आमचे भीष्माचार्य...!

आठवणीतील मनेगाव ....!  

भाग- ५    आमचे सर्वांचे भीष्माचार्य ...!
                                  शब्दांकन- संजय कदम

             श्री. जे. बी. पगार सरांचे बालपण खूपच संघर्षमय होते.  बालपणीच पितृछत्र हरपले होते. प्राथमिक शिक्षण गावातच जि.प. प्राथमिक शाळा, पांगरी ता. सिन्नर येथे पूर्ण झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणाची सोय गावात उपलब्ध नसल्याने वावी येथील माध्यमिक विद्यालयात खूपच संघर्ष करून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षणाची सोय जवळपास उपलब्ध  नसल्याने, कोपरगाव येथे बी. एस्सी. चे शिक्षण पूर्ण केले.येथेच त्यांना सोमवंशी आण्णा सारखा जिवलग मित्र भेटला दुर्दैवाने आम्हांला त्यांचा अपेक्षित दीर्घ सहवास लाभला नाही. पुढे बी.एड. पूर्ण करून नोकरीची सुरुवात मविप्र संस्थेतील सेवा कोठूरे येथून सूरु झाली
पुढील वर्षी सोनांबे येथे बदली झाली. तसे बघितले तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी खुपच अडथळे पार पाडले.  
               श्री. जे. बी. पगार सर कौटुंबिक जबाबदाऱ्यानां  वाहून घेतलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याबाबतीत मला नेहमी एक गोष्ट नमूद करावी वाटते.  “साधी  रहाणी, उच्च विचार” हे सूत्र त्यांना १००% लागू होईल, असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. तात्यांचे राहणीमान अत्यंत साधारण पण विचार मात्र नेहमीच उच्च असायचे, आपल्या बरोबरच आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांचा हा उत्कर्ष करण्यासाठी धडपड करणारे तात्या नेहमीच सर्वांसाठी एक आदर्श घालून देणारे आहेत. परिस्थितही साधारण असतांना सुद्धा मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केले नाही. दोन्ही मुलं व मुलगी उच्च शिक्षित असून सर्व आपले नोकरी व कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्यास सक्षम आहेत. 
             सरांचा मोठा मुलगा नितीन हा सौदी अरेबिया येथील कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. त्याच्याकडे देखील काही दिवस जाऊन विदेशवारी देखील त्यांनी पूर्ण केली आहे. तसेच लहान मुलगा निलेश व सूनबाई दोघे पुणे येथे चांगल्या पदावर कार्यरत आहेत. कन्या सौ. योगिता बी. फार्म. झालेली असून, जावई पुण्यातच चांगल्या कंपनीत कार्यरत आहेत. लहान मुलगा व कन्या पुणे येथे नोकरीनिमित्त स्थायिक झाले आहेत. कौटुंबिक जबाबदाऱ्या सशस्वीरीत्या पुर्ण करून सेवानिवृत्त होऊन सिन्नर येथे आपल्या मित्रांसोबत स्वछंदी  जीवनाचा आनंद घेत आहेत. श्री.पगार तात्यांचे सौ.ताराबाई (काकूशी) लग्न झाल्यापासून अर्धांगीने तितकीच तोलामोलाची साथ दिल्यानेच जगन्नाथाचा रथ यशस्वी जीवनाची वाटचाल करीत आहे. या रथाची वाटचाल पुढे ही  सुरूच राहील यात शंका नाही. आमच्या काकू खूपच हळव्या मनाच्या आणि तात्या कडक स्वभावाचे तरी देखील सौ. काकूंनी आपले सर्व नातेवाईक व तात्यांचे मित्रमंडळीत खूपच मानाचे व आदराचे स्थान प्राप्त केले आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात कुणाकडेच वेळ नाही, तरी सिन्नर येथे उपचारासाठी दवाखान्यात ऍडमिट नातेवाइकांचा डबा पोहचविण्याचा काकूंनी कधीच कंटाळा केला नाही, ही गोष्ट खूपच अभिमास्पद आहे.
            सोनांबे येथून बदली होऊन आल्यावर एक अनुभवी शिक्षकाची भूमिका मनेगाव येथे बदलून आल्यावर पार पाडली.  मनेगाव विद्यालयात नोकरी करत असतांना आम्हांला मोठा मित्र परिवार मिळाला होता. आमच्या मित्र परिवारातील सर्वांना एकत्रित ठेवण्याची जबादारी कुणाली तरी घ्यावी लागणार होती, ती जबाबदारी आमच्यातील सर्व दृष्टीने ज्यांना भीष्माचार्य पदवी शोभेल असे आमचे मित्र व जेष्ठ मार्गदर्शक असल्याने श्री. जे. बी. पगार सरांकडे आपोआप आली होती.  मित्र परिवारामध्ये कुटुंब प्रमुखाची भूमिकेत नेहमीच ते असायचे.  सरांबद्दल बोलायचे ठरले तर त्यांची आदरयुक्त भीती आम्हांला वाटत असायची. एखादी गोष्ट करायची ठरली, तर आम्हीं सर्व प्रथम श्री. मोरे सरां समोर मांडत असू, त्या नंतर श्री. पगार सरांकडे मांडण्याचे काम आम्हीं श्री. मोरे सरांवर सोपवायचो. यावरून त्यांचे आमच्या मित्रमंडळातील स्थान लक्षात येते. आमच्या मित्र परिवारातील कुणा कडे  छोटे-मोठे कार्यक्रम असतील, तर त्याचे काय नियोजन केले आहे? त्यात काही बदल करणे गरजेचे असतील, तर त्यांनी वडीलकीच्या नात्याने सांगण्याचा कधीही संकोच केला नाही.  तात्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्ये म्हणजे स्पष्ट वक्तेपणा होय. सहानुभूती मिळविण्यासाठी त्यांनी कधीही तत्वांशी तडजोड केली नाही. कोणताही निर्णय कौटुंबिक असो वा मित्रपरीवारातील असो ते स्पष्टपणे सांगत असत.
         तात्यांचा खुपच मोठा आधार होता...(अजूनही आहे)..कुठल्याही परिस्थितीत.. प्रसंगात.. तात्यांचा सल्ला खुपच मोलाचा असतो....तात्यांचा एक गमतीशीर डायलॉग असायचा...तो असा की....." एखाद्याशी भांडण झालं किंवा काही वाद झाला नुकसान केले, तर आपण त्याच्याशी भांडण नाही करायचे...त्याला घर बांधायला लावायचे '.....!
             श्री. मोरे सर निमोण ता. चांदवड येथून बदलून आले, तेव्हा बरेच दिवस ते अस्वस्थ होते. सुरुवातीचे काही दिवस त्यांचे कुटुंब निमोण येथेच होते. त्यांनी बद्लीसाठीचे प्रयत्न करून बघितले होते पण पुन्हा बदलीची शक्यता कमीच होती. अशा वेळी विद्यालयात त्यांचे  विषय सारखे असल्याने, पगार सरांशी ओळख परिचय वाढतच गेला.  मोरे सरांना तेव्हा सिन्नर येथे खोली बघून देण्यापासून तर त्यांचे शाळेत येण्याजाण्याची सोय पगार सरांनी करून दिली होती. नंतर दोघाची मैत्री तर सर्वांना परिचित आहेच. श्री. पगार सरांबरोबर श्री.मोरे सर हे जवळपास सूत्रच झाले होते. श्री. मोरे सरांना सिन्नर येथे जागा घेऊन घर बांधण्यास संपूर्ण मार्गदर्शन पगार सरांनी केले. आज मोरे सर सिन्नर येथे स्थायिक होण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. आज देखील सेवानिवृत्ती नंतर त्यांची मैत्री पहिल्या सारखीच टिकून आहे.
                  श्री. पगार सर नोकरीला लागल्यापासून दहावीच्या वर्गाला विज्ञान व गणित विषयाचे अध्यापन करायचे, त्यांनी आपल्या विषयाचा चांगला निकाल लागण्याच्या दृष्टीने नेहमीच प्रयत्न केले. आपला वर्ग आणि आपल्या विषयाची परिपूर्ण तयारी करून अध्यापन करण्यात ते धन्यता मानत. स्वत:च्या कामाबाबत खुपच दक्ष असलेले हे व्यक्तिमत्व म्हणता येईल. आपण शिकवीत असलेल्या विषयावर त्याचे चांगलेच प्रभुत्व असायचे. विद्यार्थासमोर जाण्यापूर्वी आवश्यक तयारी करून वर्गावर जाणे हे त्यांचे वैशिष्ट्ये होते. शिकवलेल्या भागावर विद्यार्थ्यांना तासाच्या शेवटी विचारणे की तुम्हाला शिकविलेला भाग समजला का? मला वाटते हा परिपूर्ण शिक्षकाचा गुण त्यांच्यात होता, त्यांच्या या गुणामुळे त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आपले स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. विद्यार्थ्यामध्ये त्यांच्या बद्दल नेहमीच भीतीयुक्त आदर असायचा. अजून एक गोष्ट त्यांची खुपच महत्वाची होती,  त्यांनी दुसऱ्याच्या कामात कधीच हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे ते स्वतःचे वेगळेपण निर्माण करण्यात यशस्वी झाले.
               सार्वजनिक हिताच्या कामामध्ये सहभाग घेऊन आपले योगदान देण्यात खुपच आघाडीवर असायचे. मी, जे.पी. पवार व स्व. श्रावण जगताप एकाच वेळी मनेगाव येथून बदलून गेलो होतो. जगताप मामांची गैरसोयीने प्रमोशनवर नांदगाव येथे बदली झाली होती. त्यांची  बदली झाल्यानंतर थोड्याच दिवसात जगताप मामा यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना नाशिक येथील मेंदुरोग तज्ञ डॉ. हितेन गडकरी यांच्या कॅनडा कॉर्नर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. जगताप मामाची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. दवाखान्यात दाखल केल्यापासून बिलाचे मीटर सुरु झाले होते. दर दोन दिवसांनी  दवाखान्यातून पैसे भरायला  सांगितले जायचे.  दवाखान्याचे बिल भरण्यासाठी पैसे उपलब्ध करून, जगताप मामांना बरे  करण्यासाठी सर्वांनीच केलेली धावपळ अवर्णनीय अशीच होती. दवाखान्याचे बिल दिवसेदिवस वाढत चालले होते. अशा वेळेस आम्हीं सर्वांनी आमचे विविध ठिकाणी नोकरी करणारे मित्र असलेलेच्या शाळेत निरोप पाठवून मदत मिळविण्याचा केलेला प्रयत्न, तर आम्हीं कधीच विसरू शकत नाही. 
             मनेगावच्या विद्यालयातून विद्यार्थ्यांना देखील संपुर्ण स्टाफच्या वतीने मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यास जबाबदारीने सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देऊन "एकतेचे बळ कशास म्हणतात?" याचा आदर्श घालून देत मोठी आर्थिक मदत जमा केली होती.  प्रत्येक विद्यालयातील स्टाफच्या वतीने कुणालाही सक्ती न करता, मोठ्याप्रमाणात रोख रक्कम जमा करण्यात यश देखील आले होते. जगताप मामा बरे व्हावेत, त्यासाठी कितीही पैसे लागले?  तरी चालतील पण ते वाचले पाहिजेत, अशीच आमची सर्वांची इच्छा होती. मात्र काही गोष्टी आपल्या हातात नसतातच, त्यांच्या तब्बेतीत सुधारणा दिसत नसतांना आम्हीं सर्व मित्र डॉक्टरांना भेटलो.श्री. पगार सरांनी डॉक्टरांशी दुखाच्या प्रसंगी सुद्धा अत्यंत संयमाने डॉक्टरांना विचारले की,” नक्की आजाराचे स्वरूप काय आहे? ते सांगा पेशंटची आर्थिक परिस्थिती नाजूक असून, तुम्ही आम्हांला स्पष्ट सांगा की यातून पेशंट बरे होईल का ?  डॉक्टरांचा नाईलाज झाला त्यांनी पेशंट व्हेंटिलेटरवर असल्याचे सांगितले. जोपर्यंत व्हेंटिलेटर सुरु आहे तो पर्यंत कृत्रिम श्वाशोस्वास सुरु राहील. सर्व परिस्थिती समजून घेतली.
            सरांनी त्यांच्या ओळखीच्या तज्ञ डॉक्टरांचा सर्व रिपोर्ट दाखवून सल्ला घेतला.  आता बिल भरण्यात काहीही अर्थ नव्हता याची खात्री केली. कटू असला तरी योग्य निर्णय घेण्याची त्यांची क्षमता वाखाणण्याजोगीच होती. शेवटी डॉक्टरांनी सांगितले की आता आमचे सर्व प्रयत्न संपले आहे. तर त्यावेळी जगताप मामांच्या मोठे भाऊ श्री. तुकाराम जगताप यांच्याशी बोलून योग्य तो निर्णय घेतला. पुढील सर्व विधी पार पडे पर्यंत स्वतः जगताप मामांच्या कुटुंबाला आधार देण्याचे काम करत राहिले.  त्यांना पुढील सुविचार तंतोतंत खरा ठरतो. “संकटकाळी मदतीला धावतो तोच खरा मित्र”....!
        श्री. पगार सरांना श्री. जोंधळे सर, श्री. मनियार सर, श्री. के. आर. पंडित, श्री. आर. के. दिघे, श्री.जे. के. गवळी, श्री. जी. एच. पाटील, इ.मुख्याध्यापक म्हणून लाभले. सरांची जास्तीत जास्त सेवा सोनांबे व मनेगाव येथेच झाली. डुबेरे येथे पर्यवेक्षक म्हणून तर पुन्हा मनेगाव येथे मुख्याध्यापक म्हणून सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांच्यातील कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक  संस्थेने ओळखला शेवटचे दोन वर्षे त्यांनी लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली. याच ठिकाणी ते सेवानिवृत्त झाले.
            मनेगाव येथे सेवेत असतांना मोरेसर, सोमवंशी आण्णा , जाधवसर, अनिलजी कुंदे, मी आमचे एक छोटेसे मित्रमंडळ तयार झाले. आजपर्यंत आम्ही परिवारासह एकत्रित येऊन एकमेकाच्या सुख- दुःखात सहभागी होतो.  मनेगाव येथील डॉ. शिवाजी कराड, डॉ.योगेश सोनवणे, इंजीनिअर सचीन पोटे, इंजीनिअर संदीप सोनवणे व उद्धव मुरकुटे, योगेश कर्डक,फिपक सोनवणे, वकिल झालेले चेतन सोनवणे व मोरेश्वर सोनवणे, सी.ए.झालेले भारत सोनवणे व जितेंद्र शालिग्राम, निलेश व  रवींद्र सोनवणे, संतोष व विकास वैष्णव, रामहरी शिंदे,शरद सोनवणे, सौ. प्रमिला व योगिता शिंदे, कविता सोनवणे, संगीता शिंदे, पल्लवी पडवळ, सुवर्णा कर्डेल, इत्यादी विद्यार्थी मित्रांसोबतच ज्यांचे नाव या ठिकाणी नमूद करू शकलो नाही असे असंख्य विद्यार्थी त्यांनी घडविले आहेत.
 विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात यशस्वीरीत्या काम करत आहेत. त्याचे श्रेय आदरणीय पगार सरांना द्यावेच लागेल...!

शब्दांकन,✒️
श्री. संजय कदम
ज्युनि. कॉलेज ऑफ एज्यु. Mvpnd

Comments

Popular posts from this blog

वाजे विद्यलाय-१

महाविद्यालयीन जीवनातील मित्र...!

नांदगाव भाग-5