...कर्मवीरांचे रंगीत फोटो झाले...!

......आणि कर्मवीरांचे फोटो रंगीत झाले...! ✒️🌹
                     शब्दांकन-श्री. संजय कदम

                 मविप्र संस्थेच्या मनेगाव विद्यालयात आमचे मित्र श्री पी. टी. जाधव कलाशिक्षक पदावर कार्यरत होते.  अध्यापनाचे काम करतांनाच ते नेहमी आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करायचे. ते विविध प्रकारचे जवळपास सर्वच वाद्य लिलया हाताळतात. त्याच बरोबर अनेक चित्रकार विद्यार्थी मविप्र संस्थेच्या विविध शाखेवर कार्यरत असतांना घडविले आहेत. संस्थेत श्री. पी. टी. जाधव सरांना जवळपास सर्वच शिक्षक व  मुख्याध्यापक एक उत्कृष्ट चित्रकार म्हणून ओळखतात. संस्थेतील सेवेतच एकदा मनेगाव विद्यालयात घडलेल्या विचत्र घटनेने त्यांच्यासाठी एक संधी उपलब्ध करून दिली, संधीचे सोने करण्याचे कसब कलाकारातच असते. एक वेळ अशी होती की संस्थेतील प्रत्येक शाखेत कर्मवीरांचे फोटो होते. समाजदिनाच्या दिवशी त्यांचे पुजन व त्यांच्या कार्याचे स्मरण केले जाई, रंगीत सिनेमा आणि रंगीत फोटोंचा जमाना येवून बरेच दिवस झाले.  तरी कर्मवीरांचे फोटो मात्र ' black and white'  कलर मध्येच होते. कर्मवीरांचे फोटो ही रंगीत आणि आकर्षक स्वरूपात तयार करावेत.  अशी कल्पना कुणाच्या कशी सुचली आणि तिची कार्यवाही कशी झाली त्याची ही मनोरंजक हकीकत.......!
            मविप्र संस्थेचे संस्थापक कर्मवीरांचे रंगीत फोटो संबधी एक मजेदार प्रसंग याकाळात मनेगाव विद्यालयात घडला. मनेगाव येथे समाजदिनाच्या प्रतिमापूजन कार्यक्रमासाठी कार्मवीरांचे फोटे कार्यालयातून काढले होते. पुढे सुट्टी असल्याने कार्यक्रमानंतर फोटो कार्यालयात मूळ ठिकाणी लावणे झाले नाही.  पावसाळ्याचे दिवस असल्याने फोटो ठेवलेल्या ठिकाणी खिडकीतून पाऊसाचे पाणी कर्मवीरांच्या फोटोवर पडले. पावसाचे पाणी सुट्टीकाळात सुकले होते. मुख्याध्यापकांनी संस्थेचे पदाधिकारी जर शाळेच्या भेटीसाठी आले तर कार्यालयात कर्मवीरांचे फोटो लावलेले नसतील  तर विचारणा करतील. शिपायांना बोलावून कार्यालयात पहिले असलेल्या जागेवर कर्मवीरांचे फोटो लावण्यासाठी मुख्याध्यापक श्री. आर. के. दिघे  यांनी सांगितले. फोटो लावण्यासाठी जेव्हा काढले, तेव्हा समजले की, कर्मवीरांच्या फोटोत पाणी गेल्याने खराब झाले होते.
             संस्थेतील शिक्षकांची सेवाजेष्ठता यादी निरीक्षणासाठी मराठा हायस्कूल, नाशिक येथे ठेवण्यात आली होती.  सेवाजेष्ठता यादी बघायला श्री. जे. बी.पगार, श्री.जी.बी.मोरे व श्री. पी. टी. जाधव  जाणार होते.  मुख्याध्यापकांनी त्यांना संस्थेच्या कर्मवीरांचे शाळेतील फोटो खराब झाल्याने, नवीन फोटो बाबत चौकशी करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे चौकशी केली असता फोटोच्या किमती खुपच असल्याचे आढळले. मराठा हायस्कूल येथे पोहोचल्यावर शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिघे सरांना फोटो संदर्भातील सर्व माहिती सांगितली. 
                       मुख्याध्यापकांनी इतका खर्च शाळेला परवडणारा नाही. दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापकांनी कलाशिक्षक श्री पी. टी. जाधव यांना बोलावले.  ते म्हणाले "कर्मवीरांच्या फोटोसाठी काही पर्याय वापरून मार्ग काढता येईल का?". त्यावर जाधव सर म्हणाले “मार्ग काढण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही. पण कर्मवीरांच्या फोटोंचा अत्यंत संवेदनशील प्रश्न आहे, ही बाब संस्थेशी निगडीत असल्याने, काही अडचण निर्माण झाली तर मी अडचणीत येईल.” जाधव सरांचे म्हणणे  ऐकूण घेतले. मुख्याध्यापक श्री. दिघे सर म्हणाले, “ जाधव सर, मी आहे तुम्ही काळजी करू नका.” त्यामुळे श्री. पी.टी. जाधव सरांनी मुख्याध्यापकांनी सोपविलेली जबाबदारी शाळेचे दोन पैसे वाचविणारी असल्याने सामाजिक भान ठेऊन स्वीकारली. जेव्हा फोटो फ्रेमपासून वेगळे केले तेव्हा फोटोचे टचअप करतांना त्यांच्या लक्षात आले होते की, “फोटोत खराब व्हायला, आता काही शिल्लक राहिलेच नव्हते.” काम खुपच आव्हानात्मक होते.
             कलाकारांना नेहमीच आव्हानात्मक कामे करायला आवडतात. पावसाच्या पाण्याने खराब झालेल्या फोटोच्या टचअपसाठी श्री. पी. टी. जाधव सरांनी सुरुवातीला पहिला फोटो संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरातांचा घेतला. फोटोचे काही पापुद्रे निघाले होते ते सारखे करण्यासाठी त्यांनी विविध प्रयोग केले. चेहऱ्याचे टचअप करतांना कोणताही बदल होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी त्यांनी कर्मवीर रावसाहेब थोरातांचे अनेक फोटो समोर ठेवले होते. फोटो टचअप करतांना ते वेगवेगळ्या कोपऱ्यात उभे राहून मूळ चेहऱ्यात काही बदल तर होत नाही ना याची काळजी घेत.  त्यांना गरज वाटली तेव्हा इतरांशी केलेल्या कामावर चर्चा करत असत, फोटोंच्या विषयी काही विचारणा झाल्यावर त्यात काही सूचना करण्याची इतरांची पात्रता नव्हतीच, हे क्षेत्र कुणाचेच नव्हते. सर्व पर्याय वापरून कर्मवीर रावसाहेब थोरातांचा आकर्षक रंगीत फोटे पी. टी. जाधव सरांनी तयार केला. सर्व प्रथम हा कर्मवीरांचा रंगीत फोटो बघण्यासाठी आम्हांला घरीच बोलावले. आम्हीं सर्व मित्र नशीबवानच, या ऐतिहासिक प्रसंगाचे आम्हीं साक्षीदार होतो.
              कर्मवीर रावसाहेब थोरातांचा रंगीत फोटो बघून मुख्याध्यापक श्री. आर. के. दिघे सर अवाक झाले. श्री. पी.टी.जाधव सरांच्या कलेचे वर्णन करतांना विद्यालयाचे  मुख्याध्यापक म्हणाले, “माझ्याकडे तुमच्या कलेचे, वर्णन करण्यास शब्दच नाहीत” असे कौतुक केले. तेव्हा कोणताही कलाकार हा आपल्या कलेची कदर करणारे दोन शब्द ऐकण्यास उत्सुक असतो.  कलाकाराच्या पाठीवर शाबासकीचा हात फिरला की त्याला आकाश ही ठेंगणे होत असते. आमचा हा कलाकार मित्र देखील या गोष्टीस अपवाद नव्हता, उर्वरित कर्मवीरांचे रंगीत फोटो तयार करण्यासाठी त्यांनी आपले प्राण त्यात ओतले असे म्हटले तर योग्य ठरेल. श्री. पी. टी. जाधव नव्या उमेदीने कामास लागले. त्यांनी आपले सर्वस्व कलेसाठी त्यागले, मला वाटते हे सामर्थ्य फक्त कलाकारात असते.  त्याचा अनुभव आम्हीं अनेक वेळा जाधव सरांच्या कार्यातून घेतला आहे. कर्मवीरांच्या फोटोंचे काम सुरु असतांना जेवणाची वेळ झाली असता, त्यांना जेवणासाठी बोलवले तर म्हणत, तुम्ही सुरुवात करा मी आलोच म्हणत,  सर्वांचे जेवण होऊन जायचे मात्र तहान-भूख हरपलेला हा कलाकार  आपले काम तल्लीन होऊन करायचा, एवढी कर्मनिष्ठा बघितलेला मित्र दुर्मिळच...!
                  कर्मनिष्ठते बाबत त्यांना एकदा आम्हीं विचारले असता त्यांनी सांगितले की, "त्यांचे आई व वडील दोघेही प्राथमिक शिक्षक होते. त्यांचे वडील श्री. तुकाराम शंकर जाधव (मुख्याध्यापक) सेवानिवृत्त होण्यापूर्वी निफाडचे तालुका मास्तर पदावर कार्यरत होते. आई जरा कडक शिस्तीची असल्याने, आमच्यावर लहानपणा पासूनच कोणते ही काम वेळेत, मन लावून व एकाग्रचित्ताने करण्याचे संस्कार झाले होते. आपण केलेल्या कामातून आनंदप्राप्ती व्हावी अशी आईची इच्छा असायची. त्यामुळे प्रत्येक गोष्ट वेळेत करण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करायचो, हाती घेतलेले काम वेळेपूर्वीच पूर्ण केलेले असायचे."  त्यांचा हा गुण आम्हां सर्वांसाठी अनुकरणीय असाच आहे. 
                 आमच्या या कलाकार मित्राने सोपविलेली जबाबदारी कठीण परिश्रमाने खूप कमी कालावधीत  सर्व चार ही कर्मवीरांचे रंगीत फोटो नव्या रुपात तयार करून पार पाडली. संस्थेच्या इतिहासात मनेगावच्या नूतन जवाहर विद्यालयात कर्मवीरांचे रंगीत फोटो मुख्याध्यापक कार्यालयात सर्वप्रथम लावण्याचा मान मिळाला ही गोष्ट गावाच्या दृष्टीने अभिमानास्पदच आहे.  काही दिवसांनी संस्थेचे संचालक डॉ. श्री. भाऊसाहेब मोरे विद्यालयात भेट देण्यासाठी आले असता त्यांनी मुख्याध्यापक कार्यालयात कार्मवीरांचे रंगीत फोटो बघितले श्री. आर. के. दिघे सरांना विचारले की, “ इतके सुंदर, कर्मवीरांचे रंगीत फोटो संस्थेत सुद्धा नाहीत. तुम्हांला कोठून मिळाले? “ श्री.दिघे सर उत्तरले  "कर्मवीरांचे रंगीत फोटो आमच्या विद्यालयाचे कला शिक्षक श्री. पी.टी. जाधव सरांनी तयार केले आहेत."  संचालक साहेबांनी जाधव सरांना संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालात बोलावून घेतले. संस्थेचे शिक्षणाधिकारी साहेब श्री. यु. आर. जाधव व श्री. ए. बी. सोनवणे यांना भेटण्यास सांगितले.  षिक्षणाधिकारी साहेबांनी श्री. पी.टी. जाधव सरांशी सविस्तर चर्चा केली. यापुर्वी चार कार्मवीरांचे रंगीत फोटो तयार झाले होते. त्याचे सोबत फोटो कॉपी होत्या त्या बघून उर्वरित कर्मवीर डी. आर. भोसले व कर्मवीर गणपत दादा मोरे यांचे देखील रंगीत फोटो बनविण्यास सांगण्यात आले.. त्याप्रमाणे श्री. पी.टी. जाधव सरांनी  उर्वरित कर्मवीरांचे रंगीत फोटो तयार केले. संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयास कर्मवीरांच्या रंगीत फोटोंचा एक संच जाधव सरांनी भेट दिला. पुढे  संस्थेच्या कार्यकारिणीच्या सभेत ठराव मंजूर करून श्री.पी. टी. जाधव सरांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन संस्थेच्या विविध शाखांना कर्मवीरांचे रंगीत फोटो पुरवठा करण्याचे काम दिले. आज देखील कर्मवीरांच्या उच्च प्रतीचे रंगीत फोटो पुरविण्याचे काम ते करत आहेत. श्री. जाधव सरांनी दिलेले कर्मवीरांचे चांगल्या प्रतीचे रंगीत फोटो आज ही मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक येथील मध्यवर्ती कार्यालयांत लावलेले आहेत.
                 श्री. पी.टी. जाधव सरांनी पुढे छत्रपती शाहू महाराजांचा सर्वप्रथम रंगीत फोटो देखील बनविला आहे. मविप्र संस्थने आपल्या प्रिंटिंग प्रेस मध्ये विविध विषयांचे व्यवसाय छपाई केले होते, व्यवसाय पुस्तिकेचे मुखपृष्ठ तयार करण्याचे काम संथेने त्यांना दिले होते.  श्री. पी.टी. जाधव सरांनी मोठ्या कष्टाने पण सर्वांच्या पसंतीला उतरेल असे आकर्षक मुखपृष्ठ तयार करून संस्थेत सर्वांची मने जिंकली होती. कोठुरे येथे सेवेत असतांना तेथील विद्यालायाच्या नावाचा आकर्षक बोर्ड व विद्यालयाच्या दर्शनी भागावरील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पेंटिंग त्यांच्यातील उच्च कलाकाराची साक्ष देत आहे. संस्थेच्या जनता विद्यालय, सिन्नर, जनता विद्यालय, डुबेरे, जनता विद्यालय, सोनांबे, नूतन जवाहर विद्यालय मनेगाव येथील शाळेच्या नवीन इमारतीचे नावाचा बोर्ड, इमारतीचे काम त्यांच्या सेवा काळातच झाल्याने शाळेतील व्हरांड्यातील अनेक पेंटींग व अप्रतिम सरस्वतीची प्रतिमा सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली.   इत्यादी शाळांच्या नावाचे आकर्षक बोर्ड त्यांनी आपल्या सहकारी कालाशिक्षकांच्या सोबतीने केले.
               मविप्र संस्थेने विद्यमान सरचिटणीस श्रीम. नीलिमाताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा चित्रात्मक इतिहास तयार करण्यासाठी कलाशिक्षकांची टीम तयार केली आहे त्यामध्ये श्री. पी. टी. जाधव सरांचा देखील समावेश आहे. हे काम बऱ्यापैकी पूर्ण झालेले असून लवकरच सर्वांसाठी ते वाघ गुरुजी विद्यालय, नाशिक येथे उपलब्ध होणार आहे.  ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने निश्चितच गौरवास्पद व अभिमानास्पद बाब आहे. श्री. पी.टी. जाधव सरांसारख्या कलाकाराचे आम्हीं मित्र श्री. जे. बी. पगार, श्री. जी. बी. मोरे, श्री. जे. पी. पवार, श्री. एस. एम. सोनवणे, श्री. एस. व्ही. कदम, श्री. बी. डी. बाराहाते, श्री. भागवत क्षिरसागर, श्री. अरुण सावंत., श्री. दत्ता पाटील, श्री. गोविंदराव कोठावळे, श्री. बी. आर. कहांडळ. श्री. व्ही. बी. म्हस्के., श्री. अनिल कुंदे, श्री. एकनाथ खैरनार, श्री. इ.डी. चव्हाण, श्री. के.आर गोसावी, श्री. व्ही. व्ही. सोनवणे, इ. आहोत या गोष्टीचा आम्हांला नेहमीच अभिमान असेल...!
          
                   आपण काही वेळा ऐकले असेल की, "इष्टापत्तीतुन ही कधी-कधी चांगले घडते"  शाळेतील शिपायाने केलेल्या चुकीतून एक चांगले काम झाले ते म्हणजे कर्मवीरांचे रंगीत फोटो तयार झाले आणि ते देखील एका मजेदार प्रसंगातून.  मविप्र समाज परिवारात कर्मवीरांचे नाव आदराने घेतले जाते, या कर्मवीरांना आकर्षक रंगीत फोटोच्या रूपाने मूळ स्वरूपात प्रस्तुत करणारे श्री.पी. टी. जाधव. कर्मवीरांच्या त्यागातून उतराई होण्यासाठी त्यांनी केलेला विनम्र प्रयत्न, एक उच्च कोटीचे कलाकार श्री. पी.टी. जाधव यांच्या कार्याचा घेतलेला आढावा. मविप्र परिवारातील सेवक व आमचे मित्र श्री.प्रकाश तुकाराम जाधव यांना जन्म देणारी,  "धन्य ती माऊली जिने आपल्या सारख्या विविध कलागुणसंपन्न  कलाकारास जन्म दिला....!🌹💐💐🙏

मातृदिनाच्या निमित्ताने आमच्या मावशींना हा लेख समर्पित...!🌺🌹💐🙏

माझा प्रवास✒️🌹
शब्दांकन
श्री. संजय कदम
*ज्युनि. कॉलेज ऑफ एज्यु. MVPN

Comments

Popular posts from this blog

वाजे विद्यलाय-१

महाविद्यालयीन जीवनातील मित्र...!

नांदगाव भाग-5