वाजे विद्यालय,भाग 4

.आठवणीतील वाजे विद्यालय.......!(सिन्नर)
भाग-4      (सहलीचे अनुभव)

शब्दांकन – श्री.एस. व्ही. कदम (सर)

                  सिन्नर तालुक्यातील अनेक माध्यमिक विद्यालय उपक्रमशील विद्यालय म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यात वाजे विद्यालयाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. आज स्पर्धेच्या युगात शिक्षण क्षेत्रात होणारे बदल स्वीकारून विद्यार्थ्यांना नवीन दृष्टी देणारे हे विद्यालय सर्वांच्या पसंतीस उतरले आहे. विद्यालयात गुणवत्ता वाढीसाठी वर्षभर विविध परीक्षा शालेय, मविप्र संस्था, राज्य व राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जातात. आपल्या नावलौकिकानुसार वाजे विद्यालय विविध परीक्षात दरवर्षी सातत्याने यश प्राप्त करत असते. विद्यालय विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. यासाठी क्रीडा, कला, सांस्कृतिक, वक्तृत्व, गायन, नृत्य इत्यादी स्पर्धा घेतल्या जातात. त्याच बरोबर सहलीचे देखील आयोजन विद्यालयात केले जात असते. मी येथील विद्यालयात कार्यरत असतांना विद्यालाचे मुख्याध्यापक श्री.एम. बी. शिंदे सर,  पर्यवेक्षक श्री. एम.पी. देशमुख व श्रीम. एस.डी.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहल प्रमुख श्री. बी.जी. थोरात सरांच्या कुशल नेतृत्वात आयोजित शैक्षणिक सहलीचे अनुभव आज देखील आम्हांला आनंद देऊन जात असतात.      

             वाजे विद्यालयात दरवर्षी एकदिवसीय वर्षां सहल व हिवाळ्यात मोठ्या शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. दरवर्षी वेगवेगळ्या मार्गावर विद्यार्थ्याना नाविन्यपूर्ण सहलीचे अनुभव देण्याचा प्रयत्न केला जातो. साधारणत: सन २००४-०५  या शैक्षणिक वर्षांत सिन्नर-नाशिक-धुळे-धार संस्थान(मध्य प्रदेश)-मांडवगड-उज्जेन- इंदोर-ओंकारेश्वर-धुळे-नाशिक-सिन्नर यामार्गावर विद्यालयाचा सहलीचे आयोजन केले होते. प्रथमसत्र परीक्षा सुरु असतांनाच सहलीबाबत वर्गात सूचना येऊन गेली होती. सहलीचा प्रवास मोठा असल्याने विद्यार्थी मित्रांना दीपावलीच्या सुट्टीत आवश्यक पैसे जमा करण्याची सूचना वर्गशिक्षकांनी केलेली होती. ज्याच्या वर्गातील विद्यार्थी जास्त त्या वर्गशिक्षकास सहलीसाठी प्राधान्यक्रम दिला जात असल्याने सर्व वर्गशिक्षक आपल्या वर्गातील सहलीसाठी विदयार्थी संख्या वाढीसाठी प्रयत्नशील होते. दीपावलीच्या सुट्टी नंतर विद्यार्थ्यांनी सहलीचे पैसे जमा करण्यास संथ सुरुवात केली होती. काही विद्यार्थी आपल्या मित्र-मैत्रिणींचे पैसे जमा होण्याची वाट बघत होते. तर काही विद्यार्थी मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यासाठी पैसे भरत होते. सहल प्रमुखांना मदत करण्यासाठी श्री. व्ही. बी. म्हस्के सर होते. विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने नाशिक यथील चौधरी यात्रा कंपनीच्या बस निश्चित केल्या होत्या. सहलीचा दिवस आवश्यक विद्यार्थी संख्या पूर्ण होताच दिवस निश्चित करण्यात आला. चौधरी यात्रा कंपनीच्या बसने ठरलेल्या दिवशी आमची शैक्षणिक सहल शालेय आवारातून पालकांच्या शुभेछासह पुढील प्रवासास निघाली. सहलीच्या सुरुवातीला नेहमी प्रमाणे उत्साह दिसून आला. प्रत्येकाने आपल्या मित्रांच्या शेजारी जागा मिळवून सहलीची पूर्ण तयारी केली होती.  सहलीचा प्रवास जसजसा पुढे गेला तसतसे विद्यार्थी काही विद्यार्थी झोपी गेले. 
            मध्यरात्री सहलीच्या बस धुळे मार्गे मध्य प्रदेशात गेल्यानंतर धार कडे जाण्यासाठी निघाल्या. त्यावेळी बस चालकाने कमी अंतराचा निवडलेला मार्ग निर्मनुष्य, घनदाट जंगलाचा, चढउताराचा, वळण घाट असलेला व खराब रस्ता असल्याची जाणीव आम्हाला होत होती. नेहमीच्या अनुभवाप्रमाणे थोड्याफार अंतरापर्यंत रस्ता खराब असेल असे आम्हला वाटले होते. मात्र आमचा अंदाज अंधारातील बस प्रवासाने चुकीचा ठरविला. अंधारात आम्ही नक्की कोठे चाललो आहोत, हे कुणाला कळत नव्हते. सहलीच्या बस वळणघाटाच्या रस्त्यावर परत-परत वळाल्याने बरेच विद्यार्थी जागे झाल्याने जोराने आवाज करत प्रतिसाद देऊ लागले होते. काही वळणावर शिक्षक देखील भयभीत झाल्याने बस चालकास सावकाश बस चालविण्याच्या सूचना पुढे बसलेल्या सरांनी केल्या. मात्र सकाळी धार येथे वेळेवर पोहचण्याचे कारण सांगून बस चालक त्याच्या पद्धतीने बस चालवीत आम्हाला नियोजित ठिकाणी पोहचविण्यात यशस्वी झाला.

           रात्रभरचा सुरु असलेला प्रवास सकाळी नियोजित ठिकाणी धार येथे पोहचल्यावर थांबला. धार संस्थानाबाबत अधिक माहिती आम्हाला येथील नागरिकांकडून समजली. मुहमद तुघलकाने साधारणत: पंधराव्या शतकाच्या शेवटी धार येथील किल्याचे बांधकाम केले. नंतरच्या काळात थोरल्या बाजीराव पेशव्यांनी सन १७३२ मध्ये आनंदराव पवार यांना त्याच्या पराक्रमाबद्दल धार व आसपासच्या परगण्याचा हक्क दिल्याने हे संस्थान धारचे संस्थान म्हणून नावारूपास आले. येथील पवार घराण्याने पेशवे काळात मोठा पराक्रम गाजविल्याचा इतिहास आहे. पुढे पानिपतच्या लढाईत पवार घराण्यातील यशवंतराव पवार कामी आल्याचे समजले. धारचा किल्ला, संस्थांचे ऐतिहासिक महत्व जाणून घेतले. आमचे काही सहकारी आपल्या पवार आडनावाचा परिचय करून देत, तेव्हा आम्ही धारचे पवार असे अनेक वेळा आम्ही ऐकले होते. पवारांच्या पराक्रमाशी नाव जोडलेले धार संस्थान नाते आम्हांला समजले. सहलीच्या निमित्ताने ऐतिहासिक धार संस्थान व किल्याला भेट देण्याचे भाग्य आम्हा सर्वांनाच लाभले होते. 
             येथील प्रेक्षणीय ठिकाण बघून आम्ही आमच्या प्रवासातील पुढील पर्यटन स्थळ मांडवगडकडे निघालो. रस्त्याने जातांना येथील भव्य महाल आमच्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. विस्तीर्ण भागात वसलेले मांडवगड येथील तवेली महाल, हाथी महल, रेवकुंड(पाणी महल), हिंदोळा महाल, रूपमती महाल स्थापत्य कलेचा अप्रतिम ठेवा आमच्या सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र ठरला. येथील प्रत्येक वास्तूची गाईडने आम्हाला सखोल माहिती दिली यात वस्तूची निर्मिती, कालखंड, येथील प्रशासन, ऐतिहासिक महत्व विद्यार्थी व शिक्षकांना स्पष्ट करून सांगितले. सहलीसाठी मांडवगड ठिकाण खूपच प्रेक्षणीय स्थळ असल्याचे जाणवले. आम्हांला येथे इच्छा असूनही जास्त वेळ थांबता आले नाही, कारण रात्रीचा मोठा प्रवास, सकाळचे बाकी असलेले नैसर्गिक विधी, नाश्त्याची झालेली वेळ इत्यादी बाबींचा विचार करता, स्वच्छतागृह असलेल्या ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला. सर्वांचे स्नान व इतर बाबी पूर्ण होई पर्यंत चौधरी यात्रा कंपनीचे आचारी व स्टाफ नाश्ता तयार करत होते. त्याठिकाणी तयार होत असलेल्या नाश्ता ठरल्याप्रमाणे नसल्याने आमचे सहल प्रमुख श्री. बी.जी. थोरात सर, पर्यवेक्षक श्री. एम. पी. देशमुख यांनी चौधरी यात्रा कंपनीचे व्यवस्थापक यांना कडक शब्दांत सुनावले, त्यामुळे येथील वातावरण काही चांगलेच तापले होते.येथे अनुभवातून संयम, सहनशीलता व आक्रमक थोरात सरांनी चौधरी यात्रा कंपनीच्या नाशिक येथील कार्यालयाशी संपर्क साधल्याने यापुढे ठरल्याप्रमाणे नाश्ता व भोजन देण्याचे व्यवस्थापक यांनी मान्य केल्याने पुढील अनर्थ टळला. येथे नाश्ता तयार करण्यासाठी खराब असलेला भाजीपाला न वापरता इतर वापरण्यायोग्य पदार्थांचा वापर करून नाश्ता तयार झाला. नंतर आम्ही पुढील प्रवासासाठी छोटी-मोठी प्रेक्षणीय स्थळांना भेट देत सायंकाळी उज्जैन येथे नियोजित ठिकाणी पोहचलो. सहलीची बस ठरवितांना भोजन व्यवस्था विद्यालयाने आपल्याकडे ठेवावी ही गोष्ट आम्हांला पुढील सहलीचे नियोजन करतांना नेहमीच लक्षात ठेवली. पुढे मी आमच्या कॉलेजच्या बसने अनेकवेळा सहल घेऊन गेलो, पण असले प्रसंग पुन्हा उपस्थित होऊ नये म्हणून नेहमीच भोजनाची व्यवस्था कॉलेजकडे ठेवली. सहलीतील या घटनेमुळे आम्हाला भावी काळासाठी चांगलाच धडा शिकायला मिळाला, हे तितकेच खरे.....!

       उज्जैन येथे पोहचल्या नंतर सर्वप्रथम आम्ही येथे रात्री मुक्कामी थांबण्यासाठी घेतलेल्या हॉलवर गेलो. येथे सर्व फ्रेश झाल्यानंतर, आपल्या देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग श्री महाकालेश्वरांच्या दर्शनासाठी गेलो. येथे दर्शनासाठी अत्यंत शिस्तबद्ध व सुचानाचे पालन करत सर्वांनी शांततेत श्री. महाकालेश्वराचे दर्शन घेतले. मोकळ्या वेळेत येथील मंदिर व शहराबाबत माहिती स्थानिक जाणून घेत होतो. त्याचवेळी आम्ही सकाळी दर्शनासाठी मंदिर उघडण्याची वेळ विचारून काही निवडक विद्यार्थी व शिक्षक पुन्हा सकाळी भगवान श्री महाकालेश्वराचे शांततेने दर्शन घेतले. मुक्कामाच्या ठिकाणी इतर विद्यार्थ्याची व शिक्षकांची तयारी होई पर्यंत परवानगी घेऊन गेलेले सर्वच दर्शन आटोपून बसमध्ये येऊन पोहचले होते. उज्जैन शहर मोक्षदायिनी क्षिप्रा नदी काठावर वसलेले धार्मिक दृष्ट्या भारतातील महत्वाचे शहर आहे. येथे देशभरातून श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी व महाशिवरात्रीस भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनास येतात. देशात दर बारा वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्यातील चार प्रमुख ठिकाणापैकी एक महत्वाचे ठिकाण आहे. 
             आम्ही येथून जवळच असलेले प्रसिद्ध चिंतामण गणेश मंदिर, मंगलनाथ मंदिर, भगवान श्रीकृष्ण, बलराम व सुदामा यांचे गुरु महर्षी सांदिपनी आश्रम, ऐतिहासिक कालभैरव दर्शन, उज्जैनचे प्रसिद्ध सम्राट विक्रमादित्य आणि वेताळ यांच्या कथा ‘सिंहासन बत्तीशीचे’ ठिकाण, क्षिप्रा नदीवरील घाट इत्यादी ऐतिहासिक प्रेक्षणीय ठिकाणे बघितली. येथील कालभैरव मंदिरात दर्शनास जातांना, प्रत्येक भक्त कालभैरव देवासाठी मद्याचा प्रसाद घेऊन जात असल्याचे आम्ही बघितले. त्यापाठीमागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला कोणतेही समाधानकारक उत्तर येथे मिळाले नाही. आम्ही देखील हा अनोखा प्रसाद घेऊन देवाच्या दर्शनास गेलो होतो. आम्हाला देवाला देला जाणाऱ्या अनोख्या प्रसाद मागील वैज्ञानिक दृष्टीकोन जाणून घ्यायचा होता. मात्र देवाला दिला जाणारा मद्याचा प्रसाद पात्रातून कमी होत असल्याचा अनुभव आम्ही या ठिकाणी घेतला. वेळे अभावी आम्हाला पाठीमागील कारण जाणून घेता आले नाही याची खंत आज देखील आहे. याबाबत अनेक परदेशी संशोधकांनी पुरातत्व विभागाचे परवानगी घेऊन यामागील वैज्ञानिक दृष्टिकोनातून सत्य जाणून घेण्यासाठी अनेक दिवस थांबून निरीक्षण केले पण शेवटी त्याच्या देखील हाती कोणतेही ठोस पुरावे लागले नाहीत. शेवटी त्यांना देखील निराश होऊन आपल्या देशात परत जावे लागल्याचा इतिहास आम्हाला येथील एका ग्रहस्थाने सांगितला. उज्जैन शहरातील श्री महाकालेश्वर मंदिर परिसरात मराठी भाषिकांची संख्या मोठी असल्याचे आम्हाला आढळले. छोटे-मोठे व्यावसायिक फुल विक्रेते, प्रसाद विक्रेते, धार्मिक पुस्तके, सी. डी. विक्रेते इ.मराठी भाषिक असल्याचे त्यांच्या सोबत झालेल्या संभाषणातून आमच्या लक्षात आले. आम्ही नाशिक या प्रसिद्ध धार्मिक ठिकाणाहून आल्याचे समजल्यावर येथील विक्रेत्यांनी आम्हाला मोठे सहकार्य केले. येथे जवळपास सर्वच विद्यार्थी व शिक्षकांनी देवाचा प्रसाद खरेदी केला. काहींनी इतर वस्तूची खरेदी करण्याचा आंनद देखील घेतला. मी सहलीत अनुभवलेली सर्वात कठीण गोष्ट म्हणजे, बाजारात खरेदीसाठी विद्यार्थ्यांना मोकळे सोडणे. त्यासाठी खूप वेळ तर जातोच पण सर्व विद्यार्थी एकत्रित करणे जिकरीचे ठरते. विद्यार्थ्यांना रागवण्याची वेळ आली तर बऱ्याच वेळा शिक्षकाबद्दल त्यांचा गैरसमज होतो. काहीवेळेस सहलीतील आनंदात विरजण पडण्याची देखील शक्यता निर्माण होत असते. मात्र सहलीत शिस्त राखण्यासाठी कुणालातरी ही भूमिका पार लागते. 

              उज्जैन दर्शन आटोपून आम्ही दुपारी इंदोर येथील ऐतिहासिक होळकरांचा राजवाडा बघण्यासाठी पोहचलो, मात्र तेथे भारतीय पुरातत्व विभागातर्फे  राजवाडा डागडूजीचे काम सुरु असल्याने आम्हाला राजवाडा आत प्रवेश करून बघता आला नाही. त्यामुळे सहलीत सहभागी झालेल्या कुणालाही निराशा लपविता आली नाही. राजवाड्यास बाहेरून आच्छादन लावलेले असल्याने आम्हांला ऐतिहासिक राजवाडा बघता आला नाही. येथील राजवाड्या समोर गाईडने आम्हाला इंदोरचे ऐतिहासिक महत्व व होळकरांच्या पराक्रमाचा परिचय ओघवत्या शैलीत करून दिला. शेवटी ‘दुधाची तहान ताकावर भागवणे’ उक्तीप्रमाणे आम्ही येथून जवळच असलेला प्रसिद्ध काचेचा महाल बघितला. इंदोर मध्ये मराठी भाषिकांची संख्या मोठी असल्याचे जाणवले. मध्यप्रदेशातील सर्वात मोठे शहर व  उद्योगनगरी असलेल्या इंदोरचे गाडी प्रवासातून दर्शन घेतले. यानंतर आम्ही नर्मदा काठी असलेल्या बारा  ज्योतिर्लिंगापैकी एक महत्वाचे ठिकाण श्री ओंकारेश्वरांचे मनोभावे दर्शन घेतले. अहिल्याबाई होळकर यांनी नर्मदा नदीकाठी बांधलेल्या अप्रतिम घाट, येथील स्वच्छता, नर्मदा नदीचे डोळ्याचे पारणे फेडणारे सौंदर्य, पर्यटकांसाठी असलेली व्यवस्था, थोड्याफार प्रमाणात विद्यार्थी व शिक्षकांनी वस्तूची खरेदी केल्यान नंतर परतीच्या प्रवासास निघालो. आमच्या विद्यालयाचे या शैक्षणिक सहलीत बारा ज्योतिर्लिंगापैकी प्रमुख दोन क्षेत्राचे दर्शन झाल्याने सर्व विद्यार्थी खूपच खुश झाले होते. सहलीच्या प्रवासात पर्यवेक्षक श्री. एम. पी. देशमुख सरांच्या मार्गदर्शनाखाली सहल प्रमुख श्री. बी.जी थोरात श्री. एस. आर. पगार,  श्री. व्ही. बी. म्हस्के,श्री. सी. घुमरे, श्री. जी. एस. खैरनार, श्री. के. आर. गोसावी, श्री. जे. एन. बडवर, श्री. एस. व्ही. कदम, श्री. बी. एस. देशमुख, श्रीम. व्ही. डी. सोनवणे, श्रीम. एस.पी. हांडोरे व इतर सहभागी शिक्षक व सेवकांनी सहल यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतल्याने कोणत्याही अडचणीशिवाय सहल निर्विघ्नपणे पार पडली. सहलीत सहभागी विद्यार्थ्यांनी सूचनांचे पालन केल्याने नियोजित सर्व प्रेक्षणीय स्थळांची सखोल माहिती मिळवून आमचा पुढील प्रवास सुखर झाला. दुसऱ्या दिवशी शाळेत सर्व सहलीत सहभागी विद्यार्थी विद्यालयात हजर होई पर्यंतची काळजी सहल प्रमुखांना लागलेली असते. प्रथम दर्शनी सहलीची जबाबदारी सोपी वाटत असली तरी हे काम खूपच कठीण व त्रासदायक असल्याचे सहल घेऊन जाणाऱ्या सर्वच शिक्षकांनी अनुभवले आहे.  विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. मा. एम. पी. देशमुख सरांचे मार्गदर्शन व सहल प्रमुख श्री. बी. जी. थोरात व श्री व्ही.बी.म्हस्के सरांच्या उत्कृष्ट नियोजन व कार्य पद्धतीमुळे सहलीत सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी शिस्तीचे पालन उत्तम रीतीने केल्याने सहलीचे नियोजन यशस्वीरित्या पार पडले.

           दरवर्षी विविध विद्यालयातून होणारे सहलीचे आयोजन विद्यार्थ्यांना विद्यालयातून मिळणाऱ्या शिक्षणापेक्षा  प्रात्यक्षिकातून ज्ञान, शिस्तीचे महत्व, वेगळा प्रदेश, तेथील रीतीरिवाज, सहकारी मित्रांची घ्यावयाची काळजी, वेळेचे योग्य नियोजन इ. बाबीचे ज्ञान मिळवून देण्याचा प्रयत्न होत असतो. आपल्या परिवारापासून दूर  गेल्यावर घ्यावयाची काळजी, बाह्य जगाचे अनुभव, प्रवासातील अनुभव, आपल्या बाल मित्रांसोबत केलेली मौज-मजा, दीर्घ काळापर्यंत स्मरणात राहणाऱ्या आठवणी, शालेय अभ्यासातून सहल काळात मिळणारी सुटका इत्यादी बाबी विद्यार्थ्यांना सहलीतून मिळतात. पुस्तकी अभ्यासातून शिकलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या भाषा,  भूप्रदेश, भूप्रदेशाची रचना, रीतिरिवाज, खानपान, वेशभूषा, नद्या, पिक पद्धती, ऐतिहासिक वारसा, सांकृतिक व धार्मिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांची माहिती प्रत्यक्ष मिळविण्याची संधी सहलीच्या निमित्ताने मिळत असते. वाजे विद्यालयाची परराज्यतील शिक्षक  म्हणून सहभाग असलेली माझी पहिलीच शैक्षणिक सहल खूप काही शिवून गेली. या सहलीत मला मिळालेले अनुभव माझ्या पुढील सेवेतील अनेक सहलीच्या यशस्वी नियोजनासाठी उपयोगी ठरले.
वाजे विद्यालयातील माझी सेवा  येथील सर्व सहकारी शिक्षक बंधू-भगिनींच्या, सेवकवृंद, शिक्षकेतर सेवकांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्यामुळे नेहमीच स्मरणात राहील.विद्यालयातील सर्व पदाधिकारी, शिक्षक, सेवकवृंद, सेवक कर्मचारी व विद्यार्थी मित्रांचा मी सदैव ऋणी राहील ...!

              वाजे विद्यालयातील माझ्या सेवेतील अनुभव आठवणीतील वाजे विद्यालय या लेखातून आपल्यासमोर सादर केले, या विद्यालयातील सेवेतून मला आपणां सर्वांकडून खूप काही नवीन शिकायला मिळाले.त्यातील काही अनुभव आपल्या समोर मांडले. त्यास आपण उदंड प्रतिसाद दिल्याने आपले शाळा व शिक्षकांबद्दल व्यक्त केलेले प्रेम अवर्णनीय आहे. यापुढे ही असेच प्रेम  आपणांकडून मिळेल हीच अपेक्षा आहे. या लेखा सोबतच आठवणी वाजे विद्यालयातील या मालिकेचे सुरु केलेले लेखन थांबविण्याची योग्य वेळ आली असे वाटल्याने या लेखा सोबतच या मालिकेचा समारोप करतो.  जय हिंद....!🌹🙏🙏

प्रवास माझा
शब्दांकन- श्री.एस.व्ही. कदम

Comments

Popular posts from this blog

वाजे विद्यलाय-१

महाविद्यालयीन जीवनातील मित्र...!

नांदगाव भाग-5