नांदगाव भाग-1
आठवणीतील नांदगाव....!🌹🌹🙏
(अ. वि. नांदगाव)भाग-1
✒️शब्दांकन- ✒️श्री. एस.व्ही. कदम(सर)
सिन्नर येथील लोकनेते शंकरराव वाजे विद्यालयात मी गेल्या चार पाच वर्षापासून कार्यरत होतो. येथील विद्यालयात मी बऱ्यापैकी स्थिरावलो होतो. अध्यापनाबरोबरच विद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर सोपवलेले काम मी प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे जास्तीत जास्त काळ संगणक कक्षात शाळेच्या कामासाठी मी देत असे. शाळेच्या अतिरिक्त कामातून आनंदप्राप्तीची अनिभूती मला होत असायची. त्यामुळे मी प्रत्येक काम बिनचुक व मन लावून करत असायचो. जून 2006 मध्ये इयत्ता पाचवीत माझ्या मुलीने विद्यालयात प्रवेश घेतला होता. त्यामुळे तिला शाळेत घेऊन यायची, सुट्टी नंतर शाळेतुन घरी घेऊन जायची जबाबदारी मला पार पाडावी लागत असे. शाळेत काही काम असले तर उशिरापर्यंत तिला माझ्यासोबत थांबून एक प्रकारची शिक्षा तिला होत असायची. यावरून मला शाळेतून सहकाऱ्यांचे व घरातून नेहमीच दोन शब्द ऐकून घ्यावे लागत असायचे. याप्रमाणे एक दीड महिन्याचा कालावधी पार पडला होता. कुणाच्याही ध्यानी-मनी नसतांना 5 ऑगस्ट 2006 रोजी माझी बदली वाजे विद्यालयातून अध्यापक विद्यालय नांदगाव येथे झाली. माझी बदली झाल्याने मी पूर्णतः अस्वस्थ झालो होतो.
माझी विद्यालयातून बदली झाली हे समजताच मुलीने तर यापुढे मी शाळेत जाणार नाही असा हट्ट धरला होता, मात्र विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. बी. जी. थोरात सरांनी कुशलतेने तिची समजूत काढल्याने माझा एक प्रश्न सुटला होता. नांदगाव येथे बदली झाल्याने माझे अनेक सहकारी मला पदोन्नती मिळाली, गैरसोय झाली, गावाकडे बदली झाली, मॅडमची बदली तिकडे करून घ्या, दररोज अपडाऊन करा असे अनेक पर्याय सुचवत माझी समजूत काढून मला धीर देत होते. पण म्हणतात 'ना ज्याचे जळते, त्यालाच कळते' उक्तीचा अनुभव मला यावेळी आला. मी मात्र 'ऐकावे जणांचे करावे मनाचे' हे धोरण अवलंबले होते. कोणत्याही सेवकाला बदली झालेल्या ठिकाणी जाऊन हजर होणे गरजेचे असते. त्याप्रमाणे मला देखील बदली झालेल्या ठिकाणी जाऊन हजर होणे आवश्यक होते. अध्यापक विद्यालय नांदगाव येथे हजर होण्यासाठी आवश्यक तयारी मी आता सुरू केली होती.
सिन्नर येथे राहणारे परंतु नांदगाव महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले श्री. अरुण पोटे सरांचे मला मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मिळालेल्या मार्गदर्शनामुळे मला नांदगावला जाण्यासाठी हिम्मत मिळाली. सरांनी त्याचे कॉलेज सकाळी असल्याने सोबत घेऊन जायची व घेऊन यायची जबाबदारी घेतल्याने मला मोठा दिलासा मिळाला होता. मला तेव्हा अल्सरचा त्रास असल्याने अनेक प्रकारचे पथ्यपाणी पाळावे लागत होते. त्यामुळे जेवण डबा, गोळ्या-औषध, पुरेसे पिण्याचे पाणी इत्यादी गोष्टीची काळ्जी घ्यावी लागत होती.श्री.पोटे सरांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार मी नवीन बदली झालेल्या ठिकाणी रुजू होण्यासाठी सिन्नर येथून सकाळी साडेसहा वाजता बस स्थानकात पोहचलो. नाशिक जाणाऱ्या बस नाशिकरोडच्या शिवाजी पुतळ्याजवळ उतरून दिल्याने माझ्या प्रवासातील संघर्ष सुरू झाला होता.येथून चालत- चालत रेल्वे स्टेशन गाठले. श्री. पोटे सरांनी सांगितल्या प्रमाणे तेथे गेल्यानंतर रेल्वे पास साठी ओळखपत्र व नासिकरोड ते नांदगाव रेल्वे प्रवासाचा पास काढून घेतला.
नाशिकरोड रेल्वे स्टेशन वरील लोकांची धावपळ, मुंबईच्या लोकल प्रवासाची आठवण करून देणारी होती. रेल्वे स्टेशनवर बहुसंख्य प्रवासी नेहमीच अप-डाऊन करणारे असावेत. पुढील प्रवासासाठी मी रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर पोहोचलो. मनमाडसाठी गाडी येण्यास जवळपास एक तास वेळ होता. यावेळेत मी नांदगाव जाण्यासाठी ओळखीचे कुणी भेटते का? असा विचार करत होतो, मात्र मी नांदगाव येथे पहिल्यांदाच जात असल्याने ती शक्यता कमीच होती. रेल्वे स्टेशवर जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांची घोषणा होत होती पण रेल्वे प्रवासाचा फारसा अनुभव नसल्याने मला रेल्वेच्या अप आणि डाऊन मधील फरक देखील कळत नव्हता. रेल्वेच्या अप आणि डाऊन यातील फरक कळण्यासाठी चार-सहा महिन्यांचा कालावधी मला लागला. गाडी येण्यापूर्वी प्रवाशांच्या प्लॅटफॉर्मवर गर्दी वाढू लागली होती. नेहमीच्या प्रवाशांनी सकाळी पाच नंतर मनमाडसाठी पहिली गाडी पाऊने नऊ वाजता असल्याचे सांगितल्याने मला स्टेशनवरील गर्दीचे कारण समजले. मी प्रवासात नांदगाव जाणारी क अप-डाऊन करणारी व्यक्ती मिळते का याचा शोध घेत होतो, मात्र असे कुणीही मला भेटले नाही. प्लॅटफॉर्मच्या वाढत्या गर्दीने माझी अवस्था कळपातून चुकलेल्या वासरा प्रमाणे झाली होती.
प्लॅटफॉर्मवर वाढणारी गर्दी माझ्या पुढील प्रवासात प्रवासातील अडचणी दर्शवित होती. गाडी येण्याची घोषणा होताच प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी झाली होती. मी एका प्रवाशाला विचारले मला मनमाड पर्यंत जायचे आहे, त्यांनी मी पहिल्यांदा प्रवास करतोय हे बघून मला जनरल बोगी कडे जायला सांगितले. जनरल बोगी हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकत होतो. मी पुन्हा विचारले "कोठे असते जनरल बोगी?" त्यांनी सांगितले" इंजिनच्या मागे" मी सांगितलेल्या ठिकाणी धावपळ करत पोहोचलो. बघतो तर तेथे गर्दीचा महापूर आलेला होता. मी कसा तरी तेथे पोहोचल्यावर जनरल बोगीत जाण्यास मला खूप संघर्ष करावा लागला. रेल्वेत चढतांना होणारे अनेक गैरप्रकार ऐकलेले असल्याने, मला मनातुन भीती वाटत होती. पण आज नाईलाज होता पुढील प्रवासासाठी जनरल बोगीत लोकलच्या प्रवासात प्रमाणे आता जाण्यात यशस्वी झालो. प्रचंड गर्दी, सोबत असलेल्या बॅग बरोबर उभे राहणे देखील कठीण काम होते. मात्र सिन्नर- नांदगाव अपडाऊन कसे असेल? याची छोटीशी झलक या प्रवासातून मला अनुभवायला मिळाली होती. गाडीतील प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा नसतांना वेगवेगळे खाद्यपदार्थ, नवीन वस्तू विकणारे विक्रेते मात्र कोणतेही बंधन नसल्यासारखे वस्तू विक्री करतांना दिसत होते. त्यांच्या मार्गात कुणाचा अडथळा आला तर दादागिरीचे दोन शब्द इतरांना सूनावत होते. माझ्या रेल्वे प्रवासातील हा अनुभव मला थक्क करणारा असाच होता. काही वेळ एक पायावर तर काही वेळ दोन पायावर उभे रहात मी मनमाड पर्यंतचा काहीसा संघर्षमय प्रवास पूर्ण केला होता.
मनमाडला रेल्वेतून उतरल्यानंतर रेल्वे स्थानका शेजारी असलेल्या पोस्ट ऑफिस शेजारी नांदगाव येथे जाण्यासाठी काळी-पिवळी व्हॅन किंवा टॅक्सी उभ्या असतात. नांदगावच्या प्रवासासाठी असलेल्या ओम्नी व्हॅन मध्ये मागच्या सीटवर चार-चार प्रवासी बसलेले होते, पुढील सीटवर दोन एकूण दहा प्रवासी बसलेले होते. पाच अधिक एक असे आर. टी. ओ.च्या नियमाप्रमाणे परवाना असलेल्या गाडीत विनातक्रार दहा प्रवाशी अधिक एक चालक असा प्रवास नांदगावच्या दिशेने सुरु झाला होता. पाणेवाडीच्या पुढे गेल्यानंतर असे समजले की हिसवळ जवळील नदीवरील छोटा पूल पावसाने खाचल्याने मनमाड-नांदगाव वाहतूक विस्कळीत झाली होती. नांदगावकडील वाहतूक विस्कळीत झाली असे समजताच व्हॅन चालकाने आम्हाला रस्त्यात उतरून घेण्याची सूचना केली, मात्र गाडीत नेहमीचे अपडाऊन करणारे प्रवासी असल्याने त्यांनी चालकास नांदगाव येथे सोडण्याचा आग्रह धरला. येथे मी एकतेच्या शक्तीचे मोल अनुभवले. सर्व नोकरी करणारे असल्याने, चालकाने आम्हाला नांदगाव येथे थोडे उशिरा पण सुरक्षित पोहोचविले. मला इंग्लिश स्कूल, नांदगाव शाळेच्या गेटवर उतरविण्यात आले. तेथे उतरताच समोर दर्शनी भागात अध्यापक विद्यालय, नांदगाव वाचताच माझ्या जीवात जीव आला. माझ्या बदलीच्या ठिकाणी अनेक अडथळे पार करत सुखरूप पोहोचल्याचा आनंद मला झाला. असे म्हणतात ना 'सिर सलामत तो पगडी पचास' याचा प्रत्यय मला पदोपदी आला होता.
अध्यापक विद्यालय, नांदगाव येथे पोहचताच मी कार्यालयाकडे गेलो. प्राचार्य कक्षात विद्यालयाचे प्राचार्य श्री. टी. व्ही. भागवत सरांची भेट घेतली. प्राचार्यांनी कनिष्ठ लिपिक श्री.व्ही. आर. पाटील यांना बोलऊन मला विद्यालयात रुजू करून घेण्यास सांगितले. मी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अध्यापक विद्यालय नांदगाव येथे रुजू झालो. विद्यालयात रुजू झाल्यानंतर प्राचार्यांनी मला विचारले, "सर तुमचे जेवण झाले आहे का? मी उत्तर दिले, "नाही" मी सकाळपासून काही खाल्ले नसल्याने, मला प्रचंड भूक लागली होती. प्राचार्य म्हणाले,"माझे देखील जेवण बाकी आहे, आपण सोबत जेवण करू या." अशा प्रकारे पहिल्याच दिवशी आमच्या विद्यालयाच्या प्राचार्य साहेबांसोबत जेवण्याचे भाग्य मला लाभले. आमचे जेवण झाल्यानंतर मी शिक्षक दालनात गेलो. तेथे मात्र आमचा ओळख परिचय झाल्यानंतर तेथील शिक्षकांनी मी प्राचार्यांच्या सोबत जेवण केल्याने त्याच्या आहारी गेल्याचा निष्कर्ष काढल्याचे मला काही दिवसांनी समजले. अध्यापक विद्यालया नोकरी करणारे श्री.एस.डब्ल्यू. शेवाळे सर, श्री. एस.बी.देसले सर, श्री.के.आर. राऊत सर, श्री. बी. के. पवार सर इत्यादी शिक्षक नाशिकहुन अपडाऊन करत असल्याचे समजल्याने माझ्यासारख्या बुडत्याला काडीचा आधार मिळालाहा होता. त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून हे सर्व माझे सहकारी माझे प्रवासातील सोबती बनणार होते, या गोष्टीचा मला मनस्वी आनंद झाला होता.
विद्यालयाची सुट्टी होताच माझा सिन्नरचा परतीचा प्रवास सुरु झाला, या प्रवासात माझे सिन्नर पासून दररोजचे सोबती अपडाऊन करणारे प्राध्यापक अरुण पोटे देखील भेटले. त्यांच्यासोबत प्रवास करतांना त्यांची माझी ओळख झाली. त्यांची ओळख माझ्या दृष्टीने फार महत्वाची होती, दुसऱ्या दिवसापासून पहाटे पाचच्या पॅसेंजरने मला श्री. पोटे सरांबरोबर डाऊन करायचे होते. प्रवासातील सर्व बारकावे मी त्यांच्याकडून जाणून घेत होतो. मात्र ते पहाटे लवकर उठून आले असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्टपणे जाणवत होता. नांदगाव ते नाशिक प्रवासात लहान बालकाप्रमाणे मी निरागसपणे अनेक प्रश्न सरांना विचारत होतो. सर माझ्या प्रश्नांची उत्तरे देत होते, सकाळी हजार होण्यासाठी जातांना प्रवासात झालेली तारांबळ येताना फारशी झाली नाही याचे कारण म्हणजे नियमित अपडाऊन करणारे माझ्या सोबतीला होते. नांदगाव येथून सोबत असलेले माझे सहकारी होते नाशिकरोड पर्यंतचा माझा प्रवास चांगला झाला. नाशिकरोडला उतरून सिन्नर येथे घरी पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. घरी पोहचण्यापूर्वीच पुन्हा नाशिकरोड येथून पहाटे पाचची गाडी पकडण्यासाठी पहाटे साडेतीन वाजता सिन्नर बस्थानकावर पोहचण्याची काळजी सोबत घेऊन घरी पोहचलो. अशाप्रकारे अध्यापक विद्यालय नांदगाव येथे झालेली बदली मला पहिल्याच दिवशी अनेक चांगले वाईट अनुभव देऊन गेले मात्र बदली झालेल्या नवीन ठिकाणी हजर होण्याची मोठी कामगिरी मी पार पाडल्याने अनेक अडथळे पार पाडून समाधानी होतो हे तितकेच खरे....!
क्रमशः
🌹🌹प्रवास माझा🌹🌹
शब्दांकन-✒️✒️🌹
श्री. एस.व्ही.कदम(सर)
अध्यापक विद्यलाय, नांदगाव
जि. नाशिक
Comments
Post a Comment