आठवणीतील मनेगाव....!

✒️आठवणीतील मनेगाव ....!✒️🙏  

भाग- 7 शाळेतील काही प्रसंग  ✒️🌹          
 शब्दांकन ✒️ श्री. संजय व्ही. कदम

                मनेगाव येथे सेवा करतांना अनेक घटनांचे साक्षीदार होणाचा प्रसंग बऱ्याच वेळा आला. यातील एक प्रसंग थोडा विचित्रच होता. एकदा मी माझ्या वर्गावर नेहमी प्रमाणे अध्यापन करत असतांना शेजारच्या वर्गात खूपच जोराचा कोलाहल झाला. मी शेजारील वर्गात जाऊन बघणे स्वाभाविकच होते. माझ्या सारख्या नवीन शिक्षकास हा प्रसंग चित्रपटात शोभेल असे दृश्य, विचाराच्या पलीकडील होते. एक बारा-तेरा वर्षाचा विद्यार्थी हातात धारदार उघडलेला चाकू, नजरेत दहशत भरलेली होती. समोरील शिक्षिका भयभीत होऊन आवक झालेल्या होत्या. मी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्या विद्यार्थ्यावर झडप घातली. त्याच्या हातातील धारदार शस्त्र माझ्याकडे घेतले. तो पर्यंत शेजारील वर्गातील शिक्षक व विद्यार्थी येऊन पोहचले होते. मनेगाव विद्यालयातील माझ्या नावलौकिकाप्रमाणे मी जागेवरच महाप्रसादाचे यथेच्छ वाटप केले. थोड्याच वेळात सर्व वातावरण शांत झाले. घडलेला प्रसंग कुणाच्याही जीवावर बेतणारा असाच होता. नंतर आम्ही संबधित विद्यार्थ्याच्या पालकांना बोलून योग्य ती समज दिली. घडलेल्या प्रसंगाबद्दल विद्यार्थ्याने संबधितांची माफी मागितली. मी मात्र दिवसभर खूपच गोंधळलेल्या अवस्थेत काढला. कारण मी विद्यार्थाला केलेली शिक्षा योग्य की अयोग्य यावर माझ्या काही सहकाऱ्यांमध्ये मागे-पुढे चर्चा सुरू होती. मी नवीनच असल्याने मला वरिष्ठांच्या विचारण्याची चिंता होतीच. अशा वेळी माझे मित्र माझ्या मदतीला धावून आले म्हणाले “कदम, तू काहीच चुकीचे काम केले नाही. आम्ही देखील तुझ्या जागेवर असतो, तर हेच केले असते.” मला बरे वाटले आणि माझ्या मनातील भीती दूर झाली. काही दिवसांनी सदर विद्यार्थ्याच्या पालकांनी येऊन मला सांगितले की सर तुम्ही दिलेल्या प्रसादाचा चांगला परिणाम झाला आहे. आज पासून शाळेतील याची सर्व जबाबदारी तुमची. माझी बदली होई पर्यंत सदर विद्यार्थ्यास मी नेहमी वरचेवर अभ्यासासंदर्भात विचारणा करत असायचो तो देखील व्यवस्थित प्रतिसाद देत होता. अधूनमधून किरकोळ तक्रारी येत होत्या मात्र श्री.मोरे सरांच्या नजरेखाली या विद्यार्थ्याने आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.

           शिक्षक म्हणून मला एका सहकारी शिक्षकाचा आलेला अनुभव विद्यार्थ्यापेक्षा वेगळाच होता. मी शाळा भरण्यापूर्वी शिक्षकदालनात माझे काम करत बसलो होतो.  मुख्याध्यापकांनी मला शिपायामार्फत बोलावून घेतले आणि मला विचारले ”सर, तुमची नव्यानेच नोकरी सुरु झाली आहे. तुमची एक तक्रार आली आहे.” मी विचारले “सर, माझे काही चुकले काय?“ सर रागावून म्हणाले  “तुम्ही चुकीचे वागून,मलाच विचारताय.”  सरांनी  माझ्या बाबतची तक्रार सांगितली मी शांततेने ऐकून घेतली, माझ्या कामासाठी निघून गेलो. संबधित शिक्षकांना मुख्याध्यापकांनी बोलाऊन घेतले. मला शिपायाने मुख्याध्यापकांनी बोलावल्याचा निरोप दिला. मी त्वरित साहेबांच्या  समोर उभा राहिलो. मला तक्रार करणाऱ्या शिक्षका समोरच विचारले की ‘तुम्ही, वरिष्ठ शिक्षकांना योग्य मान देत नाहीत. त्यांची अवहेलना करतात. हे बरे नाही.” याप्रमाणे मी काहीही  केलेले नव्हते या गोष्टीवर माझा विश्वास होता. त्यामुळे संबधित शिक्षकांना मुख्याध्यापक म्हणाले की,”सर, बोला तुमची काय तक्रार आहे? कदम सरांबद्दल."  सदर शिक्षक बोलतच नव्हते , शेवटी म्हणाले,”कुठे काय? माझी काहीच तक्रार नाही. असे मी काहीच म्हणालो नव्हतो?”  मुख्याध्यापक म्हणाले “ मग, मी खोट बोलतोय का?” वातावरण तप्त होत असतांनाच, मी स्वत:ला बोलण्यापासून थांबवू शकलो नाही. मोठी हिम्मत करून म्हणालो “आपल्या पैकी कोण खोट बोलतय?  ते तुमचे तुम्हीच ठरवा.”  मी तेथून शिक्षकदालनात गेलो. माझ्या पश्चात बरेच काही घडले असावे, याचा अंदाज मला आला होता. परिपाठ संपताच मी त्वरित वर्गात पोहचलो, विद्यार्थी हजेरी घेतली तो पर्यंत मुख्याध्यापक लॉगबुक घेऊन माझा पाठ निरीक्षणासाठी हजर झाले. माझ्यासाठी हा एक प्रकारे धक्काच  होता. नुकत्याच घडलेल्या प्रसंगातून मी स्वत:ला सावरत माझ्या पद्धतीने शिकविले. पाठाचे निरीक्षण करून मुख्याध्यापक कार्यालयात निघून गेले. मी शिक्षकदालनात गेलो असता शिपायाने मला मुख्याध्यापकांनी बोलावल्याचा निरोप दिला. मी मनाशीच बडबडलो आजचा दिवस काही मझ्यासाठी चांगला नाही.  मी मुख्याध्यापकांसमोर जाऊन उभा राहिलो, सरांनी मला समोरील खुर्चीवर बसायला सांगितले. मला काय होतेय? काहीच कळत नव्हते पण काय करणार?  तेवढ्यात साहेबांनी माझ्याकडे लॉगबुक दिले त्यावर, मी विषयशिक्षक म्हणून स्वाक्षरी केली. सर्व सूचना वाचुन घ्या असे सरांनी सांगितले मी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचल्या. मुख्याध्यापक म्हणाले “सर, विषयावर तुमचे चांगले प्रभुत्व आहे. तुमच्यात एक चांगला शिक्षक होण्याचे गुण आहेत, असे कौतुक ऐकून बरे वाटले. सकाळच्या प्रसंगातून तुमच्या विषयी चुकीची तक्रार आली होती. आता माझ्या मनात कोणताही गैरसमज नाही.” असे “दुध का दुध और पानी का पानी” करणारे मला लाभलेले मुख्याध्यापक एक सच्चे मार्गदर्शक व प्रेरणादायक म्हणून सदैव स्मरणात राहतील....!

               मी नववीचा वर्गशिक्षक असताना एक प्रसंग घडला होता. प्रथम सत्राचे पेपर तपासणी कामानंतर प्रत्येक वर्गाचे  निकालपत्रक तयार झाले. त्यानंतर प्रत्येक वर्गशिक्षकाने आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रथमसत्राचे गुणपत्रक वाटप केले. वर्गातील विद्यार्थ्यांना गुणपत्रक जमा करण्याची मुदत ठरवून दिली. मुदतीत बहुसंख्य विद्यार्थ्यांचे गुणपत्रक जमा झाले. मात्र दोन-तीन नमुनेच बाकी होते. मी दररोज त्यांना विचारले की, काही तरी कारण सांगून चालढकल होत असायची. माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. एकच विद्यार्थ्याचे गुणपत्रक जमा होण्याचे बाकी होते. संबधित विद्यार्थ्यास दुसऱ्या दिवशी गुणपत्रक घेऊन येण्याची ताकीद दिली होती. त्याप्रमाणे त्याने गुणपत्रक आणले असल्याचे मला पहिलेच समजले होते. मी वर्गात संबधित विद्यार्थ्याकडे गुणपत्रक मागितले असता टाळाटाळ केल्याचे जाणवले. मी त्याला आता कडक शिक्षा करेल असे धमकावले, तेव्हा त्याने गुणपत्रक माझ्याकडे जमा केले. बघितले तर गुणपत्रकात हवे तसे गुण स्वत:च्या मर्जीने वाढवून घेतलेले. त्याने गुणपत्रकात केलेली खाडाखोड माझ्या मस्ताकापर्यंत पोहचली, तरी देखील तास संपेपर्यंत मी स्वतःवर नियंत्रण ठेवले.  संबधित विद्यार्थ्याला स्टाफरूम मध्ये घेऊन गेलो. विनाकारण जास्त चर्चा नको म्हणून क्रीडाशिक्षक श्री.जे. पी. पवार सरांना सोबत घेऊन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. के. आर. पंडित सरांचे कार्यालय गाठले. मुख्याध्यापकांनी विश्वासात घेऊन संबधित विद्यार्थ्याला घडलेला प्रकाराबाबत विचारणा केली. मात्र त्या विद्यार्थ्याने सांगितले “मला, मिळालेले गुणपत्रक खाडाखोड केलेले होते .” सरांनी पुन्हा एकदा माझ्या हातातील सर्व गुणपत्रक घेऊन एक-एक विद्यार्थ्याच्या गुणपत्रकांचे बारकाईने निरीक्षण केले.  मला बोलावून सांगितले, ”सर तुमचा काही दोष नाही, हा मुलगाच बदमाश दिसतोय..!  त्याच्या पालकांना शाळेत बोलून घ्या. “ आम्ही शिक्षकदालनात आलो श्री. जी.बी. मोरे, जे.पी. पवार, पी.टी जाधव, एल.एस. कोल्हे, इ. शिक्षक तेथे होतेच.  श्री. जे.पी. पवार सरांनी दरवाजा आतून बंद केला.  काही कळण्याच्या आतच उपस्थित प्रत्येक शिक्षकाने दोन-चार फटक्यांचा प्रसाद एकाच वेळी  सदर विद्यार्थ्यास दिला. तो खूप घाबरला आता आपले काही खरे नाही, असे वाटल्याने तो हात जोडून विनंती करू लागला. शिक्षकदालनातील गोंधळ ऐकून मुख्याध्यापक तेथे येऊन पोहचले. त्यांच्या समोर त्या विद्यार्थ्याने केलेला सर्व प्रकार सांगितला “गुणपत्रकातील खाडाखोड सरांनी नाही, तर मी केली होती. मी नापास झाल्याने घरी गुणपत्रकावर सही मिळाली नसती...!” मी निर्दोष असल्याने माझा मनातील राग शांत झाला होता. दुसऱ्या दिवशी संबधित विद्यार्थी पालकांना घेऊन शाळेत आला. पालकांना आम्ही घडलेला प्रसंग सांगितला. पालकांनी सांगितले “सर, आता फक्त एवढेच ऐकायचे बाकी होते. आम्ही याच्या पुढे आता हात टेकले आहेत. आता हा तुम्हांला ही त्रास द्यायला लागला असेल, तर त्याला घरी ठेऊन घेतो. आता तुम्हीच ठरवा याचे काय करायचे ते ?” पालकांची मुलाच्या शिक्षणाबाबत असलेली तळमळ बघून आम्ही विचारात पडलो, हा विद्यार्थी पालकांची काय अपेक्षा पूर्ण करेल? आम्ही पालकांना समजून सांगितले, “आतापर्यंत, आम्ही काही तक्रार असल्यास तुम्हाला शाळेत बोलवत होतो. आता तूमच्या मुलाची काही तक्रार असेल तर तुम्ही आमच्याकडे येत जा.” त्या दिवसापासून त्या पालकांना शाळेत येण्याची कधीच गरज पडली नाही. मात्र त्यांच्या मुलाला विद्यार्थ्याने जर चूक केली तर आई वडिलांच्या व्यतिरिक्त कुणी तरी विचारणारा असतो हे समजले. तेव्हापासून मात्र शाळेतील विद्यार्थ्यामध्ये एक संदेश पोहचला की, ‘चुकीचे काम केले तर दरवाजा बंद करून शिक्षक झोडपतात.’ या घटनेमुळे एकाच दगडात अनेक पक्षी मारले गेले होते. अशी अभिनव शिक्षा सुचलेले क्रीडाशिक्षक जे.पी.पवार सर ग्रेटच होते.

                 माझ्या नववीच्या वर्गावर मी नेहमीप्रमाणे हिंदी विषयाच्या शुद्धलेखनाच्या वह्या तपासत होतो. जर एखादी चूक, एखादा शब्द योग्य प्रकारे लिहिला नसेल, तर संबधित विद्यार्थ्यास त्या शब्दाचे लेखन फलकावर समजून द्यायचो. एक विद्यार्थी ‘क’ वर्णाचे लेखन चुकीच्या पद्धतीने करायचा. साधारणतः ‘क’ वर्ण डावीकडून उजवीकडे लेखन करतात. मात्र तो विद्यार्थ्यी उजवीकडून डावीकडे लेखन करायचा. थोडक्यात तो उलट 'क' लिहायचा. मी त्याला ‘क’ वर्णाचे लेखन फळ्यावर अनेकदा करून दाखविले. त्याला फळ्यावर लिहायला लावले. त्याला एकदाही बरोबर त्या वर्णाचे लेखन करता आले नाही. यावेळी आमच्या संपूर्ण वर्गाचे खूपच मनोरंजन झाले. मला आता असे वाटले की, हा विद्यार्थी मुद्दामून करतोय शेवटी त्याला थोडा मार दिला. त्याने अबोध बालकासारखा दिलेला मार सहन केला. मी रागावलो त्याला म्हटलो “तुझ्या, वर्गशिक्षकाचे नाव, तुला बरोबर लिहिता येत नाही.” त्याने निरागस पणे उत्तर दिले “सर, मी खूप प्रयत्न केले, पण मला तुम्ही सांगितल्या प्रमाणे लेखन जमणार नाही.” पुन्हा थोडा मार दिला पण काहीच उपयोग झाला नाही. मी शेवटचा पर्याय म्हणून रागावून म्हणालो  “ हे, बघ जर तुला उद्या ‘क’ वर्ण, मी सांगितलेल्या पद्धतीने लिहिता आला नाही. तर, मी तुझी तुकडी बदलणार आहे.” पुढचा तास मोरे सरांचा होता त्यांना ही सांगितले की,” ..... या विद्यार्थ्याची आपल्याला उद्या तुकडी बदलून द्यायची आहे.” आणि मी निघून गेलो. काही गोष्टी शिक्षा करून होत नाही, इतर वेगळ्या मार्गाने होत असतात. याचा अनुभव मला दुसऱ्या दिवशी वर्गावर आल्याबरोबर, त्याच विद्यार्थ्याने आपला वर्ग बदल होऊ नये म्हणून खूप सरावाने ‘क’ शब्दाचे योग्य लेखन केले. हा विद्यार्थी बऱ्याच दिवसानंतर भेटल्यावर त्यानेच मला या प्रसंगाची आठवण करून दिली. एवढेच नाही तर माझ्या खिश्यातील पेन काढून ‘क’-कदमसर शब्द बिनचूक लिहून दाखविला. सांगण्याचे तात्पर्य आपण जर विद्यार्थी दशेत ठरविले तर कठीण काम पूर्ण करण्यासाठी फक्त चिकाटी आणि परिश्रमाची गरज असते. माझा मार खावून सुद्धा माझ्याच वर्गात बसण्यासाठी धडपड करणाऱ्या विद्यार्थास माझा धन्यवाद ...!  

                   एकदाआपल्या मनेगाव विद्यालयाच्या तापासणीसाठी संस्थेचे तपासणी पथक शाळेत दाखल झाले. संस्थेची शाळा तपासणी म्हटले की सर्वांची चिंता वाढायची. पथकाच्या शिफारशी शाळेसाठी व शिक्षकांसाठी महत्वाच्या असत.  डॉक्टर वसंतराव पवार साहेबांनी संस्थेच्या नामवंत  सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचे शाळा तपासणीसाठी पथक तयार केले होते. तपासणी पथकाचा चांगलाच दरारा होता. त्यांनी आल्याबरोबरच छोट्या-छोट्या बाबीवरून संबंधितांना धारेवर धरणे सुरु केले होते. कदाचित त्यांच्या दृष्टीने ते बरोबरच असेल. त्यांनी परिपाठापासून दिवसभरात आम्हां सर्व शिक्षकांचे पाठ निरीक्षण केले इतर कार्यालयीन रेकॉर्ड तपासले.प्रयोगशाळा, ग्रंथालय, खेळाचे साहित्य व विविध परीक्षा,एस.एस.सी परीक्षा निकाल इ. बाबी तपासल्या. साधारणतः शाळा सुटल्यानंतर सर्वांची मिटींग घेऊन शाळेतील कामकाज व अध्यापन संदर्भात चांगल्या बाबी व उणिवा मुख्याध्यापकांसमोर सांगितल्या जाव्यात असे अपेक्षित असायचे. दिवसभरातील शाळेचे केलेले  निरीक्षण एक-एक प्रसंग सांगत शिक्षकांच्या पाठांच्या बाबतीतही निरीक्षक बोलू लागले. त्यांच्या बोलण्याचा सूर फक्त नकारात्मक असल्याचे मुख्याध्यापकाच्या लक्ष्यात आले. आतापर्यंत शाळेतील एकही चांगली बाब व्यक्त झाली नसल्याने शाळेचे मुख्याध्यापक श्री. के.आर.पंडित अस्वस्थ झाल्याचे जाणवत होते. अचानक मुख्याध्यापक उभे राहिले आणि तपासणी प्रमुखाची परवानगी घेऊन बोलले "आपल्या सर्व निरीक्षकांनी आत्तापर्यंत मांडलेल्या बाबी मी काळजीपूर्वक ऐकतो आहे. आपणांस माझ्या शाळेतील एकही चांगली बाब दिसली नाही, याचे मला आश्चर्य वाटते. माझी  सर्व मान्यवरांना विनंती आहे, की उणिवा असतीलच निश्चितच सांगा पण त्याच बरोबरच चांगल्या गोष्टीचा देखील उल्लेख याठिकाणी व्हावा ही आमची अपेक्षा आहे. नाही तर तुम्ही एक दिवस शाळेची तपासणी करून आज निघून जाणार. माझ्या शाळेत  अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले, तर हे विद्यालय मी उद्या कसे चालवायचे?  हे देखील लक्षात असू द्या." आम्ही सर्वच स्तब्ध झालो होतो, शिक्षकांचे संदर्भात पुढील तज्ञांनी थोडक्यात मार्गदर्शन करत काढता पाय घेतला. उशिरापर्यंत चाललेल्या उद्बोधनातून एकंदरीत शाळा तपासणीचा दिवस पार पडला. एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आपल्या संस्थेचा, शाळेचा, शिक्षकांचा व कर्मचारी वर्गाचा सर्वार्थाने विचार करणारे, काही तत्व पटत नसले तर त्यास स्पष्ट विरोध करणारे, नेहमी सर्वांचेच हित जोपासणारे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री. के.आर.पंडित सर स्वतःचा एक आदर्श निर्माण करणारे व्यक्तिमत्व होते.

                 माझी मनेगाव येथून जनता विद्यालय, नायगाव येथे बदली झाली होती. शिक्षकाच्या दृष्टीने बदली त्याच्या सेवेचा एक भाग असतो. पण काही वेळा विनाकारण झालेली बदली यातना देते, असाच प्रसंग माझ्या बाबतीत मनेगाव शाळेत घडला होता. माझ्या बदलीने विद्यालयातील असंख्य विद्यार्थी नाराज झाले होते. माझे काही सहकारी सुद्धा नाराज झाले होते. काही नाराजी व्यक्त करत होते, तर काही व्यक्त करत नव्हते.  अशाच प्रकारे काही सातवीचे विद्यार्थी खूपच नाराज झालेले होते. त्यांची नाराजी मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. शिक्षकदालनाच्या शेजारीच हा वर्ग असल्याने वर्गात कुणी तरी विद्यार्थी रडत असल्याचे वर्गावरील शिक्षकांना समजले. त्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रडण्याचे कारण विचारले, तेव्हा एका विद्यार्थ्याने सांगितले की, “आपल्या कदम सरांची बदली झाली म्हणून, हे  विद्यार्थी रडताय.” संबधित सरांनी त्यांना रागावून सांगितले की, “त्यांची बदली झाली, म्हणजे गावावर आकाश कोसळले काय?” मी  हे वाक्य ऐकून सुन्न झालो. माझे सहकारी असे का बोलले असतील?  या प्रश्नाचे उत्तर मला आज देखील मिळालेले नाही. मी एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की, सर्वांनी आपल्या सहकाऱ्याबाबत बोलतांना मनावर नियंत्रण ठेऊन बोलावे. नाही तर माझ्या सारखे अनेक शिक्षक एखाद्या अनुत्तरित प्रश्नाचा बोजा घेऊन पुढील सेवा पूर्ण करतील. असे ही प्रेम करणारे काही सहकारी मला येथे लाभले, त्यांचे सर्व प्रथम आज ही मी आभार मानतो.

                 माझ्या मनेगाव येथील सेवेत मुख्याध्यापक म्हणून श्री. मनियार सर, श्री. जे.के. गवळी, श्री. जी. एच. पाटील., श्री. के. आर पंडित  इ. मान्यवरांचे योग्य मार्गदर्शन मिळाले.  माझ्या येथील सहकाऱ्यांकडून योग्य सहकार्य,सहवास व मार्गदर्शन मिळाल्याने मी सर्वांचाच कायम ऋणी राहील. माझ्या दृष्टीने मनेगावने मला आयुष्यभरासाठी दिलेली मित्रांची अनमोल भेट...!  याच बरोबर माझे फमिली डॉक्टर श्री. अशोकजी एन. सोनवणे सर यांनी मला अपघात काळानंतर तब्बेती विषयी खूपच मोलाचे मार्गदर्शन केले, वेळी-अवेळी काही अडचण आल्यास त्यांनी माझ्या परिवारातील आजारी सदस्यांचा योग्य उपचार केल्याबद्दल मी नेहमीच त्याचा ऋणी राहील. 
                लेखानाची मालिका सुरु केल्यानंतर आमच्या डॉक्टर शिवाजी कराड, योगेश वर्पे, सचिन पोटे, प्रमिला शिंदे(पोटे), जितेश वैष्णव यांच्यासह अनेक  विद्यार्थांनी उत्तम लेख प्रकाशित केले त्यांचे विशेष अभिनंदन..!  आपल्या ग्रुपचे प्रमुख श्री. मोरेबापुंचे विशेष आभार स्वतः लेखन करतानाच, अनेकांतील सुप्त गुणांना जागृत करून न कळत लेखन करून घेतले त्यामुळे बापुंचे विशेष आभार. लेखन केल्यानंतर योग्य प्रतिसाद देण्याचे काम आपले मार्गदर्शक श्री. जे.बी. पगार सर, श्री. पी. टी. जाधव सर, श्री. जे. पी. पवार व विद्यार्थी मित्र डॉक्टर योगेश सोनवणे, संदीप सोनवणे, उद्धव मुरकुटे, दिपक सातपुते, विक्रम गायकवाड,  रामहरी शिंदे, अमोल आंबेकर, संदीप वाजे, विलास सोनवणे,योगेश कर्डक, संजय कर्डक, सिताराम नागरे, दीपक सोनवणे, सौ.ललिता कोतवाल, सौ.ज्योती मोरे (महाजन), सुरेखा नजान(मार्कंड), रोहीणी (काळे)सोनवणे, विनोद जाधव,किरण शिंदे, बळीराम चकोर,अनिल सोनवणे, भारत सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, चेतन  सोनवणे, मोरेश्वर सोनवणे  इत्यादी विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला या सर्वांचे मी आभार मानतो.  
                 माझ्या सर्व शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो मी आपले सर्वांचे मार्गदर्शक श्री. जे.बी. पगार सर, श्री.जी. बी. मोरे,आमच्या अध्यापक विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री.श्याम पाटील सरांचा संपूर्ण लेख वाचून दिलेल्या प्रेरणेने मी आठवणी मनेगावच्या या सदरामध्ये जवळपास एकूण सात भाग क्रमश: लेख प्रकाशित केले. अनेकांनी माझे खूप कौतुक केले काहींनी मार्गदर्शक सूचना ही केल्या. काही सूचना त्वरित स्वीकारल्या, सर्वच सूचना स्वीकारता आल्या नाहीत त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आपण सर्व मानेगावकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. माझ्या नैताळे, सिन्नर, नांदगाव, दिंडोरी येथील सहकारी मित्रांनी व विद्यार्थी (छात्रशिक्षक) मित्रांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहील. मनेगावच्या व माझ्या मित्र परिवारातील मित्रांच्या जीवनावरील प्रसंग लिहीतांना काही उणीवा राहिल्या असतील तर मला मोठ्या मानाने क्षमा करावी. आपणा सर्वांचे प्रेम कधीही विसरता येणे शक्य नाही. आजच्या लेखाबरोबरच योग्य वेळी कोठे तरी थांबायला हवे, हा विचार समोर ठेऊन आठवणीतील मनेगाव ही माझ्या लेखनाची मालिका मी येथेच थांबवत आहे. सर्वाचेच पुन्हा एकदा आभार .....!🌹🌹🙏

प्रवास माझा✒️
शब्दांकन✒️🌹
श्री. संजय कदम
ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्यु. Mvpnd

Comments

Popular posts from this blog

वाजे विद्यलाय-१

महाविद्यालयीन जीवनातील मित्र...!

नांदगाव भाग-5