ध्येय वेडा शिक्षक...!
✒️आठवणीतील मनेगाव ....!✒️
भाग- 6
....,एक ध्येय वेडा शिक्षक !(श्री. जी. बी. मोरे)
शब्दांकन :✒️ संजय कदम
आमचे मित्र सदाबहार व्यक्तिमत्व व मार्गदर्शक श्री. जी.बी. मोरे सरांचे बालपण आकाराने मोठ्या कुटुंबात व्यतीत झाले. मोठे म्हणण्याचे कारण म्हणजे या कुटुंबात सहा बहिणी व तीन भाऊ अशा भावंडात मोरे बापू लहानाचे-मोठे कधी झाले, हे कदाचित त्यांना स्वतःला ही कळले नसावे. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जि.प. प्राथमिक शाळा, चौगाव (गोताणे) ता. जि. धुळे येथे झाले. मात्र शाळेतील अत्यंत हुशार, नम्र, तत्पर, प्रामाणिक, सभाधिट, आज्ञाधारक, जबाबदार, समजदार, कर्तव्यदक्ष, मिश्कील, प्रत्येक बाब चाणाक्षपणे जाणून घेणारा चिकित्सक इ. गुण त्यांच्यात होते. त्यामुळे बापू लहानपणा पासूनच सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू होते.
“विद्या विनयेन शोभते” हा संस्कार त्यांच्यावर बालवयातच झाला होता. वडीलधाऱ्यांच्या प्रति बापूंच्या मनात खूपच आदर होता. गावातील वडीलधारे त्यांना वाण्याच्या दुकानातून वस्तू आणून देण्यापासून, इतर कामासाठी सर्वांनाच हक्काचा माणूस म्हणजे बापू होते. त्यांना कदाचित कुणी काम सांगितले, तर समोरच्या व्यक्तीने आपल्यास त्या योग्यतेचे समजल्याचा भाव त्यांच्यात असायचा. कुणी ही काम सांगावे आणि त्यांनी आत्मीयतेने पूर्ण करावे हे त्यांचे वैशिष्ट्ये होते.
लहानपणी आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना बसस्थानकापासुन घरी घेऊन येणे, परत जातांना पुन्हा बसस्थानकापर्यंत सोडविण्याचे काम ते अत्यंत आवडीने करायचे. पहुण्यांशी वडीलधारे बोलतात त्याच पद्धतीने बोलणे सभाधिटपणा त्यांच्याजवळ असल्याने त्यांना अवगत होते. पाहुण्यांनी आणलेला खाऊ आई जवळ बसून खाण्यात त्यांना खुपच आनंद मिळायचा, कारण आईजवळ बसण्याचा फायदा काय असायचा? तो सर्वांनाच माहित आहे. सातवी पर्यंत बापू स्वछंदी विद्यार्थ्याचे जीवन जगले. केंद्र परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. बापू हुशार असल्याने आईने त्यांच्या पुढील शिक्षणाची सोय आपल्या भावाकडे अर्थात श्री. दशरथ (मामा) शेवाळे, मोराणे(सां) नामपूर येथे करून ठेवली होती. आई पासून दूर राहिल्याचे दुख त्यांना झाले पण त्यांनी ते कधी व्यक्त होऊ दिले नाही.
आठवी पासून शिकतांना अनेक प्रसंग त्यांनी आपल्या विविध लेखातून आपल्या समोर मांडले आहेतच. स्वत:च्या घरी शिक्षण घेणे आणि पाहुण्यांकडे शिक्षण घेणे वाढत्या वयाबरोबर त्यांना चांगलेच समजले होते. तरी शिक्षणासाठी आजोळ सर्वाधिक सुरक्षित व चांगले ठिकाण असावे असे मला वाटते. धुळे येथील SSVP सारख्या नामवंत महाविद्यालायातून बी.एस्सी. (फिजिक्स) पदवीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. पुढे मालेगाव येथे बी. एड. च्या पदवीचे शिक्षण घेतले. त्यावेळी त्यांचे वर्ग मित्र माळी बापू, ओंकार पाटील त्यांच्या सोबतच असल्याने हे वर्ष खूपच संस्मर्णीय ठरले होते. त्यांना खऱ्या अर्थाने विद्यार्थांना शिक्षणात येणाऱ्या अडचणीची खरी ओळख धुळे येथील कालावधीत झाली असावी. त्यांचे अनेक अनुभव त्यांनी आपल्या लेखनातून व्यक्त केले आहेत.
मविप्र संथेत नोकरीला त्यांची सुरुवात निमोण येथून सन1979 मध्ये झाली. त्यावेळी एकटेच असल्याने ”एकटा जीव सदाशिव ” म्हणी प्रमाणे ग्रामीण जीवनाचा खरा आनंद त्यांनी घेतला. आज ही निमोण म्हटले तर संस्थेतील अत्यंत गैरसोयीचे ठिकाण मानले जाते. तरी देखील त्या काळात या गावाने त्यांना आपलेसे करून घेतले होते. त्यांचे पूर्ण वेळ काम फक्त विद्यार्थी हितासाठीच होते. त्यांचे तेथील मित्र बँकेतील श्री. सोनवणे साहेब, डॉक्टर इनामदार यांच्यासह मोठा मित्रांचा गोतावळा त्यांनी जमविला होता. तो बघण्याची संधी मला सुदैवाने मिळाली होती.
बापूंना नेहमीच प्रवास करण्याची भारी हौस असायची, परतीच्या प्रवासाहून आलो की त्रास होणार, माहित असून सुद्धा आम्हीं बऱ्याचवेळा त्यांच्या घरी, बहिणीकडे, भावाकडे जाऊन आलो आहे. प्रत्येक सुख-दुख:च्या प्रसंगी त्यांना मी मनेगावला आल्यापासून हक्काचा सोबती प्रवासास मिळाला होता. आम्हीं सिन्नरला शेजारीच रहात असल्याने दोघानांही तशी कुटुंबाची काळजी नसायची, कारण आम्ही शेजारी कमी जिव्हाळ्याचे संबध जास्तच जोपासले होते. बापूंचे गावाकडे जायचे नियोजन सुद्धा रविवारला जोडून सुट्टी असेल तर असायचे याचे कारण मला खूप उशिरा समजले की, आपण शाळेत नसलो तर मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. एवढा विद्यार्थी हिताचा विचार करणारा दुर्मिळ मित्र आम्हांला योगायोगानेच लाभला.
बापूंची राजदूत गाडी जुनी असल्यानेआम्ही गावी जाण्यासाठी श्री.अनिल कुंदे यांच्याकडे गाडी मागितली त्यांनी त्वरित चावी दिली. आम्ही बापूंच्या घरी राजदूत डीलक्स गाडी घेऊन गेलो होतो. मी पहिल्यांदा मोटरसायकल चालविली. दोन दिवसाच्या प्रवासात आम्ही सिन्नर-मालेगाव-अवधान -धुळे- चौगाव-कुसुंबा- म्हसदी- चिराई बारी- मार्गे मोराणे-नामपूर-सटाणा-देवळा-ओझर-नाशिक-सिन्नर असा जवळपास पाचशे किलोमीटरचा प्रवास केला. काही ठिकाणचा प्रवास कित्येक किलोमीटर निर्जन व जंगलाच्या रस्त्याने केला होता. बापूंना माझा आधार तर मला त्यांचा आधार होता. त्यांच्याकडे राजदूत गाडी असल्याने मी बिनधास्त होतो. म्हणतात ना की, 'अज्ञानात खूप सुख असते" याचा अनुभव दोन दिवसांचा प्रवास करून आम्ही सिन्नरला आलो तेव्हा आला. कुंदेनीं आम्हांला विचारले की"गाडीने काही त्रास वैगेरे दिला का?" आम्हांला त्यांच्या विचारण्याचा अर्थ समजला नाही. नंतर त्यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी गाडीत काही गोष्टी चेक केल्यावर बघितले तर स्पॅनरचे किट कुणीतरी यापूर्वीच काढून घेतलेले होते. तसेच गाडीचे कागदपत्रांची झेरॉक्स प्रत देखील नसल्याचे आढळले. आम्हीं मात्र सर्व सोबत असल्यागत केलेला प्रवास संस्मरणीय व नंतर थरारक असाच झाला...!
आमच्या दृष्टीने बापू म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व होय. फावल्या वेळेत पुस्तकांचे वाचन व त्या पुस्तकात असलेल्या बाबीवर सहकाऱ्याशी चर्चा करणारे बापू, आम्हीं शेजारी रहात असतांना संगीत विषय शिकण्यासाठी आमचे गुरु श्री. विलास जाधव सर वयाने लहान असून ही त्यांना नमस्कार करून तन्मयतेने संगीत शिकणारे कलाप्रेमी बापू,(माझा अपघात झाल्यानंतर संगीत शिक्षणात खंड पडल्याने आमची ती इच्छा दुदैवाने अपूर्ण राहिली) मित्र परिवारात गेल्या नंतर कुटुंबाचा सर्वांनाच विसर पाडणारे बापू, नातेवाईक व मित्र परिवारात पैशांचा विचार न करणारे बापू, प्रत्येक वयोगटात चपखल बसणारे व्यक्तिमत्व म्हणजे बापू, लहान मुलांना त्वरित आपलेसे करणारे बापू, जादा तासिकेला वर्गावर जाऊन विद्यार्थांना गोष्ट सांगून आपलेसे करणारे बापू, शाळेतील सर्वच कर्मचाऱ्यांना समान वागणूक देणारे बापू, स्त्री-पुरुष समानता जपणारे बापू, विद्यार्थ्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी स्वत:च्या जीवनातील प्रसंग सांगणारे बापू, निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आनंद मिळविणारे निसर्गप्रेमी बापू, स्वतःच जोखीम पत्कारून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहलीचे वेगवेगळे अनुभव मिळवून देणारे यशस्वी सहलप्रमुख बापू, प्रत्येक विद्यार्थ्यावर मुलांप्रमाणे प्रेम करणारे वेळ प्रसंगी कडक शिक्षा करून त्यांना आपलेसे करणारे बापू, प्रत्येक गोष्ट समजण्यासाठी तिच्या मुळाशी जाऊन सत्य जाणून घेणे हा त्यांच्या स्वभावाचा पैलू होता. रसायनशास्त्र विषय शिकविताना माझ्यापेक्षा श्री. जे. बी. पगार सर चांगला शिकवतील हा उद्देश ठेऊन त्यांचे भौतिकशास्त्र शिकविणारे हे दोघे सहकारी मित्र छोट्या-छोट्या गोष्टीतून विद्यार्थी हिताचा विचार करायचे.
त्यांचे जीवनातील एक प्रसंग अगदी मजेदार आहे. मामांकडे शिकण्यासाठी असतांना त्याकाळात रेडीओवरती सकाळी अकरा वाजता कामगार सभेत अत्यंत श्रवणीय मराठी गाणी ऐकायला मिळायचे. आठवीला असतांना आकाशवाणी मुंबई केंद्रावर “माळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभी? राखण ....!” हे गाणे सुरु झाले, त्यांना माहित होते की, आपल्या धाकट्या मामांना हे गाणे खुपच आवडते त्यांनी रेडीओ बंद केला आणि मळ्याच्या वाटेने सुसाट धूम ठोकली, सर्वच त्यांच्याकडे बघुन चकित झाले. एकदाचे ते मळ्यात पोहचले पळल्यामुळे चांगलीच दमछाक झालेली असतांना ते मामांना म्हणाले “तू आते ना आते घर चाल, रेडीओ वर तुना आवडीनं गाणं लागेल शे, मी रेडीओ बंद करी वणू” मामांना सर्व काही समजल्याने हसू आले. नेहमीच लहानपणा पासूनच दुसऱ्याच्या आनंदात, आनंद शोधणारे निर्मळ मनाचे बापू नेहमीच आम्हांला तुमचा अभिमान आहे.
श्री. गोविंद बाभुता मोरे सर(बापू) सौ. अलका (वाहिनी), कन्या ज्योती व मुलगा जयंत यांच्यासह आमच्या शेजारी रहात असायचे. सौ. वहिनीनी मोरे बापूंना समर्थ साथ दिल्याने एक यशस्वी मुख्याध्यापक पदापर्यंत पोहचले. शेजारी रहाण्याचा सर्वाधिक आनंद आम्ही घेतला आहे. मोरे बापूंनी आमच्या शेजारी रहायला येण्यासाठी जास्त भाडे असलेली खोली स्वीकारली होती. आमच्या मित्रांमध्ये श्री. अनिल कुंदे जर सोडले तर सर्वांनी नातेवाईक व होस्टेलच्या जीवनाचा आनंद उपभोगला आहे. त्यामुळे आम्हांला विशिष्ट पदार्थ आवडतो किंवा आवडत नाही असे काही नव्हतेच. मात्र मोरे बापूंना मी जोडी झालो आणि ते मला जोडी झाले. ज्याच्या घरी जास्त आवडीचा पदार्थ असला की, जेवणाचे वाढलेले ताट घेऊन एकमेकांकडे जेवणाला जायचा आनंद आम्ही घेतला आहे. आम्ही सिन्नर येथे तिकोणे वाड्यात रहात असतांना शेजार धर्माचे सर्व जन नियमित पालन करत असायचे. सायंकाळी जेवण तयार झाले की, तयार झालेली भाजी शेजारी दिली जात असायची. शेजारी भाजी दिली जात असल्याने प्रत्येक सुगरण भाजी उत्तम होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायची त्यमुळे भाजी उत्तमच झालेली असायची. मला मागचे दिवस आठवले की, पु. ल. देशपांडेच्या “बटाट्याची चाळ” पुस्तकातील अनेक प्रसंग आठवतात. खरेच तेव्हाचे आम्ही सर्व शेजारी भाग्यवान होतो की, असे आनंदी जीवन भाड्याने रहात असलेल्या ठिकाणी आम्हांला अनुभवता आला. आम्ही ही माणसे असल्याने थोड्या फार आवडी-निवडीचा विचार करत असायचो. आपल्याला कमी आवडणारी भाजी शाळेत डब्याला घेऊन जायची, इतरांचे डब्बे असल्याने अडचण दूर होते ही गोष्ट मला त्यांच्याकडून समजली. स्व. श्रावण जगताप मामांच्या डब्यातील चटकदार चटणीची चव अजूनही आठवल्याशिवाय रहात नाही.
आज सर्व गोष्टी प्रत्येकांकडे असून ही त्याकाळी मिळालेला आनंद देऊ शकत नाहीत या गोष्टीची खंत देखील मनाला वाटते. आमचा तिकोणे वाडा आम्हाला खूप काही देऊन गेला. श्री. अनिल कुंदे सारखा वेगळे क्षेत्र असलेला मित्र आम्हांला तेथेच भेटला श्री. मोरे सर विद्यार्थ्यांमध्ये कडक शिस्तीचे शिक्षक म्हणून ओळखले जायचे. त्यांच्याकडे गणितासारखा विद्यार्थांना जास्त न आवडणारा विषय पण वर्षभरात हा विषय आवडीचा होण्याचे तंत्र सरांकडे होते. विज्ञान विषय शिकवितांना अत्यंत सहजतेने शिकविण्याची कला त्यांना अवगत होती. त्यांची निरीक्षण क्षमता खूप दांडगी होती, विद्यार्थ्याची अडचण ते बरोबर ओळखत. संकट समयी त्यांनी मला केलेली अनमोल मदत, स्व. जगताप मामांना केलेली मदत, स्व.वारुंगसे सरांना केलेली मदत असेल, मला न माहित किती तरी लोकांना मदत केली असेल ते त्यांनाच माहित. मोरे सरांनी प्रत्येक शाळेवर काम करतांना संपूर्ण शाळा एक परीवाराप्रमाणे जोडण्याचे काम कौशल्याने केले.
त्यांच्या काही वेळा बदल्या झाल्या त्यागोष्टीचा त्यांना कधीच खेद वाटला नाही उलट ते म्हणायचे, मला नव्या शाळेत अनेक नवीन मित्र भेटले. त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन नेहमी सकारात्मक असतो. घडून गेलेल्या कोणत्याही गोष्टीवर पश्चाताप करणे त्यांना आवडत नाही. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी फोर व्हीलर घेतली. गाडी चालविण्यासाठी मोटर ड्रायविंगचा क्लास लाऊन चारचाकी गाडीचे लायसन काढून या वयात गाडी चालवायला शिकले हे विशेष. श्री.मोरे सरांकडून सर्वांनाच खूप काही शिकण्यासारखे आहे. असे म्हटले जाते "फुलासंगे मातीस, वास लागे" यानुसार आमच्या जीवनात फुलांचा सुगंध पसरवीण्याचे काम फुलाप्रमाणे बापूंनी केले हे मात्र निश्चित...! मनेगाव येथे पगार सरांच्या सोबतीने अनेक विद्यार्थी घडविण्यात त्यांचे योगदान महत्वाचे आहे. सर्वांना नेहमीच मोलाचा सल्ला देणारे, श्री.मोरे सर वाचक म्हणून खूप मोठे आहेत. आता चांगले लेखन ही करताय त्यांच्यातील किमान एक तरी गुणाचा आपण स्वीकार करून आपण लेखन किंवा वाचन करण्याचा संकल्प करावा असे मला वाटते.
श्री. मोरे सरांनी निमोण ता. चांदवड येथे श्री. देवकर सर, श्री. नेरे सर, श्री. मवाळ सर, श्री. सादडे सर, सोनवणे साहेब, इनामदार डॉक्टर इ मित्र मिळविले होते. तसेच निमोण येथे त्यांनी घडविलेले आमचे काही मित्र भगवान बाराहाते, सुनील पगार, विनोद सोनवणे, भाऊसाहेब देवरे, प्रा.डॉ. संजय बाराहाते विद्यार्थी घडविले आहेत. निमोण येथून आल्यावर त्यांना मनेगावला मुख्याध्यापक म्हणून श्री. मनियार सर, श्री. के. आर. पंडित, श्री. आर. के. दिघे, श्री.जे. के. गवळी, श्री. जी. एच. पाटील, श्री. आर. बी. देवरे, श्री. एम. बी. शिंदे, श्री. ए. एम. शिंदे, श्री. शिरसाठ सर इत्यादी नामवंत मुख्याध्यापकांच्या हाताखाली मोरे सरांनी आपले काम चोखपणे पार पडले. त्यांनी मुख्याध्यापक म्हणून मनेगाव येथे एक वर्ष व सोनांबे येथे दोन वर्षे प्रभावी मुख्याध्यापक म्हणून कामकाज केले.
त्यांना सोनांबे येथे शाळेचा परिसर व फलकलेखनासाठी पी. टी.जाधव सरांसारखा कलाकार सहकारी मित्र मिळाल्याने त्यांचे काम अधिकच सोपे झाले. मात्र श्री. जी. बी. मोरे सर मुख्याध्यापक म्हणून आल्यावर खूपच जबाबदारीने काम करून इतरांना आपल्याकडे बोट दाखविण्याची संधी पी.टी.जाधव सरांनी दिली नाही, ही बाब देखील खूपच महत्वाची होती. श्री. मोरे सरांनी सेवा करत असताना वेळोवेळी विज्ञान प्रदर्शनात श्री. जे. बी. पगार सरांच्या मदतीने विद्यालयाला तालुकास्तरीय व जिल्हास्तरावर अनेकदा यश मिळवून दिले. मनेगाव येथील डॉ. शिवाजी कराड, डॉ.योगेश सोनवणे, इंजीनिअर सचीन पोटे, इंजीनिअर संदीप सोनवणे व उद्धव मुरकुटे, योगेश कर्डक,फिपक सोनवणे, वकिल झालेले चेतन सोनवणे व मोरेश्वर सोनवणे, सी.ए.झालेले भारत सोनवणे व जितेंद्र शालिग्राम, निलेश व रवींद्र सोनवणे, संतोष व विकास वैष्णव, रामहरी शिंदे,शरद सोनवणे, सौ. प्रमिला व योगिता शिंदे, कविता सोनवणे, संगीता शिंदे, पल्लवी पडवळ, सुवर्णा कर्डेल, इत्यादी विद्यार्थी मित्रांसोबतच ज्यांचे नाव या ठिकाणी नमूद करू शकलो नाही असे असंख्य विद्यार्थी त्यांनी घडविले आहेत.
श्री.मोरे सरांची कन्या सौ. ज्योती मोरे (महाजन) शिक्षिका म्हणून श्री. मोरे सरांचा वारसा समर्थपणे चालवत आहे व त्यांचे जावई श्री. महाजन सर मुख्याध्यापक म्हणून दोघें ही एकाच आश्रम शाळेत, वाडे ता. चाळीसगाव येथे कार्यरत आहेत. श्री. जयंत मोरे उच्च शिक्षित असून बरेच दिवस सोनांबे यथे कॉम्पुटर शिक्षक म्हणून काम केले. शासनाने ते पद रद्द केल्याने आज सिन्नर येथे रेडीमेड स्टोअर्स चालवीत आहे. बापूंची सुनबाई सौ. सुजाता मोरे, संजीवनी प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून संजीवनी नगर, सिन्नर येथे कार्यरत आहे. आज देखील आम्ही सर्व मित्रांनी एकत्रित येऊन सहभोजन करावे बापूंना नेहमी वाटते परंतु आजचे वातावरण योग्य नसल्याने आम्ही त्यांना म्हणत असतो बापू, “बचेंगे तो और लढेंगे “ आणि ते आमची ही गोष्ट मिश्कीलपणे स्वीकारतात.
आज मोरे बापू सेवानिवृत्त असले तरी आठवी ते दहावीच्या विद्यार्थांचे गणित व विज्ञान विषयाचे ते क्लास घेतात. त्यांच्यातील शिक्षक त्यांनी आज देखील ताजातवाना ठेवला आहे. आमच्या बरोबरच त्यांनी मविप्रचा सेवानिवृत्त शिक्षक मित्रांचा ग्रुप, दररोज सकाळ सायंकाळ फिरण्यासाठी परीसरातील सेवानिवृत्त मित्रांचा ग्रुप असून तेथे आमच्या दोन ही जिवलग मित्रांचा वेळ खूपच आनंदाने जातो आहे यातच आम्ही आनंदी आहोत. श्री.माळी बापू व श्री.ओंकार बापू तुमची माफी मागून आपला वर्ग मित्र गोविंद बापू ग्रेटच आहे. मोरे बापू आपल्या सारखा सर्वगुणसंपन्न मित्र व मार्गदर्शक आम्हास लाभल्याने आमच्या सर्व मित्र परिवाराचे जीवन धन्य झाले.....!🌹🙏
माझा प्रवास
शब्दांकन✒️
श्री. संजय कदम
ज्युनि. कॉलेज ऑफ एज्युकेशन, mvpnd
Comments
Post a Comment