आठवणीतील मनेगाव....!

✒️आठवणीतील मनेगाव ......! ✒️🌹
भाग-2    ✒️

                
                  दीपावलीच्या सुट्टीनंतर विद्यालय सुरु होताच पहिल्या दिवसापासून जवळपास सर्वच विद्यार्थी उपस्थित होते. सर्वच शिक्षक आपापल्या विषयाचे पेपर संबधित विद्यार्थांना दाखवून गुणांची नोंद यादीत करत होते. मला आलेला अनुभव थोडा वेगळाच होता. विद्यार्थांना पेपर दिले असता मिळालेला प्रत्येक गुण बरोबर आहे का? याची खात्री करून घेतांना, गुण कमी दिले तर त्याचे कारण विद्यार्थांनी जाणून घेतले. शिक्षक म्हणून मला परीक्षेतील गुण बघण्यासाठी पहिल्या दिवसापासुन हजर राहणारे विद्यार्थी मनेगावला दिसली. 
                 विद्यालयात नवीन वेळापत्रक सर्व वर्गांना व शिक्षकांना दिल्यानंतर त्याची कार्यवाही झाली. मला पाचवी ‘ब’ चा वर्गशिक्षक करण्यात आले. ही गोष्ट कळताच मी खूप नाराज झालो. मला शिकविण्यासाठी इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग, त्याचप्रमाणे वर्गशिक्षक म्हणून वरचा वर्ग मिळेल असे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने माझी नाराजी मी काही शिक्षकांना बोलून दाखविली. माझे उच्च शिक्षण झालेले असून मला शिकविण्यासाठी मोठा वर्ग मिळावा अशी माझी समजूत होती. शेवटी मुख्याध्यापकांना भेटून मी माझी अडचण सांगितली. सरांनी माझे म्हणणे ऐकुण घेत शांततेने मला समजावले की, “आता वेळापत्रकात बदल शक्य नाही. पुढे वेळापत्रक बदलेल तेव्हा मी बदल करून देईल.” 
                मला मिळालेल्या वर्गावर मी वर्गशिक्षक म्हणून काम सुरु केले. यावर्गाचे सामाजिकशास्त्र माझ्याकडे दिलेले होते. छोट्या वर्गात अध्यापनाचा आनंद मला मिळू लागला. तेव्हापासून आपल्याला मिळालेल्या कामात आनंद शोधण्याचे माझे काम सुरु झाले ते आज पर्यंत सुरु आहे आणि पुढे ही सुरूच राहील. आजही मला त्यावर्गातील अनिल सोनवणे, कांताराम गायकवाड, संगीता शिंदे इ. विद्यार्थी आठवतात.  
                    चंपाषष्ठीचा दिवस जवळ आला तशी मनेगाव यात्रेची उत्सुकता विद्यार्थ्यासोबत आम्हांला लागलेली होती. सिन्नर तालुक्यातील पहिली यात्रा मनेगाव येथे भरते.  येथूनच तालुक्यातील यात्रांची सुरुवात होत असते. त्यामुळे ही यात्रा आगळी-वेगळी मानली जाते. यात्रेच्या तयारीसाठी गावकरी एक कमिटी स्थापन करून यात्रेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवितात. कमिटी यात्रेच्या वेळी पूजेचा मानकरी ठरवितात. यात्रेची तयारी मंदिरातील मूर्तीची स्वच्छता व रंगरंगोटी बरोबरच मंदिरास रंग देण्याचे काम करतात. संपूर्ण गावातील स्वच्छता, माध्यमिक शाळेचा परिसर स्वच्छता  केली जाते. या काळात गावातील नोकरी निमित्ताने बाहेरगावी असलेले सर्व नोकरदार, व्यासायिक आपल्या गावी आपल्या कुटुंबासह परतलेले असतात. 
                   संपूर्ण  गावात नवचैतन्य संचारलेले असते. यात्रेच्या दिवशी नायगाव येथून गंगेचं आणलेले  गंगाजल प्रत्येक घरातून एक कावडी याप्रमाणे सकाळी गावातून मिरविले जाते . सायंकाळी श्री खंडोबा महाराज पालखी मिरवणूकीची सांगता होते. वांग्याचे भरीत व भाकरीचा नैवेद्य देवास दिला जातो.  दिवस मावळतांना धारणगाव येथील भगत बारागाड्या ओढण्याचे काम पार पडतात. हा नेत्रदीपक कार्यक्रम बघण्यासाठी सर्वांचीचीच धावपळ सुरू असते. भक्तांचे श्री खंडोबा महाराज दर्शन उशिरा पर्यंत सुरु असते. 
                 यात्रा परिसर विविध दुकानांनी सजलेला असतो. खेळण्यांचे दुकाने, लहान-मोठे पाळणे, वेगवेगळ्या खाण्याच्या पदार्थांचे दुकाने, मनोरंजक खेळांचे दुकाने, लोककला(तमाशा) मंडळ इ. यात्रेचा खरा आनंद बालगोपाळ घेतात. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी चार वाजता कुस्ती प्रेमींसाठी कुस्त्यांचे आयोजन केले जाते. 
              आम्ही देखील यात्रेत पोहचल्यावर आमचे विद्यार्थी बाळू व चंदू वाकचौरे यांच्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या पदार्थांवर ताव मारून यात्रेचा आनंद घेत असतो. सर्वांसाठी यात्रेचा प्रसाद आम्हीं न विसरता घरी घेऊन येतो. गावातील बहुसंख्य कलाप्रेमी तमाशा मंडळाचा कार्यक्रमास हजेरी लावतात. श्री.उफाडे सरांसमवेत मी यात्रेतील लोककला (तमाशा) मंडळाचा कार्यक्रम बघितला.  यात्रेच्या निमित्ताने अनेकांना रोजगार मिळतो, त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो.
                   यात्रेच्या निमित्ताने बाहेरगावी असलेले गावातील सर्व मित्र आपल्याला भेटतील याची शोधाशोध सुरु असते. काही मित्र भेटल्याने आनंदी होतात तर कुणी आपला मित्र न भेटल्याने निराश होतात. प्रत्येक घरात नारळाचा व यात्रेचा खाऊ वडीलधारी मंडळी घेऊन जातात. सर्व कुटुंबा समवेत यात्रेतील खाऊचा आनंदाने स्वाद घेत असतात.  दुसऱ्या दिवशी गावातील विद्यालात नोकरी करणारे शिक्षक यात्रेचा प्रसाद शिक्षकांना यात्रेतील पदार्थांचा नाश्ता देण्याची असलेली पद्धत मला खुपच भावली. गावातील यात्रेच्या सांगतेनेच पाणी टंचाई उग्र रूप धारण करायला सुरुवात करते. 
                    मनेगाव विद्यालयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास नवी सायकल बक्षीस देणारे गावातील दानशूर सरपंच श्री. बजुनाथ भागुजी सोनवणे यांनी संगमनेर येथे ऊसाची रसवंती सुरु करून उन्हाळ्यात लोकांची ऊसाच्या ताज्या रसाने तहान भागविण्याचे काम सुरु केले. याबरोबरच त्यांनी महाराष्ट्रातील अनेक शहरातील बसस्थानक व विविध महत्वाच्या ठिकाणी मनेगावच्या युवकांना रसवंतीगृह सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले. वेळप्रसंगी रसवंतीसाठीचे यंत्र घेण्यासाठी मनेगावच्या अनेक युवकांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली. अनेक बेरोजगारांना रोजगार तर मिळाला पण रसवंतीगृहासाठी मनेगावची वेगळी ओळख निर्माण करून दिली. आमचे मित्र श्री. मोरे जी. बी. सरांबरोबर मी कदाचित मोटर सायकलवर सर्वात जास्त प्रवास केला. त्यांच्यासोबत अनेक शहरात आम्ही मनेगावकरांच्या रसवंतीगृहावर ऊसाच्या ताज्या रसाचा रसास्वाद घेतला. बहुसंख्य रसवंतीचे चालक मोरेसरांचे विद्यार्थी होते हे विशेष. एका रसवंती मालकास आम्ही विचारले, ”तुम्ही  रसवंतीगृह चालविण्याचे काम का करता?” त्यावेळी त्यांनी आम्हांला उत्तर दिले की,” जेव्हा आमच्या गावी पाणी टंचाई असते, तेव्हा रसवंतीगृह चालवून आम्हीं दोन पैसे मिळवतो आणि पाऊस होताच शेतीची कामे सुरु झाल्यावर आम्हीं शेती करण्यासाठी गावी परत जातो.” यावरून एकच गोष्ट मला जाणवली ती म्हणजे पाणी टंचाईवरील उपाय व कुटुंबातील मुलांवर स्वावलंबनाचे, कष्टाचे, परिश्रमाचे व प्रामाणिकपणाचे संस्कार होतात. मला वाटते त्यामुळेच प्रत्येक क्षेत्रात मानेगावकर आपला ठसा उमठवितात....!

भाग- 2 (6520)
 पुढील भाग क्रमशः...

माझा प्रवास✒️
श्री. संजय कदम
ज्युनि.कॉलेज ऑफ एज्यु., mvpn

Comments

Popular posts from this blog

वाजे विद्यलाय-१

महाविद्यालयीन जीवनातील मित्र...!

नांदगाव भाग-5