भाग-2
🌹🌹आठवणीतील नांदगाव .....!🌹🌹
(अ. वि. नांदगाव ) भाग-2
✒️शब्दांकन✒️ ✒️श्री. संजय कदम(सर)
अध्यापक विद्यालय, नांदगाव येथे सेवेत रूजू झाल्यानंतर पहिल्या दिवशी सिन्नरला घरी येण्यास बराच वेळ झाला होता. घरी पोहचतांना दुसऱ्या दिवशी पहाटे साडेतीन पावणेचार वाजता सिन्नर बस स्थानक येथे पोहचण्याचे दडपण सोबत घेऊन गेलो होतो. परिणामी रात्री झोपल्यानंतर पहाटे लवकर उठण्याची काळजी असल्याने अनेकवेळा जाग आली, घड्याळात किती वाजले? हे वारंवार बघण्याची सवय झाली होती. रात्रीची निवांत झोप यापुढे माझ्या नशिबात नसावी असे मी मनोमन गृहीत धरले होते. एक महिण्यापूर्वी माझ्या मित्रांच्या आग्रहाखातर मी नवीन मोबाईल घेतल्याने अलार्म लावण्याची सोय झाली होती. तसे घरात छोटे घड्याळात देखील सकाळी उठण्यासाठीची बेल लावलेली होती. पहाटे उठण्याची बेल होण्यापूर्वी मी पंधरा मिनिटे कधी अर्धा तास आधी उठून नांदगाव जाण्याची तयारी सुरु करत असे.
मी सिन्नर बसस्थानका शेजारील एस.टी.डेपोत मोटर सायकल लावून ठरलेल्या ठिकाणी पोहचत असे. सिन्नरपासून मला सोबत असलेले श्री.अरुण पोटे सर आल्यानंतर काही वेळा ताबडतोब प्रवासासाठीचे साधन मिळत असे, तर काहीवेळा एखादी बस भेटत असे. काही वेळा कोणतेही साधन न मिळाल्यास आम्ही स्टेट बँक समोर गाडीची प्रतीक्षा करत असायचो. येथे चहाची टपरी असलेल्या गृहस्थाशी माझी ओळख सरांनी करुन दिली होती. बऱ्याच वेळा तुळजापूर-नाशिक, लातूर-नाशिक, पुणे-कळवण, पुणे-पिंपळगाव, पुणे-साक्री यापैकी कोणतीही एक एस.टी. बस नाशिकरोड येथे जाण्यासाठी मिळत असे. काहीवेळा हिना ट्रॅव्हल्स, महाकाली ट्रॅव्हल्स किंवा खाजगी गाड्यांनी बेबभरवश्याचा व जीवधोक्यात घालून नाशिकरोड पर्यंतचा आमचा प्रवास नित्य नियमाने सुरु झाला होता. भल्या पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर फारशी रहदारी नसल्याने गाड्या भरधाव वेगाने चालत असल्याने आम्ही जीव मुठीत धरूनच बसत असू. प्रवासाचे मिळालेले साधन फार कमी वेळात नाशिकरोड येथील शिवाजी पुतळ्याजवळ आम्हाला उतरविले जात असे. तेथून आम्ही चालत साधारणत: पहाटेच्या साडेचार ते पौनेपाच पर्यंत नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथे पोहोचत असायचो. पहिल्या दिवशी रेल्वे स्टेशन वरील लख्ख प्रकाश व प्रवाशांची डोळे दिपवून टाकणारी गर्दी बघून मला पुढील प्रवासाचे काही खरे नाही असे वाटले...! परंतु दररोज अपडाऊन करणारे असंख्य मित्रांची ओळख श्री अरुण पोटे यांनी करून दिली यांनी करून दिली. यामध्ये प्रामुख्याने सर्वाधिक काळापासून प्रवास करणारे आमचे अपडाऊनचे सहकारी नांदगाव महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक श्री. साबळे सर यांची ओळख आमच्या प्रवासामध्ये नेहमीच स्मरणात राहणारी ठरली. त्याचेच सहकारी हिंदी विषयाचे प्राध्यापक श्री. नितीन पाटील सर, भूगोल विषयाचे प्राध्यापक श्री संजय पगार सर, नाशिक शिक्षण प्रसारकचे, नांदगाव येथील व्ही.जे. हायस्कुलचे शिक्षक श्री. तुषार साळुंके सर, श्री.भाऊलाल पवार सर यांची देखील ओळख झाली होती. त्याचबरोबर अध्यापक विद्यालयातील माझे सहकारी मित्र श्री. शेवाळे सर,श्री. देसले सर, श्री. राऊत सर , श्री पवार सर मला स्टेशनवर भेटल्यानंतर त्याच्यासोबत पुढील प्रवास होत असायचा.
पहाटे पाच वाजता देवळाली-मनमाड-भुसावळ पॅसेंजर एक नंबर प्लॅटफॉर्मवर येताच रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी असून आम्हाला दररोज जागा मिळत असे. आमचे दररोज अपडाऊन करणारे मित्र आमच्यासाठी पॅसेंजर थांबण्यापूर्वीच गाडीत चढून जागा सांभाळून ठेवत असत. आमचे बरेच सहकारी वरील बर्थवर निवांत झोपलेले असायचे. सुरुवातीचे काही दिवस मला ही गोष्ट योग्य वाटत नव्हती, पण म्हणतात ना 'नित मरे, त्याला कोण...!' याप्रमाणे मला देखील या प्रवासाची सवय झाली होती. बर्थवर टाकण्यासाठी रद्दीवर्तमानपत्र व पांघरण्यासाठी शाल आता बॅग मध्ये सोबत असायचे. माझ्या अपडाऊनच्या सहकारी मित्रसॊबत मलादेखील सकाळच्या प्रवासात शरीराला विश्रांतीसाठी झोप घेण्याची सवय लागली. माझ्यासाठी देवळाली-भुसावळ पॅसेंजरचा नित्याचा पण अनोखा प्रवास दररोज खुप काही शिकविणारा होता ....!
देवळाली-भुसावळ पॅसेंजर ने माझा प्रवास नांदगावच्या दिशेने सुरू झालेला प्रवास किती दिवस सुरु राहणार होता? हे कुणालाही माहित नव्हते. नाशिकहून ओढा-खेरवाडी-सुकेणा-निफाड-उगाव-लासलगाव-समीट असे छोटे- मोठे स्टेशनवर थांबत पॅसेंजर साधारणतः सकाळी साडेसहा वाजता गाडी मनमाड रेल्वे स्टेशनवर पोहोचत असे. तेथील चहा, वडापाव व वर्तमानपत्र विक्रेतेत्यांच्या आवाजाने झोपलेले जवळपास सर्वच प्रवासी उठत असत. दररोज अपडाऊन करणारे आपापल्या सोयीनुसार फ्रेश होऊन उपलब्ध असलेल्या जागेवर येऊन बसायचे. मनमाडहुन-पाणेवाडी-हिसवळ-पांझन-नांदगाव या अर्ध्या तासाच्या प्रवासा नंतर पॅसेंजर सात-सव्वासात वाजता नांदगावला पोहचत असे. याप्रवासात दररोज अनेक नवीन सहकारी मित्रांचा ओळख परिचय होत असायचा. पॅसेंजर नांदगाव येथे थांबताच उतरल्यानंतर महाविद्यालयातील प्राध्यापकांचे कॉलेज आठ वाजता भरणार असल्याने ते निवांत असायचे. मात्र आमचे अध्यापक विद्यालय सात वाजून वीस मिनिटांनी भरत असल्याने विद्यालयात वेळेत पोहोचण्याची माझ्या सहकार्यांची लगबग सुरू झालेली असायची. सर्व अनुभवाने व वयाने माझ्या पेक्षा जेष्ठ व श्रेष्ठ होते. मी त्यांच्यासोबत धावत होतो, त्यांच्यासोबत केलेली धावपळ मला विद्यालयात वेळेवर पोहोचण्यास उपयोगी ठरत असायची. अध्यापक विद्यालयातील शिस्त वाखाणण्याजोगी होती. विद्यालयाची सुरुवात आदर्श परिपाठाने होत असायची. परिपाठात ठरवून दिलेले घटक नेमूण दिलेले छात्राध्यापकांचा गट परिपूर्ण परिपाठ सादर करत असत. परिपाठातील प्रत्येक घटक नाविन्यपूर्ण व आत्मविश्वासाने सादरीकरण होत असल्याचे. परिपाठामध्ये घेतलेली प्रार्थना व सर्वच घटक आम्हां शिक्षकांसह छात्राध्यापकांना अनेक नवीन बाबी शिकऊन जात असत. पहिल्या दिवसापासून विद्यालयातील परिपाठाने माझे मन जिंकले होते. म्हणतात ,' First impression is last impression.' विद्यालयाची सुरुवात उत्साहाने उत्तम होत असायची, त्यामुळे अध्यापन परिणामकारक होत असे.
बदलीच्या दुसऱ्या दिवशी आमच्या विद्यालयाच्या प्राचार्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतले. माझ्याकडे असलेले अध्यापनाचे विषय, वर्ग सांगून वेळापत्रक माझ्याकडे दिले. माझा अध्यापनाचा मुख्य विषय हिंदी असल्याने, प्रथम वर्षाचे हिंदी व द्वितीय द्वितीय वर्षाचा एक विषय देण्यात येणार होता त्यासाठी प्राचार्यांनी मला विचारणा केली, "सर, तुम्ही कोणत्या विषयाचे चांगले अध्यापन करू शकाल? त्यानुसार विषय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो." मात्र यापूर्वी मी सिन्नर येथे दहावीपर्यंतचा संगणक विषय शिकविलेला असल्याने नांदगाव येथील आमचे सहकारी श्री. डी. व्ही. गोटे सरांनी त्यांच्याकडे असलेला माहिती संप्रेषण तंत्रज्ञान हा विषय मी विद्यालयात नवीन असल्याने माझ्याकडे देण्यासंबंधी प्राचार्यांना सूचित केले होते. मी एक दोन वेळा प्राचार्यांना हा विषय यापूर्वी शिकत असलेल्या शिक्षकांकडे ठेवण्याची विनंती केली, मात्र श्री. डी.व्ही. गोटे सर हा विषय मी चांगल्या पद्धतीने शिकवू शकतो हे पटवून देण्यात यशस्वी झाले आणि माझ्याकडे द्वितीय वर्षाचा माहिती संप्रेषण तंत्रज्ञान हा डी.एड.च्या अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट झालेला विषय शिकविण्यासाठी देण्यात आला.
अध्यापक विद्यालयात तसा मी नवखा असल्याने मला मिळेल तो विषय शिकविण्याची मी तयारी मी ठेवलेलीच होती. सुरुवातीच्या काही दिवसात मला विद्यालयाचे प्राचार्य व माझ्या सहकारी शिक्षकांनी तुम्ही अध्यापक विद्यालय, नांदगाव येथे सेवा करणार आहात? की बदली करून माध्यमिक विद्यालायकडे जाणार, याबाबत सारखी विचारणा करत होते. मात्र काही दिवसांनी नांदगावचा बदली बाबतचा इतिहास सांगायला ते विसरले नाहीत. मी उत्सुकते जाणून घेतले असता, अनेकांनी मला, "सर नांदगाव येथे बदली करून येणे सोपे आहे, परंतु येथून बदलून जाणे अत्यंत अवघड असल्याचे सांगितले." त्यामुळे नांदगाव येथून बदलून जाण्याची माझ्या मनात असलेल्या इच्छेला एका प्रकारे मोठा धक्काच बसला होता. माझ्या मनात बदली करून पुन्हा माध्यमिक विभागात काम करण्याची शक्यता दिवसेंदिवस धूसर होत गेली. माझ्याप्रमाणेच येथे कार्यरत असलेले माझे नाशिक येथून नियमितपणे अपडाऊन करणारे माझे सहकारी मित्र बदलीच्या प्रयत्नात होते. मात्र बदलीची आशा आता सर्वांनी सोडून दिली होती. मला ही बाब समजल्यावर आता मला दीर्घकाळ येथेच नोकरी करावी लागेल याचा अंदाज आला होता.
अध्यापक विद्यालयातील कामकाज माध्यमिक विद्यालया पेक्षा खूपच भिन्न होते. येथील सेवेत त्याचा अनुभव मी दररोज घेत होतो. यापूर्वी मी काम करत असलेल्या ठिकाणी जवळपास शंभर सेवकांचा मोठा स्टाफ होता. त्या तुलनेने नांदगाव येथे त्याच्या पंधरा टक्केच स्टाफ होता. अध्यापक विद्यालयातील तीस-तीस विद्यार्थ्यांच्या प्रत्येक वर्षाच्या दोन तुकड्या असल्याने अत्यंत सुटसुटीत वर्ग रचना होती. वर्गात अध्यापनासाठी गेल्यानंतर अध्यापक विद्यालयातील प्रवेश गुणवत्तेने होत असल्याची जाणीव मला विद्यार्थ्यांशी केलेल्या चर्चेतून झाली. विद्यार्थ्यांचे माझ्या विषयाचे ज्ञान तपासण्याचा मी प्रयत्न केला त्यामध्ये सर्व विद्यार्थी गुणवत्ताधारक असल्याने, मला बरेच समाधान वाटले. नियमित वर्ग अध्यापन सुरू झाल्याने भावी शिक्षकांना शिकविण्याचा आनंद आता मी घेऊ लागलो होतो. अध्यापक विद्यालयात अध्यपना बरोबरच प्रात्यक्षिक कामावर जास्त भर दिला जात असतो. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांचे माध्यमिक व प्राथमिक शाळेतील सराव पाठ, प्रत्येक विषयाचे प्रात्यक्षिक काम पूर्ण करून घ्यायची जबाबदारी विषय शिक्षकांची असायची. अध्यापक विद्यालयात छात्राध्यापकांचे अंतर्गत गुणदान करण्यासाठी डीएड 50 हा नवीन प्रकार समजला. अध्यापक विद्यालयात शिकवला जाणारा अभ्यासक्रम व्यावसायिक असल्याने उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50 टक्के गुणांची प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेत अट होती. त्यानुसार गुणदान करण्याची पद्धती मी माझ्या ज्येष्ठ सहकारी मित्रांकडून समजून घेतली. त्यानुसार कामकाज सुरू केले होते, मात्र मी माध्यमिक विद्यालयातून आलेलो असल्याने गुणदानाची पद्धती समजून घेणे माझ्यासाठी अडचणीची ठरत होती. मी विद्यालयात नवीन असल्याने अंतर्गत गुण भरण्याचे काम माझ्या जेष्ठ सहकाऱ्यांच्या मदतीने समजून घेऊन पूर्ण केले. याच वेळी छात्राध्यापकांचे वार्षिक पाठ घेण्याचे काम सुरु झाले होते. वार्षिक पाठ अंतर्गत गुणांचा भाग असल्याने छात्राध्यापकांच्या दृष्टीने वार्षिक पाठास खूप महत्व होते. यासाठी अध्यापक विद्यालयातील अंतर्गत परीक्षक व माध्यमिक विद्यालयातील अनुभवी शिक्षक किंवा दुसऱ्या अध्यापक विद्यालयातील शिक्षकांची बाह्य परीक्षक नेमणूक केलेली असायची. अध्यापक विद्यालयात मला वार्षिक पाठ बघण्यासाठी अंतर्गत परीक्षक म्हणून नेमण्यात आले होते. त्यासाठी प्रत्येक पाठासाठी अंतर्गत परीक्षकास दहा रुपये व बाह्य परीक्षकास प्रत्येकपाठासाठी वीस रुपये असे मानधन देखील मिळत असायचे. मी बी. एड. पूर्ण केल्यानंतर मला खूप दिवसांनी विद्यार्थ्यांचे पाठ बघण्याचा योग आला होता. माझया बी.एड.करत असतातांच्या कॉलेजच्या दिवसांची आठवण यानिमित्ताने ताजी झाली होती. अशा पद्धतीने अध्यापक विद्यालय, नांदगाव येथे गैरसोयीने झालेल्या बदलीने मला थोड्याच दिवसात खुपकाही शिकायला मिळाले. अध्यापक विद्यालयातील वार्षिक कामकाज पूर्ण होऊन प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी वार्षिक परीक्षेसाठी जाणार होते. मी अध्यापक विद्यालयात आता थोडाफार स्थिरावण्यास सुरुवात झाली होती. अध्यापक विद्यालयात गुणवत्तेनुसार प्रथम वर्षासाठी प्रवेशाची प्रक्रिया सुरू होती, नवीन विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी येत होते. आमच्या अध्यापक विद्यालयातील सत्तर टक्के प्रवेश विभागीय स्तरावर व तीस टक्के राज्यस्तरावरील प्रवेश पद्धतीने झाले होते. राज्यस्तरीय प्रवेश पद्धतीतून जास्तीत-जास्त विद्यार्थी विदर्भ व मराठवाड्यातील असायचे. अशा पद्धतीने आमच्या अध्यापक विद्यालयातील प्रथम वर्षाच्या संपूर्ण जागा नवीन प्रवेशाने भरल्या गेल्या होत्या. प्रथम वर्षाच्या प्रवेशासोबतच या सत्राची सांगता झाली होती.
(टीप- विद्यार्थी मित्रांनो आपण कॉलेजला असतांनाचे फोटो असतील तर कृपया मला पाठवा. पुढील लेखासोबत fb वर टाकता येतील🌹🙏)
क्रमशः
✒️प्रवास माझा🌹🌹
शब्दांकन✒️ श्री. एस.व्ही.कदम(सर)✒️
अध्यापक विद्यालय, नांदगाव (नाशिक)
Comments
Post a Comment