वाजे विद्यलाय, भाग -2

🌹आठवणीतील वाजे विद्यालय.......!🌹
                     भाग-२(सिन्नर)

✒️शब्दांकन ✒️🌹
–   संजय कदम (सर)

             सिन्नरच्या वाजे विद्यालयातील सेवेत मला एक वर्षां पेक्षा अधिक कालावधी झाल्याने,  येथील कामाची पद्धती मला परिचित झाली होती. मी सुद्धा इतर शिक्षक व सेवकांप्रमाणे  माझ्या कार्य पद्धतीत बदल करत समायोजन केले होते. येथील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर सेवकवृंदाचा कार्यशैलीचा परिचय मला झाला होता. विद्यालयाचे पदाधिकारी विद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसाठी नेहमी प्रयत्नशील असायचे. यामध्ये मुख्याध्यापकांसह प्रामुख्याने आमचे मार्गदर्शक मा. श्री.एम. पी. देशमुख, श्री. बी. जी. थोरात, श्रीम. एस. डी, शिंदे इ. चे योगदान महत्वाचे असायचे. एकदा विद्यालयात घडलेला प्रसंग मला आजही  आठवतो. मविप्र संस्थेकडून दरवर्षी समाजदिनाच्या निमित्ताने प्रत्येक शाखेत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले जात असते. वाजे विद्यालयातील विद्यार्थी संख्या विचारात घेता संस्थेकडून आलेले गणवेश संख्येने खूप कमी होते. वर्गशिक्षकांकडून गरीब विद्यार्थ्यांची यादी घेऊन त्याची खात्री करण्याचे काम माझ्या सह काही जेष्ठ शिक्षकांकडे पदाधिकाऱ्यांनी सोपविले होते. त्यानुसार आम्हीं  वर्गात जाऊन विद्यार्थ्याची पुन्हा चौकशी करून अंतिम यादी तयार  केली. नियोजनाप्रमाणे  समाजदिनाच्या दिवशी प्रमुख पाहुणे मा. कृष्णाजी भगत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमाने गणवेश वाटप केल्यानंतर काही गरजू विद्यार्थी गणवेश संपल्याने गणवेशापासून वंचित राहिले होते. ही गोष्ट आम्ही पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. याबाबतीत पर्यवेक्षक श्री. एम.पी. देशमुख, श्रीम. एस. डी. शिंदे, श्री. बी.जी.थोरात सरांनी प्रत्येकी एक गणवेश त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांसाठी गणवेश उपलब्ध करून देण्याचे ठरविले. विद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांनी स्टाफ मिटिंग मध्ये गरजू विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सर्व उपस्थितीतांना आवाहन केले, पदाधिकाऱ्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत  प्रत्येक शिक्षक बंधू-भगिनींनी प्रत्येकी एक गणवेश देण्याचे जाहीर केले. त्यानुसार यादी तयार केली जवळपास पन्नास पेक्षा अधिक गणवेश गरजू विद्यार्थ्यासाठी उपलब्ध झाले. गणवेश खरेदीसाठी श्री. मोरे जी.बी. श्री. एन. सी. घुमरे, श्री. जी.एस.खैरनार, श्री. व्ही. बी. म्हस्के, श्री. जे. एन. बडवर, श्री. एस. व्ही.कदम, श्री. बी.एस. देशमुख इ. शिक्षकांवर जबाबदारी सोपविली होती. विद्यालयातील चांगल्या कामासाठी सदैव तयार असणारे सर्वच सहकारी येथे मला लाभल्याचा आजही निश्चित अभिमान आहे.  कोणत्याही सेवकास गणवेशा बाबत पदाधिकाऱ्यांनी सक्ती न करता गरजू विद्यार्थ्यांना मिळालेली मदत खूपच मोलाची ठरली. श्री. एम.पी.देशमुख सर व श्री.बी.जी. थोरात सरांच्या सूचनेप्रमाणे आम्ही गणेश पेठेतील शाळेचे गणवेश विक्री करणाऱ्या दुकानदारांना गणवेश खरेदीचा हेतू आम्ही सांगितला. वेगवेगळ्या दुकानातून प्रत्येकी दहा-बारा गणवेश कमी किमतीत खरेदी केले. त्यासोबतच त्यांच्याकडून काही गणवेश मिळाल्याने गणवेशांची संख्या बऱ्यापैकी वाढली होती, त्यामुळे सर्वच गरजू विद्यार्थ्यांसाठी गणवेश उपलब्ध झाल्याचा आनंद आम्ही  अनुभवला. मविप्र संस्थेत असा आगळावेगळा उपक्रम राबविणारे सिन्नरचे वाजे विद्यालय कदाचित एकमेव विद्यालय असेल. अशा रीतीने ‘कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात, स्वतः पासून करणारे’  पदाधिकारी येथे आम्हांला लाभले हे आम्ही सर्वच सेवक आसामचे भाग्य समजतो. वाजे विद्यालयातून मिळालेला हा संस्कार आजही माझ्या डी.एड. कॉलेज मध्ये आम्ही गरजू विद्यार्थ्याना वेगवेगळ्या रूपाने मदत करण्याचे काम सुरु ठेवले आहे.
             वाजे विद्यालयात सेवा करत असतांना मला श्री. आर. बी. देवरे, श्री. पगारेसर , श्री. एम. बी. शिंदे, श्री. जाधवराव इ. मान्यवर मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्यात श्री. आर. बी. देवरे सरांच्या बाबतील बोलायचे झाले तर मविप्र संस्थेतील इंग्रजी विषयावर प्रभुत्व असलेले तज्ञ शिक्षक म्हणून त्यांची सर्वाना ओळख होती.  विद्यालयातील इतर  मुख्याध्यापकांच्या तुलनेने त्यांचे प्रशासन कडक होते. त्या तुलनेने श्री. एम. बी. शिंदे सर व श्री. पगारे व श्री. जाधवराव सरांचे प्रशासन विद्यालयातील पदाधिकाऱ्यांच्या मदतीने विद्यालयाचे कामकाज सुरळीतपणे चालविण्यास प्राधान्य देणारे होते. विद्यालयातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या वैशिष्ट्येपूर्ण कामकाजातून एक नवीन आदर्श निर्माण केला होता. त्यानुसार विद्यालयाची विविध परीक्षेतील यशाची परंपरा कायम राखण्याच्या दृष्टीने नेहमीच पदाधिकारी प्रयत्नशील होते. मुख्याध्यापकांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत येथील विद्यालयाचे पदाधिकारी नेहमीच शिस्त, गुणवत्ता व नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यालयाचा नावलौकिक वाढविण्याचा यशस्वी प्रयत्न करत असत. येथील मुख्याध्यापकांना तालुक्यातील मोठे विद्यालय असल्याने प्रशासनाबरोबरच विविध प्रशिक्षणे, विविध खेळांच्या स्पर्धा, विविध परीक्षेंचे केंद्र असल्याने अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. मला लाभलेल्या सर्वच मुख्याध्यापकांनी विद्यालयाचे कामकाज उत्कृष्ट पद्धतीने सांभाळले. येथील विद्यालयात उपमुख्याध्यापक पद आहे, हे पद पर्यवेक्षक पदावरून बढतीने दोन-तीन महिन्यासाठी येणारे संस्थेतील भावी मुख्याध्यापक असायचे. येथील विद्यालयाचा स्टाफ मोठा असल्याने बऱ्याचवेळा सर्वांची ओळख होई पर्यंत या पदावरील उपमुख्याध्यापकांना बढती मिळून ते मुख्याध्यापक पदी बदलून जात असत.        
           येथील विद्यालयात सर्वाधिक काम असलेले पद कदाचित पर्यवेक्षकांचे असेल. त्यासोबत मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून येथील पर्यवेक्षक कार्यरत असल्याचा अनुभव मी घेतला आहे. मी येथे कार्यरत असतांना मला आलेला अनुभव असा होता की, विद्यालय मोठे असल्याने संस्था नेहमीच येथे अनुभवी मुख्याख्यापकांची नेमणूक करण्याचा प्रयत्न करत असे. त्यामुळे अनुभवी मुख्याध्यापक विद्यालयास लाभले तरी, त्यांची सेवा कमी शिल्लक असल्याने येथे दरवर्षी मुख्याध्यापक सेवानिवृत्त होत असत. नव्याने आलेल्या मुख्याध्यापकांना विद्यालयाच्या कामकाजाची ओळख होई पर्यंत बराच कालावधी निघून जात असे. त्यामुळे विद्यालयाचे दैनिक कामकाज सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी येथील पर्यवेक्षक पार पाडत असत. येथील विद्यालयास अत्यंत कार्यक्षम पर्यवेक्षकांची मोठी परंपरा लाभली आहे. यात प्रामुख्याने श्री. एम. पी. देशमुख, श्री. ए. एस. गोवर्धने, श्रीम. एस. डी. शिंदे, श्री. बी. जी. थोरात इत्यादी कर्तव्यदक्ष पर्यवेक्षकांचा उल्लेख करावा लागेल. आज मी शिक्षक म्हणून सेवा करत असतांना आपले स्वत:चे कामकाज करणे सोपे असते. पण इतर शिक्षकांकडून काम करून घेण्याची अत्यंत कठीण जबाबदारी पार पडण्याचे काम पर्यवेक्षकांना करावे लागत असे. मला तर वाटते विद्यालयात काम करतांना त्यांना बऱ्याचवेळा ‘तारेवरची कसरत, पर्यवेक्षकांना पार पाडावी लागते.’ मला लाभलेल्या सर्व पर्यवेक्षकांनी त्यांच्यावर विद्यालयाने सोपविलेली कामगिरी पार पाडत असतांना काहीवेळा शिक्षकाशी वाईटपणा घ्यायची वेळ आली तर मागे पुढे बघितले नाही, त्यामुळेच त्यांना विद्यालयात उत्तम पद्धतीने आपली कामगिरी पार पाडता आली.
          येथील सेवेत मला भावलेले व्यक्तिमत्व म्हणजे मा. श्री. एम. पी. देशमुख सर होय.  मी येथे सेवेत रुजू झालो तेव्हा सर विद्यालयात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते. सरांना कर्तव्यदक्ष व तत्पर शिक्षक अधिक प्रिय असायचे. आपल्या मधुर वाणीतून समोरच्या व्यक्तीस आपलेसे करणारे सरांचे व्यक्तिमत्व होते. सरांच्या संपर्कात आलेली व्यक्ती त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांना कधीच विसरत नसे. सरांचे वैशिष्ट्ये म्हणजे अत्यंत अभ्यासू, टापटीप व नीटनेटकेपणा, साधी रहाणी उच्च विचार, अजातशत्रू, मधाळ वाणी, शिस्तप्रियता, विद्यार्थी व शिक्षकप्रिय, बहुआयामी शिक्षक, उत्कृष्ट वक्ते, वाचनाचा व्यासंग, कर्मनिष्ठ, हसतमुख, सुंदर हस्ताक्षर, माणसे जोडण्यात अग्रेसर, सामाजिक बांधिलकी सदैव जोपासणारे, गरजवंतासाठी  देवदूत, अडचणीतील लोकांचे मार्गदर्शक, सत्याची व न्यायाची बाजू घेणारे, प्रसंगी कठोर निर्णय घेण्याची क्षमता, मोठा मित्र परिवार जमविणारे सरांचे व्यक्तिमत्व होते. सिन्नर मध्ये माधवराव देशमुख सरांना ओळखत नाही, अशी व्यक्ती शोधून सापडणे अवघड होते. विद्यालयाच्या कामात सतत व्यस्त असलेल्या देशमुख सरांची आपल्या स्वभावानुसार विद्यालयातील प्रत्येक घटकाकडून काम करून घेण्याची पद्धती वाखाणण्याजोगी होती. सरांची उपशिक्षक म्हणून जास्तीत-जास्त सेवा याच विद्यालयात झाली असल्याचा फायदा देखील विद्यालयास होतांना आम्ही अनुभवलेला आहे. सरांचे बरेच जुने विद्यार्थी तेव्हा पालक असल्याने शाळेतील नवीन प्रवेशासाठी वर्षभर त्यांना सर आवाहन करतांना दिसायचे. यातून त्यांची शाळेविषयीची तळमळ दिसून येत होती.आपल्या स्टाफ मधील कुणाकडे काही कार्यक्रम असेल, तर सर नेहमीच त्यांना मदतीसाठी तयार असायचे. त्याच बरोबर स्टाफ मेम्बरकडे कार्यक्रमासाठी सर्वांच्या उपस्थितीचा आग्रह देखील धरत असत. त्यामुळे संपूर्ण स्टाफ कार्यक्रमासाठी उपस्थित रहात असायचा. पर्यवेक्षकपदी कार्यरत असतांना वेळ प्रसंगी शिक्षकांकडून काम करून घेतांना कठोर निर्णय देखील सर घेत असत.  शहरातील लहान-थोरांमध्ये मानाचे स्थान मिळविलेले सर अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व होते. सिन्नर शहराची खडानखडा माहिती असलेले देशमुख सर सिन्नरचा चालताबोलता इतिहास होता. मला भावलेल्या श्री. एम.पी. देशमुख सरांकडून मला मिळालेले संस्कार आज शिक्षक म्हणून काम करतांना खूपच उपयोगी ठरत आहेत.    
             येथील सेवेत मला सुरुवातीला जेष्ठ सहकारी म्हणून मा.श्री. बी. जी. थोरात सरांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. सरांची बदली मनेगाव येथे असतांना त्यांची व माझी ओळख झाली. त्यावेळी माझ्या सारख्या नवीन शिक्षकाला सरांची कार्यशैली खूपच प्रेरणादायी ठरली. मनेगाव येथील विद्यालयात आमच्यासाठी सर एक दिपस्तंभाप्रमाणे होते. पुढील काळात सरांची बदली सिन्नर येथे झाली.  सरांची सर्वाधिक सेवा सिन्नर येथील  विद्यालयात झालेली आहे. त्यामुळे येथील विद्यालयाची इमारत उभारण्यासाठी इतर शिक्षकांसोबत श्री. बी.जी. थोरात सरांचे योगदान महत्वाचे होते. आजचे वाजे विद्यलाय सुरुवातीचा बराच काळ गावातील हनुमान इमारतीत भरणाऱ्या जनता विद्यालय ते सिन्नरच्या वैभवात भर टाकणारे आजच्या नावारूपास आलेल्या  विद्यालयाची भव्य इमारत असलेले लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर हा प्रवास जवळून बघणाऱ्या निवडक शिक्षकांत श्री. एम.पी. देशमुख व श्री. बी.जी.थोरात सरांचा समावेश आहे.  मविप्र संस्थेत व संपूर्ण नाशिक जिल्ह्यात गणित व विज्ञान विषयाचे परिपूर्ण शिक्षक म्हणून सरांची ओळख होती.  सर अत्यंत मितभाषी, विज्ञाननिष्ठ, कर्मनिष्ठ, तत्वनिष्ठ, स्वच्छतेचे पुरस्कर्ते, पर्यावरण प्रेमी, शिस्तप्रिय, अत्यंत अभ्यासू, उत्तम वक्ते, कडक शिस्तीचे, परोपकारी, विद्यार्थी हित जोपासणारे, सर्वांसाठी आदर्श मार्गदर्शक इ.  वैशिष्ट्ये सरांचे सांगता येतील. सर्व विद्यार्थी व शिक्षकांना नेहमीच सरांची आदरयुक्त भीती वाटायची. त्यामुळे सहजासहजी कुणीही सरांकडे येण्यास तयार होत नसे. सरांचे आपल्या अध्यापन विषयावर प्रभुत्व होते, त्यामुळे गणितासारखा कठीण विषय देखील विद्यार्थ्यांना सोपा करून शिकविण्याची कला त्यांना अवगत होती. त्यांच्या परिणामकारक अध्यापनाद्वारे सरांची  विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून विद्यालयात ख्याती होती. पर्यवेक्षक पदी कार्यरत असतांना देखील सरांनी आपल्या वर्ग अध्यापनांकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही,  ते स्वतः आपले अध्यपनाचे काम प्राधान्याने करत. सरांनी विद्यालयातील कोणत्याही विद्यार्थ्याचा बेशिस्तपणा कधीही खपवून घेतला नाही. त्याच बरोबर गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शक्य असेल ती मदत मिळवून देण्याचा सरांचा नेहमीच मानस असायचा. सरांना आपल्या कामात प्रामाणिक असलेले शिक्षक, कोणत्याही कामासाठी सदैव तयार असलेले शिक्षक प्रिय होते. विद्यालयात पर्यवेक्षक म्हणून सर कार्यरत असतांना, कामात कुणीही केलेला हलगर्जी त्यांनी खपवून घेतला नाही. गरज भासल्यास संबधितांची कडक शब्दांत कान उघाडणी करण्यात त्यांनी मागेपुढे पहिले नाही. सरांनी प्रशासनात बेशिस्तपणा कधीही खपवून घेतला नाही, त्यामुळे विद्यालयातील प्रत्येक घटक जबाबदारीने काम करत असे. श्री.बी.जी.थोरात सरांनी घरात दीर्घ काळापासून वैद्यकीय उपचार घेत असलेल्या सौ. थोरात मॅडमची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. याचा आपल्या शालेय कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता घेतली. त्यासंदर्भात कुणाशीही फारशी चर्चा केली नाही, यातून सरांचा त्याग व मोठेपणा मला अनुभवयास मिळाला. सरांकडून एखाद्या शिक्षकास शाबासकी मिळविणे म्हणजे एखादा पुरस्कार मिळविण्यासारखे कठीण काम होते. सर नेहमी चांगले काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते. माझी २००६ मध्ये अचानक मविप्र संस्थेच्या अध्यापक विद्यालय, नांदगाव येथे बदली झाल्याने, माझ्या जीवनात निर्माण झालेल्या अस्थिरतेत मला वडीलकीच्या नात्याने सरांनी दिलेला आधार व मोलाचे मार्गदर्शन कधीही विसरता येणे शक्य नाही.  आजही मार्गदर्शक म्हणून सर मला मोलाचे मार्गदर्शन करतात. सरांच्या घरी जाण्याचा बऱ्याच वेळा योग्य आला तेव्हा त्यांनी केलेले आमचे आदरातिथ्य दीर्घ काळ स्मरणात राहणारे आहे. माझ्या दृष्टीने सरांकडून मला शिक्षक म्हणून संस्काराची खूप मोठी शिदोरी मिळाली, जी शिदोरी मला भावी काळात खूपच उपयुक्त ठरणार आहे.
           विद्यालयात घडलेला एक प्रसंग मला आज ही आठवतो. विद्यालयात नेहमीप्रमाणे रविवारी इयत्ता दहावीची सराव परीक्षेचा पेपर होता. पेपर सुरु होण्यापूर्वी श्री. बी. जी. थोरात सरांनी मला बोलून घेतले व म्हणाले ‘कदम सर, आम्ही सर्व शिक्षक श्री.एस. आर. पगार सरांच्या वडिलांचे दु:खद निधन झाल्याने, त्यांच्या अंत्यविधीला पांगरी येथे जात आहोत. तुम्ही विद्यालयात थांबून परीक्षेचे सर्व ब्लॉकचे फिरते पर्यवेक्षण करून पेपर घ्या. विद्यार्थ्यांना त्याप्रमाणे मी सूचना करतो.’ सरांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे मी सर्व वर्गात प्रत्येक एक विद्यार्थी नेमून प्रश्नपत्रिका वाटप करून दिल्या. विद्यालयात एक शिपाईमामा माझ्या मदतीसाठी दिले होते. त्यांच्या मदतीने मी सलग फिरते पर्यवेक्षण करून सरांनी माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठरविला. परीक्षेच्या वेळेत कोणताही गोंधळ न होऊ देता सराव परीक्षा उत्तम रीतीने पार पाडली होती. या परीक्षेचे पेपर तपासणी नंतर सर्वात कमी निकाल या सराव परीक्षेचा लागला होता. थोडक्यात सराव परीक्षेच्या वेळी वर्गात पर्यवेक्षक नसतांना देखील विद्यार्थ्यांनी त्यांना श्री. थोरात सरांनी केलेल्या आवाहना प्रमाणे स्वयं शिस्तीने व प्रामाणिकपणे सराव परीक्षेचा पेपर सोडविला होता हे विशेष...! यावरुन थोरात सरांच्या सुचानांचे पालन विद्यार्थी व शिक्षक काटेकोरपणे करत असायचे याचा अनुभव यावेळी मी घेतला. सराव परीक्षेचा पेपर संपल्या नंतर लगेच विद्यालयात नाशिकच्या डॉ. श्यामा कुलकर्णी यांचे दहावीच्या विद्यार्थ्यासाठी उद्बोधनपर व्याख्यान आयोजित केले होते.  व्याख्यान पूर्वनियोजित असल्याने रद्द करणे शक्य नव्हते. या व्याख्यानासाठी दहावीचे सर्व विद्यार्थी पार्वती हॉल समोरील जागेत मी घेऊन गेलो, कार्यक्रमाची रूपरेषा सांगून आवश्यक सूचना केल्याने, उद्बोधन व्याख्यानात कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घेत हा कार्यक्रम देखील मी उत्तमरित्या पार पाडला. कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात श्री. बी.जी. थोरात सर आले, त्यांनी मला काही अडचण वैगरे आल्याविषयी चौकशी केली. निरीक्षण शक्तीच्या जोरावर योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करण्याची क्षमता सरांकडे होती. येथील सेवेत मला सरांचे मिळालेले मार्गदर्शन, प्रोत्साहन व सहकार्य नेहमीच प्रेरणा देत राहील...!

क्रमशः

🌹प्रवास माझा🌹🙏
✒️शब्दांकन-✒️✒️🌹
श्री. एस. व्ही. कदम(सर)
ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, mvpdn

Comments

Popular posts from this blog

वाजे विद्यलाय-१

महाविद्यालयीन जीवनातील मित्र...!

नांदगाव भाग-5