कलेतून सुसंस्कार...!
✒️आठवणीतील मनेगाव ....!✒️🙏
भाग- ४ कलेतून सुसंस्कार !🌹
✒️शब्दांकन- संजय कदम
जून महिना सर्वांच्याच दृष्टीने खूप महत्वाचा असतो. बळीराजाचे लक्ष येणाऱ्या काळात चांगल्या पाऊसाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे लागलेले असते, पेरणीपूर्व मशागतीचे कामे सुरु होतात. विविध शालेय अभ्यासक्रमांची सुरुवात याच महिन्यात होत असते. सर्व शाळा उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर याच काळात सुरु होतात. मनेगाव परिसरातील जि. प. प्राथ. शाळा, धोंडवीरवाडी येथील प्राथमिक शिक्षक श्री. महारू निकम व श्री. धोंडगे सर यांनी ही शाळा नावारूपाला आणण्यासाठी खूपच परिश्रम घेतले होते. धोंडवीरवाडी येथील चौथी पास सर्व विद्याथीं मनेगाव विद्यालयात पाचवीसाठी प्रवेश घेत असत.
प्राथमिक शाळेतून माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेणारे पाचवीचे विद्यार्थी खुपच उत्साहित असत. त्यांना नवीन शाळेच्या पहिल्या दिवसाचे खूप आकर्षण असते. नवा वर्ग, नवीन शाळा, नवीन मित्र, नवीन शिक्षक, नवे वातावरण, प्रत्येक विषयास नवीन शिक्षक, प्रत्येक तासाला वेगळ्या विषयाचे अध्यापन, मैदानात होणारे खेळाचे तास, इ. सर्व काही नवीनच होते. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे गणवेश सुद्धा नवीनच, त्यामुळे पाचवीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे आकर्षण असायचे. याचा अनुभव मला मनेगाव येथे रहायला असतांना आला. मी रहात असलेल्या परीट मळ्यातील प्राथमिक शाळेत असलेल्या इयत्ता चौथीच्या मुली सुवर्णा व उज्वला सर आम्हीं जून मध्ये तुमच्या शाळेत येणार असल्याचे वारंवार म्हणत असायच्या, त्यांच्या बोलण्यात विद्यालया बाबतची आत्मीयता व उत्सुकता असायची. या विद्यार्थिनी माझ्या ओळखीच्या असल्याने त्यांना मी परिवारातील सदस्य वाटत असे. पाचवीचे प्रवेश झाल्यानंतर योगायोगाने पाचवीच्या माझ्याच वर्गात त्या दाखल झाल्या. हा वर्ग आजपर्यंत देखील मला वर्गशिक्षक म्हणून मिळालेला सर्वात उत्साही, हजरजवाबी व प्रचंड ऊर्जेने ठासून भरलेला वैशिष्ट्यपूर्ण होता.
उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या जीवनातील एक अत्यंत महत्वाचा टप्पा असलेला लग्न सोहळा पार पडला होता. मी लग्न झाल्यानंतर सिन्नर येथेच रहाण्यासाठी खोली घेतली. माझी पत्नी जि. प. प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत होती. माझे मनेगाव येथील शेजारी व सहकारी श्री. उफाडे सर बदलून मातेरेवाडी ता. दिंडोरी येथे गेले. त्यांच्याबरोबरच अनेक सहकारी शिक्षक बदलून गेले. त्यांच्या जागेवर नवीन सहकारी शिक्षक आले होते. मी नैताळे येथे सेवेत असतांना ज्यांचा शोध घेत होतो ते कला शिक्षक श्री. पी. टी. जाधव बदली होऊन आले होते. श्री. एस. एम. सोनवणे, श्री. जे. पी. पवार इ. शिक्षक मनेगाव येथे बदलून आले. त्यांचा ओळख परिचय व्हायला फारसा वेळ लागला नाही. नवीन आलेले शिक्षक आपल्या कार्यातून स्वतःचा परिचय करून देत होते.
श्री. पी. टी. जाधव कलाशिक्षक म्हणून श्री. पवार सरांच्या जागेवर बदलून आले. कलाशिक्षक शब्द त्यांच्यासाठीच तयार झाला असावा अशी ही व्यक्ती होय. मनेगाव येथे रुजू होताच आपल्यातील कलागुणांना संधी मिळेल तेथे प्रकट करायला सुरुवात केली होती. सर्वप्रथम शाळेचा परिपाठ ढोल-ड्रम, तबला, पेटी (हार्मोनिअम) संगीतमय होऊ लागला होता. थोड्याच दिवसात श्री. जी.बी. मोरे सरांनी पेटीवर राष्ट्रगीत व काही प्रार्थना सरांकडून शिकून घेतल्या. जाधव सर तबला देत असायचे. शाळा भरतानाच अत्यंत प्रसन्न वातावरण निर्मिती होऊ लागली. शाळेचा एक गीतमंच असावा अशी त्यांनी कल्पना मांडली. गीतमंचसाठी विद्यार्थ्यांची निवड करतांना मनेगाव मधील सुप्त गायक आलेल्या विद्यार्थ्यांचा आम्हांला शोध लागला. गीतमंच तयार करतांना आम्हांला संगीतातील ज्ञान व कान असलेले श्री. एस. एम. सोनवणे सरांचे खूपच मार्गदर्शन लाभले.
गीतमंचात प्रामुख्याने विलास सोनवणे, विक्रम गायकवाड, संदीप गांजवे, दीपक सातपुते, मंगेश सोनवणे, किरण शिंदे, तुकाराम सोनवणे. श्रीकांत कदम, रामहरी शिंदे, मंगल सोनवणे, शुभांगी जाधव, संगीता शिंदे, सुवर्णा कर्डेल, पल्लवी पडवळ, पूनम महाजन इ. विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. गीतमंच स्थापन झाल्या पासून वेगवेळ्या प्रार्थना, समूहगीत व देशभक्तीपर गीत बसवून घ्यायला सुरुवात झाली होती.ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य दिनाचे औचित्यसाधून सिन्नर येथे राष्ट्रसेवा दलातर्फे तालुकास्तरीय समूहगीत स्पर्धा आयोजित स्र्ण्यात आल्या होत्या.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्रित तयारी करून घ्यायचे ठरविले. कदाचित गायन स्पर्धेत पहिल्यांदाच मनेगाव विद्यालयाने सहभाग घेतला होता. सिन्नर शहरातील स्वतंत्र संगीत शिक्षक असलेल्या शाळांनी भाग घेतल्याने स्पर्धा खूपच कठीण होती. यास्पर्धेत आमची शाळा कदाचित शहरातील मुले कसे गायन करतात हे बघण्याच्या हेतूने गेले होतो. पण या स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थांनी "उधळीत शत किरणा, फुलवित जन हृदया....! " हे उत्कृष्ट समूहगीत गायन करून स्पर्धेत पहिला क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. गायन स्पर्धेत कदाचित या विद्यालयास मिळालेले हे पहिलेच यश होते. विद्यालयाच्या शिरपेचात एक मनाचा तुरा रोवला होता. यासाठी श्री. पी.टी. जाधव , श्री. एस. एम. सोनवणे, श्री. जी. बी,.मोरे, श्री. एस. व्ही. कदम व श्री. जे. पी. पवार इ.च्या कठोर परिश्रमाने विद्यालयास हे यश मिळाले होते. शालेय अभ्यासाव्यतिरिक्त विद्यालयाच्या नावलौकीकात भर टाकण्यासाठी इतर ही क्षेत्र असतात, याचा परिचय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना येत होता. विद्यालयात खेळाच्या विविध स्पर्धा, गायन स्पर्धा, समाज दिनाच्या वकृत्व स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, शासकीय चित्रकला परीक्षा इ. ची जोरदार तयारी करून यश प्राप्ती कडे वाटचाल सुरु होती.
प्रासंगिक फलक लेखन करून सर्व विद्यार्थ्यांचे व गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेण्याचे कसब जाधव सरांकडे होते. दिनविशेष असेल त्या दिवशी त्या समाज सुधारक किंवा स्वातंत्र्य सेनानींचे रंगीत खडूने फलकावर काढलेली आगळीवेगळी चित्र चर्चेचा विषय ठरायची. फलक लेखन करतांना सर मला नेहमीच सोबतीला घेत असत. याचे कारण म्हणजे मी सुद्धा त्याचे फलक लेखन सुरु असतांना कोणता शब्द कस लिहिला तर आकर्षक दिसेल या संबधी सरांशी बोलत असे.
जाधव सरांना मी एकदा प्रश्न विचारला की, “मला देखील तुमच्या प्रमाणे फलक लेखन करता येईल का?” त्यावर ते विनोदाने मला म्हणायचे की, “मग, तुला रोज फलकलेखन काळजीपूर्वक निरीक्षण करायला पाहिजे.” मला ही गोष्ट जेव्हा सरांनी सांगितली तेव्हा अनेक विद्यार्थ्यांनी ऐकली होती आणि बरेच विद्यार्थी जाधव सरांनी फलक लेखन सुरु केले की, त्या ठिकाणी उपस्थित असायचे. सरांचे फलकलेखन विविधतेने नटलेले असायचे. एकदा केलेले फलकलेखन ते दुसऱ्यांदा करत नसायचे. फलक लेखनासाठी नेहमीच वेगळा विषय तयार असायचा.
फलक लेखनासाठी त्यांनी ‘चिंतन’ हे सदर सुरु केले होते. त्यात खुपच वैचारिक व परिपूर्ण विचार देणारे मार्मिक लेखन केलेले असायचे. आम्हीं सोमवार व गुरुवार फलकलेखनाचा दिवस निश्चित केला असल्याने, त्यासाठी लेखनासाठी मजकूर व वाचनासाठी गावकरी देखील तयार असायचे. काही कारणास्तव फलक लेखन करता आले नाही तर गावकरी विचारायचे की, “आज जाधाव रजेवर आहेत काय? ते आज का आले नाहीत? त्यांना बरे नाही क?” असे अनेक प्रश्न काळजीपोटी विचारत असत. गावकऱ्यांना त्यांच्या फलकलेखनाचा जणू काही लळा त्यांना लागला होता. जाधव सर म्हणायचे “मरावे परि कीर्ती रूपी उरावे”. आपल्या कामातून सर्वांना एक आदर्श निर्माण करत असायचे. आम्हीं त्यांना म्हणायचो फलक लेखन छान झाले, ते पुढे न बोलू देताच...! चला, चहा प्यायला. असा दिलदार व कलाकार शिक्षक प्रत्येक शाळेला मिळाला तर किती तरी विद्यार्थ्यांना सुसंस्कार मिळतील.
फलक लेखन करण्यासाठी थोडक्यात, पण अत्यंत समर्पक मजकूर त्यांना अपेक्षित असायचा. मला बऱ्याच वेळा ही जबाबदारी माझ्यावर सोपवायचे. मी हो म्हणायचो मला योग्य मजकूर सापडला नाही, तर मी मोरे सरांना विचारायचो, त्यांचे वाचन खूप असल्याने ते कोणत्या पुस्तकात चांगला मजकूर मिळेल खात्रीने सांगायचे. मी त्यांना विचारले की, “तुम्ही जसे लेखनासाठी सुंदर विचारांचे परिच्छेद उपलब्ध करून देतात, त्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे?.” ते म्हणाले “ अधिकाधिक पुस्तकांचे वाचन केले पाहिजे.” मी आता वाचन करायचे ठरविले होते, त्यासाठी एखादे चांगले पुस्तक सुचवा, अशी मी त्यांना विनंती केली.
मला वाचायला सुचविलेले पुस्तक होते ‘राष्ट्रसंत गाडगेमहाराज’ यांचे गो. नी. दांडेकरांनी लिहीलेले चरित्र. हे पुस्तक वाचण्यासाठी मला बराच कालावधी लागला. पण पहिलेच पुस्तक मला शिक्षक म्हणून खूप काही शिकवून गेले. हे पुस्तक वाचलेला शिक्षक विद्यार्थ्यावर अनेक सुसंस्कार करण्यास सक्षम होतो. आजपर्यंत हे पुस्तक वाचल्याने, अध्यापन करतांना मला त्याचा खुपच फायदा झालेला आहे. पुस्तके आपले कसे चांगले मित्र ठरू शकतात याचे एक उदाहरण, लोकमान्य टिळकांनी एका ठिकाणी सांगितले आहे की, ”मला चांगले पुस्तक आणि मित्र, यापैकी एकाची निवड करायला लावली, तर मी पुस्तकाचीच निवड करेल” या वरून पुस्तकाचे महत्व कळते. याचे कारण शोधले तेव्हा कळते की, “वेळ आली तर मित्र विचार बदलेल, पण पुस्तक आपले विचार कधीच बदलत नाही.” म्हणून सर्वांनी पुस्तके वाचली पाहिजेत.
प्रत्येक दिनविशेष नवीन काही तरी शिकवणार या उद्देशाने त्यांना लेखन अपेक्षित असायचे. प्रासंगिक फलक लेखनात कारगील युद्धाच्या वेळी रायफल व त्यावरील सैनिकाचे शिरस्त्राण त्यांनी केलेले रेखांकन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते. स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, लोक शाहीर आण्णा भाऊ साठे, लालबहादूर शास्त्री, महात्मा गांधी, कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर भाऊराव पाटील, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रविंद्रनाथ टागोर, स्वातंत्र्यवीर सावरकर, विविध क्रांतिकारकांचे रंगीत खडूने काढलेले फळ्यावरील प्रतिमा आज देखील नजरेसमोर उभ्या रहातात. लेख संपल्या नंतर जाधव सरांच्या फलक लेखनाचे फोटो टाकलेले आहेत.आपण सर्वांनी बघून कलेचा आनंद घ्यावा.
संस्थेचा समाजदिन, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन, महाराष्ट्रदिन या विशेष दिवशी केलेले फलकलेखन तर अवर्णनीय व अप्रितम असायचे. जाधव सरांनी केलेले फलकलेखन प्रभावी, आकर्षक, परिणामकारक, संस्कारशील, मार्मिक, बोधप्रद व आत्मचिंतन करायला भाग पाडणारे असायचे. जे आम्हां सर्वांसाठी दीर्घकालीन सुसंस्कार करणारे होते. सरांच्या सोबत फलकलेखनाचे अनुभव मला भावी जीवनात उपयोगी पडतील. मला अध्यापक विद्यालयात प्रत्येक वर्णाचे लेखन करण्याची पद्धती, सुवाच्य लेखन, कलेची जोपासना,त्यागाची भावना, कठीण परिश्रम इ. बाबी प्रामाणिकपणे करण्याचा मी प्रयत्न करत आहे. नव्याने छात्रशिक्षक म्हणून आलेल्या भावी शिक्षकांना फलकलेखनाची योग्य दृष्टी देण्याचा प्रयत्न मी करत असतो.
श्री. पी. टी. जाधव सरांना सिन्नर येथील नामाकित संस्थेचा शिक्षकदिनाच्या दिवशी “आदर्श शिक्षक पुरस्कार” कोणताही अर्ज न करता देण्याचे निश्चित झाले होते. एक दिवस अगोदर कार्यक्रमाच्या उपस्थितीसाठी त्यांना तसे कळविण्यात आले होते, तेव्हा त्यांनी विनम्रपणे उत्तर दिले “आपण माझी पुरस्कारासाठी निवड केली त्या बद्दल धन्यवाद....!, मला सर्व पुरस्कार माझ्या विद्यार्थ्यांकडून मिळाले आहेत. त्यामुळे मला कोणताही पुरस्कार नको, मी हा पुरस्कार घेण्यासाठी येणार नाही. ऐनवेळी तुमची अडचण नको.” मिळालेला पुरस्कार नाकारणारे आजच्या काळातील खरे सर्वांचे आदर्श शिक्षक पी.टी.जाधव दुर्मिळच......!🌹🙏
प्रवास माझा✒️🌹
शब्दांकन✒️
श्री. संजय. कदम
ज्युनि. कॉलेज ऑफ एज्युकेशन, mvpd
Comments
Post a Comment