नांदगाव भाग-4

🌹🌹आठवणीतील नांदगाव......!🌹🌹
                       (अ. वि. नांदगाव)भाग-4

शब्दांकन✒️✒️ संजय कदम(सर)✒️🌹

               अध्यापक विद्यालय नांदगाव येथील माझ्या सेवेतील काही अनुभव असे होते. दरवर्षी प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा ओळख परिचय आम्ही करून घेत असू. यासोबतच मी डी.एड आलेल्या विद्यार्थ्यांचा थोडा आगळा - वेगळा परिचय करून घेत असतो. त्यासाठी प्रवाशी प्रत्येकाला अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याचे कारण प्रत्येक विद्यार्थ्यांना वैयक्तिक विचारत असतो. दरवर्षी भावी शिक्षक बनण्यासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारत असतांना, मला आलेला अनुभव फारच वेगळा व विचित्र होता .प्रवेश घेतलेले बहुसंख्य विद्यार्थी आई-वडील किंवा नातेवाईकाच्या आग्रहाने किंवा दबावाने या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे  विद्यार्थी मोठ्या संख्येने असायचे. भावी काळात शिक्षक म्हणून बालकांवर संस्कार करण्यासाठी इतरांच्या आग्रहाखातीर आलेले डी. एड.चे छात्राध्यापक भावी काळात बालकांवर किती संस्कार करू शकतील हा संशोधनाचा विषय होऊ शकेल. या विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या काळात तुम्ही आता भावी काळात शिक्षक म्हणून कार्यरत होणार आहात, त्यासाठी आपण आपले काम प्रामाणिकपणे पार पाडण्याचा आग्रह आम्ही नेहमीच धरत असायचो. याकरिता देशाचे शत्रूपासून प्रामाणिकपणे रक्षण करणाऱ्या सैनिकांचे उदाहरण मी नेहमी देत असतो. तुम्हाला देखील या क्षेत्रात राहून देशसेवा करता येईल.  विद्यार्थ्यांनी विचारले," ते कसे करणार? "त्यांना मी उत्तर दिले, "आपापल्या क्षेत्रात प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम करणे ही सुद्धा एक प्रकारची देशसेवाच आहे. तुम्ही शिक्षक झाल्यानंतर  अत्यंत प्रामाणिकपणे  विद्यार्थ्यांवर  संस्कार करत करून  सेवा करू शकता." नातेवाईकांच्या आग्रहावरून प्रवेश घेणाऱ्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचे दृष्टीकोन दोन वर्षांमध्ये  बदलण्यात आम्ही सर्व शिक्षक यशस्वी  होत असतो या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे.

                  आमच्याकडे नव्याने प्रवेश घेतलेले बहुसंख्य विद्यार्थी आपल्या आई-वडिलांसोबत राहून आतापर्यंतच्या शिक्षण पूर्ण करत असतात. मात्र आमच्याकडे प्रवेश घेतल्यानंतर आपल्या पालकांपासून दूर अंतरावर वसतिगृहात किंवा खोली घेऊन शिक्षण घेण्याची वेळ छात्राध्यापकांवर आलेली असायची. वस्तीगृह म्हटलं की तेथे असलेल्या सुविधा काही प्रमाणात कमी-जास्त असतातच. विद्यार्थ्यांनी उपलब्ध सुविधा नुसार तेथे राहतांना समायोजन करणे गरजेचे असते. काही विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत कधीही गार पाण्याने अंघोळ केलेली नसते. वसतिगृहात नव्याने प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना गार पाण्याने आंघोळी शिवाय पर्याय नसायचा. त्यामुळे सुरवातीच्या काळात बरेच विद्यार्थी आजारी पडत असत. घराबाहेर जेवणाची सवय नसल्याने खाणावळीतील जेवण केल्याने वस्तीगृहातील बरेच विद्यार्थी आजारी पडण्याचे प्रमाण फार मोठे असायचे. तर काही विद्यार्थ्यांना  वस्तीगृहात राहणे व खाणावळीतील जेवण सहन होत नसायचे. त्यामुळे बऱ्याच वेळा घरगुती मेसचा पर्याय निवडून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न वस्तीगृहातील काही विद्यार्थी करत असायचे.  मात्र यामध्ये पालकांची होणारी ससेहोलपट आम्ही जवळून अनुभवायचो. काही विद्यार्थ्यांना येथील हवामान मानवत नसायचे, तर काही  विद्यार्थी यात त्वरित समायोजन करून घेत असत, खरे तर समायोजन ही एक कलाच असते. जीवनात समायोजन करणारी व्यक्ती लवकर यशस्वी होते. आमच्यापैकी बहुसंख्य शिक्षकांनी वस्तीगृहात राहून शिक्षण पूर्ण केलेले असल्याने आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना आमचे अनुभव सांगून धीर देण्यासोबतच समायोजन करण्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत असायचो.

              अध्यापक विद्यालयात प्रवेश घेऊन बरेच विद्यार्थी आपले वेगवेगळे ध्येय समोर ठेवून डी. एड.चा अभ्यासक्रम पूर्ण करत असायचे. काही विद्यार्थी अत्यंत गांभीर्याने तर काही विद्यार्थी मौजमजा व दुर्लक्ष करायचे. म्हणतात ना "ज्याचा हात मोडेल, त्याच्या गळ्यात पडेल" या म्हणी प्रमाणे काही छात्राध्यापक ATKT मध्ये बसत असत त्यांना पुढील वर्षाचा प्रवेश मिळत असे, जे छात्राध्यापक ATKT मध्ये न बसल्याने काही विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेल्याचे आम्ही बघितले आहे.  विद्यालयाची वेळ संपल्यानंतर वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तसा खूप मिळत असायचा. विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहात काही सुविधा कमी असल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. मला वाटते सर्व सुविधा मिळाल्यानंतर मनुष्य आळशी होत असतो. सुविधाचा अभाव मनुष्याला आपल्या ध्येयाकडे जाण्यास प्रोत्साहीत करतो . याच वेळी अडचणी मात्र नवीन मार्ग शोधण्यासाठी मार्गदर्शक ठरत असतात. गरज ही शोधाची जननी आहे,  यामुळेच येथे वसतिगृहात राहणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त पाळत विविध स्पर्धा परीक्षांची तयारी देखील सुरू केली होती. त्यांना आलेल्या अडचणीत वेळोवेळी शक्य असेल ते मार्गदर्शन करण्याचे कार्य आम्ही सर्व शिक्षक करत असायचो.   त्यातील काही विद्यार्थी चांगली तयारी करून महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये कार्यरत चांगल्या पदावर आहेत तर बाकी असलेले बहुसंख्य विद्यार्थी जिल्हा परिषद शिक्षक म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत आहेत. शिक्षक म्हणून काम करण्यास नांदगावच्या अध्यापक विद्यालयाने आवश्यक बळ त्यांच्या पंखात भरण्याचे काम प्रामाणिकपणे केले. म्हणूनच या शिक्षकांनी आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करतांना, सध्या कार्यरत असलेल्या शाळेवर तालुक्यात चांगला नावलौकिक प्राप्त केला आहे. अध्यापक विद्यालय व तेथे काम करणाऱ्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. या सर्व शिक्षकांनी भविष्यकाळात देखील आपल्यासमोरील बाल-गोपालांवर उत्तम संस्कार करून देशाचे आदर्श नागरिक बनवावे अशी अपेक्षा आम्ही शिक्षक या नात्याने त्यांच्याकडून करतो.

                      दरवर्षी अध्यापक विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर सुरुवातीच्या काळात अनेक विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असते. असाच एक प्रसंग विद्यालयात मी अनुभवलेला आहे. नाशिक येथील एका विद्यार्थिनीचा आपसात बदली करून नंबर अध्यापक विद्यालय, नांदगाव येथे लागला.  नांदगाव येथे प्रवेश घेतल्यानंतर  येथील वातावरण संबंधित विद्यार्थिनीच्या प्रकृतीस मानवत नव्हते, त्यामुळे ती वारंवार आजारी पडत होती. तब्येत बिघडल्यानंतर पालकांशी संपर्क होत असायचा, त्यामुळे आपल्या मुलीची तब्येत ठीक नसल्याने पालक नेहमीच काळजीत असायचे. शेवटी त्यांनी एक-दोन मुली सोबत करून विद्यालयाच्या परिसरात स्वतंत्र खोली घेतली. आता या विद्यार्थिनी स्वयंपाक स्वतः करू लागल्याने आजारी पडण्याच्या प्रमाणात काही  सुधारणा झाली होती. मात्र सदर विद्यार्थिनीस अधून-मधून प्रकृतीची समस्या जाणवत होती.  सदर विद्यार्थिनीचे पालक माझे मित्र नाशिक येथे राहत असल्याने सुट्टीच्या दिवशी ते आपल्या  कन्येला भेटण्यासाठी नांदगाव येथे जात असत. अधून मधून माझ्याशी संपर्क साधून आपल्या कन्येच्या तब्येतीची विचारपूस परस्पर करत असायचे. अत्यंत आज्ञाधारक, उत्साही व प्रत्येक उपक्रमात सहभागी होणारी ही विद्यार्थिनी खूपच संघर्षमय रीतीने हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात यशस्वी झाली. अशाप्रकारे जवळपास दोन वर्षाचे डी. एड व तेव्हा सहा महिन्याची आंतरवासिता पूर्ण करतांना सदर विद्यार्थिनी व तिचे  पालक यांच्यासाठी खूपच कठीण असा होता. या काळात संबंधित पालकांचे संपूर्ण कुटुंब अस्वस्थ झाल्याचे मी जवळून बघितले आहे. सुदैवाने डी.एड. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सहा महिन्याची आंतरवासिता करत असतांनाच  तीन महिन्यातच आंतरवासीता उपक्रम थांबविण्याचा महाराष्ट्र शासनाचा आदेश प्राप्त झाला. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांनीचा अभ्यासक्रम नियोजित  वेळेपेक्षा तीन महिने आधीच संपल्याने तिच्या पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला. 

                अध्यापक विद्यालय नांदगाव येथे सेवेत असतांना विद्यालयातील अत्यंत महत्त्वाची असलेली पाठ समिती प्रमुख म्हणून मी कार्यरत होतो. याच काळात शहरी भागातील सेमी इंग्रजीतून शिकण्याचे लोन ग्रामीण भागात देखील पोहचले होते. नव्याने बऱ्याच माध्यमिक शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू झाले होते . याला नांदगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल देखील अपवाद नव्हते. येथे इयत्ता पाचवीचे सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू झाले होते. आम्ही आमच्या डी.एड.च्या विद्यार्थ्यांसाठी पाठ लावण्यासाठी निवडलेल्या शाळेत गणित व विज्ञानाचे पाठ घेण्यासाठी अडचण येऊ लागली होती. यातून काहीतरी मार्ग काढणे गरजेचे होते, म्हणून आम्ही प्राचार्य साहेब व शिक्षकांनी आपसात चर्चा करून विज्ञान शाखेतून बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना आवाहन केले की, आपल्यापैकी सेमीचा वर्गावर पाठ घेण्यास जे विद्यार्थी सक्षम असतील त्यांनी आमच्याकडे नावे नोंदवा. त्यानुसार नेहा देशमुख हिने माझ्याकडे नाव नोंदविण्याचे सर्व प्रथम धाडस दाखविले. त्यासाठी आवश्यक सर्व मार्गदर्शन श्री.,एस.बी.आहेर व श्री.बी.डी बाराहाते सरांनी करण्याचे आश्वासन सदर विद्यार्थिनीस दिले.  सदर विद्यार्थिनीने गणिताचा पाठ पाचवीच्या सेमी इंग्रजीच्या वर्गावर घेण्यासाठी तयारी सुरू केली. आम्ही सेमी इंग्रजीच्या वर्गावर पाठ घेण्यासाठी केलेला हा पहिलाच प्रयोग असल्याने आम्हीं देखील उत्साहित होतो. हा पाठ निरीक्षण करण्याचे काम आमचे मार्गदर्शक व मित्र श्री.एस.बी.आहेर सरांनी केले. त्यांनी सदर विद्यार्थिनींची आत्मविश्वास वाढविण्यासाठी खूप प्रोत्साहन दिले.असमही चांगले काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन देत असायचो. म्हणूनच या पाठाला आम्ही बहुसंख्य शिक्षक उपस्थित होतो. वर्गात विद्यार्थी संख्या जास्त असल्याने आमच्यापैकी जास्त शिक्षक  खिडकीच्या बाहेरुन सदर विद्यार्थिनींच्या पाठाचे निरीक्षण केले. कोणतेही दडपण न घेता नियोजनाप्रमाणे सेमी इंग्रजीच्या वर्गावर नेहा देशमुखने गणिताचा पाठ उत्तम पद्धतीने घेतला.  हा पाठ पूर्ण झाल्यानंतर आम्ही वर्गातील विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मिळालेली प्रतिक्रिया खूपच आगळी वेगळी होती. नव्यानेच पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या वर्गावर आमच्या  छात्राध्यापिकेने घेतलेला पहिलाच पाठ ऎतिहासिक ठरला.  त्यावर  पाचवीच्या निरागस व अबोध बालकांनी प्रतिक्रिया देतांना असे म्हटले ,"आमच्या, शिक्षकांपेक्षा मॅडम तुम्ही खूप चांगले शिकविले, उद्यापासून तुम्हीच आम्हाला गणित विषय शिकवा." यावेळी त्यांचे विषयी शिक्षक देखील तेथे उपस्थित होते. मात्र त्यांनी देखील आमच्या छात्राध्यापिकेने घेतलेला पाठ उत्तम होता प्रतिक्रिया दिली. साधारणतः 2008 पासून सेमी इंग्रजीच्या वर्गावर विद्यार्थ्यांचे पाठ घेण्याचे केलेले धाडस आजपर्यंत अध्यापक विद्यालयात सुरू आहे. खरेतर सेमी इंग्रजीच्या वर्गावर पाठ घेण्याचे तयारी दर्शविणारे विद्यार्थी आमच्या दृष्टीने या उपक्रमास सहकार्य करणारे विद्यार्थी या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मार्गदर्शन करणारे शिक्षक देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. 

क्रमशः

🌹🌹प्रवास माझा🌹🌹
✒️✒️शब्दांकन✒️✒️🌹
श्री. एस.व्ही. कदम (सर)
ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, दिंडोरी

Comments

Popular posts from this blog

वाजे विद्यलाय-१

महाविद्यालयीन जीवनातील मित्र...!

नांदगाव भाग-5