शिक्षणातील अडथळे आणि मी......!
🌹शिक्षणातील अडथळे आणि मी....!✒️🌹
✒️शब्दांकन ✒️ श्री. संजय कदम
चांदवड येथील विद्यालयातून मार्च १९८३ मध्ये मी एस.एस.सी. परीक्षा पास झालो. पुढील शिक्षणासाठी सर्वांनाच अपेक्षित असलेले गुण मला मिळविता आले नव्हते. त्यामुळे इतरांचे दोन शब्द ऐकून घेण्याचे नशिबात लिहिलेले होतेच. “ज्याचे जैसे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर.” या प्रमाणे गुण कमी मिळणाऱ्या विद्यार्थ्याची होणारी उपेक्षा मला देखील अनुभवास मिळाली. सर्वप्रथम मी परीक्षेत पास झाल्याचा सर्वांना आनंद होईल हा माझा भ्रम बऱ्या पैकी लवकरच दूर झाला. पास झाल्याने माझे सर्व प्रश्न सुटतील असे मला वाटत होते. मात्र तसे काहीच घडले नाही, तर अनेक प्रश्न माझ्या पास होण्याने उपस्थित झाले होते. कॉलेजला पाठवून शिक्षण घेण्याचे विचार कुणाच्याही मनात आले नाहीत, असे विचार येण्याचे काही कारण नव्हतेच. मला तर दहावी नंतर आय. टी. आय. किंवा अकरावी हे दोन पर्याय माहित होते. पण गुण कमी मिळाल्याने कुणाला काही विचारणे गुन्हा केल्याच्या बरोबर होते.
नाशिक शासकीय आय. टी. आय. अभ्यासक्रमाचे मेरीट अधिक असल्याने तेथे नंबर लागला नाही. शेवटी संजय पवार, दिलीप पवार, रामदास शेजवळ, राजेंद्र कदम व मी नाशिक येथील श्री. गुलाटी यांच्या खाजगी प्रशिक्षण संस्थेत इलेक्ट्रिक वायरमनचा कोर्स करून एखाद्या कंपनीत काम मिळेल या हेतूने या सहा महिन्यांच्या कोर्सला प्रवेश घेतला. जुलै १९८३ ते डिसेंबर १९८३ या कालावधीत आमच्या गावातील आम्ही पाच मित्रांनी सोबतच हा कोर्स पूर्ण केला. या कालावधीत मी माझे दाजी श्री. शिवाजीराव रायते यांच्याकडे राहात होतो. पुढे जानेवारी महिन्यापासून अंबड व सातपूर परिसरातील कंपनीत नोकरीच्या शोधात माझा भाऊ राजू आणि मी फिरत असायचो. प्रत्येक ठिकाणी आमच्या शरीरयष्टीकडे बघून दहावीची परीक्षा पास झाल्यावर काम शोधण्यासाठी या असे उपदेश आम्हाला ऐकायला मिळत होते. कंपनीत शिक्षणा ऐवजी तब्बेतीकडे बघून नोकरी मिळते ही नवीन गोष्ट आम्हांला माहित झाली होती. आम्ही दोघे ही वयाच्या पंधराव्या वर्षीच दहावीची परीक्षा पास झालेलो होतो. त्यामुळे नाशिकच्या दोन्ही औद्योगिक वसाहतीत आम्हाला काम मिळाले नाही. इलेक्ट्रिक वायरमनचा कोर्स करून नोकरी मिळविण्याचे आमचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. कोर्स पूर्ण करून जवळपास सहा महिने कामाच्या शोधात फिरून काम मिळाले नाही. त्यामुळे शेवटी नाइलाजास्तव आम्ही आमच्या गावाकडे निघून आलो.
आम्ही आमच्या गावी गेल्यानंतर शेती कामात मदत करू लागलो होतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत सटाण्याचे बाबा कै.त्र्यंबक शिवराम अहिरे (राजुचे आजोबा) आलेले होते. आजोबांची खरी ओळख सटाण्याचे बाबा अशीच होती. बाबांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनाच आपलेसे करणारे शांत व्यक्तिमत्व होते. अत्यंत परोपकारी गृहस्थ अशी त्यांची ओळख होती. मी त्यांना कधीही कुणावर रागवताना बघितले नव्हते. त्यांनी आमची नाशिक येथील शिक्षण व नोकरी विषयी चौकशी केली. मात्र नोकरीसाठी फिरतानाचे अनुभव ऐकून त्यांनी आम्हांला शिक्षण पुढे सुरु ठेवण्याचा सल्ला दिला. बाबा जिल्हा परिषद, नाशिकचे कर्मचारी म्हणून सेवेत असल्याने शिक्षणाचे महत्व जाणून होते. त्यांनी आम्हाला नोकरीतील जीवनात शिक्षण महत्वाचे सविस्तर सांगितले. राजू जून 1984 मध्ये सटाणा येथे अकरावीला प्रवेश घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मला, येत्या शैक्षणिक वर्षात काय करणार?’ याबाबत चौकशी केली. त्यातून त्यांना कोणतेही अपेक्षित उत्तर मिळाले नसावे, मला देखील अकरावीसाठी सटाणा येथे शिक्षणाचा आग्रह धरला. मी आई-वडिलांकडे बोट दाखवून माझी सुटका करून घेतली. माझ्या आई-वडिलांशी चर्चा करून मी देखील राजू बरोबर सटाणा येथे कॉलेजला प्रवेश घेऊन शिक्षण सुरु ठेवावे असा आग्रह धरला. वास्तविक आमचे कुटुंब विभक्त झालेले होते. माझ्या शिक्षणासाठी बाबांनी आग्रह करण्याचे कारण नव्हते. पण बाबांनी आपल्या नातवाच्या सोबतच माझे देखील शिक्षण व्हावे ही दाखविलेली तळमळ माझ्यासाठी देवदूतच ठरले. अत्यंत विशाल दृष्टिकोन असलेले बाबा सटाण्याच्या आरोग्य केंद्रात सेवेत असतांना त्यांनी इतरांना केलेली मदत थक्क करणारीच होती. दवाखाण्यात येतांना अनेक रुग्णांकडे केस पेपरचे पैसे नसायचे त्यांनी कुणालाही परत न पाठविता ते स्वतः पैसे भरून देत असत. रुग्णांसाठी बाबा आरोग्यदूत म्हणून कार्यरत होते. एकदा आम्ही काही कारणास्तव दवाखान्यात गेलो तेथे बाबांना विचारणारे रुग्ण होते. आम्ही त्यांचे काही काम असेल म्हणून विचारले तेव्हा समजले की त्यांच्याकडे पैसे नाहीत आणि बाबा असल्यावर त्यांना पैसे लागत नाहीत. तसे काहीही नव्हते पैसे नसलेल्या रुग्णांचे पैसे ते भरून देत. मात्र ह्या गोष्टीची कोठेही वाच्यता त्यांनी केली नाही.
आम्हांला परोपकार, कठोर परिश्रम व प्रामाणिकपणाचे संस्कार बाबांकडूनच मिळाले. आजोबा मला शिक्षणासाठी सटाणा येथे घेऊन गेले. राजूचा व माझा अकरावी आर्ट्सला प्रवेश घेऊन दिला. आजोबा पेन्शनर असल्याने त्यांना आर्थिक हातभार लागावा यासाठी कॉलेज करत असतांना आम्ही रहात असलेल्या अहिल्याबाई चौक, येथून जवळच असलेल्या टोमाटो मार्केट मध्ये राजू आणि मी दुपारी कॉलेज सुटल्यानंतर काम करायचो. हे काम करतांना आम्ही दोघे ही ग्रामीण भागातील असल्याने कोणतीही अडचण आम्हाला आली नाही. काम कमी-जास्त असले तरी आमची कोणतीही तक्रार नसायची. कॉलेजच्या वर्ग अध्यापनातून आमच्या जबाबदारी विषयी अनेक उदाहरणातून आम्हाला स्वावलंबनाचे धडे मिळत होते. आम्ही काम करून शिकत असतानांच आजोबा- आजी अभ्यासासाठी प्रोत्साहन देत असायचे. आमचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार याची काळजी घेत असत. जर तुम्ही चांगले गुण मिळविले नाही तर इतरांचा गैरसमज होईल आणि आजोबांनी मुलांना शिक्षणासाठी बोलावून कामास पाठविले असा अर्थ निघेल. पण आजी-आजोबांचे सततचे प्रोत्साहन व मार्गदर्शन आम्हाला प्रेरणा देत असायचे.
सटाणा येथे त्यावेळी माझ्यासह लहान-मोठे सहा भावंड शिक्षणासाठी आजी-बाबांकडे होतो. आजी आमच्या सर्वांच्या जेवणाची खूप काळजी घेत असे. आजीचा स्वभाव कडक होता. त्यामुळे सर्वांनाच शिस्तीत वागावे लागत असे, कुणी चुकले तर शिक्षा करण्यासाठी आजी मागे पुढे बघत नसे. आजींनी सर्वाना कामाचे समान वाटप करून दिलेले असायचे. आम्हांला सर्वांना प्रत्येक गोष्ट वेळेवर करण्याची सवय आजीमुळे लागली होती. त्यामुळे प्रत्येकाला शाळा - कॉलेजला वेळेपूर्वी पोहचण्याची सवयी लागल्या होत्या. आजी-बाबांनी आमची सर्वांची घेतलेली काळजी व केलेले संस्कार आम्हाला पुढील जीवनात खूप उपयोगी ठरले. आम्ही काम करून शिकण्याचा आमचा उपक्रम सुरूच ठेवला. व्यक्ती जेव्हा निष्ठेने एखादे काम करते तेव्हा वेळ देखील गतिमान झालेली असते. मला आज पर्यंत सर्वात कमी वेळेत संपलेले वर्ष म्हणून अकरावीचे शिक्षण घेत असलेले वर्ष नेहमीच स्मरणात राहील. आमचे कॉलेजच्या वेळेनंतर दुपारी थोडेफार काम करतानाच वर्ष केव्हा पूर्ण झाले समजलेच नाही. आम्ही अकरावीत चांगल्या गुणांनी पास होऊन आजोबांचा आमच्यावरील विश्वास सार्थ ठरविला होता.
अकरावी पास झाल्यानंतर मला शिक्षण सोडून नोकरीच्या शोधात पाठविण्यास सटाण्याच्या बाबांचा विरोध होताच. मात्र बारावीचे शिक्षण माझ्या नशिबात त्यावर्षी नासावेच. कारण शिक्षण घेऊनही नोकऱ्या मिळत नाहीत हा विचार पुढे आल्याने शिक्षणा ऐवजी काही तरी कामधंदा किंवा नोकरी करावी असे वडीलधारी मंडळीला वाटल्याने शिक्षण थांबवावे लागले. सुरत येथे मामांच्या गावातील अनेक लोक कामासाठी जाऊन त्यांनी तेथे चांगलेच नाव कमावून स्थिरावले होते. याबाबत माझ्या आजोबांना सर्व माहिती होतीच. माझ्या आजोबांनी आई-वडिलांशी चर्चा करून मला माझ्या लहान मामा सोबत सुरत येथे पाठविण्याचा निर्णय घेतला. आमच्या घरातून घेतलेला निर्णय आपल्या कुटुंबाच्या हितासाठी असल्याने आम्ही सुरत येथे जाण्यास तयार झालो. माझे लहान मामा सोबत असणार होते त्यामुळे मला इतक्या दूर अंतरावर जाण्यास कोणतीही अडचण वाटली नाही. माझे लहान मामा (जिभाऊ) माझ्या पेक्षा तीन वर्षांनी मोठे असतील. त्यांच्या सोबत सुरत येथे माझ्या मोठ्या मामींचे भाऊ(शिवाजी) यांच्या कडे गेलो होतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या कामाची व राहण्याची व्यवस्था झाली होती. आम्ही सुरत येथील बहुसंख्य महाराष्ट्रीयन लोकांची वस्ती असलेल्या 'भेस्तान' येथे एक खोली घेऊन येथून दोन-तीन कि.मी. असलेल्या जी. आय. डी. सी. तील मील मध्ये कामाला पायी जात असू. “आपला हात जगन्नाथ” उक्ती प्रमाणे स्वतः स्वयंपाक करून डबा घेऊन कामावर जायचो. येथे थोड्याच दिवसात आम्ही मामा-भाच्यांनी हॅन्डलूम मशीनवरील स्किलचे काम आम्ही शिकून घेतले होते. तेथील छोट्या कपडा मील मध्ये काम करू लागलो. त्यावेळी इतर ठिकाणी कंपनीत काम केल्यावर मिळणाऱ्या वेतना इतके पैसे आम्हाला मिळत होते. एक कष्टकरी कामगाराचे जीवन जगण्यास आम्ही सुरुवात केली होती.
सुट्टीच्या दिवशी सुरत येथील वेगवेगळी प्रेक्षणीय ठिकाणांना भेटी देणे, नवीन चित्रपट रिलीज झाला, तर शक्य असल्यास पहिलाच शो बघण्याचे काम देखील न चुकता करत असायचो. आमच्या कपडा मीलमध्ये बारा तास कामाचा कालावधी असायचा. दोन शिफ्ट मध्ये काम करावे लागत असायचे. बारा तास उभे राहून काम करण्याची आता आम्हाला सवय झाली होती. सायंकाळी स्वयंपाक करण्यास खूपच कंटाळा येत असे. मात्र सांगणार कुणाला? मामा-भाचे जोडी असल्याने आम्ही एकदा कामास सुरुवात केली तर काम पूर्ण होण्यास फारसा वेळ लागत नसे. आमचे कंपनी कामगाराचे दैनंदिन जीवन गतिमान झालेले होते. त्यामुळे आठवड्याची सुरुवात झाल्यावर सुट्टीचा दिवस कधी यायचा हे देखील कळत नसे. मार्च महिन्यापर्यंत हा दिनक्रम सुरुच होता. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मामा म्हणाले की ‘मला आता सुरतला थांबून काम करण्यात काही अर्थ वाटत नाही. मी जून महिन्यात डी.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार आहे.’ मामाचे हे वाक्य ऐकून माझा तर सुरुवातीला थरकापच उडाला. सोबत असून आमची याविषयावर कधीही चर्चा झाली नव्हती. कारण आम्ही जवळपास एक वर्षाचा अनुभव घेऊन एक कुशल कामगार म्हणून ओळख निर्माण केली होती. सुरत येथील नामवंत कपडा मील मध्ये आम्हाला चांगला पगार मिळेल अशा ठिकाणी आम्हाला कामाची संधी उपलब्ध झाली होती. अशा स्थितीत असतांना गावी यायचा निर्णय माझ्या मनाला पटत नव्हता. आम्ही येथे चांगले स्थिरावून घरी दोन पैसे पाठवून मदत करायला सुरुवात केली होती. मामांनी मला गावी जाण्याविषयी विचाल्यावर ‘मी, देखील नेक काम में देरी क्यों?’नुसार ताबडतोब सुरतहून गावी अर्थात मातृभूमीची ओढ असल्याने येण्याची तयारी सुरु केली. आम्ही सर्व तयारी करून दोन दिवसात तेथील सर्व देणे-घेणे व्यवहार पूर्ण करून घराचा रस्ता धरला. आम्ही अचानक कोणतीही पूर्व सूचना न देता गावी आलो, हे बघून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सुरुवातीला अनेक तर्क-वितर्क काढण्याचा प्रयत्न झाले. मात्र खरे कारण आई-वडिलांना सांगितल्यावर त्यांचा विश्वास बसल्याने सुरत वारीचा विषय संपला. माझा एक वर्षाचा काम शोधून घरी आर्थिक हातभार लावण्याचा आगळा-वेगळा प्रवास अचानक थांबला होता. माझ्या आजोबांनी माझे डी.एड. मामा बरोबर होण्यासाठी प्रयत्न केले पण त्यांना त्यात यश मिळाले नाही. सुरत येथे जाऊन आल्याने शिकण्याचे एक वर्ष वाया गेल्याची खंत मात्र राहिलीच. एक मात्र खरे की माझ्या शिक्षणाचे ‘पुन्हा पाढे पंचावन्न’ सुरु झाले.
मी गावी आल्यानंतर थोड्याच कालावधीत माझ्या पेक्षा लहान बहिणीचे लग्न झाले. त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती खुपच नाजूक झाली होती. आता शेती करण्याशिवाय माझ्यापुढे अन्य पर्याय असू शकतो, याचा विचार ही माझ्या मनात येण्याचे काहीच कारण नव्हते. वडील जुनी मॅट्रिक शिकलेले होते, पण आई निरक्षर असूनही तिने माझ्या शिक्षणासाठी काही करता येईल का? यासाठी प्रयत्न सुरु ठेवलेले होते. बहिणीच्या लग्नानंतर काही दिवसांनी मोठी बहिण व रायते दाजी आमच्या गावी आले होते. त्यांना माझ्या सुरत वारीचा सर्व घटनाक्रम सविस्तर माहित होता. दहावी नंतर एक वर्ष नाशिक, एक वर्ष अकरावी सटाणा आणि एक वर्ष सुरत, त्यामुळे पुढे काय? हा प्रश्न माझ्यासह सर्वांनाच होता. माझे जीवन दरवर्षी नवीन वळण घेत होते, ते मला कोणत्या वळणावर घेऊन जाईल याचा अंदाज मला देखील येत नव्हता. माझी घरी आलेल्या वडिलधाऱ्या मंडळी समोर जाण्याची माझी हिम्मत होतच नव्हती. एक प्रकारे जीवन निराशेकडे मार्गक्रमण करत होते. अशात मला दाजींनी बोलावून विचारले “आता पुढे काय करायचे ठरविले?” या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडे नव्हते. असे म्हणतात “काही वेळा न बोलताच, काही प्रश्न सुटत असतात” मी त्यांची नजर चुकवून तेथून केव्हा काढता पाय घेतला कुणालाच कळाले नाही.
आई-वडील व बहिण-दाजी यांची बराच वेळ चर्चा झाली. त्यानुसार माझे रायते दाजी मला शिक्षणासाठी नाशिक येथे घेऊन आले. नाशिक येथे आल्याबरोबर माझ्यासमोर कॉलेज प्रवेशाचे मोठे आव्हान होते. एक वर्षाचा शिक्षणात खंड पडलेला असल्याने कॉलेज प्रवेशासाठी बऱ्याच अडचणी येत होत्या. त्या सर्व अडचणी दूर करण्याचा मी प्रयत्न करत होतो. मला प्रवेशासाठी मित्र संजय पवार यांनी मदत केली. त्यांच्या शेजारी के. टी. एच. एम. कॉलेजचे सेवक श्री. प्रभाकर मंडलिक रहात असायचे. त्यांच्या अथक प्रयत्नातून ऑगस्ट १९८६ मध्ये बारावी आर्ट्सला माझा प्रवेश झाला. माझे नियमित कॉलेज व अभ्यास सुरु होऊन बारावी परीक्षेचा फॉर्म देखील भरला होता. यामुळे माझी एक वर्षापूर्वी शिक्षणाच्या रस्त्यावरून भरकटलेली गाडी पुन्हा मार्गी लागली. दिवाळीच्या कॉलेजला सुट्टया लागल्याने मी गावी गेलो. मला वडिलांनी लहान बहिणीला दिवाळीसाठी घेण्यास पाठविले होते. बहिणीच्या घरी गेल्यावर सर्व खुशाली विचारून झाल्यावर तिच्या सासऱ्यांनी मला विचारले “संजू, तू कॉलेजला प्रवेश घेतल्याचे समजले, पण तू पास होशील का?” मी त्वरित उत्तर दिले ‘होय’. ते मला म्हणाले की “तू, जर बारावी पास झाला तर मी पूर्ण गावाला पेढे वाटेल.” त्यांना काय म्हण्याचे होते ते त्यांनी म्हटले. कदाचित मला त्याचा अर्थ तेव्हा समजला असेल किंवा नसेल. पण त्यांच्या बोलण्याने माझ्या जीवनाला निश्चितच अर्थ प्राप्त झाला. त्यांच्या मुळेच मला अभ्यासाची प्रेरणा मिळाली. आक्का व रायते दाजींचे संपूर्ण लक्ष व मार्गदर्शन होतेच. मी मार्च १९८७ मध्ये बारावीची परीक्षा चांगल्या मार्कांनी पास झालो. मात्र यश जरी मिळाले तरी यशाचे खरे शिल्पकार माझे सटाण्याचे आजी-आजोबा, श्री. रायते दाजी व बहिण यांनाच आहे. ज्यांनी स्वत:च्या असंख्य अडचणी असतांना माझ्यासाठी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात महत्वाची भूमिका पार पाडली त्यासर्वांचाच मी सदैव ऋणी राहील......!
🌹प्रवास माझा🌹
✒️शब्दांकन✒️🌹
श्री. संजय कदम
अध्यापकाचार्य,
ज्युनि.कॉलेज ऑफ एज्यु. दिंडोरी
Comments
Post a Comment