आठवणीतील नायगाव....!
✒️आठवणीतील नायगाव ....! ✒️🌹
शब्दांकन ✒️– श्री. एस. व्ही. कदम(सर)
मविप्र संस्थेत सेवेत असतांना जानेवारी, 1998 मध्ये माझी बदली मनेगाव येथूनजनता विद्यालय, नायगाव येथे उपशिक्षक म्हणून झाली. नायगावची ओळख सिन्नर तालुक्यात आगळी-वेगळीच आहे. सिन्नर तालुका दुष्काळी असल्याची ओळख सर्वदूर पसरलेली आहे. तालुक्याची दुष्काळी ही ओळख पुसून टाकणारे जी काही गावे सिन्नर तालुक्यात आहेत, त्यात नायगावचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय दृष्टया हे गाव अत्यंत महत्वाचे आहे. शैक्षणिक बाबतीत प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात उत्तम शिक्षण प्राप्त करण्याची परंपरा गावाने जपली आहे. शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गावकरी नेहमीच प्रयत्नशील असतात. माध्यमिक विद्यालयास सुसज्य इमारत व विविध सुविधा असल्याने विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे यश संपादन करून गावाच्या नावलौकिकात भर घातली आहे. पंचक्रोशीतील विविध गावातील विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात मोलाची कामगिरी केलीआहे. गावात विविध धर्मियांनी एकतेचे दर्शन व सामाजिक सलोख्याचे आदर्श अनेकांसाठी घालून दिले आहेत. अजून एक गुण मला येथील विद्यार्थ्यांत दिसला, तो म्हणजे गावाच्या संपन्नतेची हवा त्यांच्या डोक्यात कधीच गेली नाही. त्यामुळे त्यांनी शिक्षणाचे महत्व कमी होऊ दिले नाही हे विशेष...!
नायगाव सिन्नर पासून चौदा किलोमीटर अंतरावरील महत्वाचे गाव आहे. या गावाची अनेक वैशिष्ट्ये आहेत त्यात प्रामुख्याने तालुक्यातील एक संपन्न गाव, पंचक्रोशीतील महत्वाची बाजारपेठ, गोदाकाठावरील बागायती गाव, आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करणारे गाव, भाजीपाला व नगदी पिके घेणारे, जवळपास पाच हजार पेक्षा अधिक लोकसंखेचे गाव, सुसंस्कृत व आदर्शगाव, साप्ताहिक बाजाराचे गाव, बाहेरगावी नोकरी व्यवसाय करणाऱ्याचे गाव, येथे नोकरी व व्यवसाय करणाऱ्याला आपलेसे करणारे गाव, सार्वजनिक वाचनालय, महिला बचत गट, विविध कार्यकारी विकास सोसायटी, बँक ऑफ इंडिया,धनलक्ष्मी पतसंस्था, गोदायुनियन कृषक सहकारी संस्था, या शेतकऱ्यांच्या अर्थवाहिनी म्हणून कार्यरत आहेत. सायखेडा व नाशिकरोड, सायखेडा- सिन्नर, या प्रमुख बाजार पेठेच्या गावांना जोडणारी महत्वाची बाजारपेठ असल्याने नायगावचे महत्व अधिकच वाढलेले आहे.
नायगावात पाडव्याच्या दिवशी बिरोबा-म्हाळोबा देवांची यात्रा भरत असते. यात्रेच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांच्या आतिषबाजीच्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हा कार्यक्रम सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र असतो. यात्रेच्या काळात संपूर्ण गावात नव चैतन्याचे वातावरण बघयला मिळते. त्याच बरोबर हनुमान जयंती झाल्यावर नऊ दिवसांनी शनैश्वर महाराजाची यात्रा भरत असते. यात्रेच्या उत्सवातून गावातील सांस्कृतिक व पारंपरिक परंपरांचा वारसा जपण्याचे काम केले जाते. तसेच नायगावची अजून एक ओळख तालुक्यात आहे, म्हणजे सिन्नर तालुक्यातील बहुसंख्य गावांच्या यात्रांची सुरुवात येथून जवळच असलेल्या गोदा संगमावरून प्रत्येक गावातील कावडीधारक कावडीतून पाणी घेऊन जातात. त्यांतरच संबंधित गावातील यात्रेच्या उत्सवास सुरुवात होते.
नायगाव येथे झालेल्या बदलीने माझ्या समोर अनेक प्रश्न निर्माण केले होते. कारण ज्या दिवशी बदली झाली त्याच दिवशी अपघातातून बरा झालेला माझा हात,सिन्नर बसस्थानकात उतरून घराकडे जात असतांना सिन्नरच्या जनता विद्यालयासमोर पाय घसरण्याचे निमित्त होऊन पुन्हा एकदा माझा डावा हात फ्रॅक्चर झाला. त्यावर त्वरीत नाशिकला येऊन प्राथमिक उपचार करून घेतले. दुसऱ्या दिवशी बदलीच्या ठिकाणी नायगाव येथील विद्यालयात रुजू होण्यासाठी गेलो. शाळेत गेल्यानंतर मी कार्यालयीन गोष्टींची पूर्तता करून रुजू झालो. मला बघितल्यानंतर शिक्षकांनी माझी सर्व चौकशी केली गळ्यात हात बांधलेले होता. त्यामुळे मला सर्वानीच सहानुभूती दाखवली. मी या शाळेत रुजू होण्यापूर्वीच शाळेतील काही शिक्षकांचा थोड्याफार अंतराने अपघात झालेला असल्याने कुणीतरी मधेच बोलले, अजून एक मोडतोड झालेल्या शिक्षकाची आपल्या शाळेत भर पडली. मला सहकाऱ्यानी केलेली चेष्टा-मस्करी ऊर्जा देऊन गेली. असे म्हटले जाते की, “इतरांच्या दु:खाचे प्रसंग ऐकले की, आपले दु:ख कमी होते.” त्याचा अनुभव मी या विद्यालयात घेऊ लागलो होतो. नायगाव शाळेतील श्री. वरखेडे सरांचा अपघात झालेला असल्याने, तेथे चर्चा सुरु झाली आपल्या स्टाफला कसली तरी बाधा झाली. अपघाती घटना घडत असल्याने देवाधर्माचे काही तरी बघून आपण शांती करून टाकली पाहिजे. असे हलके-फुलके विनोद माझी गैरसोयीने झालेली बदलीची तीव्रता कमी करून गेली. येथील शाळेवर रुजू होऊन मी हातावर वैद्यकीय उपचार घेण्यासाठी मोठी सुट्टी घेतली.
नाशिक येथील डॉ. हरिभाऊ कवडे यांच्याकडे जाऊन हातावर वैद्यकीय उपचार सुरु केले. हाताची सूज उतरल्यानंतर त्यांनी प्लास्टर करून गोळ्या औषधे घेण्यास सांगितले. मला डॉक्टर म्हणाले "सर,हात बरा होण्यासाठी काही महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे शाळेतील नियमित काम सुरु असू द्या. शाळा भरतांना , सुटतांना आणि मधल्या सुट्टीतील गर्दीपासून थोडे दूर रहायचे." डॉक्टर साहेबांच्या सुचनांचे पालन करण्याचे आश्वसन मी त्यांना दिले. मी पण विचार केला की, "खाली दिमाग तो शैतान का घर होता है।" याचा अनुभव मला घेतलेल्या सुटीत आला. मला हातावरील वैद्यकीय उपचारासाठी टाकलेली रजा संपल्या नंतर शाळेत रुजू झालो. माझ्या पुढे शाळेत दररोज येण्याजाण्याचा प्रश्न होता, मात्र प्रत्येक प्रश्नाचे उत्तर निश्चित असते. याच काळात श्री. आर. डी. वाजे सर डुबेरे ते नायगाव अपडाऊन करत होते. त्यांच्या बरोबर मोटरसायकलने अत्यंत सुरक्षितपणे शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत दररोज घर पोहोच सेवा मिळाली हे देखील मी माझे भाग्यच समजतो. कारण मदत करणारे खूप भेटतात पण 'आपल्या अडचणीच्या वेळी केलेली, छोटीशी मदत सुद्धा पर्वता एवढी मोठी ठरत असते." त्याचा अनुभव मी प्रत्यक्ष घेतला होता.
जून मध्ये शाळा सुरु होण्यापूर्वी माझ्या हातावर वैद्यकीय उपचार करून हात बरा करण्याचं मी ठरविले होते. पण ठरविलेल्या सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणे कधीच शक्य नसते. माझ्या बाबतीत ही असेच घडले. आधुनिक तंत्राने तयार झालेले नवीन प्लास्टर प्रकार बाजारातआलेले होते, वजनाने हलके असल्याने डॉक्टरांनी या प्लास्टरचा वापर करण्याचा सल्ला दिला, सर्व दृष्टीने योग्य वाटल्याने आम्ही ते प्लास्टर हातास करून घेतले. उन्हाळा अत्यंत कडक असल्याने हाताला प्लास्टरच्या जागेवर खूपच खाज सुटत होती. हा प्रकार काही नव्याने वाढून ठेवील, याची मी कल्पना देखील केली नव्हती. माझ्या कडून प्लास्टरच्या आत काही तरी वस्तू घालून खाजविण्याचा प्रयत्न झाला, दोन दिवसांनी प्लास्टरच्या भागात जखम झाली. त्यात इन्फेक्शन होऊन जखमेतून रक्त वाहू लागले, मी केलेला आगाऊपणा माझ्या लक्षात आला. परत एकदा नाशिक येथे उपचारासाठी दवाखान्यात जावे लागले. हातावर उपचार करणारे डॉक्टर श्री. मोरे सर व श्री. जाधव सरांच्या देखील चांगलेच ओळखीचे झाले होते. दवाखान्यात तपासणी नंतर त्यांनीच माझ्या सोबत डॉक्टर श्री. हरिभाऊ कवडे यांना विनंती केली की, “डॉक्टर साहेब, आपल्याला कदम सरांच्या हाताचा कायमस्वरूपी इलाज करणे खूप गरजेचे असल्याचे सांगितले.” डॉक्टरांनी सांगितले "हाताला झालेली जखम बरी होताच, ऑपरेशन करण्याचा निर्णय घेऊ," हाताची जखम बरी होताच, शाळा सुरु होण्याचा दिवस जवळ आला. मात्र डॉक्टरांशी चर्चा करून शाळा सुरु झाल्यावर पहिल्याच दिवशी शाळेवर हजर होऊन पुन्हा रजा टाकायचे ठरले. ठरल्याप्रमाणे रजा टाकून मी हाताचे ऑपरेशन डॉक्टर श्री. हरिभाऊ कवडे यांच्या कडे स्टीलची प्लेट व सहा मोठ्या स्क्रूच्या मदतीने हाताचे यशस्वी ऑपरेशन करून घेतले. पुढील सहा महिने घ्यावयाची काळजी विषयी सखोल मार्गदर्शन केले. आता पुन्हा शाळेत दररोज जाऊन आपले नियमित कामे सुरु करावयाची होती.तेव्हा पासून आजपर्यंत हाताने मला माझ्या नियमित कामकाजात कोणताही विशेष त्रास दिला नाही. शेवटी थंडीच्या दिवसात हाताची अधिक काळजी घ्यावीच लागते. नायगाव येथे झालेली बदली देखील माझ्या दृष्टीने खूपच महत्वाची ठरली, याच ठिकाणी सेवेत असतांना माझ्या अपघातग्रस्त हातावर कायमस्वरूपी इलाज झाला. मी एक गोष्ट नम्रपणे सर्वाना सांगू इच्छितो की, श्री. पगार सर, श्री. मोरे बापू, श्री. अनिल कुंदे व श्री. पी.टी. जाधव सरांना त्यांच्या घरातील लोकांच्या दवाखान्यापेक्षा माझ्यासाठीच जास्त धावपळ करावी लागली. कदाचित ही धावपळ आमच्यातील मैत्रीच्या परीक्षेचा काळ होता, त्यात माझे सर्व मित्र मात्र या परीक्षेत १००% पास झाले. पुन्हा एकदा मित्रांचे मोलाचे सहकार्य मला मिळाले. मनेगाव येथील इतर सहकारी मित्र व विद्यार्थी देखील माझ्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी अधून मधून माझ्या घरी येत असायचे.
माझ्या हाताचे ऑपरेशन झाल्यावर रजा संपताच मी शाळेत हजर होण्यासाठी गेलो. शाळेत शिक्षकदालनातं पोहचलो, तर नवीनच ठिकाणी आल्याचा अनुभव आला. विद्यालयातील बहुसंख्य शिक्षकांच्या बदल्या होऊन, अनेक नवीन सहकारी शाळेत रुजू झाले होते. त्यात प्रामुख्याने श्री.व्ही. बी. म्हस्के, श्री. पी. एस. सोनवणे यांच्यासह अनेक शिक्षक आले होते. सिन्नर येथून येणारे श्री. पी.एस. सोनवणे सरांसोबत माझ्या हाताचे ऑपरेशन झाले असल्याने शाळेत येण्याजाण्याची सोय सहकारी शिक्षकांनी करून दिली. येथील माझ्या सहकारी मित्रांनी यापूर्वीच्या शाळेतील सहकार्याचे व्रत येथे ही सुरु ठेवले होते हे विशेष....! श्री. मोरे (बापू) सरांनी सांगितल्याप्रमाणे माझे मित्र जोडण्याचे काम येथे ही सुरुच होते. नायगाव विद्यालयाच्या शिक्षकदालनातील वातावरण नेहमी हसत खेळत ठेवण्याचे काम माझे सहकारी मित्र श्री, विजय म्हस्के व श्री. शिवाजी रहाटळ यांच्या सोबतच इतर सहकारी मित्र करत असायचे. येथील वातावरणाने माझ्या हाताचे दुखणे मी पूर्णतः विसरलो होतो. आपले दुःख विसरण्याचे ठिकाण शाळेतील वातावरण असू शकते, याबाबत माझ्या काही मित्रांचा विश्वास बसणार नाही. पण नायगावमध्ये ही गोष्ट शक्य झाली होती.
आम्ही नायगाव येथे सेवेत असतांना प्रवासाची साधने फारच मर्यादित होती. तेव्हा घडलेला मजेदार प्रसंग. आमचे एक जेष्ठ सहकारी गैरसोयीने नायगाव येथे बदलून आले होते. दररोज ते ओझर-चांदोरी-सायखेडा-नायगाव या खडतर मार्गाने अपडाऊन करायचे. काही वेळा एवढ्याशा प्रवासासाठी अनेक गाड्या बदलण्याची कसरत करून त्यांना प्रवास पूर्ण करावा लागत असे. शाळेत वेळ मिळाल्यावर आमची दररोज, घरी पोहचण्या पासून, तर शाळेत येई पर्यंतच्या प्रवासावर चर्चा व्हायची. एक दिवस काही कारणास्तव शाळा उशिरा सुटली, त्यांना सायखेडा येथे पोहचण्यास बराच उशीर झाल्याने, तोपर्यंत त्यांची ओझर गाडी निघून गेली. त्यांना घरी जाण्यासाठी खूपच उशीर झाला. दुसऱ्या दिवशी त्याचा परिणाम आम्हांला त्यांच्या कृतीतून व बोलण्यातून जाणवत होता. त्यामुळे आमच्या सहकारी मित्रांवर त्याचा थोडाफार परिणाम व्हायचा. आमच्या एका सहकारी मित्राने त्यांच्याकडून उशीर होण्याचे कारण जाणून घेतले. त्यावर त्यांनी एक उपाय सुचविला " सर,तुम्ही रस्त्यावर उभे राहून येणाऱ्या प्रत्येक, वाहनाला हात द्या, वाहन थांबले तर निघून जायचे " ते सर त्वरित उच्चारले "हे टू व्हीलरवाले खूप शहाणे,......असतात...!,स्वतःला काही तरीच समजतात, आपण हात देऊन सुद्धा थांबत नाहीत" हे ऐकून आमचे मित्र उच्चारले ''सर, एवढे टेन्शन घ्यायचे नाही. गाडीवाला थांबला तर ठीक, नाही थांबला, तर वाईट वाटून घ्यायचे नाही. कारण, आपण त्याला गाडी घ्यायला पैसे दिलेय का? सरांनी उत्तर दिले "नाही " मित्र म्हणाले "मग, आज पासून टेन्शन घ्यायचे नाही, येईल त्या साधनास हात देऊन आपल्या प्रवास सोपा करण्याचा मंत्र दिला" हा मंत्र इतका उपयोगी ठरला की काही वेळा आम्ही सिन्नर येथे पोहचतांना ते ओझर येथे पोहचलेले असायचे. यानंतर त्यांची बदली होई पर्यंत त्यांनी प्रवासासंबंधी कोणतीही तक्रार केली नाही. नोकरी गैरसोयीने असतांना सुद्धा आंनद प्राप्तीचा हा मंत्र आपल्याला सुद्धा दैनंदिन जीवनात उपयोगी पडू शकतो...!
सातवीच्या वर्गात एक प्रसंगाचा अनुभव मला विद्यालयात आला.मी सातवीचा वर्गशिक्षक होतो, या वर्गात सर्वच प्रकारचे विद्यार्थी होते. माझ्या वर्गात एक अभ्यासात चांगली असलेल्या विद्यार्थिनीने गुणपत्रकावर पालकांची सही घेऊन आल्यानंतर गुणपत्रक जमा करतांना मला विचारले" सर, माझे गुण कमी करता येतील का?" असला विचारात टाकणारा प्रश्न आज पर्यंत कदाचित कुणाला ही विचारला नसेल. मी देखील प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी सदर विद्यार्थिनीस विचारले की "तुला, गुण का कमी करून पाहिजेत?" यावर विद्यार्थिनीने उत्तर दिले की, "मला दररोजचा अभ्यास करायला, शाळेत यायला आवडत नाही, मुळात शाळा शिकायलाच आवडत नाही." हे ऐकून मी विचारात पडलो. त्या विद्यार्थिनीस मी विचारले "तुला जर शाळेत येण्यास आवडत नाही, तर मग तू शाळेत का येतेस ?" तिने उत्तर दिले "माझे आई-वडील घरी राहू देत नाही, म्हणून शाळेत येते." असे असले तरी तिच्या भविष्याच्या दृष्टीने शिक्षणाचे महत्व या विद्यार्थिनीस पटवून देण्यात आम्हीं सर्वच यशस्वी ठरलो. पुढे पदवी पर्यंतचे शिक्षण त्या विद्यार्थिनीने पूर्ण केले. शिक्षकास अनेक प्रकारच्या विद्यार्थ्यांना सामोरे जात वाटाड्याच्या भूमिकेतून मार्गक्रमण करावे लागते. वेळप्रसंगी त्यांच्या बालबोध मनातील शिक्षणाची भीती दूर करून शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम करावे लागते. ग्रामीण भागातील पालक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास सक्षम नसतात अशा वेळी शिक्षकांची जबाबदारी अधिक वाढते. शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाने अनेक विद्यार्थ्यांनी खूप मोठी झेप घेतल्याचे उदा. डॉ. APJ अब्दुल कलाम यांचे देखील आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की, विद्यार्थ्याला चांगले शिक्षक लाभणे त्याचे भाग्य असते, पण शिक्षकाला सुद्धा चांगले विद्यार्थी लाभण्यासाठी शिक्षक ही नशीबवान असावा लागतो.
नायगाव विद्यालयातील साधारणतः दीड वर्षांची माझी सेवा संस्मरणीय होती. विद्यालयाच्या विकासासाठी व जडणघडणीत महत्वाचे योगदान देण्यात श्री. शेख बाबा, श्री. अशोकराव लोहकरे, श्री. नारायण लोहकरे, श्री. शिवाजीराव कातकडे, श्री.लक्ष्मणराव सांगळे,श्री. हिरामण पानसरे, श्री. ज्ञानेश्वर एन.भास्कर सरांचे मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य लाभले. या सर्वांचे आभार मानने माझे कर्तव्य समजतो. या काळात मला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ए. एम. शिंदे, पर्यवेक्षक श्री. परदेशी सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. येथील सेवेत श्री. व्ही. बी. म्हस्के, श्री. एस.सी. रहाटळ, श्री. पी.एस. सोनवणे, श्री. सी. डी. शिंदे, श्री. एस. डी.पवार, श्री. एस. पी. पांगारकार, श्री. के.एम.नेरे, श्री.गारे सर, श्रीम. पी.डी. जाधव, श्री. डी. एन. भास्कर, श्री. सोमनाथ गिरी, श्री. छगन घनदाट, श्री. हांडगे नाना, श्री.कैलास कदम इत्यादी सहकारी मित्रांनी मला खूप मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले. यासर्वांचा मी सदैव ऋणी राहील.
नायगाव येथे नोकरी करणे माझ्या दृष्टीने खूपच आव्हानात्मक होते. येथील विद्यार्थी नम्र, शिस्तप्रिय, तत्पर, अभ्यासू, मेहनती व आज्ञाधारक असल्याने नेहमी ध्येय प्राप्ती कडे वाटचाल करत असल्याचे जाणवले. माझे वैद्यकीय उपचार सुरु असताना येथील स्टाफने, सेवकवृंदाने व विद्यार्थी मित्रांनी दिलेली आत्मीयतेची वागणुक माझ्या सदैव स्मरणात राहील. येथील सेवेच्या काळात मी प्रामाणिकपणे माझे काम केले असल्याने, आजही येथील विद्यार्थी भेटल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करतात. त्यातील काही विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या पदावर कार्यरत आहेत. या विद्यार्थ्यांत प्रामुख्याने आमदार नरेंद्र दराडे यांची सून डॉ. कविता नामदेव कातकडे, (M.S.) होऊन येवला येथे आपला दवाखाना सांभाळतानाच त्यांच्या कामात महत्वाचे योगदान देत आहे. महेश घुले, फार्मसी ऑफिसर, उप-जिल्हा रुग्णालय, निफाड, संदीप चव्हाण, IDFC बँकेत क्रेडिट मॅनेजर, नितीन लोहकरे सिन्नर MIDC मध्ये, लेबर कॉन्ट्रॅक्टर, ललित जेजुरकर,दमन येथे फार्मा कंपनीत,शिल्पा कातकडे, NDCC बँक सिन्नर, विनोद जेजुरकर व गायत्री जेजुरकर,सिन्नर येथील कंपनीत एक्झिकेटीव, राहुल गारखेडकर, शीतल सांगळे K.K. वाघ इंजी.कॉलेज नाशिक येथे, निलेश बैरागी शिवशाही बसचालक नाशिक-पुणे मार्ग,इत्यादी वेगवेगळ्या ठिकाणी उत्कृष्ठ सेवा बजावत आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे नाव इतक्या वर्षात संपर्क नसल्याने मला येथे नमूद करणे शक्य झाले नाही. अशा अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करून विद्यालयाचे व गावाचे नाव मोठे केले आहे.या सर्वाचे माझ्या वतीने हार्दिक अभिनंदन....!
मी मात्र नायगाव येथील बदलीने आपला हात पुन्हा फ्रॅक्चर झाला, ही गोष्ट कुठे तरी मनाच्या कोपऱ्यात जागा करून होती. त्यामुळे मी तत्कालीन संस्थेचे सिन्नर तालुका संचालकश्री. राजेंद्रजी नवले यांना केलेल्या विनंतीवरून, त्यांनी माझी बदली जनता विद्यलाय, डुबेरे येथे करून दिली. त्याचे मनापासून आभार. मला नायगाव येथील सेवेतून श्री. विजय म्हस्के, श्री. शिवाजी रहाटळ,श्री.आर.डी.वाजे,श्री.पी.एस.सोनवणे यांच्या सारखे जिवलग मित्र मिळाले. येथून मला येथील सेवेत खुप काही नवीन शिकण्यास मिळाले, मला ते पुढील सेवेत उपयोगी ठरले. त्यामुळेच माझ्या नायगाव येथील सेवेतील आठवणी मला नेहमीच प्रेरणा देत राहतील...!
प्रवास माझा✒️🙏
शब्दांकन✒️🌹
श्री. एस. व्ही.कदम()
ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन,mvpdn
Comments
Post a Comment