नांदगाव भाग-6

🌹🌹आठवणीतील नांदगाव ....! भाग-6🌹🌹
  🎼(अ. वि. नांदगाव दक्षिण भारत सहल)भाग-2

✒️शब्दांकन-✒️संजय कदम(सर)

               तिरुपती देवस्थान परिसरातील विविध पर्यटन स्थळांना भेटी व धार्मिक स्थळांचे दर्शन घेऊन दोन दिवसाच्या मुक्कामानंतर आम्ही पुढील प्रवासासाठी सायंकाळी तिरुपती वरून पुन्हा घाटाच्या रस्त्याने जातांना घेतलेला अनुभव परतीच्या प्रवासातही अनुभवला.  यावेळी देखील बऱ्याच विद्यार्थ्यांना तीव्र उताराच्या रस्त्याने गाडी उतरतांना हेअर पिन कर्व्ह आकाराच्या वळणावळणाच्या रस्त्याने बस जात होती. यावेळी काही विद्यार्थ्यांसह शिक्षकांना देखील या प्रवासाने त्रास झाला. मात्र त्रास होऊन सुद्धा हा प्रवास आमच्यासाठी अनोखाच होता. हा प्रवास संपतांनाच आम्ही पुढील प्रवासासाठी तिरुमाला रेल्वे स्टेशन गाठले.
            तिरुमालाहून रात्रीच्या रेल्वेने आम्ही बँगलोर दर्शनासाठी रवाना झालो. दिवसभर विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या असल्याने सर्वच खूप थकलो होतो. त्यामुळे स्लीपर कोचच्या रिझर्वेशनचा झोपण्यासाठी  उत्तम उपयोग झाला. विशेष म्हणजे आमचे प्राचार्य पाटील सरांनी रात्रीचा मुक्काम पैसे भरून लॉजिंग बोर्डिंग मध्ये करण्या ऐवजी आरामात सोबतच ट्रेनचा प्रवास खूपच आनंददायी ठरला त्यामुळे पुढील पर्यटन स्थळांना भेटी देण्यात भेटी देण्यात सर्व ताजेतवाने राहत असत. सकाळी बँगलोर येथे पोहचल्या नंतर येथील अत्यंत भव्य असे रेल्वे स्टेशन तेथून प्रवाशांना बाहेर निघण्यासाठी बाहेर निघण्यासाठी भुयारी मार्ग या मार्गातील स्वच्छता प्रकाशाची व्यवस्था इत्यादी आमच्यासाठी अनोखे होते. बंगलोर ला सकाळी पोहोचल्यानंतर  रेल्वे स्टेशन बाहेरच आम्ही विद्यार्थ्यांचा नाश्ता होईपर्यंत  बँगलोर दर्शनासाठी गाड्यांची व्यवस्था  केली. त्यामुळे आम्हाला येथील प्रसिद्ध भव्य बुल टेम्पल, टिपू पॅलेस व सायन्स म्युझियम इत्यादी ठिकाणे बघण्याचे नियोजन होते. येथील प्रसिद्ध सायन्स म्युझियम संग्रहालय बघितले माझ्यासारख्या कला शाखेतून शिक्षण घेतलेल्या व्यक्तीस खरेतर सायन्स म्युझियम आगळा वेगळा आनंद देणारे देवालायच ठरले. येथील वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट हाताळण्यास मिळाले, त्याचबरोबर विविध शास्त्रज्ञांचे लेख माहिती व विज्ञानाच्या अनेक संकल्पना येथील म्युझियम मध्ये आम्हाला अभ्यासायला मिळाल्या. आमच्या सोबत असलेल्या भावी शिक्षकांच्या दृष्टीने पुस्तका बाहेरील जगाची ओळख झाली.  येथे आम्ही जास्तीत-जास्त वेळ थांबून अनेक वैज्ञानिक रहस्य जाणून घेतले. येथून कमी वेळात बाहेर पडणे शक्य नव्हते तरी देखील आमच्या नियोजनाप्रमाणे आम्हाला दुपारी तीन वाजता म्हैसूर येथे जाण्यासाठी ट्रेनचे रिझर्वेशन असल्याने थोड्या धावपळीतच सायन्स म्युझियम बघून बाहेर पडावे लागले. या गोष्टीचे आज देखील मला दुःख वाटते. शिक्षक या नात्याने शैक्षणिक सहल  किंवा  वैयक्तिक कौटुंबिक सहलीसाठी संपूर्ण एक दिवस येथील सायन्स म्युझियम मध्ये विद्यार्थ्यांना वेळ देता येईल असे नियोजन असावे. येथून जास्तीत जास्त माहिती मिळवून विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टिकोण निर्माण होण्यास मदत होईल. भावी काळात येथे शैक्षणिक सहल घेऊन जाणाऱ्या शिक्षकांनी याबाबीचा विचार करावा असे मला वाटते.
            आमच्या सहलीच्या सुरुवातीपासूनचा रेल्वे प्रवास रात्रीचा व स्लीपर कोच  रिझर्वेशन झालेला होता. बेंगलोर ते मैसूर रेल्वे प्रवासात प्रथमच आम्ही  चेअरयान (अर्थात आपल्याकडे धावणाऱ्या पंचवटी, गोदावरी या बसण्यासाठी खुर्च्या असलेल्या) रेल्वेने प्रवास सुरू केला होता. या प्रवासाचे व्यवस्थे बाबत  विद्यार्थ्यांना  बसण्यापूर्वी आम्ही कल्पना दिलेली असल्याने  विद्यार्थी देखील खूप उत्साहित होते. कारण खिडकी समोर बसून बसून बेंगलोर ते म्हैसूर हा प्रवास शेतात असलेले भाताचे  पीक, नारळाच्या बागा, खजुराचे झाडे, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, मुबलक पाणी, संपूर्ण हिरवागार परिसर इत्यादी निरीक्षण करत आम्हाला दक्षिण भारतातील रेल्वे प्रवासाचा मनमुराद आनंद देऊन गेला. आतापर्यंतच्या प्रवासात विद्यार्थी ग्रुपने वेगवेगळ्या बोगीत रिझर्वेशन मिळाल्याने छोट्या-छोट्या ग्रुपमध्ये शिक्षकां समवेत सूचनांचे पालन करत प्रवास करत होते. आज मात्र सर्वांना एकाच बोगीत आपल्या मित्रांसमवेत एकाच ठिकाणी बसून प्रवास करण्याची संधी पहिल्यांदाच मिळाली होती. सायंकाळी सहा वाजता आम्ही मैसूर रेल्वे स्टेशनवर उतरलो. आम्ही म्हैसूर येथे पोहोचताच निवासाच्या ठिकाणी जाण्यासाठी बस व्यवस्था प्राचार्य शाम पाटीलसरांच्या तत्परतेने झालेली होती. निवास व्यवस्था आमच्या दृष्टीने पुरेश्या सुविधांनी युक्त असल्याने येथील निवासाची आमची चिंता मिटली होती. रात्रीच्या भोजना सोबतच आम्ही दुसऱ्या दिवशीच्या नियोजित पर्यटन स्थळांच्या भेटीचे नियोजन केले. रात्री निवांत झोप घेऊ सकाळी लवकर उठून तयार झालो.
              आमच्या नियोजित कार्यक्रमानुसार आम्ही म्हैसूर येथील वडियार राजे यांचा प्रसिद्ध राजवाडा बघण्यासाठी गेलो. त्याच सोबत येथीलअंबा पॅलेस, डॉल पॅव्हेलियन, युरोपियन -इंडियन शिल्पे, सेरेमोनियल वस्तू. दरबार हॉलमधील कोरीव खांब अप्रतिमच कलेचे दर्शन घडवत होते. वडियारांसाठी अतिशय अभिमानाची असलेली ही वास्तू म्हणजे रॉयल गोल्डन थॉर्न होय. त्यांच्या सार्वभौमत्वाचे हे प्रतीक मानले जाते. येथील दसर्‍याचा उत्सव आपल्या देशातील सर्वात मोठा सांस्कृतिक उत्सव मानला जातो. हा उत्सव म्हणजे  संपूर्ण देशाच्या आकर्षणाचे केंद्र असते. दसऱ्याच्या दिवशी वडियार घराण्यातील राजाची मिरवणूक काढायची परंपरा आजही जपली जात आहे हे विशेष...! यावेळी हा महाल सर्वांना पाहण्यासाठी खुला असतो.  
              राजवाडा विस्तीर्ण भूभागावर बांधलेला वास्तुकलेचा आदर्श नमुनाच आहे. येथील प्रसिद्ध दसरा मेळावा संपूर्ण मैसूर नगरी या मेळाव्यासाठी उपस्थित राहील असे भव्य मैदान या मैदानासमोर असलेल्या भव्य सभामंडपाची ऎतिहासिक रचना कोणत्याही कॉलम शिवाय केली आहे. हा  वास्तुकलेचा अतिउत्तम नमुना मानला जातो. आकाराने प्रचंड असलेला हा राजवाडा आजही अत्यंत उत्तम स्थितीत तेथील पर्यटन विभागाने जतन केला आहे. म्हैसूर शहरात दूरवरूनच दिसणारे राजवाड्याचे घुमट, प्रचंड मोठी भिंत राजवाड्याकडे सर्वांना आकर्षित करतात.  राजवाड्यात आत जाण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत. येथील पेंटींग्ज, टाईल फ्लोअरिंग, कास्ट आयर्नचे खांब, झुंबरे आणि स्टेन ग्लास वर्क, परिसरातील अनेक छोटेसे पण आकर्षक देवळे डोळ्यांचे पारणे फेडतात. राजवाड्याची विद्युत रोषणाई रात्रीच्या वेळी लहान थोरांना भुरळ घालणारी असते. अप्रतिम कोरीव कामाने राजवाड्याचे नटलेले खांब, छते, दरवाजे आणि जगभरातून गोळा केलेल्या कलात्मक वस्तूंचा संग्रह प्रत्येक पर्यटकास तृप्त करतो. राजवाड्या बाबत असे समजले की सुरुवातीला हा राजवाडा पूर्ण लाकडातच बांधला गेला होता. मात्र पुढे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने, राजवाडा विसाव्या शतकाच्या सुरुवातीस पुन्हा बांधण्यात आल्याचे तेथील गाईडने सांगितले.  ही ऐतिहासिक वास्तूरचना हिंदू आणि मुघल शैलीचे उत्तम मिश्रण असून घुमट, कमानी, प्रशस्त व्हरांडे ही राजवाड्याची वैशिष्ट्ये आहेत. येथील ऐतिहासिक पॅलेसच्या सौंदर्यात 'चार चाँद लगाने का काम' विश्वविख्यात चित्रकार राजा रवी वर्मा यांचे एक-एक पेंटिंग करत आहे. तासंतास या पेंटिंगचे निरीक्षण करणारे कलाकार येथे बघवायस मिळतात. म्हैसूर पॅलेस ही ऐतिहासिक अप्रतिम वास्तू मी भेट दिलेल्या विविध पर्यटन स्थळांपैकी  सर्वोत्तम असल्याचे माझे मत आहे.
                  म्हैसूर परिसरातील सर्वांचे आकर्षण असलेले  ठिकाण  म्हणजे वृंदावन गार्डन होय. येथे जातांनाच टिपू पॅलेस व टिपू सुल्तानचे समाधी स्थळ येथील ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष देते.  वृंदावन गार्डन मुघल शैलीत बांधलेली असून कावेरी नदीवरील अलमट्टी या ऐतिहासिक धरणाजवळ आहे. अलमट्टी धरणाचे अभियंता भारताची शान असलेले थोर शास्त्रज्ञ व अभियंता सर मोक्षगुंडम विश्वेसरय्या हे आहेत. हे धरण बघण्याचे भाग्य आम्हाला लाभले ही आमच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. कावेरी जलतंटा तामिळनाडू व कर्नाटक  राज्यांचा या धरणाशीच निगडित आहे. येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या वृंदावन गार्डन मध्ये अनेक चित्रपटांची गाणी येथे चित्रित झाल्याचे चित्रिकारणातून लक्षात येते. या गार्डनचे आकर्षण म्हणजे सूर्यास्त होताच येथे विविध रंगी लाईटच्या तालावर नाचणारी कारंजे अत्यंत मनमोहक आहेत. म्हैसूरला खरेदी करायला सँडल अगरबत्ती व साबण, सौंदर्य प्रसाधनांच्या वस्तू इ.आहेत. चंदनाच्या वस्तूंनी येथील बाजार नेहमीच सुगंधित असतो. पण कोरीव कामाच्या हस्तीदंती वस्तू नुसता हात लागला तर फुटतील काय? इतक्या नाजूक दिसतात.  मात्र चांगल्याच दणकट व टिकाऊ असतात. रोझ वुडच्या वस्तू आणि फर्निचर नितांत सुंदर असे. मग चंदन तेल, विविध प्रकारच्या अगरबस्ती, खेळणी, ब्राईट रंगातील पेंटिंग्ज आणि म्हैसूर सिल्क साड्या पर्यटकांवर मोहिणी घालण्यास पुरेसे आहेत. 
              म्हैसूरपासून जवळच चामुंडा हिल उंच पर्वतावरील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. जाण्याचा मार्ग देखील नैसर्गिक संपन्नता लाभलेला आहे. येथून म्हैसूर शहरातील सरोवरे, पॅलेस आणि बागांचे सुंदर नेत्रदीपक दृश्य नजरेत सामावून ठेवावे असेच आहे. चामुंडा देवी ही वडियार या राजघरण्याची कुलदैवत असलेली देवी आहे. महिषासूराचा या टेकडीवरच देवीने वध केल्याची आख्यायिका आहे.  महिषासूराच्या त्रासातून जनतेची सुटका करणारी ही देवी पार्वतीचे रूप मानले जाते. साधारणत: बाराव्या-तेराव्या शतकात येथे चामुंडेश्वरीचे मंदिर आणि भव्य गोपूर उभारले गेले असावे.  जवळपास हजारपेक्षा अधिक पायर्‍या चढून गेल्यावर प्रथम दिसते ती महिषासूराची अतिप्रचंड भव्य मूर्ती आणि त्याच्यापुढेच असलेली उंच व भव्य नंदीची मूर्ती सर्वांचे आकर्षण ठरते. चामुंडा हिल उत्तर भारतातील बहुसंख्य पर्यटन स्थळांची आठवण करून देणारे महत्वाचे पर्यटन स्थळ आहे.
             म्हैसूर शहर पूर्वी कर्नाटक प्रांताची राजधानीचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. म्हैसूर शहर अनेक ऐतिहासिक  घटनांचे व राज्यकर्त्यांच्या  पराक्रमाचे साक्षीदार ठरले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या शहरास थोर राजघराण्याची परंपरा लाभली आहे. मैसूर मधील बॉटनिकल गार्डन ऐतिहासिकच म्हणावे लागेल कारण विस्तीर्ण भूभागावर पसरलेले सर्व प्रकारच्या वनस्पती पक्षी प्राणी इत्यादीची गार्डन मध्ये असलेली उपस्थिती लहान थोरांना वेगळीच अनुभूती देऊन जाते विविध प्रकारचे पक्षी त्यांचे विविध रंग खूपच आनंद देऊन जातात त्याच बरोबर पाळीव व जंगली प्राणी विविध प्रकारची माकड,हत्ती, वाघ, जिराफ,गाय, रानम्हैस इ. मोठ्या संख्येने येथे प्रत्यक्ष रुपात बघावयास मिळतात.  विद्यार्थी जीवनात बऱ्याच वेळा अनेक पशुपक्षी आपण चित्रातच बघत असतो, मात्र शाळेत शिकणाऱ्या आपल्या पाल्यांना येथील गार्डन मध्ये घेऊन गेल्यानंतर नंतर विविध प्राणी व पक्षी यांचे आवाज, हालचाली, शरीर  रचना इत्यादी बाबी समजून घेणे शक्य होईल.  प्रत्यक्ष जीवनात खूप काही पुस्तकी ज्ञान पेक्षा इतर ज्ञान देण्यास उपयुक्त ठरतात. आम्हाला येथील बॉटनिकल गार्डन मधून अनेक प्रकारचे अनुभव अनुभव दीर्घकाळासाठी जतन करण्याची संधी मिळाली. आम्हाला मैसूर मध्ये इतक्या सुंदर गोष्टी प्राचार्यांनी आयोजित केलेल्या सहली मुळे बघता आल्या हे आम्ही आमचे भाग्य समजतो.
या सहलीत माझे सहकारी मित्र श्री.डॉ. बी.के. पवार सर, श्री.बाराहाते सर, श्री.शिंदे सर, श्रीम. महाले मॅडम, श्री. वाल्मिक कोल्हे मामा यांनी सहलीच्या आंनदाबरोबरच सोपविलेली जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडली.
             अजून एक गोष्टीसाठी आम्हाला म्हैसूर शहर भावले, येथे खाण्या-पिण्याच्या पदार्थांची खूपच रेलचेल असल्याचे आम्ही अनुभवले. मला तर दहा रुपयात कोणतीही तांदळाच्या पदार्थाची स्वादिष्ट डिश आठवते. दक्षिणेत कुठेच खाण्यापिण्याचे  कधीच हाल होत नाहीत. डोसा, इडली, उपमा, उत्तपा, भातांचे विविध प्रकार आणि त्यात खास करून वापरला जाणारा कर्नाटकी मसाल्यांची चव न्यारीच असते. येथे कोठे हीअत्यन्त वाजवी दरामध्ये तांदळाचे पदार्थ सहज उपलब्ध होतात. येथील हॉटेल व्यावसायिक पर्यटकांची फक्त भूक भागवत नाही तर त्यांच्या पदार्थातून झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद अवर्णनीय असाच होता मैसूर दर्शनाचा आमचा तीन दिवसाचा नियोजित कार्यक्रम आम्ही दोन दिवसात काटकसर करुन पूर्ण केला उरलेल्या एक दिवसाचा आम्ही येथून जवळ असलेल्या तामिळनाडूतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ उटी बघण्यासाठी सदुपयोग करण्यासाठीचे ऐनवेळी नियोजन केल्याने सहलीत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना आकाश आकाश ठेंगणे झाल्याचा अनुभव आम्ही येथे घेतला.🌹🌹🙏🙏
   

क्रमशः🌹🌹
🌹🌹  प्रवास माझा🌹🌹
✒️शब्दांकन✒️✒️
श्री. एस.व्ही. कदम(सर)
ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन,mvpdn

Comments

Popular posts from this blog

वाजे विद्यलाय-१

महाविद्यालयीन जीवनातील मित्र...!

नांदगाव भाग-5