नांदगाव भाग-7

🌹🌹आठवणीतील नांदगाव.......!🌹🌹 भाग-7
 (अ.वि.नांदगाव, दक्षिण भारत सहल) भाग-3🌹🌹

🌹✒️शब्दांकन-✒️✒️ संजय कदम(सर)🌹🌹

               म्हैसूर येथील पर्यटन स्थळांना दोन दिवसात भेटी देऊन आमचे सहलीचे सर्व पैसे वसूल झाल्याचा आनंद आम्हाला झाला होता. आता आम्ही ऐनवेळी निवडलेले उटी हे तमिळनाडूतील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण प्रत्येकाच्या आकर्षणाचे केंद्र होते.  प्रत्येकाने आपल्यापल्या परीने दुसऱ्या दिवशी जाण्याची तयारी सुरु केली होती. सकाळी ठरलेल्या वेळी सहा वाजता आम्ही सर्वजण तयार होतो.  बस सकाळी वेळेवर आल्याने आम्ही उटीच्या दिशेने पुढील प्रवास सुरू केला केला. म्हैसूर पासून काही अंतर गेल्यावर तमिळनाडू राज्य सुरू झाले तर दुसरी कडे केरळच्या सीमा लागल्या होत्या. त्याचबरोबर भारतातील निलगिरीचे घनदाट जंगल सुरू झाले. निलगिरी पर्वत रांगेच्या संपूर्ण जंगलाचा प्रवास, रस्त्यावर धावणारे वाहनांची संख्या त्या तुलनेत खूपच कमी होती. रस्त्यावरून ये-जा करणारी वाहने समुहा समूहाने जात असल्याचे आढळले, कारण जंगली प्राण्यांची काही प्रमाणात भीती याठिकाणी असल्याचे सांगितले.  रस्त्यात अनेक ठिकाणी कळपाने हत्ती असल्याचे आम्ही बघितले.  काही वेळा हत्तींनी छोट्या गाड्या ढकलून दिल्याने अपघात झाल्याचे आमच्या ड्रायवरने आम्हाला सांगितले.
आमचा प्रवास जसजसा पुढे जात होता  तसतसे प्रवासात वेगवेगळे प्राणी बघावयास मिळत होते.  पुढे घाटाच्या रस्त्यातुन जावे लागले.  येथे मात्र डोंगर उतारावर चहाचे मळे बघायला मिळाले. एका ठिकाणी थांबून चहाची झाडे तेथे काम करणारे मजूर यांची थोडीफार माहिती जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला पण त्यांची भाषा आम्हाला समजत नव्हती आणि आमची भाषा त्यांना समजत नव्हती. त्यामुळे मोठी अडचण झाली. बस ड्रायव्हरला आमची अडचण लक्षात आल्याने त्याने आम्हाला संपूर्ण माहिती थोडक्यात तोडक्या-मोडक्या हिंदीतून सांगितली अशाप्रकारे आमचा प्रवास घनदाट जंगलातून निसर्गाचा आनंद घेत सुरूच होता.  तेथील जंगलाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे मोठ्या प्रमाणात चंदनाचे वृक्ष बघायला मिळाले. याच जंगलात कदाचित कुख्यात चंदन तस्कर विरप्पनचे वास्तव्य होते.
            जंगलाचा प्रवास संपल्यानंतर घाटरस्ता सुरु      झाला. या घाटात जवळपास पन्नास पेक्षा जास्त हेअर पिन वळण होते.  घाटातून प्रवास करतांना आम्ही सर्वच जीव मुठीत धरून बसलो होतो, वळणावर गाडी वळतांना आम्हांला भीती वाटत होती.  बस ड्रायव्हर नेहमीप्रमाणे बस चालवत होते, त्यांना या घाटाच्या अवघड रस्त्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की," या रस्त्यावर आमचा दररोजचा प्रवास सुरू असतो. त्यामुळे आम्हाला या रस्त्यांचा सर्व झाला आहे." रस्त्यावर येणाऱ्या अडचणी त्यांना सर्व माहीत होत्या. ड्रायव्हरने सांगितले की, "या जंगलाच्या मार्गावर थोड्याफार प्रमाणात जास्त धोका हत्तीच्या काळपापासून असतो". घनदाट जंगलाचा व वळण घाट असलेल्या धोकादायक प्रवास करून आम्ही उटी येथे पोहोचलो.
                उटी हे प्रसिद्ध पर्यटन ठिकाण निलिगरी पर्वत शृंखलेत वसलेले आहे. येथील हिरवीगार झाडी, चहाचे मळे, थंड पण आल्हाददायक वातावरणाने आम्ही सर्वच उत्साहित झालो. उटी येथे पोहोचताच मार्च महिन्यात उन्हामध्ये थंडीचा अनुभव आम्ही घेतला. थंड हवेचे ठिकाण म्हणून उटी प्रसिद्ध आहे. यालाच  ‘उधगमंडलम’ असेही म्हणतात. उटी पर्यटन स्थळाला अमाप निसर्ग सौंदर्य लाभले आहे. आपल्या देशात अनेक थंड हवेचे ठिकाणं आहेत, पण उटीस "क्वीन ऑफ हिलस्टेशन्स " असे का म्हटले जाते? या प्रश्नाचे उत्तर आम्हाला येथे अनुभवलेल्या गोष्टी वरून समजले. आम्ही सकाळी दहा-साडेदहा वाजता आवशयक प्रवेश फी भरून येथे प्रवेश केला, तर समोरच एक छोटी चहाची टपरी दिसली. तेथे चहा पिणाऱ्याची मोठी गर्दी बघून, आम्ही देखील येथील थंड वातावरणात चहाच्या टपरीवर चहाचा स्वाद घेतला. आम्ही बाहेरून आलो आहोत हे विक्रेत्यांनी ओळ्खल्याने विविध वस्तू विक्री करण्याची गर्दी झाली. आमच्या पैकी बऱ्याच जणांनी त्यांच्याकडून स्वस्तात असलेल्या कानटोप्या विकत घेतल्या. आपल्या वस्तू विक्रीसाठी हे विक्रेते आमच्या आजूबाजूला सारखे फिरत वस्तूंची विक्री करत होते. चहा घेतल्यानंतर सुरुवातीलाच आमच्यापैकी काही विद्यार्थी व शिक्षकांनी येथील तलावात बोटिंगचा आनंद घेतला.
          थोड्याच वेळात आम्ही येथील प्रसिद्ध बोटॅनिकल गार्डनकडे रवाना झालो, चहुबाजूंनी दाटलेली आकर्षक हिरवळ, दाट देवदार वृक्षांनी सजलेली वनराईमुळे उटीच्या सौंदर्यात भरच पडलेली होती. तामिळनाडूतील थंड हवेचे ठिकाण म्हणून उटी जगप्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात पर्यटकांचा ओढा उटीकडे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे गाईडने सांगितले. येथील घनदाट हिरवळ, विविध आकारातील झाडांची नाविन्यपूर्ण कटिंग व विविध आकार आम्ही येथे बघितले. त्याचबरोबर वेगवेगळया प्रकारची छोटी झाडे, फुले यांची माहिती गाईड कडून जाणून घेतली. जवळपास साठ-सत्तर एकरात येथे विविध झाडे लावलेली आहेत. येथे जवळपास आठ-दहा एकरात  विविध प्रकारचे व रंगाचे गुलाबाचे आकर्षक झाडे लावण्यात आलेली आहेत. येथील गुलाबाचे विविध रंगी व आकाराचे फुले सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र ठरते. येथे फोटो काढण्यास कोणतीही बंदी नसल्याचे गाईडने सांगितले. त्यामुळे सहलीत सहभागी सर्वांनीच फोटो काढण्याचा मनमुराद आनंद घेतला.  येथे अनेक हिंदी चित्रपटांचे व अन्य भारतीय भाषांतील चित्रपटांचे चित्रनिकरण याच परिसरात नेहमी सुरु असल्याचे आमच्या गाईडने सांगितले. 
               उटी येथील चिलून पार्क लहान मुलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. याठिकाणचे झोके व छोटे-छोटे डब्बे असलेली रेल्वे सर्वांचेच लक्ष वेधून घेते. उटीचे सौंदर्य पाहण्यासाठी याठिकाणी भारतीय पर्यटकासोबत मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक देखील आम्हाला बघावयास मिळाले. दिवसभरातील विविध ठिकाणांना भेटी देऊन आम्ही मनमुराद सहलीचा आनंद घेतला. 
आम्हाला वेळेचे बंधन असल्याने म्हैसूरला वेळेत पोहचायचे होते, त्यामुळे चार वाजता आम्ही म्हैसूरच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघालो. याप्रवासात देखील निलगिरी पर्वतरांगेतील निसर्गसौंदर्याचा आनंद आम्ही घेत होतो. या प्रवासात आम्ही अनेक जंगली प्राणी जवळून बघितले, त्याच बरोबर हत्तींचे मोठे समूह ठिकठिकाणी दिसले. पुढे चेक पोस्टला कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ राज्याच्या सीमा एकत्र असल्याचे समजले. आमची एक दिवसाची अचानक नियोजन केलेली उटीची सहल खूपच आनंददायी व मजेदार ठरली. आम्ही मोठा प्रवास करून वेळेत मुक्कामाच्या ठिकाणी सुरक्षित पोहोचलो. आता आम्हां सर्वांनाच परतीच्या प्रवासाचे वेध लागले होते. त्यादृष्टीने सर्वांनी खरेदी केलेले साहित्य बॅगमध्ये भरण्याचे काम हाती घेतले होते.
                दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही म्हैसूर येथील भाताच्या पदार्थांचा भरपेट नाश्ता करून परतीच्या प्रवासासाठी निघालो.  म्हैसूर रेल्वे स्टेशन वरून बंगलोर साठी दहा वाजता गाडी असल्याने आम्ही नऊ सव्वा नऊ वाजता रेल्वे स्टेशनला येऊन थांबलो. येथील रेल्वे स्टेशनवरची स्वच्छता कमालीची  होती. आम्हाला येथे फोटोसेशन साठी भरपूर वेळ मिळाला होता, त्याचा पुरेपूर फायदा आम्ही करून घेतला. आम्हाला बेंगलोर येथे जाण्यासाठी नियोजीत रेल्वे प्लॅटफॉर्मवर येताच आम्ही रिझर्वेशन प्रमाणे सीटवर जाऊन बसलो. थोड्याच वेळात रेल्वेचे टी.सी. आले आणि त्यांनी आमचे व  विद्यार्थ्यांचे रिझर्वेशन तपासले. यावेळी घडलेला एक प्रसंग आजदेखील आमच्या डोळ्यासमोर उभा राहतो. आमच्या विद्यार्थ्यांच्या समवेत बसून टी.सी. आमची विचारपूस करत होते. तेवढ्यात इतर रेल्वेस्टेशन प्रमाणेच एक भिकारी रेल्वेतील प्रवाशांकडून पैसे मागत होता. हे दृश्य बघताच टी.सी. त्याला जोरात ओरडले. त्याने मात्र सवयी प्रमाणे कदाचित दुर्लक्ष केले असावे. संबंधित टी.सी. रागाने उठले आणि भिकाऱ्याच्या दिशेने गेले. भिकाऱ्यास रेल्वेतून खाली उतरण्यास सांगितले तो काही ऐकत नाही बघताच. टी.सी.ने त्याच्या कानाखाली जोरात खेचली आणि झालेला आवाज ऐकून आम्ही तर अवाक झालो. आज देखील तो प्रसंग आठवला तर तो आवाज आम्ही अनुभवतो. अशा प्रकारे आपल्या रेल्वे स्टेशनचे नाव खराब होऊ नये, ट्रेन मधील स्वच्छता राखली जावी बाहेरील व्यक्तींना भिकाऱ्याकडून त्रास होऊ नये, म्हणून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्त्यव्यदक्ष रेल्वे टी.सी. ला खरेतर आमचा प्रणाम...!  
             म्हैसूर येथून सुरु झालेला आमचा परतीचा बेंगलोर पर्यंतचा रेल्वे प्रवास दक्षिण भारतातील नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेत व सह प्रवाशासोबत  गप्पागोष्टीत आम्ही केव्हा बेंगलोर रेल्वे स्टेशनला पोहोचलो? हे आम्हाला कळाले देखील नाही. येथे प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर आम्हाला कळाले ते आमची मुंबईकडे जाणारी पुढची गाडी दुरच्या प्लॅटफॉर्मवर लागणार होती त्यामुळे बराच मोठा फेरा मारून भुयारी मार्गाने प्लॅटफॉर्म पोहोचण्यासाठी बरीच धावपळ करावी लागली. प्लॅटफॉर्म वर आम्ही पोहोचलो तेव्हा आमच्या पुढील प्रवासाची ट्रेन येऊन थांबली आम्ही रीजर्वेशनच्या आसन व्यवस्था प्रमाणे गटागटाने आपापल्या जागेवर जाऊन बसलो. 
सहलीसाठी घर सोडून आम्हाला जवळपास एक आठवडा झाला होता. त्यामुळे आता आम्हाला सर्वांनाच  परतीच्या प्रवासाचे वेध लागले होते. बंगलोर येथून दुपारी तीन वाजता आमची ट्रेन पुढील प्रवासासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाली. आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. प्रवासात रस्त्याने येणाऱ्या विविध स्टेशनची माहिती विद्यार्थी जाणून घेत होते, तर काही विद्यार्थी टाकल्याने झोपेचा आनंद घेत होते. आम्हाला मात्र आमची जवाबदारी झोपू देत नव्हती. 
                  आमची रेल्वे गाडी स्टेशनवर थांबल्यावर कुणी विदयार्थी खाली उतरला तर नाही ना याची काळजी आम्हाला घ्यावी लागत होती. रात्रीचे जेवण आम्हाला ट्रेनमध्येच घ्यावे लागले. जेवणानंतर मात्र आम्ही सर्वांनी स्लीपरकोचच्या रिझर्वेशनचा झोपण्यासाठी पुरेपूर फायदा करून घेतला. रात्रीचा प्रवास कोल्हापूर- पुणे - लोणावळा -मार्गाने करत आम्ही दुपारी दीड-दोन वाजता मुंबईला पोहोचलो. येथून पुन्हा नांदगावच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेने आमचा प्रवास उत्साहात सुरू झाला. संध्याकाळी आठ वाजता आम्ही नांदगाव येथे दीर्घ प्रवासाची आनंददायी सहल पूर्ण करून सुखरूप पोहोचलो. विशेष म्हणजे बहुसंख्य विद्यार्थी मित्रांची रेल्वे प्रवास करण्याची पहिलीच वेळ होती, तर काही विद्यार्थी पहिल्यांदाच आपल्या कुटुंबापासून दीर्घकाळासाठी दूर राहिले होते.सहल याशस्वीतेसाठी आमच्या विद्यालयाचे प्राचार्य श्री.श्याम पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली सहलप्रमुख श्री.बी.डी.बाराहाते, श्री.एस.व्ही.कदम, श्री.एस.जे.शिंदे, डॉ.श्री. बी.के.पवार, श्रीम.ए.के.महाले व श्री. व्ही.एस. कोल्हे  यांच्या अथक प्रयत्नाने व विद्यालयातून सहलीत सहभागी  सर्व शिस्तप्रिय विद्यार्थी मित्रांच्या सहकार्याने आमची  दक्षिण भारताची ही सहल आमच्यासाठी अविस्मरणीय अशीच ठरली....!🌹🌹🌹🙏🙏

🌹🌹 प्रवास माझा 🌹🌹
शब्दांकन- श्री. कदम एस.व्ही.
अ.वि.नांदगाव(नाशिक)

Comments

Popular posts from this blog

वाजे विद्यलाय-१

महाविद्यालयीन जीवनातील मित्र...!

नांदगाव भाग-5