मनेगाव विद्यालयात रुजू झालेले श्री.आर.पी. उफाडे सर कुटुंबासह परीट मळ्यात राहायचे.  त्यांच्यासह श्री. एल. एस. कोल्हे व काही विद्यार्थ्यांच्या मदतीने मनेगाव येथे राहण्यासाठी मी खोलीचा शोध सुरु होता. खोलीचा निरोप मिळाल्यानंतर मी एक- दोन ठिकाणी खोली बघण्यासाठी गेलो. पण पाण्याची मुख्य अडचण प्रत्येक  ठिकाणी खोली बघतांना जाणवली.  शेवटी श्री. उफाडे सरांनी मला परीट मळ्यात त्यांच्या शेजारीच असलेली खोली दाखवली. खोली सर्वच दृष्टीने मला योग्य वाटली.  त्यामुळे श्री. उफाडे सरांच्या शेजारीच परीट मळ्यात मी खोली घेतली.  ते मला म्हणाले  "चलो, कदम सर...!  एक से भले दो।"  मी मनेगावात नवीनच, सरांच्या रूपाने मला मोठा आधार व भक्कम शेजारी लाभला. माझी निवासाची अडचण सुटल्याने मी निश्चित झालो. माझे काम आणि मी या गोष्टीस मी प्राधान्य दिले.
                मनेगाव येथे ज्या शिक्षकांच्या जागेवर  माझी नियुक्ती झाली, ते हिंदी विषयाचे शिक्षक श्री. बंग सरांचा स्वेच्छानिवृत्तीचा कार्यक्रम याच कालावधीत पार पडला. माझ्या नोकरीतील हा पहिलाच सेवानिवृत्तीचा कार्यक्रम बघण्याचे भाग्य मला लाभले. विशेष म्हणजे ज्या शिक्षकांच्या जागेवर मी नियुक्त झालो त्या सरांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आला होता. विद्यालयातील त्यांच्या सहवासातील अनेक अनुभव वक्त्यांनी व्यक्त केले. निरोपार्थी श्री. बंग सरांनी  हिंदी विषयाच्या परिपूर्ण शिक्षकाचे निकषच मनोगतातुन स्पष्ट केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री. मणियार सरांनी आपल्या मनोगतात श्री. बंग सरांच्या कार्याचा व कर्मनिष्ठतेचा गौरव केला.  नव्यानेच नियुक्त झालेल्या आमच्या सारख्या शिक्षकांना हा कार्यक्रम खूपच मार्गदर्शक व भावी काळात दिशादर्शक ठरणार होता. प्रथमसत्र परीक्षा संपताच शिक्षकांना सुट्टीत पेपर तपासणीसाठी मिळाले, तर विद्यार्थ्यांना दीपावलीच्या सुट्या....!
 
पुढील अनुभव क्रमशः। भाग-1

माझा प्रवास-✒️
संजय कदम 
ज्युनि. कॉलेज ऑफ एज्युकेशन, दिंडोरी

Comments

Popular posts from this blog

वाजे विद्यलाय-१

महाविद्यालयीन जीवनातील मित्र...!

नांदगाव भाग-5