आठवणी होस्टेलच्या....!(जनरल होस्टेल,चांदवड)
🌹आठवणी होस्टेलच्या......!🌹🙏
(चांदवडचे जनरल हॉस्टेल)
शब्दांकन – ✒️✒️🌹
संजय कदम
एरंडगावातील शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणाची सोय गावात नव्हती. एकतर मनमाड किंवा मालेगाव शिवाय पर्याय नव्हता किंवा शाळा न शिकणे हा एक पर्याय सर्वांसाठीचा होता. आमचे (आण्णा) वडील जुनी अकरावीची शिकलेले, मात्र त्यावेळी शेती उत्तम, व्यापार मध्यम व नोकरी कनिष्ठ हे सूत्र असल्याने वडिलांनी शिक्षण झालेले असूनही शाळेचे, तलाठी, ग्रामसेवक इत्यादी नोकरी स्वीकारली नाही किंवा त्यांना वडीलधारी नातेवाईकांनी नोकरी करू दिली नाही. आमचे प्राथमिक शिक्षण होई पर्यंत पाणी-पाऊस चांगला असल्याने शेती खरोखर उत्तम असल्याचा माझा देखील विश्वास होता. मात्र आई निरक्षर असून ही शिकून नोकरी, व्यवसाय करण्याचा आग्रह धरत होती. माझे मोठे मामा श्री.सुभाष काशिनाथ जाधव नोकरी करत असल्याने त्यांची स्थिती तिने जवळून बघितली होती. गावातील शिकून नोकरी करणारांचे अनुभव तिला आमच्यासाठी अधिक योग्य वाटल्याने मोठ्या बहिणीच्या शिक्षणासाठी मामांकडे मालेगाव येथे व्यवस्था केली होती. माझे लहान मामा व बहिण मोठ्या मामाकडे शिकण्यासाठी होते. त्यात भर म्हणून आईने वडिलांना (आजोबांना) माझ्या शिक्षणासाठीची व्यवस्था मामांकडे करून ठेवली होती. मी देखील बहिण आणि लहान मामा तेथे असल्याने मालेगाव येथे शिक्षणासाठी गेलों होतो. जून १९८० मध्ये आठवीच्या वर्गात शिकण्यासाठी लोकमान्य विद्यालात, मालेगाव येथे प्रवेश घेतला. एक वर्ष येथे शिक्षण घेतल्यानंतर पुढील वर्षी चांदवड येथे जनरल होस्टेलला प्रवेश घेण्याचे वडिलांनी निश्चित केले होते.
जून १९८१ मध्ये माध्यमिक शाळा सुरु होताच माझे नवीन वर्ष चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्य हायस्कूल येथे सुरु झाले. यापूर्वीच येथे माझे तीन चुलतभाऊ देखील शिकत होते त्यामुळे मी उत्साहित होतो. आमच्यात सर्वात मोठा कमलाकर (काका) एक वर्ग पुढे होता. हेमंत कदम आणि राजू कदम एक वर्षापुर्वीच होस्टेलला आलेले होते. आमचे गुरु श्री. बी.बी. देवरे सर (एरंडगावकर)आमच्या गावातील असल्याने त्यांनी माझे दोन्ही भाऊ असलेल्या वर्गात माझी व्यवस्था करून दिली होती. प्राथमिक शाळेत आम्ही सोबतच शिकल्याने, त्यांच्या सोबत होस्टेलच्या जीवनाशी एकरूप झालो. मला दररोज सकाळी थंड पाण्याने आंघोळ करतांना होस्टेल म्हणजे मोठी शिक्षा देण्याचे ठिकाण वाटायचे. मात्र थोड्या वेळात मी ही गोष्ट विसरून जात असायचो. होस्टेलचे बरेचशे कामे आईने घरी करून घेण्याची सवय करून घेतली होती. होस्टेलचे जीवन समवयस्क मुलांसोबत असल्याने खूपच आनंदात पुढे जात होते. होस्टेलच्या जीवनाचा शिस्त हा पाया असल्याचा अनुभव आला. जो शिस्त पाळेल त्याच्यासाठी होस्टेलचे जीवन खूपच लाभदायी असते. मात्र नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी त्रासदायक असायचे.
होस्टेलला आमच्या निवासाची व्यवस्था खोलीच्या आकारावरून छोट्या-छोट्या गटात केलेली असायची. प्रत्येक खोलीत सात-आठच्या संख्येने मुले असत, खोलीत आम्ही पेटीच्या समोरील भागात सतरंजी पसरविली की झोपण्याचे अंथरून तयार व्हायचे. होस्टेलच्या मुलांसाठी स्टडी टेबलसह सर्व काही अंथरूनच होते. माझ्या वर्गात असलेले दोन्ही भाऊ आम्ही एकाच खोलीत होतो. पेटीत वह्या, पुस्तके, जेवणाचे ताट,वाटी, ग्लास, कपडे इ. साहित्य असायचे. होस्टेलचे मुलं गावी जाऊन आले की घरून आणलेला खाऊ खोलीतील सर्वांनी सोबत खाण्याचा अलिखित नियमच होता. जर असे केले नाही तर रात्रीतून त्याचा खाऊ बेमालूमपणे इतरांना पेटीचे कुलूप उघडून वाटला जाई. येथे आपली वस्तू इतरांना खायला देऊन आनंद प्राप्ती होते हे आम्हांला होस्टेलच्या जीवनात समजले. प्रत्येक खोलीसाठी एक गटप्रमुखाची नेमणूक केलेली असायची. खोलीतील शिस्त व नेमूण दिलेली कामे जबाबदारीने गटप्रमुखानी करून घेणे अपेक्षित असायचे. कुणी त्यात अडचण निर्माण केली तर तो सुपरवायझर कडे तक्रार करत असे. त्यामुळे आमच्या संपूर्ण खोलीच्या कुटुंबप्रमुखाची भूमिका गटप्रमुख पार पाडत असत. आमचे होस्टेलला एक बँकेप्रमाणे खाते असायचे. आम्ही घरून आल्यावर आमच्या कडील पैसे सुरक्षित या खात्यावर भरत असायचो. आम्हांला रविवारी खर्च करण्यासाठी पैसे बँके प्रमाणे वाटप होत असे. कमीत कमी एक ते पाच रुपये खात्यातून काढत असू. यापेक्षा अधिक रुपये हवे असतील तर पूर्व सूचना देणे गरजेचे असायचे. बँक व्यवहाराचे संस्कार येथून आम्हाला मिळाले.
चांदवड मधील जनरल होस्टेल तेव्हा ग्रामीण भागात शिक्षणाची सोय नसलेल्या विद्यार्थांसाठी एक महत्वाचे ठिकाण होते. येथे जास्तीतजास्त विद्यार्थी चांदवड परिसरातील असायचे. सोबतच नाशिकसह इतर ठिकाणची विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येथे येत असायचे. होस्टेलला असतांना शिस्त खूप महत्वाचा घटक असतो. आमचे जनरल होस्टेल अधीक्षक श्री. डी.पी. शेळके सरांच्या शिस्तप्रिय प्रशासनासाठी प्रसिद्ध होते. होस्टेलला नव्याने आलेल्या विद्यार्थ्यांना माहितीपत्रकासह सर्व नियम समजून दिलेले असायचे. होस्टेलवरून शाळेत ये-जा करतांना सर्वांना नियमाचे पालन करणे बंधनकारक होते. येथे आम्हाला रहदारीच्या नियमांचा व वेळेचा संस्कार आम्हाला मिळाले. होस्टेलच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपापली तयारी करून शाळेत वेळेवर पोहचणे अपेक्षित असायचे. सोमवार ते शुक्रवार शाळा सकाळी ११.२० ते सायंकाळी ५.२० या कालावधीत भरत असायची, तर शनिवारी सकाळी ७.२० वाजता आमची शाळा भरत असायची.
होस्टेलचा दैनंदिन उपक्रम नियोजनाप्रमाणे ठरलेले असायचे. सकाळी पाच वाजता झोपेतून उठण्याची बेल होत असायची. यावेळी सर्व विथार्थ्यानी आपल्या खोलीतून खाली येऊन राष्ट्रगीत व प्रार्थनेसाठी उपस्थित राहणे आवश्यक असायचे. येथे सर्व विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाऊन गैरहजर विद्यार्थ्यांचा रिपोर्ट नियमित रेक्टरकडे दिला जायचा. जर कुणी आजारी असेल तर त्याला दवाखान्यात घेऊन जाण्याची जबाबदारी संबंधितावर सोपविली जायची. सकाळी पाच ते सात व आठ ते दहा ही वेळ अभ्यासाची होती. सकळी सात ते आठ प्रा:तकालीन विधी आंघोळ व कपडे धुण्यासाठी असायची. सकाळी दहा ते साडेदहा यावेळेत सर्वांनी सोबत जेवण करून शाळेची तयारी करून शाळेत वेळेवर पोहचणे अपेक्षित असायचे. सायंकाळी सहा पर्यंत सर्वांनी शाळेतून होस्टेलवर पोहोचणे आवश्यक होते. मात्र विविध खेळ खेळण्यासाठी आम्ही पंधरा-वीस मिनिटातच होस्टेलवर पोहचत असू. सहा ते सात होस्टेलच्या पाठीमागील मैदानावर विविध खेळ खेळण्याची व्यवस्था केलेली होती. होस्टेलचे अपवादात्मक विद्यार्थी सोडले तर सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थी असल्याने खेळाचे मैदान विविध खेळ प्रकारांनी गाजत असे. विविध खेळ खेळणारे खेळाडू व तितक्याच उत्साहाने दर्शकाच्या भूमिकेत आपले योगदान देणारे सहकारी मित्रात खेळण्यात वेळ कधी संपायचा कळत नसायचे. आर्ध्या तासात आम्ही वैयक्तिक स्वच्छतेचे काम आटोपून साडेसात ते आठ वाजता जेवणासाठीची वेळ असायची. जेवण झाल्यावर आठ ते दहा अभ्यासाची वेळ होती. रात्री दहा वाजता झोपण्याची बेल झाल्यानंतर वंदे मातरम् ने दिवसाची सांगता होऊन झोपण्यास परवानगी होती. जो कुणी जास्त वेळ अभ्यास करू इच्छित असेल तर तो दहावीच्या विद्यार्थ्यासोबत बसून अभ्यास करत असे. होस्टेलमध्ये जेवणाच्या वेळी वाढण्याचे काम दररोज रोटेशन पद्धतीने वाटून दिलेले असायचे. या गटाने स्वयंपाक घरात पाणी भरण्यापासून इतर कामे करावी लागत असत. सर्वांना समान कामाचे वाटप करून देण्याचा प्रयत्न होस्टेलचे प्रशासन करत असायचे. होस्टेलचे दैनंदिन जीवनक्रम सकाळी पाच वाजता राष्ट्रगीताने सुरु होऊन रात्री दहा वाजता वंदे मातरम् ने समाप्त व्हायचा. दिवसभरात सहा तास शाळेत व सहा तास अभ्यासात आमचा वेळ जात असे.
होस्टेलसाठी आवश्यक असलेला आठवड्यासाठीचा भाजीपाला खरेदी करण्यासाठी ठरवून दिलेल्या गटाने सुपरवायझर श्री. झरोळे सरांसोबत जावे लागत असे. बाजारात वस्तूची खरेदीने अनेक गोष्टींचा संस्कार मिळत असत. मंगळवारी व गुरुवारी संध्याकाळी खिचडी भात त्यासोबत टोम्याटोची पातळ भाजीची चव आजही वेगळाच आनंद देऊन जाते. होस्टेलवर रविवारी सकाळी असलेले गोडधोड (फिस्टचे) जेवणाचे प्रत्येकास आकर्षण असायचे. संध्याकाळी मात्र फक्त खिचडी भात जेवणात असायचा. आम्हाला शालेय व गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी रविवारी तीन ते पाच या वेळेत चांदवड गावात पाठविले जायचे. बरेच विद्यार्थी येतांना नाश्ता करून येत असायचे. होस्टेल व परिसर स्वच्छतेची जबाबदारी देखील गटागटाने वाटून दिलेली असायची. मात्र काही विद्यार्थ्यांनी होस्टेलच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना होस्टेल व वाडा सफाईचे काम सक्तीने करावे लागत असे. आम्ही एकदा इतर मुलांप्रमाणे होस्टेलच्या प्रशासनाची नजर चुकवून चित्रपट बघण्यासाठी गेलो होतो. रात्री आम्ही आलो तेव्हा कुणीतरी बघितले आणि दुसऱ्या दिवशी रेक्टरांकडे तक्रार केली आम्हाला पुढील दोन दिवस होस्टेल व परिसर स्वच्छतेची शिक्षा मिळाली. पुन्हा अशी चूक करण्याची होस्टेल सोडून जाई पर्यंत आमची हिम्मत झाली नाही.
श्री नेमीनाथ जैन ब्रम्हचर्य विद्यालय, चांदवड हे नाशिक जिल्ह्यात शिस्त व दर्जेदार शिक्षणसाठी प्रसिद्ध होते. आम्ही शिकत असतांना विद्यालयास कर्तव्यदक्ष व कर्मनिष्ठ श्री. शा. पं. जोशी मुख्याध्यापक पदी लाभले होते. त्यांच्या बाबतीत “मूर्ती लहान, पण कीर्ती महान” अशी त्यांची ख्याती होती. त्यांचे प्रशासन विद्यालयास वैभव प्राप्त करून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असायचे. शाळेला उत्तम भौतिक सुविधा, प्रयोगशाळा, प्रशस्त क्रीडांगण, एन.सी.सी. चा विभाग व शाळेला सभागृह इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या होत्या. क्रीडाशिक्षक श्री. गुळेचा सरांचे नाव आज जरी घेतले तरी त्यांचा दरारा आठवतो. सर्व विद्यार्थ्यांना शालेय शिस्त पाळण्याची सक्ती त्यांनी उत्तमरीतीने राबविली होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल विद्यार्थ्याचा मनात आदरयुक्त भीती होती. शाळेतील कोणताही विद्यार्थी सहजासहजी शालेय नियमांचे उल्लंघन करण्याची हिम्मत करत नसायचा. येथे आमच्यावर शालेय शिस्तीचे संस्कार मिळाल्याने आज आम्ही सर्व गोष्टी नियमात करतो. शिक्षकाची नोकरी करतांना आम्ही स्वतः नियमांचे पालन करत असल्याने आमच्या विद्यार्थांना शिस्त लावण्यात आम्हाला फारशी अडचण येत नाही.
आमच्या शाळेत एन.सी.सी.चे अत्यंत कार्यक्षम असे युनिट कार्यरत होते. त्यामुळे या युनिटच्या वैकल्पिक अभ्यासासाठी प्रत्येक विद्यार्थी प्रयत्नशील असायचा. माझे दोन्ही भाऊ या अभ्यासक्रमासाठी असल्याने मला एन.सी.सी.च्या वैकल्पिक अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा होता. त्यात मला प्रवेश मिळाल्याने मला खूप आनंद झाला होता. मी एन.सी.सी. घेतल्याने मला तेथे कडक शिस्तीचे श्री. परदेशी सरांची ओळख झाली. एन.सी.सी. कमांडरला साजेसे असे सरांचे व्यक्तिमत्व होते व त्यप्रमाणे नियम आम्हाला पाळावे लागत असायचे. एन.सी.सी.च्या परेडसाठी आम्ही आठवड्यातून दोन दिवस शाळा सुटल्यावर थांबत असू. परेडमध्ये कोणत्याही प्रकारच्या चुकीला माफी नसायची. चूक करणाराला शिक्षा नक्कीच मिळत असे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी आपल्याला दिलेल्या सुचानाचे तंतोतंत पालन करत असायचा. ग्रुप प्रमाणे सर्वांना परेडसाठी ऑर्डर द्यावी लागत असे. येथे देशाचे रक्षक सैन्यासाठी असलेले सर्व कडक नियम पाळावे लागत असत. अगदीच गंभीर चूक झाली तर हाताच्या कोपरावर पुढे सरकत चालण्याची, फ्रॉग जंप, पाठीवर वजन घेऊन मैदानास चक्कर मारणे इ. प्रकारची शिक्षा कोणतीही भेदभाव न करता मिळत असायची. आमची परेड घेण्यासाठी सेनेतील मेजर दर्जाचा अधिकारी देखील येत असत. बेस्ट कॅन्डीडेटची निवड सर्वांनाच सुखावह असा प्रसंग असायचा. फायरिंगसाठीचा कॅम्प निर्जन भागात लागत असे. येथे प्रत्येक एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यास फायरिंगची संधी मिळत असे. त्यानुसार त्या अभ्यासक्रमाची श्रेणी अर्थात गुणदान केले जात असायचे. अत्यंत कडक शिस्तीच्या शाळेत एन.सी.सी. सारख्या उपक्रमातून देशसेवेचे महत्व शाळेच्या माध्यमातून करून दिले जात असे. जे विद्यार्थी भविष्यात देशसेवेत जाऊ इच्छित असायचे ते ग्रामीण भागातील विद्यार्थी एन.सी.सी. च्या अभ्यासक्रमास प्रवेश घेत असायचे.
आम्हाला विद्यालयात शिकविणारे वेगवेगळे शिक्षकरुपीरत्न लाभलेले होते. श्री. आहेर सर, श्री. काले सर, श्री. पांडे सर, श्री. शेळके डी.पी. सर. श्री.ओस्तवाल सर, श्री. कुमठेकर सर, श्री. सूर्यवंशी सर, श्री. खैरनार सर, श्री. बी. बी. देवरे (एरंडगावकर) श्री. गुळेचा सर, श्री.परदेशी सर इत्यादी शिक्षक आपापल्या विषयात निष्णात होते. त्यांनी उत्तम अध्यापना बरोबरच चांगले संस्कार आमच्यावर केले. त्यामुळेच विद्यालयात व होस्टेलवर आम्हांला कमलाकर कदम, माणिकराव पवार, हेमंत कदम, संजय गायकवाड, राजेंद्र कदम, कै. संजय जाधव माजी नगरसेवक मनपा नाशिक, प्रवीण कर्डीले, बाजीराव ठाकरे, राजाराम पुरकर इत्यादी जिवलग मित्र येथे मिळाले.
चांदवड येथील नेमिनाथ जैन ब्रम्हचर्य विद्यालयात शिकतांना प्रयोगशाळेच्या बाबतीत मला एक विचित्र अनुभव येथे आला. आम्हांला रसायनशास्त्र विषय शिकविण्यासाठी श्री. कुमठेकर सर होते. इयत्ता नववीच्या वार्षिक परीक्षेचे प्रात्यक्षिक परीक्षा सुरु झाल्या होत्या. माझ्या बॅचचे प्रात्यक्षिक सुरु असतांना टेबलवर असलेली परीक्षानळी कुणाचा तरी टेबलास धक्का लागल्याने टेबलावरून घरंगळत खाली पडली. काचेची वस्तू खाली पडल्याच्या आवाजाने आमचे शिक्षक श्री. कुमठेकर खूपच ओरडले. मी त्यांना सांगण्याचा बराच प्रयत्न करून बघितला पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. माझा काही दोष नसतांना माझे म्हणणे ऐकून घ्यायला हवे होते. माझे काहीही न ऐकता मला बऱ्याच गोष्टी ऐकविल्या. मी व माझे वर्गमित्र माझी चूक नसल्याचे सांगत होतो पण काही केल्या सर ऐकत नव्हते शेवटी परीक्षानळीचे मूल्य व दंड म्हणून मला एक्कावन्न रुपये भरण्यास सांगितले. जर रक्कम भरली नाही तर पुढच्या विषयाचे प्रात्यक्षिक देता येणार नसल्याचे सांगितले. माझ्या जवळ इतकी मोठी रक्कम नव्हतीच, ही रक्कम मोठी असल्याने सहकारी मित्रांकडून पैसे घेऊन पूर्ण होऊ शकली नाही. दुसऱ्या दिवशी पैसे भरावयाचे असल्याने मी खूप चिंतीत होतो, त्यामुळे मला रात्रभर झोप लागली नाही. पैसे जमा करण्यासाठी माझ्या अनेक मित्रांची मदत घेऊन मी फक्त वीस रुपये जमा करू शकलो. बाकी रक्कम जमा करण्यासाठी शाळेतील झालेला प्रकार सांगून होस्टेलचे सुपरवायझर श्री. झारोळे सरांकडून पैसे घेऊन सदर रक्कम दुसऱ्यादिवशी प्रयोगशाळेत भरल्यानंतर पुढील विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा दिली. माझ्या सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे म्हणणे श्री. कुमठेकर सरांनी का ऐकून घेतले नाही? या प्रश्नाचे उत्तर मलाआजही मिळालेले नाही. अशा प्रकारे शिक्षकांनी विद्यालातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास घालवू नये असे मला वाटते. या घटनेचा परिणाम असा झाला, मी दहावीत शिकत असतांना बऱ्याच वेळा प्रात्यक्षिक करण्यासाठी विज्ञान प्रयोगशाळेत गेलो. पण एकदाही प्रात्यक्षिक करण्याचे धाडस मला झाले नाही. विद्यार्थ्यांशी असे वागणे बरोबर नाही याची सर्व शिक्षक बांधवांनी काळजी घ्यावी अशी माझी सर्वांना विनंती आहे. माझ्या प्रमाणे अनेक विद्यार्थ्यांन त्रास देण्याचा प्रकार आजही अनेक शाळांतून अधून- मधून घडतात. विद्यार्थी ज्यांना दैवत मानून त्यांच्या एका शब्दासाठी कोणतीही गोष्ट आनंदाने करत असतात. त्यामुळे हे सर्व कोठे तरी थांबले पाहिजे? अशी माझी सर्व विद्यालयातील मुख्याध्यापकांना विनंती आहे. माझे महिन्याचे होस्टेलचे सरासरी जेवणाचे बिल पंच्याहत्तर ते अठ्याहत्तर रुपये असायचे यावरून मी फुललेल्या परीक्षानळी व दंडाची भरलेली रक्कम किती मोठी होती याचा अंदाज येऊ शकतो. मार्च 1982 मध्ये घडलेला हा क्लेशदायक प्रसंग जवळपास मी बारा वर्षे सोबत घेऊन अस्वस्थच होतो. मी जेव्हा 1994 मध्ये एम. ए.बी.एड. शिक्षण पूर्ण करून अनुदानित शाळेत शिक्षक म्हणून नूतन जवाहर विद्यालय, मनेगाव ता. सिन्नर येथे नोकरीच्या ठिकाणी रुजू झालो. मात्र मी शिक्षक झाल्यानंतर माझे पाऊल प्रयेगशाळेकडे मला घेऊन गेले. माझे सहकारी व विज्ञान शिक्षक श्री. जी .बी. मोरे सरांना विचारले, “सर, प्रात्यक्षिक करतांना जर परीक्षा नळी खली पडून फुटली तर तुम्ही किती दंड घेतात?” हा प्रश्न ऐकून त्यांनी मला उत्तर दिले, “मी पंधरा वर्षात एकदाही असा दंड आकारला नाही. काचेच्या वस्तू वापरल्यावर दरवर्षी फुटतात असे गृहीत धरून साहित्य खरेदीसाठी शासन पैसे देते. या अनुदानातून वस्तू खरेदी करता येतात.” हे ऐकून मला खूपच वाईट वाटले. श्री. मोरे सरांना देखील झालेला प्रकार सांगितल्यावर शिक्षक असे का वागतात? याचे खूप आश्चर्य वाटले. बारा वर्षांनंतर माझी चूक नसतांना माझ्या कडून अरेरावीने पैसे वसूल करणारे श्री. कुमठेकर माझ्या दृष्टीने शिक्षक असूनही दोषी शिक्षक ठरले. याचवेळी मी निर्दोष असल्याचा आनंद देखील झाला. माझ्या शाळेतून मला अनेक चांगले वाईट अनुभव जरी मिळाले तरी शिक्षक म्हणून मला आयुष्यात उपयोगी असलेली शिस्तीची, निष्ठेची, परिश्रमाची, शिदोरी मला येथूनच मिळाली हे मात्र निश्चित........!
🌹प्रवास माझा🌹🙏🙏
✒️शब्दांकन✒️🌹🌹
श्री. संजय कदम
अध्यापकाचार्य
ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, dnmvp
Comments
Post a Comment