नांदगाव भाग-3

आठवणीतील नांदगाव .........!🌹🌹
      (अ. वि., नांदगाव)  भाग-3
शब्दांकन- श्री. संजय कदम

                 आमच्या अध्यापक विद्यालयातील प्रथम वर्षाचे प्रवेश दीपावलीची सुट्टी लागण्यापूर्वीच पूर्ण झाले होते. दीपावलीच्या सुट्टी नंतर प्रथम वर्षाचे प्रवेशित विद्यार्थी विद्यालयात दाखल झाले होते, हे विद्यार्थी विद्यालयात नवीनच होते. मी देखील शिक्षक अध्यापक विद्यालयात नवीनच होतो. नवीन आलेल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा श्रीगणेशा होतांना कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात? हे जाणून घेण्याची मला देखील उत्सुकता होती. दरवर्षी सर्वप्रथम आम्ही शिक्षक नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा ओळख परिचय करून घेत असायचो. याचकाळात नवीन छात्राध्यापकांचे स्वागत द्वितीय वर्षाचे छात्राध्यापक मोठ्या उत्साहाने करत असत. प्रथम व द्वितीय वर्षाचे छात्राध्यापक अध्यापक विद्यालयातील वस्तीग्रह वस्तीगृहात राहात असत येथे भोजन व्यवस्था नसल्याने वसतिगृहातील विद्यार्थी जेवणासाठी मेसवर जात असायचे. चारही बाजूंनी वस्तीगृह दाट झाडांनी वेढलेले होते. मुलांच्या वस्तीगृहाचे बांधकाम जुन्या पद्धतीचे असल्याने सुविधांच्या बाबतीत थोडे तोकडे होते. वस्तीगृहाची फी देखील सुविधांचा विचार करता माफक असायची. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे रेक्टर म्हणून सुरुवातीस श्री. डी. व्ही. गोटे सर व त्यानंतर श्री. बी.डी.बाराहाते कामकाज यशस्वीरीत्या बघत होते. अध्यापक विद्यालयातील विद्यार्थिनीच्या राहण्याची व्यवस्था नांदगाव महाविद्यालयातील वस्तीगृहात केलेली होती मुलांच्या तुलनेत मुलींच्या वसतिगृहात सोलरसह भौतिक सुविधा उत्तम होत्या. त्यामुळे तेथे आकारली जाणारी फी देखील तुलनेने अधिक होती. सुनिता चांगला असला तरी विद्यार्थिनींना जेवणासाठी मेस वरून जेवणाचे डबे बोलवावे लागत असत. येथे वसतिगृहाचे रेक्टर म्हणून प्रा. काजळे सर उत्तम प्रकारे कामकाज बघत असत. या दोन्ही वस्तीगृहामुळे बाहेर गावाहून येथे शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची राहण्याची चांगली व्यवस्था झाली होती पालकांना आपल्या पाल्याची फारशी काळजी वाटत नसायची. अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य विद्यालयाच्या परिसरात असलेल्या क्वार्टर मध्ये राहत असायचे त्यामुळे वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांवर नियंत्रण असायचे.
                   नवीन प्रवेशित छात्राध्यापकांना सर्वप्रथम सूक्ष्मपाठाची (मायक्रो टिचिंगची) ओळख विद्यालयातील ज्येष्ठ अध्यापकाचार्य श्री.एस. डब्ल्यू. शेवाळे, श्री. एस.बी.देसले, श्री. एस.बी.आहेर, श्री.डी. व्ही. गोटे इत्यादींनी मायक्रो टीचिंगचे उद्देश ,स्वरूप, गरज व महत्व स्पष्ट करून दिले. मी देखील बी.एड. झाल्यानंतर माध्यमिक विद्यालयाकडे सेवा केल्याने बऱ्याच बाबी विसरलो होतो. त्यामुळे अध्यापक विद्यालयात मलादेखील मायक्रो टिचिंग समजून घ्यायचे होते. पाठ समिती प्रमुख श्री. एस. डब्ल्यू. शेवाळे सरांनी  विद्यालयातील प्रत्येक अध्यापकाचार्यास एक-एक सूक्ष्म कौशल्य वाटून दिले होते. त्यानुसार प्रत्येक अध्यापकांचार्य त्यांना सोपविलेल्या कौशल्याचा (पाच मिनिटाचा) नमुना पाठ नवीन छात्राध्यापकांसमोर घेतला.   मी विद्यालयात नवीनच असल्याने शक्य असतील ते सर्व सूक्ष्मपाठ बघण्याचा प्रयत्न केला. मायक्रो टिचिंगसाठी माझ्याकडे 'पाठाचा प्रारंभ' अर्थात 'प्रस्तावना'  कौशल्य देण्यात आले होते. कोणत्याही पाठाच्या सुरुवातीस वापरले जाणारे हे कौशल्य असल्याने सराव पाठाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे कौशल्य मला देण्यात आले होते.  मी माझ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांकडून  'प्रस्तावना कौशल्य' व्यवस्थित समजून घेतले होते. भावी शिक्षकांना घडवण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी मी पूर्ण केली.  मी वेळेचे बंधन पाळत माझ्या कडे असलेले 'प्रस्तावना कौशल्य' उत्तम रीतीने घेण्याचा प्रयत्‍न केला. माझ्या कौशल्य पाठास विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्याने माझा अस्तमविश्वास वाढीस लागला. सर्वच अध्यापकाचार्यांनी घेतलेल्या कौशल्याचे नमुना पाठ टाचण विद्यालयाच्या शोकेस मध्ये लावल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याच्या आराखड्यानुसार आपल्या आवडीचा  विषय  व घटक घेण्याचे स्वातंत्र्य  छात्राध्यापकांना होते. मायक्रो टिचिंगचे पाठ गटागटाने होत असायचे. काही  छात्राध्यापक  उत्तम पाठ टाचणासह उत्कृष्ट सादरीकरणाने जास्तीत जास्त गुण पदरात पाडून घेत. काही छात्राध्यापकांना मात्र  आत्मविश्वासाच्या अभावाने मायक्रो टीचिंगचे पाठ वारंवार घ्यावे लागत असत. हा उपक्रम छात्राध्यापकात योग्य आत्मविश्वास निर्माण होईपर्यंत सुरूच असायचा. या छात्राध्यापकांचे एक-एक कौशल्याचे पाठ आम्हाला अनेक वेळा बघायचे अतिरिक्त काम करावे लागत असे. सूक्ष्म पाठांच्या समारोपासह छात्राध्यापकांत पुरेसा आत्मविश्वास प्राप्त झालेला असायचा. यानंतर छात्राध्यापकांना दोन सेतू पाठ देखील घ्यावे लागत असायचे. सेतुपाठ दहा मिनिटांचे असायचे जे मायक्रो व सरावपाठ यातील दुवा म्हणून छात्राध्यापकांना उपयोगी ठरत.
            छात्राध्यापकांचे सूक्ष्म पाठ पूर्ण झाल्यानंतर सर्व अध्यापकाचार्य आपल्या विषयाचे नमुना पाठ (तीस मिनिटांचे) छात्राध्यापकांसमोर संबंधित वर्गाचे शाळेतील विद्यार्थ्यांसमोर घेत असत. त्यानंतर छात्राध्यापकांच्या प्रत्येक शंकेचे समाधान चर्चा करून अध्यापकाचार्य करत असत.  त्यांनी घेतलेल्या पाठाचे नमुना टाचण छात्राध्यापकांसाठी शोकेसमध्ये लावले जात असे. पाठांच्या आराखड्याप्रमाणे पाठ टाचण काढणेआम्हांला अपेक्षित असायचे.  आमच्या छात्राध्यापकांचे सराव पाठ नांदगाव नगरपालिका शाळा क्रमांक 2, 6 व 10, छाजेड प्राथमिक विद्यामंदिर,नांदगाव., जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिसवळ बुद्रुक, स्टेशनचे हिसवळ व न्यू इंग्लिश स्कुल नांदगाव या शाळांवर दिलेल्या वेळापत्रक व घटकानुसार होत असायचे. सराव पाठाचे मार्गदर्शन विषय शिक्षकांकडून छात्राध्यापक घेत असायचे. संबधित अध्यापकाचार्य सराव पाठ टाचण काळजीपूर्वक बघून तपासूण देत असत. त्याचबरोबर त्यातील चुका शोधून छात्राध्यापकांना पाठ टाचण पुन्हा-पुन्हा लिहायला सांगत. त्यामुळे बरेच छात्राध्यापक अध्यापकाचार्य आम्हाला त्रास देतात असा गैरसमज करून घेत. मात्र तसा कोणताही उद्देश अध्यापकाचार्यांचा नसायचा.असे म्हणतात 'इमारतीचा पाया पक्का असला की इमारत भक्कमपणे उभी राहते' हाच दृष्टिकोण येथे मार्गदर्शकांचा असायचा. 
               सराव पाठांच्या वेळी घडलेला एक प्रसंग मला आजही आठवतो. छाजेड प्राथमिक विद्यामंदिर,नांदगाव येथे सरावपाठ सुरु असतांना शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक माननीय श्री. प्रभाकर काकळीज सर आमच्या छात्राध्यापकांचे पाठ अधून-मधून बघत असायचे. छात्राध्यापक अध्यापनात चुकले, तर त्यांना योग्य सूचना करून दुरूस्ती सुचवत असायचे, गरज पडल्यास वडीलकीच्या नात्याने रागवत देखील असत. त्याचबरोबर उत्कृष्ट पाठ घेणाऱ्या छात्राध्यापकांच्या पाठीवरून कौतुकाची थाप देणारे श्री. प्रभाकर काकळीज सर खरे तरआमच्यासाठी उत्तम मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत असत. त्यांची  तळमळ बघून मी त्यांच्या विषयी अधिक जाणून घेतल्याचा प्रयत्न केला, तेव्हा असे कळले की, श्री. काकळीज सर देखील अध्यापक विद्यालय, नांदगाव येथील डी.एड.चे विद्यार्थी होते.  आपल्या विद्यालयाच्या नावलौकिकासाठी ते  नेहमीच आमच्या छात्राध्यापकांना अनमोल मार्गदर्शन करत असायचे.  त्यांच्या शाळेवर  कोणत्याही प्रकारचा बेशिस्तपणा सरांनी खपवून घेतला नाही. छाजेड प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी व त्यांचे नाते  कुटुंबातील सदस्याप्रमाणे होते.  त्यांचा शाळेत शिकणारे विद्यार्थी पालकांवर त्यांचा एक प्रकारचा दरारा होता. म्हणूनच पाल्यांना सोडवायला आलेले पालक शाळेच्या गेटपासूनच काढता पाय घेत असत. त्यांच्या शाळेतील विद्यार्थी व पालकांना श्री. काकळीज सरांची आदरयुक्त भीती वाटत असे. विद्यार्थ्यांची तक्रार असल्यास त्यांच्या पालकांना कठोर दोन शब्द ऐकविण्यास सर मागेपुढे बघत नसत. त्यांच्या उत्तम प्रशासनाने छाजेड प्राथमिक शाळेने नांदगाव परिसरात चांगलाच नावलौकिक मिळविला होता, तो आजही टिकून आहे. सरांच्या शाळेवर पाठ घेणे आमच्या छात्राध्यापकांना भावी शिक्षक म्हणून खूपच उपयोगी ठरत असायचे. त्यामुळेच आमच्या विद्यालयाचे  छात्राध्यापक पाठासाठी जातांना आवश्यक तयारी व शैक्षणिक साहित्य घेऊन जाण्यास विसरत नसायचे. भावी काळात शिक्षक होणाऱ्या छात्राध्यापकांना नमुना पाठ टाचणातील चुका दुरुस्त होत गेल्यावर अनेक छात्राध्यापक बिनचूक पाठ टाचण काढण्याचं कौशल्य आत्मसात करत.  आम्ही  पाठ टाचणावर घेतलेल्या कष्टाचे फळ प्रत्यक्ष रूपाने वर्षाच्या शेवटी आम्हाला बघायला मिळत असायचे.
                छात्राध्यापकांचे सराव पाठ संपल्यानंतर द्वितीय वर्षाच्या छात्राध्यापकांना पंधरा दिवसांसाठीचे पाक्षिक सुरु होत असायचे. पाक्षिक उपक्रमाची सुरुवात आमच्या विद्यालयाचे प्राचार्य व संबंधित  शाळेचे मुख्याध्यापक  यांच्या उपस्थितीत  शानदार उद्घाटन सोहळ्याने होत असे. पुढील पंधरा दिवसात  होणाऱ्या  उपक्रमांचे नियोजन केले जायचे . या उपक्रमांतर्गत छात्राध्यापकांना एक वर्ग पंधरा दिवसांसाठी दिला जात असे.  शाळेच्या परिपाठात पासून तर शाळा सुटेपर्यंत सर्व नियंत्रण छात्राध्यापकांतुन निवडलेल्या मुख्याध्यापकांना करावे लागत असे. स्वतंत्र वर्ग व शाळा चालविण्याचा अनुभव येथे छात्राध्यापक घेत असत. वर्षभर सराव पाठांसाठी घेतलेली मेहनत, उत्कृष्ट अध्यापनाचा बरोबरच विविध उपक्रम शाळेत राबविण्याचा प्रयत्न करत असायचे. याकाळात छात्राध्यापक शाळेच्या  भिंती विविध प्रकारच्या लेखनाने बोलक्या करत, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, खेळाच्या विविध स्पर्धा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, वनभोजन इत्यादी उपक्रम संबंधित शाळेवर घेत असत.  पाक्षिक उपक्रमातून छात्राध्यापक जास्तीत जास्त गुण प्राप्तीसाठी प्रयत्न करत असत. पाक्षिक शाळेतून छात्राध्यापकांची निर्णय क्षमता व स्वतंत्रपणे वर्ग हाताळण्याचे कौशल्य बघण्याची संधी आम्हाला मिळत असायची. अध्यापक विद्यालयात श्री.एस.बी.आहेर सरांनी घेतलेला जोडपाठाचे स्वरूप एकावर्गासाठी ज्ञानपाठ तर दुसऱ्या वर्गासाठी आवृत्तीपाठ खूपच उत्तम प्रकारे घेतल्याचे आज देखील मला आठवते. छात्राध्यापकांना या काळात दोन जोडपाठ घ्यावे लागत असायचे. द्विशिक्षकी शाळेवर नोकरी करतांना हे पाठ खूप उपयोगी ठरत असते.उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या छात्राध्यापकाचे शाळेचे मुख्याध्यापक व इतर शिक्षक कौतुक करत उत्साह वाढविण्याचे काम करत असायचे. त्याचबरोबर मार्गदर्शन करण्याचे काम देखील मुख्याध्यापक व शिक्षक करायचे. अशाप्रकारे छात्राध्यापक घडविण्यामध्ये पाक्षिक असलेल्या शाळांचे योगदान महत्त्वाचे होते. पाक्षिक उपक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांनी घेतलेल्या विविध स्पर्धाच्या विजेत्या विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरणाने होत असे.  याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक या उपक्रमात छात्राध्यापकांनी केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा सादर करत. छात्राध्यापक शालेय परिसर सोडतांना त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी भावुक होऊन दिलेला निरोप  छात्राध्यापकांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची पावती देत असत. पाक्षिकाचा उपक्रम छात्राध्यापकांना भावी काळात शिक्षक म्हणून कामकाज करण्याच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा उपक्रम होता असे म्हणता येईल.
                 द्वितीय वर्ष पाक्षिका सोबतच विद्यालयातील प्रथम वर्षाच्या छात्राध्यापकांचे सराव पाठ संपल्यानंतर विद्यालयाच्या परिसरात श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले जात असे. श्रमसंस्कार शिबिर दहा दिवस सुरू असायचे, या शिबिरातून विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्व पटवून देण्यासाठी प्रत्येकाला स्वतः श्रमसंस्कार शिबिरात सर्व छात्राध्यापकांना श्रम करावे लागत असे. श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य व श्रम संस्कार शिबीर प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असायचे. या दहा दिवसांमध्ये  केल्या जाणाऱ्या कामांचे नियोजन केलेले असायचे.  अध्यापक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाच्या पाठीमागे असलेल्या बागेतील स्वच्छतेचे काम, झाडांना पाणी घालणे, परिसराची स्वच्छता, दोन्हीं  वस्तीगृहाची स्वच्छता, अध्यापक विद्यालय परिसरातील प्रवेशद्वारापासून तर प्राथमिक शाळेच्या पाठीमागे असलेल्या बागीच्या पर्यंतचा सर्व परिसर स्वच्छतेचे काम या काळात करून घेतले जात असे. या काळामध्ये श्रमाचे महत्त्व पटवून देणारे व्याख्यानाचे आयोजन, योग शिक्षणाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर केले जायचे.  श्रमसंस्कार शिबिरांतून भावी काळातील शिक्षकांना श्रमाचे महत्व प्रात्यक्षिकातून मिळत असायचे. श्रमसंस्कार शिबिराला अंतर्गत गुणांमध्ये गुण दिले जात असल्याने विद्यार्थी मोठ्या उत्साहाने श्रमदान शिबिरात सहभाग घेऊन उत्कृष्ट काम करत असत त्याचबरोबर विविध मनोरंजक कार्यक्रम देखील आयोजित केले जात असल्याचे छात्राध्यापकांच्या कलागुणांना यामुळे वाव मिळत असे. श्रमसंस्कार शिबिरात सकाळी चहा व नाश्ता, दुपारी एकत्रित सहभोजन  केले जात असायचे. यातूनच छात्राध्यापकात स्वयंशिस्त, कर्मनिष्ठा, श्रमनिष्ठा, नेतृत्वगुण, सृजनशीलता व संवेदनशीलता मूल्यांचे संस्कार होत असायचे. श्रमसंस्कार शिबिर खऱ्या अर्थाने छात्राध्यापक मित्रांना दीर्घकालीन संस्कारांची शिदोरी भावी जीवनासाठी देत असायचे.
                अध्यापक विद्यालय नांदगाव येथे मला अनुभवी मोलाचे मार्गदर्शन करणारे सहकारी अध्यापकाचार्य भेटल्याने मला अध्यापन करताना किंवा विविध उपक्रमांचे निरीक्षण करताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या नाहीत प्रकारच्या अडचणी आल्या नाहीत यामध्ये प्रामुख्याने प्राचार्य श्री.टी.व्ही. भागवत, जेष्ठ अध्यापकाचार्य श्री. एस. डब्ल्यू. शेवाळे, श्री एस. बी. देसले, श्री के. आर. राऊत,श्री एस. बी. आहेर, श्री डी. व्ही. गोटे, श्री. बी. के. पवार, श्रीम.ए.के. महाले, श्री. पी. यू .पाटील व श्रीम. आर.व्ही. आहेर इत्यादींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. काही सहकारी मित्र बदलून गेल्याने त्यांच्या जागी प्राचार्य श्री.एस. सी. पाटील सर व सहकारी अध्यापकाचार्य श्री.बी.डी.बाराहाते, श्री.एस.जे.शिंदे , श्री.पी.एन.बोराडे हे नवीन सहकारी मित्र लाभले. याकाळात श्री. व्ही.डी.आहेर, श्री. गांगुर्डे भाऊसाहेब, श्री. व्ही. आर.पाटील भाऊसाहेब, श्री. श्री. वाल्मिक कोल्हे, श्री.श्याम मामा, श्री. खरात मामा, श्री. बिडगर मामा इत्यादींचे सहकार्य लाभले.     
           माझ्या गैरसोईने झालेल्या बदलीने अध्यापक विद्यालयातील विविध उपक्रम मला अध्यापनाचे काम करण्यासाठी ऊर्जा देऊन जात असे. माझ्या येथील सेवेचा सुरुवातीच्या काळात अमोल बच्छाव, अविनाश खोंडे, मयूर भांमरे, विशाल क्षिरसागर बंधू,  केशव गड्डापोड, दीपक वराडे, नवनाथ कुंदे, विलास वाजे,नवनाथ खरे, राजेश्वर न्यायदे, अशोक दराडे, प्रकाश नारद, निलेश डोंगरे,  गणेश होडशीळ, निलेश गांगवे, अजय ठाकरे, निलेश बुरकुल, शिवलाल भोई, दिनेश धनगर,  हेमंत परदेशी, साहेबराव सूर्यवंशी, धुराजी काळे, धनंजय बालटे, निलेश गायकवाड, गणेश सैंद्रे, योगेश साळवे, गुणवंत माळी, योगेश पठाडे, पंकज देवरे, जनार्दन व्यवहारे, दत्तात्रय भावसार, योगेश रिंढे, रामदास चव्हाण, संतोष आदमाने, सुनील गवते, भारत भदाणे, लक्ष्मण भोये,  पूजा जैन, मंजुषा उगले, योगिता खराटे, दिपाली आहिरे, पुनम चव्हाण, सोनाली पगार, प्रियंका पाटील, नीता भारती, पूनम परदेशी,पूजा पगार, सविता उगले, शीतल वडाळकर, अनुराधा धवन, भावना जाधव, नेहा देशमुख, योगिता पाटील, शीतल पाटील (2), कुसुम कर्डेल, मंगल उघडे, गीतांजली पवार, मनीषा सानप, स्नेहल रिंढे, अनिता पाटील, रीमा भागवत, भाग्यश्री मोहने, प्रीती कचरे  इत्यादी  ज्ञात/अज्ञात  छात्राध्यापकांनी नांदगाव अध्यापक विद्यालयाच्या नावलौकित भर  घातला. सर्वांचीच नावे लेखात लिहिणे शक्य नसल्याने प्रातिनिधिक नावे मी लेखात नोंदविली आहेत. ज्यांची नावे नमूद केली गेली नाहीत त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपण सर्व विद्यार्थी आमचे दैवत होते, आपल्या  आठवणी आमच्या सदैव स्मरणात राहतील....!
(टीप- विद्यार्थी मित्रांनो आपण कॉलेजला असतांनाचे फोटो असतील तर कृपया मला पाठवा. पुढील लेखासोबत fb वर टाकता येतील🌹🙏)
🌹🌹🙏🙏

क्रमशः

🌹🌹माझा प्रवास 🌹🌹

शब्दांकन-✒️✒️🌹🌹
श्री. एस.व्ही. कदम (सर)
अध्यापक विद्यालय, नांदगाव

Comments

Popular posts from this blog

वाजे विद्यलाय-१

महाविद्यालयीन जीवनातील मित्र...!

नांदगाव भाग-5